"या कातरवेळी, पाहीजेस तू जवळी..."
धीरगंभीर सूर, ही हूरहूर लावणारी वेळ - या गाण्यातील चटका लावणारा आर्त स्वर, ती ओढ, तो विरह... तू असतीस तर असोशीने माझ्या गळ्यात हातांचा हार घालून तुझ्या पाणीदार डोळ्यांची नजरभूल घातली असतीस! हो, अगदी या वयातही! तुझा धबधब्यासारखा ओसंडून वाहणारा खळखळता उत्साह, हौशीनं आणि आपुलकीनं सर्वांचं करणं, कधी लहान मुलीसारखं उगीच छोट्या छोट्या गोष्टींसाठी फुरंगटून बसणं तर कधी माझ्यातील लहान मुलाचे सगळे हट्ट पुरवणं! खरंच, का गं गेलीस मला पोरकं करून? आयुष्यभराचा विरह देऊन???
अण्णांनी हलकेच अनुताईंच्या हसर्या छबीवरून थरथरता हात फिरवला. एवढावेळ पापण्यांशी झगडणारे मोती खळकन सांडलेच. नाक पुसायला नकळत गळ्यातल्या मफलरकडे हात वळला..."शीSS काय हे? रूमाल नाही का सापडला? आणि आता काय झालंय नाकाच्या सूरनळ्या ओढायला?" चिरपरिचित किनरा आवाज कानांच्या पडद्यांना गुदगुल्या करून गेला. छे! किती सवय झालेय हिच्या आवाजाची, अस्तीत्वाची, सोबतीची...! आता फक्त आठवणीच उरल्या आहेत.
थंडगार वारे बोचायला लागले तसं शहारत अण्णांनी गळ्याभोवतीचा मफलर कानांभोवती गुंडाळला. शालीची उब पांघर्त खिडकीची खिट्टी घट्ट केली. रेडीओचा आवाज कमी करून त्यांनी आपला मोर्चा झुलत्या आरामखुर्चीकडे वळवला. डोळे मिटून त्या खूर्चीवर झुलत जुन्या आठवणींना उजाळा देणे हा त्यांचा आवडता छंद होता. हिनेच आपल्या मागे लागून ही खूची घ्यायला लावली होती. पण पुढच्या आठवडाभरातच समजलं की बाईसाहेबांनी स्वतःसाठी घेतलेली ही खूची! आपण खूर्चीवर जरा टेकायला मोर्चा वळवला की धावत येऊन लहान मुलीसारखी स्वतःच पटकवायची खूर्ची आणि मग मस्त मांजरीसारखी डोळे मिटून त्यात झुलत बसायची. वर नाक उडवत म्हणायची,"झोपाळा बसवून घ्या म्हणून कध्धीपासून सांगत होते. ती हौस राहीलीच ना! आता काय बाबा- दुधाची तहान ताकावर भागवावी लागतेय!" तिच्या त्या आठवणीने सुरकुतल्या ओठांच्या घडीच्या कोनातून अलगद हसू सांडलं. खूर्चीकडे काहीवेळ पहात अण्णा तसेच थबकले... पुन्हा हिची जीवघेणी आठवण! छे! डोळ्यांमध्ये आपसूक गर्दी करू लागलेल्या अश्रूंमुळे चष्म्याच्या जाड भिंगांवर धुक्याचा पडदा तयार झाला आणि समोरच्या खूर्चीत झुलणारी धुसरशी इवली मूर्ती दिसू लागली. थरथरत्या हातांनी चष्मा काढत अण्णांनी मनगटांनी हलकेच पापण्या कोरड्या केल्या आणि मोठे डोळे करून निरखून पाहीलं - "हे काय हो अण्णा! तुम्हाला माहीतेय ना मला गोष्ट ऐकल्याशिवाय झोप ये नाही ते. आज एक नवीन गोष्ट सांगितल्याशिवाय मी नाही हं तुम्हाला झोपू द्यायची!" खूर्चीतल्या गोंडस आकृतीने ऑर्डर सोडली.
"माऊSS हे हे हे" सुरकुत्यांचं जाळं रूंदावत अण्णा तोंडभर हसले.
"काय चाललंय आमच्या लाडोबांचं? आधी खूर्चीतून उतर तर मग सांगतो हो तुला छानपैकी गोष्ट."
'ठमाबाई अगदी आजीसारखी लुच्ची आहे हो! खुर्ची पटकावते माझी!' त्यांनी माऊचं रेशमी बोचकं अलगद उचललं आणि आरामखुर्चीवर झुलता झुलता चिमणगोष्टी सुरू झाल्या.
..............................................................................................................................................................
सकाळची सोनहळदी उन्हं सांडायला लागली तशी अण्णांची झोप चाळवली. 'काल रात्री बराच वेळ डोळ्याला डोळा लागत नव्हता. किती वेळ कूस बदलत जागे होतो कोणास ठाऊक! आताशा तशी झोप कमीच झालेय म्हणा.' मुखमार्जन करून चहाची वाट बघत ते खिडकीशी बसले. सकाळचा वाफाळता चहा आणि प्रिंटींगचा वास येणारी कोर्या पेपराची घडी या स्वर्गसुखात सकाळी त्यांना कोणाचीही लुडबूड खपत नसे. त्यांच्या अर्धांगिनीला, अनूला, माहीत होतं ते. दात न घासता बेड टी घ्यायची सवय होती त्यांची.
"शीSS कसली मेली घाणेरडी सवय ती!" असं दहा वेळा सवयीने कुरकुरूनही सकाळी उठल्या उठल्या वाफाळत्या चहाचा कप सवयीने त्यांच्या हातात पडायचा;निदान - अनू असेपर्यंत तरी! आता - प्रितीला, त्यांच्या सुनेला सकाळी तारेवरची कसरत करावी लागते हे त्यांना माहीतच होतं. सकाळचा चहा-नाष्टा, अनिकेतच्या ऑफीसची तयारी, प्रितीचं स्वत:चं ऑफीस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माऊची शाळा! हो, ते एक मोठ्ठं प्रकरणच असायचं. रोज सकाळी माऊला उठवून शाळेची तयारी करणं म्हणजे एक दिव्यंच असायचं. एरवी अगदी गुणी बाळ असलेल्या माऊच्या, शाळेत जाताना काय अंगात यायचं कोणास ठाऊक!
'एवढा गूण मात्र अगदी बापाचा घेतलाय. अनिकेतनी काय कमी त्रास नाही दिला अनूला. बापरे! काय तो धिंगाणा काय ती रडारड!! बिचारी अनू! आपल्याला या सगळ्यातून अगदी अलिप्त ठेवायची. चहाची वेळ नाही चुकवली कधी. आई चिडायचीही तिच्यावर कधी कधी,"सूनबाई, कशाला एवढं लाडावून ठेवलंस नवर्याला? डोईजड होणारेय बघ तुला." अनू मात्र हसून सगळं साजरं करायची. दोन मुलांत तिसरं मूल म्हणून आपला गालगुच्चा घ्यायची. अगदी मुलासारखेच लाड केले तिनं. भजी खावीशी वाटतेय म्हटल्यावर कित्तेकदा अगदी ताटावरून उठून.... सूनेच्या बाबतीतला समजूतदारपणा आपल्याला तेव्हा पत्नीच्या बाबतीत दाखवायला का नाही जमला? की जाणवलीच नाही अनूची तारांबळ? तिला गृहीतच धरत आलो का आपण नेहमी?'
