Showing posts with label मराठी ललित. Show all posts
Showing posts with label मराठी ललित. Show all posts


                                                                                                                                   July 11, 2013

पाऊस खूप आहे आज... कोसळतोच आहे... मी बसलेय इतरजणींसारखीच... पावसाच्या झडींपासून अंग चोरत... एकेकजण येताहेत... चिप्प भिजलेल्या... ओढण्यांची टोकं पिळत, ड्रेस आणि छत्र्या झटकत... त्यांचे उडणारे थेंबही मी चुकवतेय.... आधीच आकसलेलं अंग अजूनच चोरून घेतेय ( जितकं जमेल तितकंच अर्थात.. :D ) त्या त्रासिकपणे म्हणताहेत "कित्ती पाऊसेय नै आज... श्शी बाई कंटाळाच आलाय..." पुन्हा त्राग्याने ड्रेसची ओलीचिप्प टोकं फडफडवणं... ते उडणारे तुषार शिताफीने चुकवत मी त्यांच्याकडे बघून हसते... थोडंसं ओळखीचं, थोडंसं अनोळखी, थोडंसं सांत्वनपर.. आणि खुपसं खुशीचं...! मी आज लवकर आलेली असते ना... इथेतिथे बघत टीपी करेपर्यंत "हा" धो धो कोसळायला लागतो... "वाचले बुवा!" माझं मन खुशीत मांडे खातं... चिप्प भिजून एसीच्या त्या बोचर्‍या थंडीत ओले कपडे अंगावर वाळवत बसायचं??? छ्या!!

रंगीबेरंगी ओल्याचिप्प गर्दीने ट्रेन फुगते... कोणी आडोसे शोधत दाराशीच उभ्या राहतात... कोणी खिडकीशी सुरक्षित अंतर राखत चिकटून चिकटून बसतात...एकमेकांना बिलगून तारेवर बसलेल्या भिजलेल्या पाखरांसारख्या...!
रोज विंडोसिट पकडायला धावणार्‍या आज उदार अंतःकरणाने विंडोसिट ऑफर करत होत्या...
थेंबथेंब पाणी गाळणार्‍या चिप्प छत्र्या खिडकीच्या हँडल्सवर विसावत होत्या... कॉलेजकन्यकांचा घोळका बाजूलाच चिवचिवत असतो... नव्या फ्रीलवाल्या छत्रीला ट्रेनमध्येच उघडून वर तीघींच्या डोक्यावर धरत फॅनखाली वाळवत असतो... स्वतःचे फंकी ट्रान्सपरंट सँडल्स दाखवत मग ते कुठून आणि कितीला मिळाले याचं साग्रसंगीत वर्णन करत... कॉलेजगर्ल्सला कुठल्याच विषयांचं वावडं नसतं ना... पावसाच्या थेंबासारखा एखादा विषय सापडावा आणि मग त्याचे हात धरून बाकीच्या थेंबांनी कोसळत राहावं संततधारेसारखं तशा कोसळत राहतात... मी हसते स्वतःशीच... तिथेच कोणीतरी हँडलवर चक्क ओढणी वाळत घातलेली असते... बायका म्हणजे ना... उपलब्ध सोर्सेसचा वापर आपल्याला हवा तसा कसा काय करायचा हे त्यांना कध्धीच शिकवावं लागत नाही.

इथे कोणी ऑफीसला जाणारी फॅशनेबल सुंदरी आपले लांबसडक केस हलकेच झटकते... खिडकी अन दरवाज्याच्या उरल्यासुरल्या फटीतून डोकावणार्‍या बाहेरच्या कित्येक भिरभिरत्या डोळ्यांना क्षणभर विश्रांती मिळते... काय म्हणत असतील मनात? "ना झटको जुल्फसे मोती...?" मी हसते पुन्हा स्वतःशीच!
तिथे कोणीतरी तल्लीनपणे आपले टप्पोरे डोळे काजळकाळे करण्यात गुंग असते... मग हळूच चिमुकला आरसा उघडला जातो... चिमुकला रूमाल चेहर्‍यावरून हलकेच फिरतो... आरश्याचे अँगल्स बदलतात चेहर्‍याच्या अँगल्सच्या प्रपोर्शन्मध्ये... मग एखादी सुखद गुलबट छटा नाजूक ओठांवर अलगद पसरते... ओठांच्या पाकळ्या एकमेकांशी मिटमिट करतात... हा सगळा शृंगारसोहोळा आजूबाजूच्या तोंड नी डोळे विस्फारून पाहत राहतात... काय विचार करत असतील मनात... "नटवी मेल्ली!!", "कित्ती सुंदर शेडंय नै? कुठल्या कंपनीची आहे पाहू... श्शीSS बाई दिसलीच नाही!!!", "ह्म्म आपल्यालाही अस्सं प्रेझेंटेबल राहायला हवं.... ठरवूनही ह्या कामाच्या धबगड्यात चिंबून जायला होतंय... स्वतःकडे लक्षच देता येत नाहीये... श्शी!!"
असंच काही बाही... आता मला थोडं जोरात हसायला येतं... कानात हेडफोनची ढेकणं कोंबलेली असल्याने माझ्या मेंदूच्या विकासावर वा विकारावर कोणी फारसा विचार करत नाही...

तेवढ्यात "ती" दिसते... कानात हेडफोन्स खुपसलेले... हातात मोबाईलचं धुड... आणि दरवाज्याच्या कोपर्‍यात स्टील बारला कवेत घेऊन लोंबकळत असते... तोंडावर प्रतिथयश गायिकेचे हजारो विभ्रम! स्वत:शीच मग्न... तालासुरात गाणं म्हणतेय कुठलंसं... दरवाज्याच्या फटीतून पाऊसझडी आत घुसखोरी करताहेत... हिला पर्वाच नाही... त्या झडींवर खुशाल चेहरा सोपवलाय... पाऊसझडी गालावर-नाकावर-कपाळावर थडाथड आपटताहेत... ही गातेच आहे... डोळे मिटून तल्लीनपणे... इथे बाकीच्या सगळ्याजणी मांजरीसारख्या अंग आकसून हाताचे पंजे उलटसुलट चेहर्‍यावर फिरवत शक्य तितकं कोरडं व्हायचा प्रयत्न करताहेत आणि ही बया खुशाल त्या पावसाला म्हणतेय... भिजव... आणखी!! वेडी कुठली... माझं स्टेशन आलं... मला जागा करून देत ती मागे सरकली... "उतरायचं नाहीये?" काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारते... जोरजोरात मान हालवत म्हणते "नाही.." "अगं मग?" मी हातानेच विचारते... ती गोडशी हसते... चेहर्‍यावरून ओघळणारे थेंब ओढणीनेच हलकेच पुसून काढते... मी जोरात हसते... आत खोलवर कुठेतरी छोटीशी वेदना सटपटते... का? कारण कळतच नाहीये... मी पुन्हा तिच्या कडे पाहते... ती दरवाज्यातून दिसणार्‍या आभाळाच्या तुकड्याला निरखत गातेच आहे... कसला मेघमल्हार आळवतेय कधीपासून कोणास ठाऊक! काय आहे माझ्या नजरेत... हेवा, अचंबा, कौतूक?? कळतच नाहीये... आत खोलवर कळ उमटतेच आहे...

