ललित : रंगायतन!!

नुकतीच रंगपंचमी पार पडली... धुलीवंदन/धुळवड आणि पंचमीच्या दिवशी रंगपंचमी! रंगांचा उत्सव! ऋतूराज वसंताच्या आगमनाप्रित्यर्थ स्वागतासाठी निसर्गाने केलेली मुबलक रंगागंधांची उधळण अनुभवत आपणही त्या निसर्गरंगात मनसोक्त डुंबून घेतो... राज्यातील अन समस्त देशभरातीलच कोरड्या दुष्काळाने ग्रासलेल्या लोकांचा विचार करत सरकारने केलेल्या पानी बचाओ आवाहनाला समस्त देशभरातील आबालवृद्धांनी कौतुकास्पद साद दिली अन कोरडी होळी(धुलीवंदन) साजरी केली...

यावेळी रंग खेळायला नवरा नव्हता सोबत!
[तसंही तो बोका आहे, अंघोळीच्या वेळी काय भिजेल तोच! एरवी पाण्याचा शिंतोडा उडाला तरी हात झटकत बसणार... पावसात भिजणे-बिजणे तर सोडाच! तेव्हडा रोमँटिकपणा नाहीये हो आमच्या नशीबात!! : (
बाहेर पाऊस पडायला लागला की माझ्या मनमोराचा पिसारा हाSS फुलारून येतो!!! तो गुलाबी गारवा... एकांतातला शहारा... कुंद हवा... धुंद वातावरण खिडकीतून मी पाहून पाहून वेडी होत असते... मनात पिंगा घातलेला असतो आल्याने गंधाळलेल्या वाफाळत्या कडक चहाचा व गरमागरम कुरकुरीत खमंग खेकडाभज्यांचा वास... झालंच तर मग मोगर्‍याच्या अर्धवट उमललेल्या धुंद कळ्यांचा आणि ओलसर मातीचा खरपूस वास, जगजीतच्या मधाळ कातील गझला आये हाये!!! आणि फुस्स आमचं अर्धांग आळसावलेल्या बोक्यासारखं सोफ्यावर हात पाय जितके म्हणून वळकटी वळता येइल तितके पोटाखाली मुडपून लोळत असतं... माझ्या मनातले आल्याचा चहा नी भज्यांचे वास ही साम्यस्थळं सोडल्यास बाकीचे प्रकार कशाशी खातात हे गावीही नसतं यांच्या!!! आणि रंगपंचमीचे रंग!!! अर्रे माझ्या कर्मा!! चमचमीत नॉनव्हेज्/मिसळ ओरपताना मसलट तेलाचा एखादा पुसटसा शिंतोडा जरी पांढर्‍याशुभ्र बनियन वर पडला तरी हे राम!!! हे रंगाबिंगाचं काय घेऊन बसलात!!!]
मी मात्र खेळले मनसोक्त रंगपंचमी माझ्या पिल्लूसोबत... अगदी नैसर्गिक! हळदीने, आणि त्याच्या माश्याच्या पिचकारीत जेवढं पाणी मावेल तेवढ्या पाव वाटीभर पाण्यात!!! वर पिल्लूने चिमुकल्या हातांनी गालाला लावलेल्या हळदीने थोडेतरी गाल उजळलेत का तेही चोरून बघून घेतलं आरशात... पी हळद हो गोरी! च्या अतिउत्साहाने!!


नवरेबुवांचं रंगांचं तथाकथित ज्ञान तसंही अगाध(!!???) आहे! नुकतच लग्न झालं तेव्हा साडी घेताना प्राथमिक रंगांचीच माहीती असल्याने बॉटलग्रीन, हिरवाजर्द, मेहंदी, पोपटी, पिस्ता, मग झालंच तर चटणी वगैरे छ्टांपर्यंत आमची गाडी घसरल्याने येताना समोसे नी पुदीना चटनी आणून चट्टामट्टा करत बसायला हवं होतं... पोटात कावळ्या-उंदरांनी फेर धरलाय!! असे काहीसे अस्वस्थ भाव त्याच्या चेहर्‍यावर पसरलेले... टोमॅटो रंगाचा शालू नी चटणी रंगाची साखरपुड्याची साडी घेतल्यावर आता गृहप्रवेशाला काय चिंचेच्या कोळाचा कलर पाहूयात का? सँडविचच्या सगळ्या झणझणीत चटण्या त्याच्या डोळ्यांत उतरलेल्या आणि टोमणे अधिकाधिक आंबट झालेले... खरेदी आवरती घेऊन आधी पोपूला धावावं लागलं होतं...

खरेदीसाठी गेल्यावर सरळसाध्या लाल रंगाला लाल न म्हणता उग्गाच डाळींबी, कोकमी, कुसुंबी, टोमॅटो, मरून, तपकीरी, विटकरी अशी विशेषणं का देतात याचा विचार करकरून नवरोबांच्या उत्साहाला वीट अन मेंदूला झीट आलेली असते...
 तरी नशीब!! हल्ली हल्लीच फ्याशनमॅनियाक झाल्यासारखं जबाँग, फॅब इंडिया नी पँटालून्सच्या साईट्स वर भरकटून मिंत्राने दिलेल्या फॅशन मंत्रानुसार इंग्लिश कलर्स सांगत बसत नाही त्याला!! "लिनन-- हा कलरेय? हे तर कापडेय ना..." (कित्ती गं बाई गुणाचा माझा नवरा तो!! नश्शीब!! कापडाचे प्रकार तरी माहीतेत! नाहीतर कॉटन एके कॉटन!!!) मनातूनच अलाबला करत मधाळ नजरेने त्याला म्हटलं "नाही रे राजा ही पांढर्‍या रंगाची शेड आहे..!"