'आपला स्वभाव तसा आत्ममग्नच - बराचसा रिझर्व! अनूच्या अगदी विरूद्ध! फसफसणारी शॅम्पेन म्हणायचो आपण तिला. खाण्याची प्रचंड आवड तशीच खिलवण्याचीही. एकूण एक हॉटेल, रेस्तराँ, ढाबे पालथे घातलेले. कुठून कुठून शोधून काढायची - अमूक एक डिश या हॉटेलात झकास मिळते आणि तमूक रेस्तराँची ही ही स्पेशालिटी आहे. आणि मग तशा प्रकारच्या डिशेस घरी करायचा खटाटोप आणि आम्ही गिनीपिग! जमायचाच बर्याचवेळेस, पण आपणच मस्करी करायचो. तिला चिडवायला खूप आवडायचं आपल्याला.'
'अनू दिसायला तशी साधारणच! आपण त्यामानाने खरंच देखणे होतो. कॉलेजात असताना कितीतरी लाजर्य नजरा पुन्हा पुन्हा आपल्याकडे वळायच्या.' अण्णांना त्या विचाराने आताही हसू आलं. 'गालात हसू घोळवत आपण दुर्लक्ष करायचो. अनू मात्र आईची पसंती. लाडाने अगदी तिचं नावही आईनेच ठेवलेलं 'अनुप्रिया'! अगदे वेगळं आणि लोभस नाव. आत्या मात्र म्हणालेली तेव्हा,"नावाइतकी काही सुंदर नाहीये हं! आपल्या श्री ला कशी गोजिरवाणी बायको मिळायला हवी होती." पण आईने अनुमध्ये काय बघितलेलं तिलाच ठाऊक. ती मात्र ठाम होती - हीच सून हवी या निर्णयावर. आणि अनू माझी अर्धांगिनी झाली - सर्वार्थानं. अपोझिट पोल्स या तत्वाला अनुसरून अगदी विरूद्ध स्वभाव असूनही मेड फॉर इच अदर म्हणावं अशी आमची जोडी होती. आपण मात्र तिला धम्माल चिडवायचो.
आपल्याशी ती भांडायला लागली की मुद्दामच मोठ्याने बोलायचो,"आई, अगं काय ध्यान बांधलेस माझ्या गळ्यात! हिच्यापेक्षा बर्या मुली अजूनही माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेत." पण अनू कसली खमकी!
"हो, ती उलट्या पंखाची कोंबडी असेल तय्यार! बघावं तेव्हा चिकटलेलीच असते नुस्ती. मागच्या ऑफीस पार्टीला पाहीलं नं."
ही मुक्ताफळं ऑफीसातल्या कलिगसाठी! अरे बापरे! तिला तर रोज नवनवीन उपाध्या मिळायच्या - भवानी काय, ढालगज काय, झिपरी वानरीण काय, सफेद चिचुंद्री काय! प्रत्येक उपाधीबरोबर हिच्या नाकाचा शेंडा लालीलाल होई. अगदी क्वचित प्रसंगी डोळ्यात पाणीही डोकवायचं पण तिचे डोळे मूलतःच एवढे पाणीदार होते की समोरचा सहज त्यात विरघळून जावा. अपार भावूक, हसरे आणि सुंदर होते तिचे डोळे. सतत एक खोडकरपणाची, आनंदाची चमक त्यात डोकवत असायची. तिचे हे भावस्पर्शी डोळे तिच्या सामान्य चेहर्याला असामान्य सौंदर्य बहाल करायचे. तिच्या त्या खोडकर, भावूक, चमकदार डोळ्यांची मला नेहमीच भूल पडायची. माऊच्या डोळ्यांत मला हीच चमक जाणवते - निरागस, उत्साही, खोडकर चमक!'
अण्णा, चहा!" अण्णांची विचारशृंखला क्षणभर खंडीत झाली.
"प्रिती, आवरलं का माऊचं?"
"हो, बघा ना काय त्रास देते कार्टी! रोजचा गोंधळ नुसता. तुम्ही बघता नं किती घाई होते ती सकाळी? अण्णा, सॉरी हं, तुमच्या चहाला आजपण उशीर झाला. केव्हा उठलात? आजचा दिवस हा सँडविचवाला नाष्टा अॅडजस्ट करा ना प्लीज. मला माहीतेय तुम्हाला ते ब्रेड्स नाही आवडत, पण- खूप उशीर झालाय हो ऑफीसला जायला. आणि हो, मटकीची उसळ केलेय. डाळभाताचा कुकर पण उतरवलाय. दुपारी पोळ्यांची बाई येईल. तीच तुम्हाला जेवण गरम करून वाढेल. निघू का मी? काही हवंय? अजून अंघोळपण राहीलीये हो! या अनिकेतला आईंनी नुसतं लाडावून ठेवलंय. इकडची काडी तिकडे करता येत नाही. किती धावपळ होते माझ्या एकटीची!"
'प्रितीपण एक धबधबा आहे. बोलायला लागली की सुसाट एकटीच बोलत सुटेल. तिचीपण बिचारीची तारांबळ उडते. गुणी आहे पण पोर. जास्तीत जास्त जमेल तितकं करायचा प्रयत्न करते. आणि काय काय सांभाळेल ती तरी? घरची कामं, ऑफीसचं टेन्शन, माऊची शाळा आणि पुन्हा कोणाची मदत नाही. अनू होती तोपर्यंत ठीक होतं. अनिकेतलाच काय आपल्यालातरी कुठे येते इकडची काडी तिकडे करता? अनूने खरंच लाडावून ठेवलेय आम्हा दोघांना. एकदा तर वैतागून बोललीही होती अनू " खुश्शाल करा हं दुसरीशी लग्न! सगळी कामं स्वतःची स्वतःला करावी लागतील तेव्हा समजेल. आई बरोबर बोलायच्या. माझंच चुकलं, फार लाडावून ठेवलेय मी तुम्हाला. मी गेले की आपोआप शिकाल स्वतःची कामं करायला!"
'फार दुष्टपणा करायची अनू! माहीत होतं नं माझा वीक पॉईंट काय आहे ते! तिच्याशिवाय जगण्याचा तर मी विचारही करू शकत नव्हतो. आपसूक डोळ्यांत पाणी यायचं तेव्हाही.'
"काय झालं नाकाच्या सुरनळ्या वाजवायला? जरा काही बोलायला नको. मला किती ऐकवत असता दिवसभर? मी पण रडू का मुळूमुळू? आणि ते नाक पुसलेले हात सोफ्याला नका पुसू! रूमाल नाहीये?"