स्टेशन दृष्टीपथात येतंय... उतरायचंय आता... मी पर्स, छत्री, ओढणी, स्वतः असा सगळा सरंजाम सावरते... आणि थोडीशी झेपावते दारातून बाहेर... पाऊस कोसळतच असतो... थोडे तुषार माझ्या चेहर्‍यावर धडपडत उड्या मारतात... मी मागे सरकायचा प्रयत्न करते पण मागे गड लढवणार्‍या मावळ्यांनी रस्ता बंद केलाय... पुढेच लढायचंय... मी नकळत डोळे मिटते... चेहरा आपसूक पुढे करते आणि म्हणते... भिजव... आणखी...! पाऊस खुशीत हसतो... झेपावतो आणि भिजवतो मला... मी भिजत राहते.. निशब्दपणे... कधीकाळचा तराणा भिजलेल्या ओठांवर अवतरतो... मी सूर पकडते, स्वतःच्याच नादात... चेहर्‍यावर प्रथितयश गायिकेचे भावविभ्रम आपसूक पांघरले जातात... मागून धक्के येताहेत... माझी समाधी भंग पावते... स्टेशन आलं वाट्टे... धुंदीत उतरते... उतरण्यापूर्वी आपसूक नजर "ति"च्याकडे वळते... ती हसते... खूपसं ओळखीचं!! मीही हसते... मोकळं, सैलावलेलं, स्वच्छ, निरभ्र!!

शब्द ओठातच घुटमळतात...तिला सांगायचे असलेले... "चार वर्षात पाहीलेली तू दुसरी वेडी! पाऊस बेभानपणे झेलणारी!! पावसाला बघून हसणारी... मला आवडतात, पावसाला बघून स्वतःशीच हसणारी माणसं!! आणि हो! पहीली वेडी... ती मीच गं!! कित्त्येक दिवसांनी सापडलेय... माझी मीच, मला, पुन्हा!!! थँक्स टू यू..."
माहीत नाही ती वेडी पुन्हा भेटेल की नाही... असेल कदाचित फेसबूक वर कुठेतरी... शेअर अन लाईक्सच्या साखळीत गुंतेलही कदाचित आणि मग ओळखीचं हसेलही स्वतःशीच, पुन्हा एकदा!!!

- स्वप्ना....
                  



तळटीपः सॉरी लोक्स, पुन्हा पुन्हा एकच फोटो अपलोड करतेय... पण काय करू प्रचंड म्हणजे प्रचंडच आवडलाय मला तो... प्रेमातच पडलीये मी त्याच्या!

चित्र सौ. : elenakalisphoto.com

ललित : पाऊस! माझा प्राणप्रिय सखा!!


इतके दिवस पावसाला वेड्यासारखी 'मिस' करत होते. काल एक छानसं ग्रीटींग ही बनवलं त्याच्यासाठी पण ते त्या वेड्याला कसं समजलं कुणास ठाऊक! बरसलाच की काल रात्री - मनसोक्त, आससून!! जणू तो सुद्धा मला खूप 'मिस' करत होता... खरं तर तो कित्येकांचा सखा!! प्रत्येकासाठी बरसतो-अगदी हातचं न राखून! पण जेव्हा कधी खिडकीत बसून त्याला डोळे भरून न्याहाळत असते- मला वाटतं तो फक्त आणि फक्त मलाच भेटायला आला आहे... कृष्ण सखा नाही का प्रत्येक गोपिकेला फक्त आपला एकटीचाच सखा वाटे तस्संच! रूसलेय ना मी, इतके दिवस मी त्याची चातकासारखी वाट पाहतेय आणि हा कुठे दडी मारून बसलेला कोणास ठाऊक!! मग हळूच येतो, छान मोकळं मोकळं प्रसन्न हसू हसतो... खरं तर त्याच्या चाहुलीनेच, त्याच्या अंगागंधाच्या मंद सुगंधानेच मी वेडीपिशी झालेली असते... पण जाम ताकास तूर लागू देत नाही! माझा रूसण्याचा हक्क, तुझं मनवण्याचं कर्तव्य! अगदी हाताची घडी घालून गुडघ्यात डोकं खुपसून बसते मी... पाहतही नाही त्याच्याकडे... तो माझी हरप्रकारे समजूत काढण्याचा प्रयत्न करतो... कधी कान पकडून, उठाबश्या काढून, क्वचित एखादी सुरम्य गाण्याची लकेर गुणगुणून... लटक्या रूसव्याने फुगलेल्या माझ्या गालावर फुंकर मारून तर माझ्या बटांना अल्लदपणे विस्कटून तर कधी चेहर्‍यावर असंख्य तुषारांची बरसात करून... कधी असंख्य सरींचे अलवार हात लडीवाळपणे गळ्यात टाकून..!! मी खुदकन हसते... नाहीच रूष्ट राहता येत त्याच्यावर फारसं!! कित्ती लोभस आहे तो...!!!
प्रियतमेला कसं खुलवायचं फुलवायचं हे तंत्र त्यानं चांगलंच आत्मसात केलंय! लब्बाड कुठला!! गालगुच्चाच घ्यावासा वाटतो त्याचा... पण तो कुठला थांबायला एवढा वेळ!! वेड लावून पसार व्हायचं ही जुनीच खोड आहे त्याची!! पण मी मात्र त्याच्या सुखद आठवणींनी एकाच वेळेस तृप्त नी घायाळ व्हायचं... त्या एकांतातल्या विजनात!!




खरं तर झोकून देण्याची, सर्वस्व दुसर्‍यावर उधळून रितं होण्याची कला मी त्याच्याकडूनच शिकले... पण इतरांना तृप्त करताना आपण मात्र रिक्तच राहतो याची खंत तो फारसा कधी बाळगत नाही... हे मात्र अजूनही मला तितकंसं जमलेलं नाही!! त्या वेड्याला जाणवत तरी असेल का स्वतःचे रितेपण?? छे!! तो तर लुटवण्यात, उधळण्यात... स्वतःच्याच तालात उन्मुक्तपणे बरसण्यात तल्लीन!! एखाद्या कसलेल्या शास्त्रीयसंगीत गायकाने रियाझ करतानाही तल्लीन पणे स्वतःशीच एक अशी हरकत घ्यावी अन आजूबाजूच्यांना त्या सूरांच्या बरसातीने चिंब भिजवून टाकावे; स्वतःच्याही नकळत.. तसंच काहीसं!!

