प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!!
प्रत्येक व्हॅलेंटाईन डे ला ही कविता नक्कीच आठवत असेल ना?? हा प्रेमाचा संदेश देणारे आणि इतर अनेक विविध विषयांवरील लोकप्रिय कविता, चित्रपट गाणी, बालगीते, वात्रटिका, कथा लिहीणारे जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर यांचा आज ८२ वा वाढदिवस!

मंगेश केशव पाडगांवकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या समुद्राने वेढलेल्या अत्यंत निसर्गरम्य गावात झाला. मुंबई युनिव्हर्सिटीमधून कला शाखेमध्ये संस्कृत आणि मराठी विषय घेऊन विशेष प्राविण्य प्राप्त केले. त्यांच्या पत्नीचे नाव यशोदा असून डॉम अजित पाडगांवकर, अभय पाडगांवकर व सौ. अंजली कुलकर्णी अशी तीन मुले आहेत.

मुंबईमधील रूईया महाविद्यालयामध्ये त्यांनी काही वर्षे मराठी विषय शिकवला. मुळातच कलेची आवड, साहित्यकलेमधील आणि लेखनातील विशेष प्राविण्य आणि अवघड विषय रोचकपणे, रंजकपणे व सहजपणे समजावून सांगण्याची हातोटी यांमुळे ते विद्यार्थी मंडळींचे आवडते होते. १९७० ते १९९० या कालावधीमध्ये त्यांनी मुंबई मधील यु. एस. इन्फर्मेशन सर्वीस येथे संपादक म्हणून काम केले.
सुमारे ४० प्रकाशने त्यांच्या क्रेडीटवर दाखल आहेत. U.S. Library of Congress हे त्यापैकीच एक!

मंगेश पाडगांवकरांना अगणित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.१९५३ आणि १९५५ चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, १९५६ मध्ये एम. पी. साहित्य संघाचा पुरस्कार, "सलाम" या काव्यसंग्रहासाठी १९८० मध्ये साहित्य संघ पुरस्कार...२००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

पाडगांवकरांच्या मनाच्या अद्भूत गाभार्‍यातून अलगद लेखणीद्वारे झरून अन अरूण दाते यांच्या मधाळ विरघळणार्‍या स्वरांचा साज पांघरून जादुई शब्द तुमच्यावर मखमली तलम गारूड कसं करतात समजतही नाही. उदाहरणादाखल काही गाणी हवीत???

हिर्‍याप्रमाणे तेजस्वी आभेने चमकणारा शुक्रतारा, रात्रीचा गुलाबी शहारा आणणारा मंद वारा, आणि पिठूर चांदण्यातील तीचा मऊसर उबदार सहारा... आणखीन काय हवं?? हा हवाहवासा सहवास किती हळूवार रोमँटिकपणे शब्दबद्ध केलेय पाडगावकरांनी त्यांच्या "शुक्रतारा मंद वारा" या गीतात...
आणि प्रेमातील आर्तता मग ती "त्या"ची असो वा "ति"ची समर्थपणे पोहोचवण्याचं काम करावं ते पाडगांवकरांच्या "भेट तुझी माझी स्मरते" आणि "असा बेभान हा वारा" या गीतद्वयींनीच! अरूण दाते आणि लता मंगेशकरांच्या आर्त स्वरांचा साज लेवून या स्वर-शब्द संगमाने तुमच्या ह्रदयात हलकीशी कळ नाही निर्माण केली तर तुम्ही फार्रच अरसिक बुवा!

यांच्यातील आर्त प्रेमिक कवी कधी "अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी; लाख चूका असतील केल्या, केली पण प्रीती" (स्वरः अरूण दाते) अशी बेधडकपणे प्रेमाची कबूली देऊन टाकतो तर कधी प्रेयसीच्या भेटीमुळे आत्यंतिक आनंदाने अंतर्बाह्य मोहरलेला प्रेमिक "जेव्हा तीची नी माझी" असे जगाचे भान हरपून गाऊ लागतो... (स्वरः अरूण दाते) तर कधी "अशी पाखरे येती.." (स्वरः सुधीर फडके) असं भूतकाळातील हिंदोळ्यावर उदासपणे झुलत उसासे टाकत गुणगुणतो.

"माझे जीवनगाणे" समर्थपणे गुणगुणणारे (स्वरः पंडीत जीतेंद्र अभिषेकी), कधी "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असा आशावादी आश्वासक संदेश देणारे, तर कधी "धुके दाटलेले उदास उदास" (स्वरः अरूण दाते) असे फिकुटलेले उदास निश्वास टाकणारे शब्द यांचेच!

"भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी" (स्वरः अरूण दाते) यांच्या खेळातून मांडलेल्या लग्नाच्या अर्धवट डावातील अधूरी कहाणी, त्यातील आर्त हुरहूर समर्थपणे पोहोचवणारे शब्दही पाडगांवकरांच्याच समर्थ लेखणीतून उतरलेले आहेत.

कधी यांच्यातील प्रेमिक "शब्दाविना कळले सारे" (स्वरः पंडीत जीतेंद्र अभिषेकी) म्हणत "शब्द शब्द जपून ठेव" (स्वरः सुमन कल्याणपूर) असा मौलिक सल्ला देण्यास विसरत नाही.
कधी यांच्यातील तत्ववेत्ता "जग हे बंदीशाला, इथे न कोणी भला चांगला; जो तो पथ चुकलेला.." हे जीवनाचे गहन तत्व रहस्य सांगून जातो.

"दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे" (स्वरः अरूण दाते) असे एखाद्या अल्लड षोडशेला सप्तरंगी स्पप्नांच्या दुनियेत अलगद नेणारे पिसाहून हलके शब्द, "तिन्हीसांजा सखे मिळाल्या" म्हणून कातरवेळी सखीला दिलेली आर्त साद, "मेंदीच्या पानावर" (स्वरः लता मंगेशकर) अलवारपणे झुलणारे हळवे मन, "येरे घना येरे घना" म्हणून थेळ घनालाच आपल्या हळव्या कातावलेल्या मनाला फुलवण्यासाठी न्हाऊ घालण्याची व्याकुळ विनंती... कित्ती रूपे वर्णावी या शब्दसंपदेची!! भावगीतांतील अलवार, हळवा, आर्त, नाजूक, आरस्पानी, व्याकूळ, मोहीत, मधाळ भाव थेटपणे पोहोचवण्याचे शिवधनुष्य या शब्दसामर्थ्याने लीलया पेलले आहे.

"ही वाट दूर जाते", "झाली फूले कळ्यांची", "हात तुझा हातातून", "अनामवीरा", "जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा", "तुझे गीत गाण्यासाठी", "भावनांचा तू रे भुकेला मुरारी" ही भावगीत, भक्तीगीत, प्रणयगीत, देशभक्तीपरगीत ही विविधता हे पाडगांवकरांच्या लेखणीचे सामर्थ्य!

बालगीतांचा रूणूझूणू किलबिलाट व्यक्त करण्यासाठी पाडगांवकरांचे शब्द असतील तर ती बालगीते अधिकच लडिवाळ रूपडं लेऊन दुडदुडत कुशीत शिरतात...
"असावा सुंदर चॉकलेटचा बंगला", "शाळेला निघताना", "आजोबा म्हणतात फणस", "आणायची माझ्या दादाला बायको आणायची", "खोडी माझी काढाल तर", "पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा", "कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा" या सर्व बालगीतांच्या ग्रामोफोनच्या गोल काळ्या रेकॉर्ड्स अजूनही बाबांनी माझ्या लहानपणाच्या आठवणी म्हणून जपून ठेवल्या आहेत... त्या बालगीतांबरोबर मी बागडत बागडत बोबड्या स्वरांत केलेली किलबीलही त्यांच्या आठवणींच्या पोतडीत अजून ताजी आहे.

पाऊस हा सानथोरांप्रमाणेच पाडगांवकरांच्या जिव्हाळ्याचा विषय! "सांग सांग भोलानाथ", "पिरपिर पिरपिर पावसाची"," येरे येरे पावसा रूसलास का, माझ्याशी गट्टी फू केलीस का?", "आला आला पाऊस आला", "ए आई, मला पावसात जाऊ दे", "टप टप टप टप थेंब वाजती" या बालगीतांतून तसेच वर वर्णन केलेल्या "येरे घना येरे घना", "श्रावणात घन निळा बरसला", "बाहेर बरसती धारा रे"... आणि ही यादी अशीच पाऊस धारांप्रमाणे अखंड बरसत राहील... आपण डोळे बंद करून शब्दधारांमध्ये चिंब भिजायचं

जीवनावर भरभरून प्रेम करणार्‍या कवी मंगेश पाडगांवकरांचा आज जन्मदिवस!
सर्व मराठी रसिकांच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा!!!

0 comments:

Post a Comment