'काय झालंय आपल्याला? का तिचा आवाज सतत कानात घुमतोय? आजकाल आधीपेक्षाही जास्तच हळवं झालोय का आपण? अनू, कसा राहू गं तुझ्याशिवाय? कधी विचारच नव्हता गं केला.' समोरचं सँडविच चिवडत अण्णांनी हताशपणे मान हलवली.
'उपमा! अनूच्या हातचा उपमा तर उडप्याच्या हॉटेलातही मिळायचा नाही. साजूक तुपात खमंग भाजलेल्या, झणझणीत मिरची, हिंग, कडीपत्ता, जिर्याची फोडणी मारलेला, टोमॅटोचा गुलाबी रंग चढलेला लुसलुशीत उपमा! वर तळलेल्या शेंगदाण्यांची आणि बारीक शेव, कोथिंबीरीची पखरण! आहा, काय स्वर्गीय सुख होतं ते!' एक हताश उसासा आपसूक तोंडातून निसटला. समोरचा चहा ही निवला होता एव्हाना.
'गारढोण चहा पोटात ढकलावा लागणार बहुतेक. फार कंटाळा आलाय चहा गरम करून घ्यायचा.' एक दीर्घ सुस्कारा सोडून अण्णा खिडकीतून बाहेर पाहायला लागले.
बाहेर पेरूचं एक डेरेदार झाड होतं. पेरू खायला रोज वेगवेगळी पाखरं यायची. 'अनूला कचकचीत अर्धे कच्चे पेरू खूप आवडायचे. अरूंधतीच्या वेळेला तिला पेरूचेच डोहाळे लागलेले. पोपटांनी उष्टावलेले पेरू शोधून शोधून काढायला लावायची. तेव्हा त्या गर्द पर्णराजींतून पेरू चटकन सापडतच नसे. आताशा पानगळ सुरू झाली होती. शिशिर ऋतूच मोठा जीवघेणा! पानगळतीने अधिकच विदीर्ण, एकाकी करणारा!! या झाडाला समजेल का ही पानगळती? एकेकाळी रसरशीत फळांचं नी गिच्च हिरव्या पर्णराजींचं वैभव मिरवणार्या पर्णहीन वृक्षाकडे आता ही पाखरे पाठ फिरवतील. त्या अकाली वठलेल्या वृक्षाला हा जीवघेणा एकाकीपणा सहन होईल?'
'अं... बेल वाजली वाटते. पोळ्या लाटणार्या बाई आल्या असतील. वातड असतात त्या पोळ्या. पीठपण जास्त लावलेलं असतं. प्रितीला सांगावं का? हल्ली चावता येत नाहेत त्या पोळ्या- मला आपला डाळ भातच करत जा म्हणून! अनूच्या हातच्या मऊसूत पोळ्या फार आठवतायंत. ती एक गंमतच होती म्हणा. लग्नानंतर कुठे काय जमायचं अनूला स्वयंपाकाचं विशेष? पोळ्या तर असे एकेक नकाशे करून ठेवायची, हरे राम!' अण्णा त्या आठवणींनी स्वतःशीच खुदखुदले.
'जाम खेचायचो आपण त्यावरून- "भारतातले नकाशे संपले वाटते आता. अरे वा! विदेशी नकाशे चालू केले? छान! प्रगती होतेय! चांगलंय!"
पण अनू मात्र मोठी जिद्दीची! महीनाभरातच नकाशे जाऊन पृथ्वीसारख्या गोल, छान मऊसूत पोळ्या करायला शिकली. खवय्यी तर होतीच ती, त्यामुळे नवनवीन पदार्थ करून पाहायचा कोण उत्साह! पण एकदम मूडी होता कारभार! कधी कशावरून बाईसाहेबांचं बिनसेल सांगू शकणार नाही. चायनीज आणि त्यातल्या त्यात नॉनव्हेज डिशेस आपले टेस्टींग बड्स चाळवणारं. अनूचा आणि चायनीजचा मात्र छत्तीसचा आकडा! तरी बिचारीने आपल्या एका वाढदिवसाला कौतुकाने चायनीजचा घाट घातला होता. घाट कसला - हाSS पसारा! वेज मंचुरियन चायनीज! आणि मग तो प्रयत्न फसल्यावर मंचुरियन बॉल्सचे मस्तपैकी मंचुरियन थालिपीठ विथ करी करून टाकलं. वर ठस्क्यात सांगून टाकलं पिंक ड्रॅगनवाल्याला नवी रेसिपी देऊन याचं पेटंट घेणारेय! मी आणि अनिकेतने चेष्टा केल्यावर रूसून बसलेली. आणि मग समजूत काढता काढता माझी पुरेवाट! ह्म्म नंतर बाईसाहेबांनीच कधीतरी रंगात येऊन स्वतःला मनवण्याचा उपाय सांगितलेला - मिडलक्लास बायकोला नवर्याकडून फार काही नको असतं. एखादं आईसक्रीम, मोगर्याचा गजरा, कौतुकाचा कटाक्ष आणि प्रेमभरले चार शब्द! आठवणीने बायकोचा वाढदिवस लक्षात ठेऊन सरप्राईज गिफ्ट म्हणून साधीशी साडीसुद्धा चालते हो! बस्स! खरंच बस्स? एवढंच? आपण उगाच त्यांना कॉम्प्लीकेटेड समजतो. '
'माझी अनू खूप साधी होती. काही अपेक्षा नव्हत्या तिच्या. असेल त्यात समाधान मानायची. साधे साधे छोटे छोटे हट्ट. तेदेखील पुरे व्हावेतच असा अट्टाहास नाही. फार हौशी! पण मुलं झाल्यापासून कधी तिला तिला साधं दोन तासांवरच्या हिलस्टेशनला फिरायला घेऊन जाऊ शकलो नाही. पोरांच्या शाळा, आजारपणं, कसल्या कसल्या स्पर्धा परीक्षा, आईचं आजारपण, माझ्या ऑफीस टूर्स! तिची हौस राहूनच गेली असेल. बोलूनच दाखवलं नाही कधी... की आपणच विचारलं नाही?'
"अण्णा, जेवण गरम केलेय. वाढू का आत्ता?" पोळीवाल्या बाईंच्या किनर्या हाकेने अण्णांची तंद्री तुटली.
"अरे बापरे! एकवेळ बायकोला समजून घेणे एवढं कॉम्प्लीकेटेड नसेल पण हे जेवण घशाखाली ढकलणं म्हणजेSSS... चला श्रीनिवासराव, आलिया भोगासी..." असं पुटपुटत अण्णा डायनिंग टेबलाकडे वळले.
'दुपारच्या गोळ्याही घ्यायच्यात अजून. जेवल्यावर लवंडावं जरासं!' रिटायर झाल्यानंतर सकाळचा मस्त चहा नी भरपेट नाश्टा, सोबतीला पेपरच्या बातम्या, दुपारी अनूच्या हातचं गरम गरम जेवण जेऊन तृप्त व्हावं नी सुस्त होऊन अख्खी दुपार वामकुक्षीचं स्वर्गसुख अनुभवावं बस्स एवढाच होता त्यांचा दिनक्रम.