पावसाबद्दल लिहा-बोलायला लागले ना की मला माझंही भान राहत नाही. त्याचे कित्येक लोभस विभ्रम मला कित्येकदा वेड लावतात. खरं तर त्याच्या येण्याच्या चाहूलीनेच त्याने मला अर्धी गारद केलेली असते... त्याच्या आगमनाचा तो मादक मोहक सुगंध- इवले इवले थंडगार थेंब झेपावत कधी टप्पोरे होत जातात... आणि हलक्या सरींनी लुभावत तो आवेगपूर्ण पाऊसझडींनी कधी गुदमरून टाकायला लावतो ते समजतही नाही... तो बेभानपणे कोसळत राहतो... आंणि आपण ते फक्त अनुभवायचं- त्याचा आवेग, त्याचा जोष... निस्तब्धपणे, निशब्दपणे!!

तप्त रूष्ट धरणीला आपल्या थेंबांच्या नाजूक जादुई बोटांनी हळूवारपणे हसवतो, खुलवतो, फुलवतो... हलक्या सरीच्या अलवार हातांनी तिच्या भुरभुरणार्‍या शुष्क वेलींच्या बटा अलगद कानांमागे सारतो आणि तिच्या लालेलाल तत्प्त घामेजल्या चेहर्‍यावर अलगद प्रेमाची फुंकर घालतो आणि मग बरसतो- बरसत राहतो...बेभानपणे! तप्त धरित्रीची गात्रं गात्रं त्याचं ते बेभान प्रेम पिऊन श्रांत क्लांत होऊन तृप्त होईपर्यंत! त्याचे हे सारे भावविभोर, आत्ममग्न लोभस विभ्रम अन नवसृजनाचा हा सारा अविष्कार खिडकीतून डोळे भरून पाहत असते... धरणीचा मादक गंधभरला तो तृप्त निश्वास मला ऐकू येतो... स्त्रीसुलभ मत्सराने मी काहीशी अस्वस्थ होते... थोडीशी पेटूनही उठते... घायाळ होऊन कळवळून पाऊससख्याला विनवते... मी ही अशीच ग्रासलेय, त्रासलेय रे! दुखःच्या ग्रीष्मझळांनी माझ्या तनामनाची काहीली होतेय... मलाही असंच सचैल न्हाऊ घाल- चिंब, नखशिखांत! कणाकणाने- बेभानपणे!! तो येतो... माझ्या नकोश्या जाणीवानेणीवांतून तो अलगद हात देऊन मला बाहेर काढतो, स्वतःच्या बेभानपणाने मला भारून टाकतो... त्याचं ते बेभान होणं सुप्तपणे माझ्यात पेरून जातो... मी बेभान होत राहते पुन्हा पुन्हा... भानावर येईपर्यंत!!

वेड लावतात मला या पावसाची सगळीच वैविध्यपूर्ण रूपं- वार्‍याने त्रेधा उडव्त अवखळपणे भुरभुरणारा, थेंबांचा फेर धरून, तारांवरून, तृणपात्यांवरून थेंब बनून अल्लडपणे ओथंबणारा, कधी पागोळ्या बनून निरागसपणे बरसणारा, कधी तत्ववेत्त्याप्रमाणे गंभीरपणे संतत्धारेच्या रूपाने तर कधी उन्मुक्त बेभान प्रियकराप्रमाणे पाऊसझडींमध्ये अविरत कोसळून गुदमरून टाकणारा! बरसून रितं झाल्यानंतरचा त्याचा हवाहवासा मादक गंधगारवा मी अंगांगभर लपेटून घेते शहारत!!

एकांतात कधीकाळची विसरली गेलेली जखम त्या विजनात भक्ककन उघडी पडते, त्यावर काळाची धरलेली खपली उचकटली जाऊन भळभळत राहते- बाहेरच्या पावसासोबत! बाहेरच्या पावसाला माझ्या या आतल्या मूकपणे झरणार्‍या पावसाचा सुगावा कसा लागतो कोणास ठाऊक? पण मग तो एखाद्या समंजस प्रियकरासारखा शांतपणे बरसत राहतो. त्याच्या असंख्य रूपेरी शीतल हातांनी मला कवेत घेऊन हळूवार थोपटत राहतो. मी त्याच्या आश्वासक मिठीत विरघळून जाते...कणाकणाने!

कधी कधी मात्र पाऊससखा रंगात येतो. आपल्या वात्रट मित्राला, वार्‍याला हाताशी धरून उगाच छेडखानी करत राहतो.. कधी ओढणीमध्ये ओढाळपणे लपायला पाहील तर कधी केसांच्या उन्मुक्त बटांबरोबर खेळू पाहील... चिंब ओलेतं रूप चोरून पाहण्यासाठी उगाच धडपड करीत राहील... आणि मग माझ्या हातातील छ्त्री वार्‍याच्या एका जोरदार झोताने पलटी झाली की दोघंजणं "कश्शी मज्जा केली!!" असं मिस्कीलपणे म्हणत एकमेकांना टाळी देत अवखळपणे हसतील.. कसं रागावू या लोभस विभ्रमांवर?? मलाही तर ते सारेच्या सारे हवेहवेसे असतात. या भावविभोर विभ्रमांना डोळे भरून पाहण्यासाठी- अनुभवण्यासाठी मी चार महीने विजनाचा वैशाखवणवा सहन केलेला असतो- माझा पाऊस सखा येईल अन माझ्या सार्‍या ठसठसत्या वेदनांवर अलवार फुंकर घालेल... तो येतोही! माझ्या मनातले भाव बरोब्बर पकडत तो येतो. मी उदास गप्पगप्पशी दिसले तर पार अस्वस्थ होतो... स्वतःच अस्वस्थ होऊन बरसत राहतो... त्याला अजिब्बात आवडत नाही मला त्रास झालेला... वेडा आहे तो-- माझ्यासारखाच! अवखळपणे, कधी लडीवाळपणे तर कधी बेभानपणे मला त्याच्या प्रेमवर्षावात चिंब चिंब न्हाऊ घालतो. तापलेल्या अवनीप्रमाणे मीही त्याला पिऊन टाकते... तो रिता रिता होतो... मी तृप्त तृप्त होते... श्रांत-क्लांत!!

