१४ फेब्रूवारी, व्हॅलेंटाईन्स डे! पाश्चात्य संस्कृतीतील प्रेमिकांचा दिवस!! पण यावर्षी १४ फेब्रूवारी २०१३ याच दिवशी भारतीय संस्कृतीमधील प्रेमाचा देव कामदेव अर्थात मदन याचा जन्मदिवस! 'माघ शुक्ल पंचमी' हा कामदेवाचा जन्मदिवस 'वसंत पंचमी' म्हणून ओळखला जातो. वसंत पंचमीला दांपत्यसुखासाठी प्रेमाच्या, सौंदर्याच्या आणि शृंगाराच्या देवता 'कामदेव - रती' यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत या दिवसापासून वसंतोत्सवाची सुरूवात होते. ऋतूराज वसंत नवसृजनाचे, चैतन्याचे, आनंद- उत्साहाचे लेणे घेऊन येतो. रंगांची, गंधाची, प्रेमाची, चैतन्याची मुक्तहस्ते उधळण करीत येणार्‍या वसंताच्या आगमनाची तयारी म्हणून वसंतपंचमी या दिवशी संपूर्ण भारतभरात चैतन्याचे प्रतिक असलेल्या पिवळ्या रंगाची वस्त्रे परीधान करून आनंदोत्सव साजरा केला जातो. नवसृजनाचे, चैतन्याचे, प्रेमाचे प्रतिक असलेल्या वसंत ऋतूचा आणि कामदेवाचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणून प्रेमाचे प्रतीपादन करणार्‍या कामदेवाच्या जन्मदिवसास 'वसंत पंचमी' हे नाव!


कामदेव हा पाश्चात्य संस्कृतीमधील क्युपिडचाच भारतीय संस्कृतीतील अवतार! जणू शंकराच्या तिसर्‍या चक्षूतील क्रोधमयी अग्नीमध्ये भस्मसात झालेल्या कामदेवाने पाश्चात्य देशात क्युपिडबाळाच्या रूपाने अवतार घेतला. दोघांच्याही हातात हृदयाला प्रेमविभोरांनी घायाळ करणारे प्रेमबाण असतात.

तब्बल ४६ वर्षांनी १४ फेब्रूवारी या दिवशी व्हॅलेंटाईन्स डे व 'वसंत पंचमी' दिनानिमित्त दोन्ही संस्कृतींचा सुंदर मिलाफ झाला आहे. भारतीय काय किंवा पाश्चात्य काय दोन्ही संस्कृती प्रेमाचा संदेश देताहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन्स डे चे वावडे असणार्‍यांनी या वर्षी १४ फेब्रूवारी ला 'वसंत पंचमी' प्रेमदिन साजरा करण्यास हरकत नाही.
तशीही आपली संस्कृती प्रेमाचाच संदेश देते. मित्रांवर तसेच शत्रूंवरही प्रेम करण्याचा संदेश देते. आणि आपल्या संस्कृतीमध्ये प्रेमाचा अर्थ फक्त शृंगारापर्यंतच मर्यादित नाही. आपल्या संस्कृतीतील प्रेम जितकं रांगडं, रगेल- रंगेल आहे तितकंच राजस आणि लोभस, नाजूक आणि नजाकतदार, हळवं आणि हळूवार आहे. वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी, स्नेह, लळा, कळकळ, काळजी, धाक, आधार, भूतदया, कळवळा,माया, ममता, श्रद्धा, भक्ती, त्याग, समर्पण ही सर्व प्रेमाचीच रूपे! कृष्णाच्या प्रती असलेली राधेची भक्ती हे प्रेमाचेच रूप तर मीरेचे समर्पणही प्रेमच!

राधेच्या भक्ती कथांचे विवेचन सर्वत्र आढळते. पण मीरेचे समर्पण... याविषयी मायबोलीवर सुंदर विवेचन वाचावयास मिळाले. जवळपास सर्वच स्त्रियांच्या अंतरात एक मिस्टर राईट वा मिस्टर परफेक्ट दडलेला असतो. म्हणजे त्या मि. परफेक्टच्या ठायी असलेल्या अपेक्षित गुणांचे जिगसॉ पझल्ससारखे तुकडेच! भेटलेल्या प्रत्येक पुरूषामध्ये ती स्त्री आपल्या अपेक्षित गुणांचे तुकडे ठेऊन पाहते. सर्व तुकडे सांधले जाऊन मि. परफेक्टचं पूर्ण कोडं उकलतच नाही. पण त्यातील जास्तीत जास्त अपेक्षांचे तुकडे ज्यामध्ये बसतील त्याला ती आपला मि. परफेक्ट म्हणून स्वीकारते. पण मीरेचं तसं नव्हतं. मीरेने श्रीकृष्णालाच तिचा मि. परफेक्ट म्हणून निवडले. त्याच्याविषयी कुठलाही पूर्वग्रह वा अपेक्षा न बाळगता... त्याच्या सर्व गुणांनाच तिने मि. परफेक्टचे गूण म्हणून स्वीकारले. त्यामुळे तिच्या मनातील मि. परफेक्टची प्रतिमा आधीपासून परफेक्टच होती...परीपूर्ण, एकसंध, अभंग! ज्या प्रतिमेला ती परीपूर्णपणे समर्पित झाली. तिचा विरह, व्याकूळता, समर्पण यांतून अवीट मार्दव व माधुर्याची गोडी असलेली भक्तीगीते जन्मास आली. मीरेचा हा समर्पणभाव आपल्या ठायी येईल त्यादिवशी आपला मिस्टर परफेक्ट/मिस परफेक्टचा शोध संपूष्टात येईल.

म्हणून या वर्षी खर्‍या अर्थाने प्रेम करा... प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्या.
कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...
तुमचं आणि आमचं अगदी...


व्हॅलेंटाईन्स डे आणि 'वसंत पंचमी' च्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा!!

--- स्वप्नाली वडके तेरसे
('वसंत पंचमी' संदर्भ : लोकसत्ता, मुंबई वृत्तांत, मंगळवार, १२ फेब्रु. २०१३)

0 comments:

Post a Comment