जेमतेम पाऊण पोळी खाऊन अण्णांनी बाकीचं आवरून ठेवलं. बाई मगाशीच गेलेल्या. अंथरूणावर पाठ टेकली, पण डोळा काही लागेना. ह्या कुशीवरून त्या कुशीवर अस्वस्थपणे हालचाल करून झाली, पण छे! अनूच्या आठवणी काही पिच्छा सोडायला तयारच नव्हत्या. खरंतर तिच्या आठवणीसुद्धा तिच्यासारख्याच -हव्याहव्याशा, सुखद! पण जीवघेण्या!! विरहाची, एकटेपणाची प्रकर्षाने आठवण करून देणार्या!
'कुंकवाचा धनी जेव्हा एकटाच पुढे निघून जातो तेव्हा त्या बाईचं अस्तीत्व संपलं, तिचा आधार गेला म्हणून सगळे हळहळतात. पण खरं तर ती बाई स्वतः फार लवकर सावरते. दु:ख तर होतंच- एवढ्या वर्षांच्या सहवासानंतरच्या विरहाचं; पण बाई संसारात, मुलाबाळांत, नातवंडांत मन रमवते. तिची ती नाळ कायम असल्यामुळे की काय, पण हा जीवघेणा एकटेपणा तिला त्यामानाने कमी जाणवत असावा. संसाराच्या धबगड्यात स्वतःच्या छंदांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता ती काहीशी मोकळी होते, स्वतःसाठी पुरेसा वेळ देऊ शकते. वाचन, देवपूजा, मैत्रीणी वगैरे! पण एखादा पुरूष त्याच्या बायकोच्या विरहाने किती एकटा पडतो, असहाय होतो याची कल्पना फक्त तोच करू शकतो. नोकरीच्या निमित्ताने तसं बायको संसाराच्या धबगड्यापासून अलिप्तच ठेवते, त्यातून अनूसारखी सगळं हातात नी बोटात ठेवणारी बायको असेल तर मग काय विचारायलाच नको!'
'अनू, अनिकेत गुणी आहे गं आणि आपली प्रितीसुद्धा! खूप काळजी घेतात गं माझी! घरातील सणवार, रात्रीच्या एकत्र जेवणाच्या वेळच्या गप्पा, माझी औषधं - धावपळीच्या आयुष्यातही जमेल तितकं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मागच्या वाढदिवसाला दोघं मला आग्रहाने नाटकाला घेऊन गेलेले. आपली अरू आणि जावईही येतात वर्षा-दोन वर्षातून भारतात! त्यांच्याही तिथल्या नोकर्या-प्रोजेक्ट्स! काय काय छान आणते अरू तिथून. मागच्या वेळेस येताना मस्त क्रीम कलरचा पोलो नेकचा टी शर्ट घेऊन आलेली. छान दिसतो हो मला! आणि आपली माऊ - तुझी "पालवी". फार लाडाने ठेवलेलंस ना तिचं नाव? तू आम्हाला सोडून गेलीस तेव्हा फारतर चार्-पाच महीन्यांची असेल ती! अगदी गोंडस गोडंबा आहे गं! अगदी तुझी कार्बनकॉपी! ठमाबाई अगदी तुझ्यासारखी नाक उडवत ऑर्डरी सोडत असते बरं! आणि सगळा जोर, सगळे हट्ट माझ्याकडेच! तसं सगळं आलबेल आहे गं अनू, पण - का कुणास ठाऊक मन कशात रमतच नाही बघ. सारखं तुझ्या आठवणींच्या जंगलात पळू पाहतं. घायाळ होतं, कळवळतं पण फिरून पुन्हा तुझ्याच विरहाच्या कोषात अडकून राहू पाहतं.
त्या चंगोच्या चारोळी सारखं - 'माझ्या प्रत्येक क्षणात तुझा वाटा अर्धा आहे,
भूतकाळ आठवायचा तर तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे!'
'अनू, तू माझं अस्तीत्व होतीस. माझं सर्वस्व! मी कधी विचारसुद्धा केला नव्हता की तुझ्याशिवाय जगण्याची वेळ माझ्यावर आली तर मी काय करेन. मुळात तुझ्याशिवाय कधीकाळी रहावं लागेल हाच विचार कधी माझ्या मनाला शिवला नव्हता. मला खात्री होती - आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्यावर इमानेइतबारे तू त्या पाळशीलच! का इतकी सवय लावलीस तुझ्या सहवासाची की तुझ्या सोबतीची गरज भासावी?'
"ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे
तरी मन तुझी वाट पाहणं सोडत नाही
मी ही म्हणतो जाऊ दे
मी त्याचं मन मोडत नाही..."
'पुन्हा चंद्रशेखर गोखलेची चारोळी!! या चारोळ्या मला तुझ्या आठवणींत रमवण्यासाठी आहेत की आठवणींनी मारण्यासाठी? छे! इतक्या कश्याकाय रिलेट होताहेत माझ्या मनःस्थितीला? सोबत करताहेत माझ्या उदास एकटेपणाला... गोंजारून अधिकच गडद जीवघेण्या करताहेत तुझ्या आठवणींना!!!'
'छे! आता कसली झोप येतेय!' अण्णा अस्वस्थपणे धडपडत उठले. अस्वस्थपणे दोनचार येरझार्या घातल्यावर ड्रॉवरमधून अलगद डयरी बाहेर काढली. अनूनेच गिफ्ट दिलेली. नेहमी तक्रार करायची,"तुम्ही मनमोकळेपणानी काही बोलत नाहीत. सगळ्या गोष्टी मनातच ठेवता नेहमी." आणि मग नवीन वर्षाचा संकल्प सोडायला लावला,"मनात जे काही येतं ते लिहून तरी ठेवत जा." अण्णांनी हळूवारपणे त्या डायरीवरून हात फिरवला. डायरीचे काही पानं हलकेच उलटली. भूतकाळाची पानेही अलवारपणे उलगडली गेली. मनातलं विशेष काही लिहीलंच गेलं नव्हतं. काही आवडणार्या चारोळ्या, कविता आठवतील तशा, जमतील तशा!
"कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी;
ती साथ गमावण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यांतून अश्रूंची सर ओघळावी..."
त्या वळणदार अक्षरांना अलगद कुरवाळताना अश्रूंची सर खळकन ओघळलीच आणि मग उमाळ्यांमागून उमाळे! अण्णा गदगदून हुंदके देऊ लागले. 'साथ गमावण्याची भीती? मी ती भीती मूर्तीमंत अनुभवतोय गं अनू!' अण्णांनी कळवळून साद घातली. काही काळ तसेच निशब्द बसून राहीले. ओघळलेले अश्रू पुसायचेही भान राहीले नव्हते. दु:खाचा उमाळा ओसरल्याव्र डायरीची आणखी काही पाने उलटली."तू गेल्यावर वाटतं, खूपसं सांगायचं होतं;
तू खूपसं दिलंस तरी आणखी मागायचं होतं..."