मला पुन्हा एकदा वेड लावून माझ्या पाऊससख्याने दडी मारलेली असते... मी बेभान सुखाने गुंगावलेली असते...
एव्हाना परीसराने ओलसर मखमली जांभळट काळोखाची दुलई ओढलेली असते. आकाशाच्या गर्दगडद पटलावर एखाद्या गुबगुबीत करड्या जांभळ्या ढगाआडून चंद्र हलकेच डोळे मिचकावत हसतो! आत रेडिओवर कधीपासून वाजत असलेला मिलींद इंगळेचा 'गारवा' एव्हाना संपत आलेला असतो... रित्या धीरगंभीर सुरात उर्वरीत स्वर गंधाळत राहतात...

"पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्र चिंब भिजलेला..
विझवून चांदण्या सार्‍या, विझलेला शांत निजलेला!"


--- स्वप्नाली वडके तेरसे

ललित : रंगायतन!!

नुकतीच रंगपंचमी पार पडली... धुलीवंदन/धुळवड आणि पंचमीच्या दिवशी रंगपंचमी! रंगांचा उत्सव! ऋतूराज वसंताच्या आगमनाप्रित्यर्थ स्वागतासाठी निसर्गाने केलेली मुबलक रंगागंधांची उधळण अनुभवत आपणही त्या निसर्गरंगात मनसोक्त डुंबून घेतो... राज्यातील अन समस्त देशभरातीलच कोरड्या दुष्काळाने ग्रासलेल्या लोकांचा विचार करत सरकारने केलेल्या पानी बचाओ आवाहनाला समस्त देशभरातील आबालवृद्धांनी कौतुकास्पद साद दिली अन कोरडी होळी(धुलीवंदन) साजरी केली...

यावेळी रंग खेळायला नवरा नव्हता सोबत!
[तसंही तो बोका आहे, अंघोळीच्या वेळी काय भिजेल तोच! एरवी पाण्याचा शिंतोडा उडाला तरी हात झटकत बसणार... पावसात भिजणे-बिजणे तर सोडाच! तेव्हडा रोमँटिकपणा नाहीये हो आमच्या नशीबात!! : (
बाहेर पाऊस पडायला लागला की माझ्या मनमोराचा पिसारा हाSS फुलारून येतो!!! तो गुलाबी गारवा... एकांतातला शहारा... कुंद हवा... धुंद वातावरण खिडकीतून मी पाहून पाहून वेडी होत असते... मनात पिंगा घातलेला असतो आल्याने गंधाळलेल्या वाफाळत्या कडक चहाचा व गरमागरम कुरकुरीत खमंग खेकडाभज्यांचा वास... झालंच तर मग मोगर्‍याच्या अर्धवट उमललेल्या धुंद कळ्यांचा आणि ओलसर मातीचा खरपूस वास, जगजीतच्या मधाळ कातील गझला आये हाये!!! आणि फुस्स आमचं अर्धांग आळसावलेल्या बोक्यासारखं सोफ्यावर हात पाय जितके म्हणून वळकटी वळता येइल तितके पोटाखाली मुडपून लोळत असतं... माझ्या मनातले आल्याचा चहा नी भज्यांचे वास ही साम्यस्थळं सोडल्यास बाकीचे प्रकार कशाशी खातात हे गावीही नसतं यांच्या!!! आणि रंगपंचमीचे रंग!!! अर्रे माझ्या कर्मा!! चमचमीत नॉनव्हेज्/मिसळ ओरपताना मसलट तेलाचा एखादा पुसटसा शिंतोडा जरी पांढर्‍याशुभ्र बनियन वर पडला तरी हे राम!!! हे रंगाबिंगाचं काय घेऊन बसलात!!!]
मी मात्र खेळले मनसोक्त रंगपंचमी माझ्या पिल्लूसोबत... अगदी नैसर्गिक! हळदीने, आणि त्याच्या माश्याच्या पिचकारीत जेवढं पाणी मावेल तेवढ्या पाव वाटीभर पाण्यात!!! वर पिल्लूने चिमुकल्या हातांनी गालाला लावलेल्या हळदीने थोडेतरी गाल उजळलेत का तेही चोरून बघून घेतलं आरशात... पी हळद हो गोरी! च्या अतिउत्साहाने!!


नवरेबुवांचं रंगांचं तथाकथित ज्ञान तसंही अगाध(!!???) आहे! नुकतच लग्न झालं तेव्हा साडी घेताना प्राथमिक रंगांचीच माहीती असल्याने बॉटलग्रीन, हिरवाजर्द, मेहंदी, पोपटी, पिस्ता, मग झालंच तर चटणी वगैरे छ्टांपर्यंत आमची गाडी घसरल्याने येताना समोसे नी पुदीना चटनी आणून चट्टामट्टा करत बसायला हवं होतं... पोटात कावळ्या-उंदरांनी फेर धरलाय!! असे काहीसे अस्वस्थ भाव त्याच्या चेहर्‍यावर पसरलेले... टोमॅटो रंगाचा शालू नी चटणी रंगाची साखरपुड्याची साडी घेतल्यावर आता गृहप्रवेशाला काय चिंचेच्या कोळाचा कलर पाहूयात का? सँडविचच्या सगळ्या झणझणीत चटण्या त्याच्या डोळ्यांत उतरलेल्या आणि टोमणे अधिकाधिक आंबट झालेले... खरेदी आवरती घेऊन आधी पोपूला धावावं लागलं होतं...

खरेदीसाठी गेल्यावर सरळसाध्या लाल रंगाला लाल न म्हणता उग्गाच डाळींबी, कोकमी, कुसुंबी, टोमॅटो, मरून, तपकीरी, विटकरी अशी विशेषणं का देतात याचा विचार करकरून नवरोबांच्या उत्साहाला वीट अन मेंदूला झीट आलेली असते...
 



तरी नशीब!! हल्ली हल्लीच फ्याशनमॅनियाक झाल्यासारखं जबाँग, फॅब इंडिया नी पँटालून्सच्या साईट्स वर भरकटून मिंत्राने दिलेल्या फॅशन मंत्रानुसार इंग्लिश कलर्स सांगत बसत नाही त्याला!! "लिनन-- हा कलरेय? हे तर कापडेय ना..." (कित्ती गं बाई गुणाचा माझा नवरा तो!! नश्शीब!! कापडाचे प्रकार तरी माहीतेत! नाहीतर कॉटन एके कॉटन!!!) मनातूनच अलाबला करत मधाळ नजरेने त्याला म्हटलं "नाही रे राजा ही पांढर्‍या रंगाची शेड आहे..!"

