मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा आहे?

प्रसंग : मला लवकरात लवकर काही कामानिमित्त स्टेशनकडे जायचं होतं म्हणून दादरवरून मी व मैत्रीणीने टॅक्सी पकडली... टॅक्सीचा मध्यमवयीन चालक सिगारेट ओढत होता. मी त्यांना सांगितलं काका, मला अॅलर्जीआहे, ५ मिनिटं सिगारेट नका ओढू प्लीज. तर आम्हाला म्हणाला, "मेरी टॅक्सी है, मै मेरी टॅक्सीमें कुछभी करूंगा, तुम्हे नहीं जमता है तो उतर जाओ!" आम्हाला घाई असल्याने झक मारत जावं लागलं.

प्रसंग : ४ दिवसांपूर्वी रिक्षेने घरी चालले होते... रिक्षेमध्ये जोरजोरात गाणी लावली होती म्हणून मी व इतरदोन सहप्रवाश्यांनी गाणी बंद करण्या स सांगितले, तर त्या रिक्षेवाल्याने उर्मटपणे म्हटले "गाने बंद नहीं होंगे, बैठना है तो बैठो!" आम्ही म्हणालो "आम्हाला नाही ऐकायचेत गाणी, तू नंतर ऐकत बस.." त्याने आधीचा उर्मट स्वर जराही कमी न करता शांतपणे सुनावलं,"तो फिर उतर जाओ" आम्ही उतरलो आणि दुसरी रिक्षा पकडून गेलो.

प्रसंग : माझा नवरा बोरीवली पश्चिमेकडील गो. रा. गांधी रेस्तराँमध्ये गेलेला... दुपारची वेळ आणि अज्जिबात गर्दी नसल्याने तिथील गारव्याचे टेबल पकडून त्याने ऑर्डर दिली. ऑर्डर घेऊन वेटर आल्यावर तेथील मालक म्हणवणार्‍या माणसाने नवर्‍याला उटून दुसर्‍या टेबलावर बसावयास सांगितले. तर नवर्‍याने सौम्य शब्दांत सांगितले गर्दी नाहीय ना, मग इथे बसलं तर काय प्रॉब्लेम आहे? तर म्हणाला, "क्या खिचखिच करता है, ये मेरा हॉटेल है! बोला है, वहापे बैठना है; तो बैठो, वरना चले जाओ!" माझा नवरा उठला नाही. त्याने सांगितलं इथे येऊन धंदा करायचा तर नीट करा. दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.

अर्थातच हे अनुभव मराठी माणूस म्हणून आलेले नाहीत, पण या अन्य भाषिकांची दादागिरी अंमळ वाढत चालली आहे.

हे आमचे अनुभव! असेच अनुभव इतरही अनेकांना येतच असतात. मराठी माणसाच्या मवाळपणाचा उदासिनतेचा, अलिप्तपणाचा गैरार्थ काढून त्याला गृहीत धरले जात आहे का?अन्य भाषिकांनी मुंबईमधील जागा उद्योगधंदे काबिज केले आहेत. रिक्षावाल्यांची, टॅक्सीवाल्यांची, हॉटेल हॉटेलवाल्यांची मुजोरी वाढतेय.. संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे देशभरातील कोणीही कुठेही जाऊन काम करणे कसे न्याय्य आहे हे अन्यभाषिक गळा काढून सांगतात. महाराष्ट्रात त्यांच्यावर कसा अन्याय होतो याचेही सहानुभूतीप्राप्तीसाठी रूदन करीत सांगतात. काही बिल्डींगमध्ये मांस-मच्छी खाणारे म्हणून मराठी लोकांना जागाही देणे नाकारले जातेय...
मुंबई खरंच महाराष्ट्राची आहे?? मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा आहे?


मराठी शाळांवर बंदी आली आहे. मराठी चित्रपटांना प्रदर्शित करवून घेण्यासाठी मल्टीप्लेक्स चित्रपटगृह मालकांशी झगडावं लागतं!!! मराठी माणसाने स्वतःच मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे.मराठी बोलणं हे स्वतः मराठी माणसालाच कमीपणाचं वाटू लागलं आहे... फळवाले, भाजीवाले, रिक्षावाले, नारळपाणीवाले, वेटर, दुकानदार इतकंच काय ट्रेनमध्ये भांडतानाही आपण हिंदी भाषाच नकळतपणे का वापरतो??

कोणीही यावे आणि मराठी माणसाला टपली मारून जावे यावर मराठी भाषिकांची स्वतःची भूमिका काय आहे? त्यावर अन्य भाषिक व मराठी नेत्यां च्या भूमिका अवलंबून आहेत! नाहीतर काही दिवसांनी मराठी माणसाला मुंबई ही महाराष्ट्राची आहे हे सिद्ध करण्यासाठी लढा द्यावा लागल्यास नवल नाही...

आपलं काय, वाचून विचार करणार आणि नेहमीच म्हणून सोडून देणार! आपण स्वतः तोडक्या मोडक्या बंबईया (मुंबईया नव्हे बरं का!!) हिंदी भाषेत बोलायचं; पडेल टाकाऊ हिंदी पिक्चरपण मल्टीप्लेक्सच्या गारव्यात पाहायचं नी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपटाच्या स्टेशनाबाहेरील पायरेटेड सीडीज आणून रविवारच्या टी. पी. साठी बघायचं; कोणा राज्यकर्त्यांनी मराठी साठी आंदोलन केलं या बातम्या वर्तमानपत्रात वाचून "मतं मिळवायचे धंदे" असल्या कमेंटसह चहाचे घुटके गिळायचे... या व्यतिरिक्त किंवा याच्यापेक्षा जास्त आपण करू तरी काय शकतो?? नाही का??

0 comments:

Post a Comment