'अनू, तू खरंच खूप भरभरून दिलंस मला आयुष्यात. अनिकेत आणि अरूंधतीसारखी गुणी मुलं, एक सुखी समाधानी संसार, प्रेमळ उबदार सहवास, खंबीर आधार - आणि न मागता दिलास तो नकोसा विरह! परत ये अनू, खरंच परत ये. तुझा श्री एकटा आहे गं! आपल्या माणसांच्या गर्दीतही तुझ्या आठवणी पोरक्या करतात गं मला.'
दाराची कडी वाजली तशी अण्णांची विचारशृंखला पुन्हा खंडीत झाली. 'अरे बापरे! किती वाजले? केव्हापासून असाच बसून आहे. दुपारच्या गोळ्याही राहील्या घ्यायच्या. आत्ता कोण असेल बरं?' डायरी घाईघाईने ड्रॉवरमध्ये ढकलून अण्णांनी आपला मोर्चा हॉलमध्ये वळवला. कडी वाजवणार्याला धीर नव्हता. "अरे हो आलो आलोSS" अण्णा दार उघडतात न उघडतात तोच वावटळ - अक्षरशः वावटळ घरात घुसली! "अगं अगं, माऊ, पडशील गं पोरी!"
"आज्जोSS" करून ते गोडूलं गळ्यात पडलं तसे मगासचे सर्व नैराश्यवादी विचार जणू वितळून गेले त्या रेशमी उबदार मिठीत!
'ह्म्म! बाईसाहेबांचा मूड जास्तच छान दिसतोय - आज्जो बिज्जो म्हणताहेत मॅडम! स्कूलमधल्या गमतीजमती ऐकवण्यासाठी हक्काचा माणूस हवा असणार! 'माहीतेय अण्णा, आज किनई आमच्या मिसने अमूक अमूक सांगितलं' किंवा 'ती सायली माहीतेय फार भाव खाते फर्स्ट प्राईझ मिळाल्यापासून!' नाहीतर मग 'पार्थच्या पप्पांची ट्रान्सफर झाली ना, आता तो जाणारेय आमचं स्कूल सोडून!' असंच काही बाही... सगळी गोडूली गुपितं आणि तिचे टप्पोरे पाणीदार डोळे मोठ्ठे मोठ्ठे करत हातवारे करत सांगण्याची मजेदार खूबी - सगळंच खूप खूप लाघवी असे.
"चला पिल्लू, आधी फ्रेश व्हा, जेऊन घ्या पटदिशी.. मग पोटभर गप्पा! काय?" अण्णांनी तिचा युनिफॉर्म बदलत म्हटलं.
"शीSS मला कंटाळा आलाय त्या पावडर गंध वाल्या पोळ्यांचा!" माऊ कुरकुरली.
"काय! पावडर गंध्?"अण्णांनी हसतच विचारलं.
"तर काय? पिठाने भरलेल्या नी काळे काळे डाग असलेल्या! तुम्ही कसे खाता त्या पोळ्या? कंटाळा नाही येत? अम्म त्यापेक्षा मला बोर्नव्हिटा चालेल आज!" हातपाय धुवत माऊने ऑर्डर कम सूचना केली.
अण्णांनी थोडं बटर लावून पोळी शेकवली. त्यावर मटकीच्या उसळीचं सारण लावून वर थोडंसं टोमॅटो केचप लावलं, वर चीज किसून टाकलं. त्या पोळीचा रोल आणि बोर्नव्हिटाचा ग्लास पुढ्यात ठेवत माऊची गंमतीदार किलबील ऐकायला ते सज्ज झाले.
............................................................................................................................................................
"अरे या झाडाला कीड लागलेय की काय? नाहीतर पेरूचं झाड इतकं शुष्क निष्पर्ण नाही होत सहसा! बारमाही फळ ते!" खिडकीतून बाहेर बघत अण्णा पुटपुटले.
"कुणास ठाऊक! पानगळ चालू आहे नं? बरं तुम्ही नाश्ता करून घ्या अण्णा. मी आज मस्त कांदापोहे केलेत बरं तुम्हाला आवडतात तसे. भरपूर ओलं खोबरं कोथिंबीर घालून! शेव हवेय का वरून?" प्रितीने नाश्त्याची बशी नी चहाचा कप टेबलावर ठेवत विचारले.
अण्णा स्वतःच्याच विचारात हरवलेले. एवढ्यात मांडीवर उबदार बोचकं धप्पदिशी पडलं.
"अगं माऊ, उठलीस का? आणि आवरायचं नाहीये का गं?" तिचं अपरं नाक बोटांच्या चिमटीत पकडत अण्णा बोलले.
"हे हो काय अण्णा, विसरलात? आज सॅटर्डे! आमच्या स्कूलला आज बुट्टी!"
"अच्छा बुट्टी तर बुट्टी! मग काय आहे बरं बाईसाहेबांचा आजचा प्लॅन?"
"आत्ताच तर स्कूल चालू झालेय. यावेळची सुट्टी कसली बोर गेली ना. बाबाला वेळच नव्हता. बाहेर कुठ्ठेच नाही घेऊन गेला" गाल फुगवत रूसक्या स्वरात बाईसाहेब कुरकुरल्या. "अम्म, तसा प्लॅनबिन काहीच नाहीये आत्ता! आपण थोडावेळ खिड्कीत बसूयात."
"माऊSS, ब्रश करून ये, पोहे देते तुला." आईच्या हाकेकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत पिल्लू अण्णांच्या हातावरच्या सुरकुत्या चिवडत बसली.
"अण्णा काय हो बघताय एवढावेळ त्या झाडाकडे?" हातांच्या चिमुकल्या घडीवर कलती मान ठेवत तिनं विचारलं.
"काही नाही गं पोरी, एवढा तगडा, कालपरवापर्यंत मस्त लगडलेला वृक्ष पार वठून गेलाय गं!" अण्णा थोडं स्वतःशी थोडं माऊशी बोलल्यासारखं पुटपुटले.
"ह्म्म आत्ता त्याच्याकडे पेरू नाहीयेत ना, मग पक्षी येत नाहीत खाऊ खायला. त्याला कित्ती एकटं एकटं वाटत असेल ना?" कोपरं खिडकीच्या कठड्यावर टेकवून चिमुकल्या हातांच्या ओंजळीत निरागस चेहरा जमेल तितका गंभीर करून माऊ पुटपुटली.
अण्णांनी चमकून तिच्याकडे पाहीलं, 'पोरगी कधी कधी वयाला शोभणार नाही अशी बोलते चुरूचुरू!'
"खरंय गं पोरी! म्हातारा झालाय तो वृक्ष!!"
"हॅ! आता थंडी संपली की मग पाऊस येईल. मग पाऊस पडला की थोड्या दिवसांनी पुन्हा त्याला पेरू येतील. ते पेरू खायला खूप सारे पक्षी येतील. आम्ही पण जाऊ पेरू काढायला. मग त्याला नाही एकटं वाटायचं. मग ते झाड पुन्हा तरूण होईलच ना..." हातवारे करत माऊ चिवचिवली.
