July 11, 2013

पाऊस खूप आहे आज... कोसळतोच आहे... मी बसलेय इतरजणींसारखीच... पावसाच्या झडींपासून अंग चोरत... एकेकजण येताहेत... चिप्प भिजलेल्या... ओढण्यांची टोकं पिळत, ड्रेस आणि छत्र्या झटकत... त्यांचे उडणारे थेंबही मी चुकवतेय.... आधीच आकसलेलं अंग अजूनच चोरून घेतेय ( जितकं जमेल तितकंच अर्थात.. :D ) त्या त्रासिकपणे म्हणताहेत "कित्ती पाऊसेय नै आज... श्शी बाई कंटाळाच आलाय..." पुन्हा त्राग्याने ड्रेसची ओलीचिप्प टोकं फडफडवणं... ते उडणारे तुषार शिताफीने चुकवत मी त्यांच्याकडे बघून हसते... थोडंसं ओळखीचं, थोडंसं अनोळखी, थोडंसं सांत्वनपर.. आणि खुपसं खुशीचं...! मी आज लवकर आलेली असते ना... इथेतिथे बघत टीपी करेपर्यंत "हा" धो धो कोसळायला लागतो... "वाचले बुवा!" माझं मन खुशीत मांडे खातं... चिप्प भिजून एसीच्या त्या बोचर्‍या थंडीत ओले कपडे अंगावर वाळवत बसायचं??? छ्या!!

रंगीबेरंगी ओल्याचिप्प गर्दीने ट्रेन फुगते... कोणी आडोसे शोधत दाराशीच उभ्या राहतात... कोणी खिडकीशी सुरक्षित अंतर राखत चिकटून चिकटून बसतात...एकमेकांना बिलगून तारेवर बसलेल्या भिजलेल्या पाखरांसारख्या...!
रोज विंडोसिट पकडायला धावणार्‍या आज उदार अंतःकरणाने विंडोसिट ऑफर करत होत्या...
थेंबथेंब पाणी गाळणार्‍या चिप्प छत्र्या खिडकीच्या हँडल्सवर विसावत होत्या... कॉलेजकन्यकांचा घोळका बाजूलाच चिवचिवत असतो... नव्या फ्रीलवाल्या छत्रीला ट्रेनमध्येच उघडून वर तीघींच्या डोक्यावर धरत फॅनखाली वाळवत असतो... स्वतःचे फंकी ट्रान्सपरंट सँडल्स दाखवत मग ते कुठून आणि कितीला मिळाले याचं साग्रसंगीत वर्णन करत... कॉलेजगर्ल्सला कुठल्याच विषयांचं वावडं नसतं ना... पावसाच्या थेंबासारखा एखादा विषय सापडावा आणि मग त्याचे हात धरून बाकीच्या थेंबांनी कोसळत राहावं संततधारेसारखं तशा कोसळत राहतात... मी हसते स्वतःशीच... तिथेच कोणीतरी हँडलवर चक्क ओढणी वाळत घातलेली असते... बायका म्हणजे ना... उपलब्ध सोर्सेसचा वापर आपल्याला हवा तसा कसा काय करायचा हे त्यांना कध्धीच शिकवावं लागत नाही.

इथे कोणी ऑफीसला जाणारी फॅशनेबल सुंदरी आपले लांबसडक केस हलकेच झटकते... खिडकी अन दरवाज्याच्या उरल्यासुरल्या फटीतून डोकावणार्‍या बाहेरच्या कित्येक भिरभिरत्या डोळ्यांना क्षणभर विश्रांती मिळते... काय म्हणत असतील मनात? "ना झटको जुल्फसे मोती...?" मी हसते पुन्हा स्वतःशीच!
तिथे कोणीतरी तल्लीनपणे आपले टप्पोरे डोळे काजळकाळे करण्यात गुंग असते... मग हळूच चिमुकला आरसा उघडला जातो... चिमुकला रूमाल चेहर्‍यावरून हलकेच फिरतो... आरश्याचे अँगल्स बदलतात चेहर्‍याच्या अँगल्सच्या प्रपोर्शन्मध्ये... मग एखादी सुखद गुलबट छटा नाजूक ओठांवर अलगद पसरते... ओठांच्या पाकळ्या एकमेकांशी मिटमिट करतात... हा सगळा शृंगारसोहोळा आजूबाजूच्या तोंड नी डोळे विस्फारून पाहत राहतात... काय विचार करत असतील मनात... "नटवी मेल्ली!!", "कित्ती सुंदर शेडंय नै? कुठल्या कंपनीची आहे पाहू... श्शीSS बाई दिसलीच नाही!!!", "ह्म्म आपल्यालाही अस्सं प्रेझेंटेबल राहायला हवं.... ठरवूनही ह्या कामाच्या धबगड्यात चिंबून जायला होतंय... स्वतःकडे लक्षच देता येत नाहीये... श्शी!!"
असंच काही बाही... आता मला थोडं जोरात हसायला येतं... कानात हेडफोनची ढेकणं कोंबलेली असल्याने माझ्या मेंदूच्या विकासावर वा विकारावर कोणी फारसा विचार करत नाही...

