आयडियाची व्हॅलेंटाईन्स डे ची नवी जाहीरात... "हॅ! बीस रूपयेका फ्लॉवर?? इससे अच्छा तो कॉलीफ्लॉवरही ले आते..." म्हातारी हेटाळणीच्या सूरांत म्हणते आणि जवळजवळ त्याच क्षणी तू चमकून माझ्याकडे पाहीलंस आणि एका डोळ्याने मी तुझ्याकडे! तुझी ती प्रतिक्रिया अपेक्षित होतीच मला! वर हसून म्हणालासही..."म्हातारी तुझाच अवतार दिसतेय!" मी हसले. तुझ्या अपेक्षित प्रतिक्रियेवर आणि त्या म्हातारबाबांच्या डिट्टो तुझ्यासारख्याच हताश प्रतिक्रियेवर!तू महागडं गिफ्ट आवडीने आणायचंस आणि मी टॅग चाचपडत "खूप महाग आहे नै.." असा आंबट चेहरा करत तुझ्या उत्साहावर विरजण घालायचं हे तर ठरलेलंच असतं. खरंतर आपण कित्ती वेगवेगळे आहोत ना... मी खूप्प गोडमिट्ट खाणारी आणि तू झणझणीत चमचमीत मसालेदार! तुला चायनीज प्रिय तर मला अज्जिबात आवडत नाहीत ते बुळबुळीत प्रकार... (अर्धी भीती की पॅक पॅक ऐवजी क्वॅक क्वॅक्/चींचीं किंवा मग अगदीच डरावचा एखादा बुळबुळीत लेग पुढ्यात येईल... विचारानेच पोटात ढवळलं बघ यॅक्क!!)
मला पंजाबी ग्रेव्हीवाल्या डिशेस आणि कुल्चा/पराठा/नान ऑल टाईम फेव तर तुला ते काजू, कांदा- टोमॅटोंच्या गोडूस ग्रेव्हीजचं वावडं! त्यामुळे हॉटेलात दोघांपैकी एकाला नित्यनेमाने खवय्येगिरीची इच्छा दडपून टाकावी लागते. तू काटेकोर स्वच्छतेवाला, परफेक्शनिस्ट आणि माझा आपला बागडबिल्ली गबाळखाना! तू ब्रँड कॉन्शस अगदी 'शूजपण वूडलँड्सचेच हवेत' कॅटॅगिरीवाला आणि मी मात्र श्शी ते कळकट्ट शूज २००० वाले वाटतात तरी कै? असं नाकं मुरडत ऑल सिझनची २५०-३०० वाली दादर पूर्वच्या एखाद्या छोट्याशा चप्पल स्टोअर मधून चप्पल घेणारी! तुझे ड्रेसेस मॉलमधले... मी मात्र 'जय हिंदमाता' वाली!!

आपल्या इवल्याश्या किचनमध्ये माझी झारे-चमचे-सुर्‍या आयुधांसह मारामारी चालू असताना तुझी अनावश्यक लुडबूड आणि हजारभर स्वच्छतेचे नियम कम सूचना मला फार इरिटेट करतात तर माझं दिवसभर सोशल नेटवर्कींगच्या साईटवर सतत 'माझे अभिनव विचार' पोस्टत पडीक असल्याने तुझ्या डोक्यात तिडीक जाते. खरंच आपण खूप वेगवेगळे आहोत ना! अगदी दोन ध्रुवांसारखे विरूद्ध स्वभावाचे! आपल्या नावांची आद्याक्षरं पण बघ 'S' आणि 'N' अगदी साऊथ आणि नॉर्थ पोल! यावर तू कौतुकाने म्हणालेलास, "अपोझिट पोल्स अ‍ॅट्रॅक्ट इच अदर!" आपलं अगदी तसंच आहे ना?

खुपदा विचार करते आपण एवढे वेगळे तरीही आपण एकत्र कसे? बर्‍याचदा या वेगळेपणातही साम्य जाणवतात... चंगोच्या चारोळ्या, सौरव गांगुली, फोटोग्राफीची, नाटकांची, क्रिकेटची, आर्ट आणि पेट्रिओटिक सिनेमांची आवड, छान काही वाचण्याची-पाहण्याची, फिरण्याची आवड, (कित्तीही नाकं मुरडली-शिव्या घातल्या तरी) तुझ्या प्रिय वपुंची फिलॉसॉफी, बरीचशी मतं-तत्वं आहेत मिळतीजुळती! आणि आपल्याला घट्ट जोडणारी लिंक आहेच त्याशिवाय का बर्‍याचदा तुला काही बोलायचं असताना मीच आधी ते बोलून टाकते...'तुमने मूंह की बात छीन ली...' असं नेहमी होतं. मग तरीही आपण बर्‍याचदा एकमेकांसाठी अनभिज्ञ का असतो? माझ्या बर्‍याचशा आवडीनिवडी तुला माहीतच नाहीयेत अजूनही ही माझी तक्रार तर तुला सध्या मी फार गृहीत धरते, तुझ्याकडे दुर्लक्ष करते ही तुझी तक्रार.