"पांढर्‍याची शेड?? हॅ!! पांढरा म्हणजे पांढरा शुभ्र!!! दुधासारखा! झालंच तर अगदी धुतल्या तांदळासारखा!! (लग्नाची बायको शोधताना कॅरॅक्टरचा हा क्रायटेरिया घरात बोलला गेला असावा... नाहीतर भात लावण्याआधी तांदूळ-बिंदूळ धुतात, मोदकाचे तांदूळ धुवून वाळवलेले असतात हे माहीत असणे शक्यच नाही!!) , नाहीतर रिन की अगदीच हाईट म्हणजे उजालाकी निळसर सफेदी!! बास!!"

नाही रे राजा... मी तत्ववेत्त्याच्या सूरात समजावत म्हणाले, अरे क्रीम, आयवरी(हस्तीदंती), व्हॅनिला, एगशेल, स्मोकी(धुरकट), पिवळसर पांढरा, निळसर सफेद, गुलबटसर पांढरा(लिनन/बेज), पोपटीसर पांढरी अमका नी ढमका! नवर्‍याचा मेंदू धुरकट पांढरा पडलेला एव्हाना माझं पंडूर प्रवचन ऐकून!!! अजून पुढचे सेकंडरी कलर शेड्स व अमक्या ढमक्या असंख्य रंगछटा शिल्लक होत्या... पुढचा धोका सूज्ञपणे ओळखत दुसर्‍या कुठल्याही समंजस नवर्‍याने त्याप्रसंगी केलं असतं तेच प्रसंगावधान राखत आमच्या नवरोबांनी 'फोन आलाय वाट्टं..' असं 'कोण आहे रे तिकडे??' च्या चालीवर पलायन केलं!! हे समजण्याइतकी मी हुशार बायको आहे, पण जाऊंदे मला काय?? त्याचंच नुकसान!! आणि तसंही.. 'आमच्या हिला माझ्यापेक्षा जरा जास्त फॅशनसेंस आहे' असं नवर्‍याने कधीकाळी केलेलं कौतूक पदरात पाडून घ्यायला कुठल्या बायकोला नाही बरं आवडणार??

पण या रंगांचा प्रॉब्लेम माझ्याच कशाला, सगळ्याच बायकांच्या नवर्‍यांना असतो वाटते...लाँड्रीला दिलेली बेडशिट बरेच दिवस परत न मिळाल्याने मी लाँड्रीवाल्याला समजावत होते," भैय्या ती पांढरी बेडशिट नाही दिलीत परत... वो सफेद, उसपर वेली वेली का निळसर डिझाईन है ना... और निळे छोटे छोटे ठिपके..." त्याचा चेहरा एका मोठ्या निळ्या ठिपक्यासारखा अनभिज्ञ! नवर्‍याने सांगितलं "भैय्या परसों दी थी सफेद चद्दर बेडशिट वो लाके नही दी!" निळा ठिपका माणसात आला.... "लाता हूं" असं म्हणत हसत हसत कपड्यांचं गाठोडं खांद्याला अडकवत तो पसार झाला...
नवर्‍याला त्याचा प्रॉब्लेम (आपबिती वरून) लग्गेच समजला... आणि लग्गेच मदतीला गेला... नवर्‍याचा चेहरा, "तेरा दर्द मै समझ सकता हूं मेरे भाई...!" अरे वा एकमेकां करू साहाय्य!!! छाने!!

परवा नवर्‍याने मात्र कहर केला... ऑफीसातनं फोन केला, "अचानक माझं(त्याचं) माहेरी(त्याच्या) जाणं ठरतंय तर ती गोल्डन ब्राऊन बॅग भरून ठेव!!"

बाई गं!! गोल्डन ब्राऊन??? माझ्या नजरेसमोर नुकत्याच धुळवडीत रंगलेले असंख्य चंदेरी-सोनेरी ऑईलपेंट कलर्स तरळून गेले... बघीतलं तर बेडच्या तळाशी एक मिलीटरी ग्रीन रंगाची, एक डार्क कॉफी रंगाची आवि त्याची नेहमीची बेज रंगाची!!! आता यात गोल्डन ब्राऊन म्हणजे मिलीटरी नक्कीच नसणार नाहीतर तो कोथींबीर चटणी हिरवी वगैरे म्हटला असता..आता उरल्या दोन!! तरी खात्री करण्यासाठी त्यातली एक कपाटाला लाऊन बघितली... मग त्याला फोन केला... "आपलं कपाट कुठल्या रंगाचंय रे?" माझा स्थितप्रज्ञ आवाज! "ते ना... फिकट तपकीरी!!" त्याचं आत्मविश्वासपूर्ण उत्तर! बरं म्हणत मी फोन ठेवला...

घरी आल्यावर त्याची "त्याला हवी असलेली" मी भरून ठेवलेली बॅग उचलून त्याच्या माहेरी प्रयाण केलं.

अवांतर माहीतीसाठी: त्या बॅगेचा आणि कपाटाचा रंग डिटो सेम आहे आणि तो आहे बेज!!!!असो! आता कानाला खडा!! नवर्‍याला प्रायमरी - लाल,हिरवा, निळा रंग सांगायची परवानगी आहे... छ्टा नकोच!!! अर्थ लावता लावता माझ्या चेहर्‍याचा रंग उडतो... :)

मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा आहे?

प्रसंग : मला लवकरात लवकर काही कामानिमित्त स्टेशनकडे जायचं होतं म्हणून दादरवरून मी व मैत्रीणीने टॅक्सी पकडली... टॅक्सीचा मध्यमवयीन चालक सिगारेट ओढत होता. मी त्यांना सांगितलं काका, मला अॅलर्जीआहे, ५ मिनिटं सिगारेट नका ओढू प्लीज. तर आम्हाला म्हणाला, "मेरी टॅक्सी है, मै मेरी टॅक्सीमें कुछभी करूंगा, तुम्हे नहीं जमता है तो उतर जाओ!" आम्हाला घाई असल्याने झक मारत जावं लागलं.

प्रसंग : ४ दिवसांपूर्वी रिक्षेने घरी चालले होते... रिक्षेमध्ये जोरजोरात गाणी लावली होती म्हणून मी व इतरदोन सहप्रवाश्यांनी गाणी बंद करण्या स सांगितले, तर त्या रिक्षेवाल्याने उर्मटपणे म्हटले "गाने बंद नहीं होंगे, बैठना है तो बैठो!" आम्ही म्हणालो "आम्हाला नाही ऐकायचेत गाणी, तू नंतर ऐकत बस.." त्याने आधीचा उर्मट स्वर जराही कमी न करता शांतपणे सुनावलं,"तो फिर उतर जाओ" आम्ही उतरलो आणि दुसरी रिक्षा पकडून गेलो.