अण्णा काही बोलायच्या आत अचानक एका जोराच्या थंड झुळकीसरशी धुळीचा लोट उठला आणि खिडकीची तावदानं झपकन आपटली. उडालेल्या धुळीबरोबरच गळालेली वाळकी पानंही उडाली आणि वाहत्या वार्याच्या झोतासोबत असहायपणे उडू लागली.
"आज्जो, वादळ झालं, वादळ झालं!" माऊ टाळ्या पिटत उड्या मारू लागली.
"अगं वादळ नव्हे ते; वावटळ आहे ती! चल आत हो बरं"
"म्हंजे?"
"वावटळ म्हणजे पाऊस पडायच्या आधी छोटूसं वादळ येतं आता पाऊस सुरू होणारेय ते सांगायला. पावसाच्या आगमनाची वर्दी द्यायला... पण पाऊस आत्ता असा अवेळी?? पावसाळा तर तसा कोरडाच गेला... यंदा खुप उशीर केलेला बेट्यानं...!!! जून सुरू झाला तरी पत्ता नव्हता... आणि आला तरी दोन दिवस पडून चार दिवस दडी!! आणि आता थंडीत कुठला पाऊस???" पावसाळ्यातील अनुच्या ओलेत्या जीवघेण्या आठवणींच्या काजळ ढगांनी पुन्हा गर्दी करायला सुरूवात केली. "बोका म्हणायची अनू मला... तीला पाऊस खूप आवडायचा... मला मात्र फारसं आवडत नसे भिजायला..."
"अय्या कसली मज्जा! आत्ता पुन्हा पाऊस येणार, मग मी माझी फुलाफुलांची छत्री घेऊन स्कूलमध्ये जाणार. आज्जो, तुम्हाला माहीतेय, आमच्या स्कूलजवळ किनई मोठ्ठा खड्डा आहे. त्यात आता पाणी साठलं की मी खूप होड्या सोडणार त्यात. " बाईसाहेब पळाल्या देखील होड्यांसाठी कागदं फाडायला.
"अग्गं माऊ पावसाळा सुरू नाही झालाय बेटा..." अण्णांची हाक विरायच्या आत माऊ पसार झालेली.
'अगदी आजीवर गेलेय! अनूलाही पाऊस म्हणजे जीव की प्राण! याच खिडकीत बसायची बाहेरच्या पावसाचे थेंब अलगद झेलत. माझी पावसाची व्याख्या म्हणजे कोबी नी कांद्याची कुरकुरीत खमंग भजी, आल्याचा वाफाळता चहा आणि बाहेरच्या पावसाचा सुखद गारवा! बाहेरचा पाऊस घरातूनच अनुभवावासा वाटायचा. कळत नाहीये थंडीत हा अवेळी असा पाऊस का पडतोय? अनुच्या आठवणींना हाताशी धरत.... शिशिरातली कोरडी हाड्म गोठवणारी थंडी आणि आता हा अवेळी पाऊस!! ओह्ह्ह!! हा पाऊस मला कधीच आवडला नाही... कधीच नाही!!!'
' मुलांचं जग किती निरागस असतं तो तो क्षण त्या त्या वेळेस आससून उपभोगणारं आणि मुख्य म्हणजे तो बदल आहे तसा आहे तेव्हा स्वीकारणारं... त्यांना कुठे असले निरर्थक प्रश्न पडतात... आत्ताच का पाऊस? पुन्हा का पाऊस? थंडीत का पाऊस? त्यांना पडणारे प्रश्नही किती निरागस!! पुन्हा त्यांची समाधानकारक उत्तरं मिळण्याचा अट्टाहासही नाही त्यात! बस्स मनात आलं विचारून मोकळं झालं... तो क्षण सरला... विसरलं. मग ते दु:ख असो, आनंद असो, जखम असो, भांडण असो, आईचा धपाटा असो, गाल फुगवण्याइतपत, कोपर्यात गप्प बसून राहण्याइतपत आलेला राग असो... तो क्षण महत्वाचा तो आहे तसा स्वीकारायचा, जगायचा, उपभोगायला मिळाला आनंदाने जगायचा नाहीतर असाच जाऊ द्यायचा. त्याचा फार काळ शोक नाही की खंत नाही. झोपेत मग कधी तो जगलेला क्षण आठवून निरागस हसायचं. तेव्हा पुन्हा एकदा जगायचा हवाहवासा तो क्षण.'
बाहेरच्या वावटळीने एव्हाना चांगलाच जोर धरला होता. धुळीचा जाड पडदा तयार झाला. आपटणार्या खिडक्यांची तावदाने घट्ट लावून घेत अण्णा आरामखूर्चीत विसावले. भूतकाळाचे काळे ढग सवयीने जोर धरू लागले. "कुंद हवेचं मळभाशी काय सख्य असते कुणास ठाऊक! मनामध्येही भूतकाळातील आठवणींचे मळभ दाटून येते. फार अस्वस्थ करतो हा पाऊस! म्हणूनच आपल्याला तो कधी कांदाभजीपलिकडे फारसा आवडलाच नाही."
आपसूक हात डायरीकडे वळला. पानं पुढे उलटली गेली तसा जीवनपट मागे उलगडू लागला. अचानक एका चारोळीपाशी येऊन आतूर डोळे थबकले,
" सगळीच वादळं मी खिडकीत बसून पाहीली;
पण परवाच्या वादळात माझी खिडकीच वाहीली..."
सगळे क्षण तिथल्या तिथे गोठल्यासारखे झाले. या चारोळीचा आज नव्याने संदर्भ सापडला- अगदी गर्भीतार्थासह!
'हक्काच्या खिडकीत बसून बाहेरची वादळं नेहमीच सुरक्षित भासतात. ती खिडकी तुम्हाला बाहेरच्या प्रत्येक वादळापासून सुरक्षित अंतरावर ठेवते, अलिप्त ठेवते. त्या एवढ्याशा खिडकीचा तेव्हा केवढा वाटतो, हे तेव्हा समजतही नाही. पण समजा, तुमचा तो आधारच हरवला तर? अनू माझ्या आधाराची खिडकी होती, मला प्रत्येक वादळापासून अलिप्त, सुरक्षित ठेवणारी! हक्काची कदाचित म्हणूनच प्रत्येक वेळेस गृहीत धरली जाणारी! आता तो आधारच निखळलाय म्हटल्यावर...
आहे आपल्यात हिंमत, प्रत्येक वादळाबरोबर समर्थपणे सामना करण्याची? की वार्याच्या झंझावाती झोताबरोबर असहायपणे फरफटलं जाईल आपलं पाचोळ्यासारखं विकलांग मन?'
मानसिक ताणामुळे अण्णांनी डोळे क्षणभर मिटून घेतले. खमंग पोह्यांवरची इच्छा केव्हाच उडून गेली होती. 'प्रितीने बिचारीने किती खपून केले होते! पण अनूच्या आठवणींनी जोर धरला की मन त्या झंझावातात पाचोळ्यासारखं हरवून जातं; बाकी कशाचं भानच राहत नाही.'
'चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्या नेहमीच आमच्या नात्यामधला दुवा होता. अरूंधतीने आमच्या मॅरेज अॅनिवर्सरीला दिलेली छोटीशी गिफ्ट! तसं आमचं नातं आधीपासूनच समजूतदार होतंच (अर्थात तेही अनुच्याच समजूतदारपणामुळे!) पण 'मी माझा' तल्या प्रत्येक चारोळीमध्ये आमच्या नात्याचे संदर्भ नव्याने सापडत गेले, त्या चारोळीच्या नव्या अर्थासह! प्रत्येक लटक्या भांडणानंतर एकमेकाला सॉरी बोलताना वाचून दाखवलेल्या प्रत्येक चारोळीमुळे आम्ही दोघं एकमेकांना नव्याने समजत गेलो. मग ती चारोळी डायरीतल्या पानांवर विराजमान होऊ लागली, नव्याने सापडलेल्या संदर्भा-अर्थासह! मस्करीने म्हणालोदेखील... "अरू, तुझ्या या चंगो ने आधी लिहीलं असतं हे पुस्तक तर तेव्हा भांडणांनंतर तुझ्या आईची समजूत काढणं फार सोप्पं गेलं असतं गं :)" दिवसागणिक आमचं नातं अधिकाधिक समृद्ध होत गेलं. (मी खर्या अर्थाने अनुला समजून घेऊ लागलो होतो का? कुणास ठाऊक...) इतकं की - एकमेकांच्या सोबतीची, सहवासाची नुसती सवयच झाली नाही तर गरज भासू लागली. म्हणूनच आज असं अपूर्ण रितं रितं वाटतंय; तिच्याशिवायचं आयुष्य - व्यर्थ, नीरस, निरर्थक! सर्व काही असूनही!!" तुला वजा केल्यावर बाकी काही उरत नाही;
तुझ्यशिवाय आयुष्य, मी आयुष्यच धरत नाही..."
अनूच्या प्रत्येक आठवणीसोबत चंगोच्या चारोळ्यांची पारायणं होत होती. प्रत्येक चारोळीतल्या अर्थासह अनू नव्याने सापडत होती, समजत होती....
बाहेरची वावटळ एव्हाना काहीशी मंदावली होती. आचानक वळवाचा पाऊस सुरू झाला. थंडी असूनही हवेत सुखद गारवा आणि उर भरून घ्यावा असा धुंद मृद्गंध पसरला. मगासच्या दु:खद उमाळ्यांचं मळभही पांगलं. अण्णा काहीसे सैलावले. भूतकाळातल्या सुखद आठवणींच्या पागोळ्या वेचू लागले.
...........................................................................................................................................................
बदललेल्या हवामानामुळे गेले काही दिवस अंगात थोडी कणकण जाणवत होती... पेज पिऊन तोंडाची चवही गेली होती. थोडा अशक्तपणा जाणवत होता. प्रिती आणि अनिकेत काळजी घेत होतेच पण आजारपणात अगदी जवळची व्यक्ती कपाळावरून फक्त हात फिरवत शेजारी बसून राहावी या विचारानेही अंगात धुगधुगी येते असं काहीसं अण्णांना वाटत होतं आज. अंथरूणावर नुसतं पडून पडूनही कंटाळा आलेला. हळूवारपणे उठून टेबलाचा आधार घेत हळू हळू ते खिडकीजवळ आले. हवेतल्या गारठ्यामुळे खिडकी काही दिवस बंदच होती. पण का कुणास ठाऊक, आज तो गारठा अंगावर पांघरायची अतीव इच्छा होत होती. थरथरत्या हातानं त्यांनी खिडकीची तावदानं अलगद ढकलली. थंडगार हवेचा एक चुकार झोत आतला उबदारपणा घुसळून काढत झपकन खोलीत शिरला. अंगातल्या कणकणीमुळे थोडासा शहारा आला पण का कुणास ठाऊक तो गारवा तनामनाला शांत करणारा हवाहवासा वाटला. आज थोडं हलकं हलकं वाटत होतं. कुठलेही निरूत्साही विचार पिंगा घालत नव्हते.
गेले काही दिवस पडून पडून विचार करायला पुरेसा वेळ मिळाला होता. 'सगळं आलबेल असूनही आपल्याला हे सुख का बोचतंय?' हा प्रश्न स्वतःच्या मनाला वारंवार विचारला. समाधानकारक उत्तर मिळालं नव्हतं अजूनही पण कुठंतरी काहीतरी चुकतंय ही जाणीव होत होती.
खरं पाहता सगळं आलबेल होतं... अनिकेत, प्रीती आजारपणापासून जरा जास्तच काळजी घेत होते. प्रितीने तर तीनचार दिवस ऑफीसला सुट्टीच टाकली होती. दुपारचं गरमागरम जेवण पोटात जात होतं. रात्री कधीमधी अनिकेत ऑफीसातून येताना नाटकांच्या डिव्हीडीज घेऊन यायचा. 'दिवसभर पडून असता... म्हणून म्हटलं तेवढाच विरंगुळा' असं म्हणत...!!
'खरंच अनू अपराधी वाटतं गं... पोरं जमेल तसं करताहेत पण हे कसलं सुख बोचतंय? अनिकेत-प्रिती ला काय वाटत असेल गं की इतकी मनापासून काळजी घेऊनही अण्णा परक्यासारखं करतात... छे!! खरंच कळत नाहीये गं ही उदासी का घेरून राहीलीये!! "आपल्या माणसाचं जाणं" इतकी विरक्ती आणू शकतं का गं की आपल्या आसपासच्या, आपली काळजी घेण्यासाठी मनापासून झटणार्या, जित्याजागत्या इतर "आपल्या माणसांकडे" आपलं इतकं दुर्लक्ष व्हावं!! सतत आपलं स्वतःच्या कोशात नी कोशात! स्वतःच्याच स्वतःपुरत्या विचारांच्या धाग्यात सुरवंटासारखं गुरफटून... इतकं की बाहेरच्या जगाची पर्वाही नसावी...
...........................................................................................................................................................'दिवस कापरासारखे भुरूभुरू उडून गेले... शिशिरानं कूस बदलली... वसंतानं जादूची कांडी फिरवली... पण ग्रीष्माची चटकेदार धगच व्यापून राहीलेय... हल्ली पडूनच असतो बर्याच वेळेस आपल्या खोलीत. नाही जावंसं वाटत बाहेर... कोपर्यातल्या वळणावर जिथे आपण रोज संध्याकाळी पाय मोकळे करायला जायचो... माऊ नी मी जायचो अधे मधे... हल्ली तर ते ही बंद केलंय.
बाकी सगळ्यांचं मात्र आपापलं रूटीन चालू आहे. नित्यनेमाने अनिकेत, प्रितीचं ऑफीस, माझं खाणं -पिणं औषधं... बाईच्या पावडरगंधवाल्या थंड सुस्तावलेल्या पोळ्या... माऊची अखंड चिवचिव, तिच्या निरागस गप्पा, तिचं थेट तुझ्यासारखं अपरं नाक उडवत माझ्यावर हक्क दाखवत ऑर्डर सोडणं, आणि हल्लीच तिचे कसले सुरू झालेले ड्रॉईंगचे नी आर्टचे क्लासेस... घरभर नुसते चित्रांनी भरलेल्या रंगीबेरंगी नी हस्तकलेच्या कागदांची गर्दी... अगदी तुझ्यासारखं जिभेचं टोक बाहेर काढत तल्लीनपणे कातरकाम!! रात्रीच्या जेवणाच्यावेळी सगळ्यांचा एकत्र हास्य कलकलाट.. तरीपण मी आपला तिथेच आहे का गं अनू? तिथेच अगदी त्याच क्षणाला ओठंगून उभा, जिथे तू मला एकटं सोडून गेली होतीस?'