त्यादिवशी फेसबूकच्या माझ्या पेजवरील छान काहीसं सुचलेलं तुला वाचायला दिलंस तेव्हा नेहमीसारखाच भारावून गेलेलास, भावूक झालेलास. तुझ्या डोळ्यांतील हे भारावलेपण, माझ्याबद्दलच्या कौतुकाची चमक मला फार फार आवडते... पेज लाईक्सपेक्षा कित्येक पटींनी जास्त! मी पटकन बोलून गेले,"मला हे सगळं सर्वात आधी तुला वाचायला द्यायचं असतं रे, पण तू भेटतच नाहीस बघ हे लिहील्या लिहील्या वाचायला द्यायला..."
"मी असतो गं, तुझ्याकडेच वेळ नसतो माझ्यासाठी...!" मी चमकून पाहीलं तर तुझ्या डोळ्यांत दुखावलेपणाचं पाणी! क्षणभर माझ्या हृदयाचंच पाणी पाणे झालं...

खरंच रे... बाळ झाल्यापासून, टिव्ही आणल्यापासून, लॅपटॉप घेतल्यापासून आपण एकमेकांना खूप कमीवेळा भेटतो ना... खूप काही सांगायचं असतं मनातलं, काही लाडीक तक्रारी... प्लॅनिंग्ज असतात, स्वप्नं असतात, खूप काही शेअर करायचं... सारं सारं राहूनच जातंय का? गृहीत धरतोय एकमेकांना... आणि मग त्यातून गैरसमज! तू निदान मनातलं सगळं सांगतोस, मला जमतच नाही मनातलं सांगायला. त्यादिवशी सगळे लेख कौतुकाने वाचलेस, अचानक विचारलंस, "एकदा लिहीशील फक्त माझ्याबद्द्ल? माझ्यासाठी??"

तुझ्याबद्दल लिहावंसं?? काय लिहू? तुला ऐकायचं असतं माझ्याकडून तुझ्याबद्द्ल... बरंच काही!! जमतच नाही मला सांगायला... तुझ्याबद्दल आवडणारं, खटकणारं... कधी जमेल माहीत नाही! एवढ्याशा लेखात, आपलं वेगळेपण तरीही एकत्र असणं, आपलं नातं, चुकत माकत, धडपडत, एकमेकाला सावरत इथपर्यंत आलोय तो प्रवास, एकमेकांना जे काही भरभरून दिलं ते प्रेम कधी कधी दु:खंही... मावणार नाहीच सारं काही इथे! सांगायचंय तुला, जमेल तसं... जमेल तेव्हा... व्यक्त व्हायचंय तुझ्यापुढे! तुझं परफेक्शनिस्ट असणं, राग किंवा तक्रारही त्रागा न करता हळूवारपणे स्पष्टपणे मांडणं, तुझा देशाबद्दलचा अभिमान, तुझं अतिसंवेदनाशील असणं, तुझं छान माणूस असणं, गरीब-गरजूंना जमेल तितकी मदत करणं, माझ्यापुढे अगदी लहान मूल होऊन लाड पुरवून घेणं, गाल फुगवून तक्रारी करणं, आपल्या बाळाचा लाडका बाबा नव्हे आईच असणं (त्याला मी तर फक्त जन्म दिलाय, खरं आईपण - अतिकाळजीने निभावतोस तूच!) सगळं सगळं खूप लोभस आहे रे... सांगेन तुला हे सर्व कधीतरी थकून भागून घरी येशील, माझ्या मांडीवर डोकं ठेवशील, तेव्हा तुझ्या केसांतून हळूवारपणे हात फिरवत सांगेन ना... जमेल तसं.

माझ्या एका खूप खास मैत्रीणीने (ओळखलं असशीलच ती मैत्रीण कोण ते! बरोब्बर! सासूच तुझी!!!) सांगितलेलं, "नवरा लहान मुलासारखाच असतो, त्याला कधी कधी स्वतःचा खूप खास वेळ द्यायचा, त्याचे लाड-कोड पुरवायचे, विशेषतः आपल्याला बाळ झालं की त्याच्याकडे दुर्लक्ष अज्जिबात होऊ द्यायचं नाही!" तिचं म्हणणं पाळेन बरं मी तंतोतंत, न कंटाळता! कायम माझा पहीला मुलगाच राहा!! तुला बरंच काही सांगायचं असतं मला, माझ्याकडून ऐकायचं असतं... आजपासून तू घरी आल्यानंतरचा स्पेशल टाईम फक्त आणि फक्त तुझ्यासाठी!


आणि हो कधी सांगितलं नव्हतं पण गेल्यावर्षी तुझी छोटीशी डिट्टो कार्बनकॉपी मला गिफ्ट दिल्याबद्दल मी तुझी आयुष्यभर ऋणी राहीन. या वर्षीचा आपला व्हॅलेंटाईन डे फार खास असणारेय माहीतेय? आपल्या नात्याला दृढ करणारे, आपल्या हातांची गुंफण अधिकच घट्ट करणारे चिमुकले हात आपल्यासोबत असणारेत... सो हॅप्पी हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे!!!


-- स्वप्नाली वडके तेरसे

0 comments:

Post a Comment