प्रसंग : माझा नवरा बोरीवली पश्चिमेकडील गो. रा. गांधी रेस्तराँमध्ये गेलेला... दुपारची वेळ आणि अज्जिबात गर्दी नसल्याने तिथील गारव्याचे टेबल पकडून त्याने ऑर्डर दिली. ऑर्डर घेऊन वेटर आल्यावर तेथील मालक म्हणवणार्‍या माणसाने नवर्‍याला उटून दुसर्‍या टेबलावर बसावयास सांगितले. तर नवर्‍याने सौम्य शब्दांत सांगितले गर्दी नाहीय ना, मग इथे बसलं तर काय प्रॉब्लेम आहे? तर म्हणाला, "क्या खिचखिच करता है, ये मेरा हॉटेल है! बोला है, वहापे बैठना है; तो बैठो, वरना चले जाओ!" माझा नवरा उठला नाही. त्याने सांगितलं इथे येऊन धंदा करायचा तर नीट करा. दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.

अर्थातच हे अनुभव मराठी माणूस म्हणून आलेले नाहीत, पण या अन्य भाषिकांची दादागिरी अंमळ वाढत चालली आहे.

हे आमचे अनुभव! असेच अनुभव इतरही अनेकांना येतच असतात. मराठी माणसाच्या मवाळपणाचा उदासिनतेचा, अलिप्तपणाचा गैरार्थ काढून त्याला गृहीत धरले जात आहे का?



अन्य भाषिकांनी मुंबईमधील जागा उद्योगधंदे काबिज केले आहेत. रिक्षावाल्यांची, टॅक्सीवाल्यांची, हॉटेल हॉटेलवाल्यांची मुजोरी वाढतेय.. संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे देशभरातील कोणीही कुठेही जाऊन काम करणे कसे न्याय्य आहे हे अन्यभाषिक गळा काढून सांगतात. महाराष्ट्रात त्यांच्यावर कसा अन्याय होतो याचेही सहानुभूतीप्राप्तीसाठी रूदन करीत सांगतात. काही बिल्डींगमध्ये मांस-मच्छी खाणारे म्हणून मराठी लोकांना जागाही देणे नाकारले जातेय...
मुंबई खरंच महाराष्ट्राची आहे?? मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा आहे?


मराठी शाळांवर बंदी आली आहे. मराठी चित्रपटांना प्रदर्शित करवून घेण्यासाठी मल्टीप्लेक्स चित्रपटगृह मालकांशी झगडावं लागतं!!! मराठी माणसाने स्वतःच मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे.



मराठी बोलणं हे स्वतः मराठी माणसालाच कमीपणाचं वाटू लागलं आहे... फळवाले, भाजीवाले, रिक्षावाले, नारळपाणीवाले, वेटर, दुकानदार इतकंच काय ट्रेनमध्ये भांडतानाही आपण हिंदी भाषाच नकळतपणे का वापरतो??

कोणीही यावे आणि मराठी माणसाला टपली मारून जावे यावर मराठी भाषिकांची स्वतःची भूमिका काय आहे? त्यावर अन्य भाषिक व मराठी नेत्यां च्या भूमिका अवलंबून आहेत! नाहीतर काही दिवसांनी मराठी माणसाला मुंबई ही महाराष्ट्राची आहे हे सिद्ध करण्यासाठी लढा द्यावा लागल्यास नवल नाही...

आपलं काय, वाचून विचार करणार आणि नेहमीच म्हणून सोडून देणार! आपण स्वतः तोडक्या मोडक्या बंबईया (मुंबईया नव्हे बरं का!!) हिंदी भाषेत बोलायचं; पडेल टाकाऊ हिंदी पिक्चरपण मल्टीप्लेक्सच्या गारव्यात पाहायचं नी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपटाच्या स्टेशनाबाहेरील पायरेटेड सीडीज आणून रविवारच्या टी. पी. साठी बघायचं; कोणा राज्यकर्त्यांनी मराठी साठी आंदोलन केलं या बातम्या वर्तमानपत्रात वाचून "मतं मिळवायचे धंदे" असल्या कमेंटसह चहाचे घुटके गिळायचे... या व्यतिरिक्त किंवा याच्यापेक्षा जास्त आपण करू तरी काय शकतो?? नाही का??

MBA नंतर...ग्रीन कार्ट कोकोनट एक्प्रेस???

MBA केल्यानंतर काय करावं??? समजा एखाद्या MNC मध्ये मॅनेजरपदी राहून मस्त स्वतंत्र एसी केबीनमध्ये पाच सहा आकडी पगार घ्यावा, मस्त लोण्यासारखी चालणारी गाडी, मुंबई-पुण्यात मस्त आधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि आकर्षक फर्निचर, इंटेरिअरने सजलेला फ्लॅट, हिरवळीवर दिमाखात उभी राहीलेली छोटेखानी टुमदार बंगली कम सेकंड होम... व्वा! नुसत्या विचाराने गुलाबी, गुबगुबीत, गोजीरवाणी सप्तरंगी स्वप्नं पापण्यांआडून रांगायला लागले ना??? आणि... मी म्हटलं नारळपाण्याची गाडी काढली तर कशी काय आहे आयडीया?? "काय भिकेचे डोहाळे!!!" अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नक्कीच उमटतील नाही???

आजच्याच लोकसत्तेत वाचलंत का? अभिजीत कुलकर्णी यांनी एका आगळ्या मराठी (हो हे स्पष्टपणे नमूद करायलाच हवं!) MBA आंत्रप्रुनरची ओळख करून दिलेय... अविनाश इघे...! अर्थशास्त्र व्यवस्थापनातील मास्टर्स पदवी घेतल्यानंतर नाशिकातील या मराठमोळ्या तरूणाला वर नमूद केलेल्या गोंडस स्वप्नांनी गुदगुल्या करीत खुणावलं असेलही कदाचित! पण या स्वप्नांकडे धाडसाने दुर्लक्ष करून कमोडिटी बिझनेसांतर्गत "ग्रीन स्ट्रीट कार्ट" या डोळ्यांना सुखद गारवा देणार्‍या मस्त फ्रेश पिस्ता हिरव्या शेडमधल्या आधुनिक नारळपाण्याच्या गाड्यांचा ब्रँड सर्व शहरांत वसवण्याच्या मोठ्ठ्या स्वप्नाने आणि ध्येयाने त्यांच्या डोळ्यांनाच काय पण मेंदूलाही पार झपाटून टाकलेय!