तुला माहीतेय, तू गेल्यापासून तसं म्हटलं तर माऊची बडबड आणि खिडकीबाहेर पाहणं हेच खर्या अर्थानं विरंगुळे! अम्म नाही खरं तर तसं म्हटलं तर एकमेव विरंगुळा म्हणजे तुझ्या आठवणींचा मध घोळवणं... मन एका मधाच्या पोळ्यासारखं झालंय... तुझ्या आठवणींच्या मधमाश्या अखंड गुंजारव करत भुणभुणत असतात अवतीभवती... आपल्या नात्यातील मुरलेल्या लाघवी क्षणांची भरती करत... आता ते तुडूंब भरून टपटपू लागलंय!!! त्या गोडमिट्टपणाचाही अखंड सहवास जीवघेणा वाटू लागलाय... तुझ्या मधाळ आठवणी, हव्याशा तरी नकोश्या!!! का असं होतंय?? मी त्या आठवणींमध्ये पार बुडतोय! कधी कधी तर फारच कासावीस होतं श्वास गुदमरतो... तरीही त्यातून बाहेर पडावसं वाटत नाहीये! हा कसला जीवघेणा अनामिक मोह? मी असलं काही बाही बोलू लागलो तर तू काहीच बोलायची नाहीस... (अर्थात मला स्वतःला कुठे समजायचं की मी काय बोलतोय नी मला काय सलतंय?) तू फक्त शेजारी बसायचीस, माझा हात घट्ट हातात धरून. निशब्द सोबत!
" गप्पच राहावसं वाटतं तुझ्याजवळ बसल्यावर
वाटतं तूच सगळं ओळखावं मी नुसतं हसल्यावर"
- इति गोखले अर्थातच!! कधी वाटतं माझ्या भावनाच हा शब्दबध्द करतो की काय!!
...........................................................................................................................................................
'बर्याच दिवसांनी खिडकीशी बसलोय. आज बर्याच दिवसांनी बाहेरचं जग पाहावसं वाटतंय... अनुभवावंसं वाटतंय... एवढे दिवस डायरीतल्या चारोळ्यांना आणि त्यांचा हात धरून हलकेच अवतरणार्या हृदयातल्या तुझ्या आठवणींना कुरवाळत बसलेलो... झाडापानांच्या बेचक्याबेचक्यांतून उबदार कोवळी हळदी उन्हं सांडलेत. उगीचच प्रसन्न वगैरे वाटतंय का आज? नेहमीसारखा एक दिवस... फक्त नव्याने उगवलेला... नव्याने उगवलेल्या पालवीसारखा... हिरव्याकोवळ्या आशा अन स्वप्नांची तजेलदार मखमल पांघरलेला!! पण आजचा हा आज आपल्यालाही खास वाटतोय हे वेगळेपण! रेंगाळणारा कंटाळा नाहीय की उदास कातर एकाकी आठवणींचं मोहोळ नाहीय... फक्त आज आणि आत्ता!! हवाहवासा हा क्षण पकडून ठेवायला हवा. ठेवता आला पाहीजे कायमसाठीच. निसटून देता कामा नये.'नकळत नजर पेरूच्या झाडाकडे वळली. कीड लागून पूर्ण वठू लागलेल्या त्या झाडाच्या खोडाच्या बेचकीतून मखमली हिरवीपिवळी कोवळी पालवी डोकवायला लागलेली. पानगळ, कीड लागणे हे तर निसर्गानुरूप होतंच राहते पण काळ सरला, ऋतू बदलला की वठलेला वृक्षही मरगळ झटकून तग धरू लागतो. या मरू घातलेल्या वठलेल्या वृक्षाला कोवळे कोंब फुटताहेत - जगण्याच्या नव्या उमेदीचे! अण्णांचे डोळे आश्चर्याने आणि आनंदाने विस्फारले. अचानक - चंगोच्या चारोळीची जादुई कांडी सरकन डोक्यात फिरली,"सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला एकदा पालवी फुटली
त्यालाच कळेना ही, जगायची जिद्द कुठली!!!"
अचानक त्यांच्या कमरेला रेशीममिठी जाणवली. माऊ नुकतीच झोपेतून उठून अण्णांच्या कमरेला लोंबकळलेली.
"काय करताय अण्णा?" झोपाळलेल्या आवाजात पिल्लू चिवचिवली.
"पालवी!" स्वतःच्याच नकळत अण्णा पुटपुटले.
'त्यात काय! आत्ता थोड्या दिवसांनी त्याला पुन्हा पेरू येतीलच ना? मग सगळे पक्षी तो खाऊ खायला परत येतीलच. मग ते झाड पुन्हा तरूण होईलच ना?' माऊचे आश्वासक उबदार शब्द पुन्हा एकदा कानात किणकिणल्याचा भास झाला.
माऊचं रेशमी गाठोडं अण्णांनी झपकन उचलून कडेवर घेतलं.
"आत्ता समजलं, तुझं नाव अनूने हौशीने 'पालवी' का ठेवलं ते! एवढे दिवस विसरूनच गेलेलो बघ. या वठलेल्या वृक्षाला जगण्याची आस लावण्याची ताकद तुझ्या संजीवनीत आहे पोरी!" अण्णा बेभानपणे बोलत सुटले होते...
"माझी अनू नव्या संजीवनीचं, नव्याने फुलण्याचं-बहरण्याचं देणं देऊन गेलीय तुझ्या रूपानं! आणि मी करंटा मात्र अजून भूतकाळातील पानगळीचा शोक करत पाचोळा चिवडत, स्वतःचं दु:ख कुरवाळत बसलोय. आपण फुलता फुलता अल्लद दुसर्याला फुलवावं हेच तर पालवीचं वैशिष्ट्य! अनू आयुष्यभर हा वसा जपत आली आणि आता मला तो जपला पाहीजे. मला जपलाच पाहीजे - माझ्या कुटूंबासाठी, माझ्या या छोट्या पालवीसाठी - माझ्या माऊसाठी आणि माझ्या... माझ्या अनुसाठी!" हसर्या, आनंदाश्रू चमकणार्या डोळ्यांनी माऊकडे पाहत भरलेल्या रूद्ध कंठाने अण्णा बोलतच राहीले...
माऊ काही न समजून डोळे मोठ्ठे करून निरागसपणे तिच्या आज्जोकडे बघत होती. एका वठलेल्या वृक्षाला नकळतपणे पालवी फुटली होती.
...................................................................समाप्त...................................................................
0 comments:
Post a Comment