"पांढर्‍याची शेड?? हॅ!! पांढरा म्हणजे पांढरा शुभ्र!!! दुधासारखा! झालंच तर अगदी धुतल्या तांदळासारखा!! (लग्नाची बायको शोधताना कॅरॅक्टरचा हा क्रायटेरिया घरात बोलला गेला असावा... नाहीतर भात लावण्याआधी तांदूळ-बिंदूळ धुतात, मोदकाचे तांदूळ धुवून वाळवलेले असतात हे माहीत असणे शक्यच नाही!!) , नाहीतर रिन की अगदीच हाईट म्हणजे उजालाकी निळसर सफेदी!! बास!!"

नाही रे राजा... मी तत्ववेत्त्याच्या सूरात समजावत म्हणाले, अरे क्रीम, आयवरी(हस्तीदंती), व्हॅनिला, एगशेल, स्मोकी(धुरकट), पिवळसर पांढरा, निळसर सफेद, गुलबटसर पांढरा(लिनन/बेज), पोपटीसर पांढरी अमका नी ढमका! नवर्‍याचा मेंदू धुरकट पांढरा पडलेला एव्हाना माझं पंडूर प्रवचन ऐकून!!! अजून पुढचे सेकंडरी कलर शेड्स व अमक्या ढमक्या असंख्य रंगछटा शिल्लक होत्या... पुढचा धोका सूज्ञपणे ओळखत दुसर्‍या कुठल्याही समंजस नवर्‍याने त्याप्रसंगी केलं असतं तेच प्रसंगावधान राखत आमच्या नवरोबांनी 'फोन आलाय वाट्टं..' असं 'कोण आहे रे तिकडे??' च्या चालीवर पलायन केलं!! हे समजण्याइतकी मी हुशार बायको आहे, पण जाऊंदे मला काय?? त्याचंच नुकसान!! आणि तसंही.. 'आमच्या हिला माझ्यापेक्षा जरा जास्त फॅशनसेंस आहे' असं नवर्‍याने कधीकाळी केलेलं कौतूक पदरात पाडून घ्यायला कुठल्या बायकोला नाही बरं आवडणार??

पण या रंगांचा प्रॉब्लेम माझ्याच कशाला, सगळ्याच बायकांच्या नवर्‍यांना असतो वाटते...लाँड्रीला दिलेली बेडशिट बरेच दिवस परत न मिळाल्याने मी लाँड्रीवाल्याला समजावत होते," भैय्या ती पांढरी बेडशिट नाही दिलीत परत... वो सफेद, उसपर वेली वेली का निळसर डिझाईन है ना... और निळे छोटे छोटे ठिपके..." त्याचा चेहरा एका मोठ्या निळ्या ठिपक्यासारखा अनभिज्ञ! नवर्‍याने सांगितलं "भैय्या परसों दी थी सफेद चद्दर बेडशिट वो लाके नही दी!" निळा ठिपका माणसात आला.... "लाता हूं" असं म्हणत हसत हसत कपड्यांचं गाठोडं खांद्याला अडकवत तो पसार झाला...
नवर्‍याला त्याचा प्रॉब्लेम (आपबिती वरून) लग्गेच समजला... आणि लग्गेच मदतीला गेला... नवर्‍याचा चेहरा, "तेरा दर्द मै समझ सकता हूं मेरे भाई...!" अरे वा एकमेकां करू साहाय्य!!! छाने!!

परवा नवर्‍याने मात्र कहर केला... ऑफीसातनं फोन केला, "अचानक माझं(त्याचं) माहेरी(त्याच्या) जाणं ठरतंय तर ती गोल्डन ब्राऊन बॅग भरून ठेव!!"

बाई गं!! गोल्डन ब्राऊन??? माझ्या नजरेसमोर नुकत्याच धुळवडीत रंगलेले असंख्य चंदेरी-सोनेरी ऑईलपेंट कलर्स तरळून गेले... बघीतलं तर बेडच्या तळाशी एक मिलीटरी ग्रीन रंगाची, एक डार्क कॉफी रंगाची आवि त्याची नेहमीची बेज रंगाची!!! आता यात गोल्डन ब्राऊन म्हणजे मिलीटरी नक्कीच नसणार नाहीतर तो कोथींबीर चटणी हिरवी वगैरे म्हटला असता..आता उरल्या दोन!! तरी खात्री करण्यासाठी त्यातली एक कपाटाला लाऊन बघितली... मग त्याला फोन केला... "आपलं कपाट कुठल्या रंगाचंय रे?" माझा स्थितप्रज्ञ आवाज! "ते ना... फिकट तपकीरी!!" त्याचं आत्मविश्वासपूर्ण उत्तर! बरं म्हणत मी फोन ठेवला...

घरी आल्यावर त्याची "त्याला हवी असलेली" मी भरून ठेवलेली बॅग उचलून त्याच्या माहेरी प्रयाण केलं.

अवांतर माहीतीसाठी: त्या बॅगेचा आणि कपाटाचा रंग डिटो सेम आहे आणि तो आहे बेज!!!!असो! आता कानाला खडा!! नवर्‍याला प्रायमरी - लाल,हिरवा, निळा रंग सांगायची परवानगी आहे... छ्टा नकोच!!! अर्थ लावता लावता माझ्या चेहर्‍याचा रंग उडतो... :)

0 comments:

Post a Comment