आता
या कार्टमध्ये वेगळेपणा काय तर आता कळकट कपडा मांडीवर टाकत अर्धवट गंजलेल्या कोयत्याने नारळ फोडत त्याचा वरचा टवका उडवताना "नारियलपानी"वाल्याकडून अर्धेअधिक पाणी खाली सांडत तुम्हाला कपड्यांना सावरत तो मोठ्ठा नारळ पेलण्याची कसरत करायला नको. या कार्टमधील मशिनच्या सहाय्याने वरचेवर नारळाला मस्तपैकी छिद्र पाडून त्यातील पाणी कार्टमधील एका छोट्या कंटेनरमध्ये टाकायचं आणि अवघ्या ५ सेकंदांमध्ये थंडगार, स्वच्छ, गोड नारळपाणी तुमच्यापुढे हजर!!! आणि पुन्हा कागदाच्या ग्लासमधून त्यामुळे पर्यावरणासाठी आणि तुमच्यासाठीही सुरक्षित!! आहे की नाही अभिनव कल्पना...! उन्हाळी सुट्ट्या पण सुरू होतीलच लवकरच! त्याच्या आतच सुर्योबांनी आपल्या तप्त झळांचे किरणदूत फैलावण्यास सुरूवात केलीच आहे! तर नारळपाणी हा आयुर्वेदाने सुचवलेला आरोग्य आणि सौंदर्यवर्धक थंडगार आणि चवदार उपाय या उन्हाळ्यावरचा अक्सीर उतारा म्हणून होऊ शकतो.

सध्या नाशिकधल्या काही महत्त्वाच्या नाक्यांवर, चौकांमध्ये सध्या कोकोनट एक्स्प्रेस दिसू लागल्या असून त्याला पहिल्याच टप्प्यात अपेक्षेहून चांगला प्रतिसाद असल्याचे अविनाशकडून समजल्याचे लोकसत्ताच्या अभिजीत कुलकर्णी यांनी लेखात नमूद केले आहे. या कोकोनट एक्प्रेसचं वेगळ्या पद्धतीने ब्रँडींग करण्यासाठी या गाडय़ांवर उभे राहून सेवा देणाऱ्या तरुणांसाठी विशिष्ट रंगाचा टी शर्ट आणि टोपी असा ड्रेस कोडही अविनाशने निश्चित केला आहे. गजनीच्या ब्रँडींगसाठी सिनेमॅक्सच्या स्टाफला खास गजनी कट ठेवण्यास सुचवणार्‍या परफेक्शनिस्ट आमीरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलाय वाटते...!

थोडक्यात काय, कायमस्वरूपी नोकरी, महीना अखेरीस निश्चित स्वरूपाचा पगार आणि गुंतवणूकीचे, घराचे हप्ते फेडून गाठीला पै पै जोडून गंगाजळी जोडणारे सुरक्षित स्वप्न पाहणार्‍या मराठी माणसाने कल्पनेचे गरूडपंख लावत मोठ्या स्वप्नांच्या जोरावर बिझीनेस स्पर्धेच्या अवकाशात झेप घेतली आहे... ही तर सुरूवात आहे... येत्या काळात त्या त्या ठिकाणच्या स्थानिकांना व्यवसाय संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून अन्य शहरांमध्ये देखील ग्रीन कार्टची साखळी निर्माण करण्याचा अविनाशचा मानस असल्यामुळे भविष्यात उच्चशिक्षित बेरोजगार तरूणाने संधी उपलब्ध नाहीत हे कारण देण्यापूर्वी स्वयंरोजगाराचा हा मार्ग नक्कीच पडताळून पाहावा.

माझ्या बाबतीत म्हणाल तर... "पातळ मलईवालं नारळपाणी दे..." (हो! सुरूवातीला मराठीच बोलून बघते... समजतंय का ते!) असं म्हटल्यावर पातळ मलई (लुसलुशीत साईसारखं खोबरं हे फारच डोक्यावरून जाईल ना!) म्हणजे काय
ते अण्णा किंवा भैय्याच्या गाडीसमोर घसा आणि डोकंफोड करत बसायला नको!!! :)

संदर्भः
["पहिला फोटो लोकसत्ता १४--२०११ च्या अंकातून साभार] "
१४-३-२०११च्या लोकसत्तामधील अभिजीत कुलकर्णी यांचा "रस्त्यावर उतरुन ‘एमबीए’ अविनाश बनला नारळ पाणीवाला!" लेख!



प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!!
प्रत्येक व्हॅलेंटाईन डे ला ही कविता नक्कीच आठवत असेल ना?? हा प्रेमाचा संदेश देणारे आणि इतर अनेक विविध विषयांवरील लोकप्रिय कविता, चित्रपट गाणी, बालगीते, वात्रटिका, कथा लिहीणारे जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर यांचा आज ८२ वा वाढदिवस!

मंगेश केशव पाडगांवकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या समुद्राने वेढलेल्या अत्यंत निसर्गरम्य गावात झाला. मुंबई युनिव्हर्सिटीमधून कला शाखेमध्ये संस्कृत आणि मराठी विषय घेऊन विशेष प्राविण्य प्राप्त केले. त्यांच्या पत्नीचे नाव यशोदा असून डॉम अजित पाडगांवकर, अभय पाडगांवकर व सौ. अंजली कुलकर्णी अशी तीन मुले आहेत.

मुंबईमधील रूईया महाविद्यालयामध्ये त्यांनी काही वर्षे मराठी विषय शिकवला. मुळातच कलेची आवड, साहित्यकलेमधील आणि लेखनातील विशेष प्राविण्य आणि अवघड विषय रोचकपणे, रंजकपणे व सहजपणे समजावून सांगण्याची हातोटी यांमुळे ते विद्यार्थी मंडळींचे आवडते होते. १९७० ते १९९० या कालावधीमध्ये त्यांनी मुंबई मधील यु. एस. इन्फर्मेशन सर्वीस येथे संपादक म्हणून काम केले.
सुमारे ४० प्रकाशने त्यांच्या क्रेडीटवर दाखल आहेत. U.S. Library of Congress हे त्यापैकीच एक!

मंगेश पाडगांवकरांना अगणित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.१९५३ आणि १९५५ चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, १९५६ मध्ये एम. पी. साहित्य संघाचा पुरस्कार, "सलाम" या काव्यसंग्रहासाठी १९८० मध्ये साहित्य संघ पुरस्कार...२००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

पाडगांवकरांच्या मनाच्या अद्भूत गाभार्‍यातून अलगद लेखणीद्वारे झरून अन अरूण दाते यांच्या मधाळ विरघळणार्‍या स्वरांचा साज पांघरून जादुई शब्द तुमच्यावर मखमली तलम गारूड कसं करतात समजतही नाही. उदाहरणादाखल काही गाणी हवीत???