तेवढ्यात "ती" दिसते... कानात हेडफोन्स खुपसलेले... हातात मोबाईलचं धुड... आणि दरवाज्याच्या कोपर्‍यात स्टील बारला कवेत घेऊन लोंबकळत असते... तोंडावर प्रतिथयश गायिकेचे हजारो विभ्रम! स्वत:शीच मग्न... तालासुरात गाणं म्हणतेय कुठलंसं... दरवाज्याच्या फटीतून पाऊसझडी आत घुसखोरी करताहेत... हिला पर्वाच नाही... त्या झडींवर खुशाल चेहरा सोपवलाय... पाऊसझडी गालावर-नाकावर-कपाळावर थडाथड आपटताहेत... ही गातेच आहे... डोळे मिटून तल्लीनपणे... इथे बाकीच्या सगळ्याजणी मांजरीसारख्या अंग आकसून हाताचे पंजे उलटसुलट चेहर्‍यावर फिरवत शक्य तितकं कोरडं व्हायचा प्रयत्न करताहेत आणि ही बया खुशाल त्या पावसाला म्हणतेय... भिजव... आणखी!! वेडी कुठली... माझं स्टेशन आलं... मला जागा करून देत ती मागे सरकली... "उतरायचं नाहीये?" काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारते... जोरजोरात मान हालवत म्हणते "नाही.." "अगं मग?" मी हातानेच विचारते... ती गोडशी हसते... चेहर्‍यावरून ओघळणारे थेंब ओढणीनेच हलकेच पुसून काढते... मी जोरात हसते... आत खोलवर कुठेतरी छोटीशी वेदना सटपटते... का? कारण कळतच नाहीये... मी पुन्हा तिच्या कडे पाहते... ती दरवाज्यातून दिसणार्‍या आभाळाच्या तुकड्याला निरखत गातेच आहे... कसला मेघमल्हार आळवतेय कधीपासून कोणास ठाऊक! काय आहे माझ्या नजरेत... हेवा, अचंबा, कौतूक?? कळतच नाहीये... आत खोलवर कळ उमटतेच आहे...

स्टेशन दृष्टीपथात येतंय... उतरायचंय आता... मी पर्स, छत्री, ओढणी, स्वतः असा सगळा सरंजाम सावरते... आणि थोडीशी झेपावते दारातून बाहेर... पाऊस कोसळतच असतो... थोडे तुषार माझ्या चेहर्‍यावर धडपडत उड्या मारतात... मी मागे सरकायचा प्रयत्न करते पण मागे गड लढवणार्‍या मावळ्यांनी रस्ता बंद केलाय... पुढेच लढायचंय... मी नकळत डोळे मिटते... चेहरा आपसूक पुढे करते आणि म्हणते... भिजव... आणखी...! पाऊस खुशीत हसतो... झेपावतो आणि भिजवतो मला... मी भिजत राहते.. निशब्दपणे... कधीकाळचा तराणा भिजलेल्या ओठांवर अवतरतो... मी सूर पकडते, स्वतःच्याच नादात... चेहर्‍यावर प्रथितयश गायिकेचे भावविभ्रम आपसूक पांघरले जातात... मागून धक्के येताहेत... माझी समाधी भंग पावते... स्टेशन आलं वाट्टे... धुंदीत उतरते... उतरण्यापूर्वी आपसूक नजर "ति"च्याकडे वळते... ती हसते... खूपसं ओळखीचं!! मीही हसते... मोकळं, सैलावलेलं, स्वच्छ, निरभ्र!!

शब्द ओठातच घुटमळतात...तिला सांगायचे असलेले... "चार वर्षात पाहीलेली तू दुसरी वेडी! पाऊस बेभानपणे झेलणारी!! पावसाला बघून हसणारी... मला आवडतात, पावसाला बघून स्वतःशीच हसणारी माणसं!! आणि हो! पहीली वेडी... ती मीच गं!! कित्त्येक दिवसांनी सापडलेय... माझी मीच, मला, पुन्हा!!! थँक्स टू यू..."
माहीत नाही ती वेडी पुन्हा भेटेल की नाही... असेल कदाचित फेसबूक वर कुठेतरी... शेअर अन लाईक्सच्या साखळीत गुंतेलही कदाचित आणि मग ओळखीचं हसेलही स्वतःशीच, पुन्हा एकदा!!!

- स्वप्ना....
                  तळटीपः सॉरी लोक्स, पुन्हा पुन्हा एकच फोटो अपलोड करतेय... पण काय करू प्रचंड म्हणजे प्रचंडच आवडलाय मला तो... प्रेमातच पडलीये मी त्याच्या!

चित्र सौ. : elenakalisphoto.com

0 comments:

Post a Comment