हिर्‍याप्रमाणे तेजस्वी आभेने चमकणारा शुक्रतारा, रात्रीचा गुलाबी शहारा आणणारा मंद वारा, आणि पिठूर चांदण्यातील तीचा मऊसर उबदार सहारा... आणखीन काय हवं?? हा हवाहवासा सहवास किती हळूवार रोमँटिकपणे शब्दबद्ध केलेय पाडगावकरांनी त्यांच्या "शुक्रतारा मंद वारा" या गीतात...
आणि प्रेमातील आर्तता मग ती "त्या"ची असो वा "ति"ची समर्थपणे पोहोचवण्याचं काम करावं ते पाडगांवकरांच्या "भेट तुझी माझी स्मरते" आणि "असा बेभान हा वारा" या गीतद्वयींनीच! अरूण दाते आणि लता मंगेशकरांच्या आर्त स्वरांचा साज लेवून या स्वर-शब्द संगमाने तुमच्या ह्रदयात हलकीशी कळ नाही निर्माण केली तर तुम्ही फार्रच अरसिक बुवा!

यांच्यातील आर्त प्रेमिक कवी कधी "अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी; लाख चूका असतील केल्या, केली पण प्रीती" (स्वरः अरूण दाते) अशी बेधडकपणे प्रेमाची कबूली देऊन टाकतो तर कधी प्रेयसीच्या भेटीमुळे आत्यंतिक आनंदाने अंतर्बाह्य मोहरलेला प्रेमिक "जेव्हा तीची नी माझी" असे जगाचे भान हरपून गाऊ लागतो... (स्वरः अरूण दाते) तर कधी "अशी पाखरे येती.." (स्वरः सुधीर फडके) असं भूतकाळातील हिंदोळ्यावर उदासपणे झुलत उसासे टाकत गुणगुणतो.

"माझे जीवनगाणे" समर्थपणे गुणगुणणारे (स्वरः पंडीत जीतेंद्र अभिषेकी), कधी "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असा आशावादी आश्वासक संदेश देणारे, तर कधी "धुके दाटलेले उदास उदास" (स्वरः अरूण दाते) असे फिकुटलेले उदास निश्वास टाकणारे शब्द यांचेच!

"भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी" (स्वरः अरूण दाते) यांच्या खेळातून मांडलेल्या लग्नाच्या अर्धवट डावातील अधूरी कहाणी, त्यातील आर्त हुरहूर समर्थपणे पोहोचवणारे शब्दही पाडगांवकरांच्याच समर्थ लेखणीतून उतरलेले आहेत.

कधी यांच्यातील प्रेमिक "शब्दाविना कळले सारे" (स्वरः पंडीत जीतेंद्र अभिषेकी) म्हणत "शब्द शब्द जपून ठेव" (स्वरः सुमन कल्याणपूर) असा मौलिक सल्ला देण्यास विसरत नाही.
कधी यांच्यातील तत्ववेत्ता "जग हे बंदीशाला, इथे न कोणी भला चांगला; जो तो पथ चुकलेला.." हे जीवनाचे गहन तत्व रहस्य सांगून जातो.

"दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे" (स्वरः अरूण दाते) असे एखाद्या अल्लड षोडशेला सप्तरंगी स्पप्नांच्या दुनियेत अलगद नेणारे पिसाहून हलके शब्द, "तिन्हीसांजा सखे मिळाल्या" म्हणून कातरवेळी सखीला दिलेली आर्त साद, "मेंदीच्या पानावर" (स्वरः लता मंगेशकर) अलवारपणे झुलणारे हळवे मन, "येरे घना येरे घना" म्हणून थेळ घनालाच आपल्या हळव्या कातावलेल्या मनाला फुलवण्यासाठी न्हाऊ घालण्याची व्याकुळ विनंती... कित्ती रूपे वर्णावी या शब्दसंपदेची!! भावगीतांतील अलवार, हळवा, आर्त, नाजूक, आरस्पानी, व्याकूळ, मोहीत, मधाळ भाव थेटपणे पोहोचवण्याचे शिवधनुष्य या शब्दसामर्थ्याने लीलया पेलले आहे.

"ही वाट दूर जाते", "झाली फूले कळ्यांची", "हात तुझा हातातून", "अनामवीरा", "जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा", "तुझे गीत गाण्यासाठी", "भावनांचा तू रे भुकेला मुरारी" ही भावगीत, भक्तीगीत, प्रणयगीत, देशभक्तीपरगीत ही विविधता हे पाडगांवकरांच्या लेखणीचे सामर्थ्य!

बालगीतांचा रूणूझूणू किलबिलाट व्यक्त करण्यासाठी पाडगांवकरांचे शब्द असतील तर ती बालगीते अधिकच लडिवाळ रूपडं लेऊन दुडदुडत कुशीत शिरतात...
"असावा सुंदर चॉकलेटचा बंगला", "शाळेला निघताना", "आजोबा म्हणतात फणस", "आणायची माझ्या दादाला बायको आणायची", "खोडी माझी काढाल तर", "पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा", "कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा" या सर्व बालगीतांच्या ग्रामोफोनच्या गोल काळ्या रेकॉर्ड्स अजूनही बाबांनी माझ्या लहानपणाच्या आठवणी म्हणून जपून ठेवल्या आहेत... त्या बालगीतांबरोबर मी बागडत बागडत बोबड्या स्वरांत केलेली किलबीलही त्यांच्या आठवणींच्या पोतडीत अजून ताजी आहे.

पाऊस हा सानथोरांप्रमाणेच पाडगांवकरांच्या जिव्हाळ्याचा विषय! "सांग सांग भोलानाथ", "पिरपिर पिरपिर पावसाची"," येरे येरे पावसा रूसलास का, माझ्याशी गट्टी फू केलीस का?", "आला आला पाऊस आला", "ए आई, मला पावसात जाऊ दे", "टप टप टप टप थेंब वाजती" या बालगीतांतून तसेच वर वर्णन केलेल्या "येरे घना येरे घना", "श्रावणात घन निळा बरसला", "बाहेर बरसती धारा रे"... आणि ही यादी अशीच पाऊस धारांप्रमाणे अखंड बरसत राहील... आपण डोळे बंद करून शब्दधारांमध्ये चिंब भिजायचं

जीवनावर भरभरून प्रेम करणार्‍या कवी मंगेश पाडगांवकरांचा आज जन्मदिवस!
सर्व मराठी रसिकांच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा!!!

ललित : हास्य-रहस्य

हास्यरंग दिवाळी अंक २०१०-११ मध्ये पूर्वप्रकाशित!




हास्य-रहस्य

एक विनोद काय करू शकतो? हसवू शकतो आणि काय??? अहं! हे तर अर्धसत्य झालं. एक विनोद तुमच्या बधीर संवेदनांना अलगद आंजारून गोंजारून तर कधी गुदगुल्या करून हलकेच फुलवतो, खुलवतो. तुमच्या सुप्त आशा आकांक्षांना पुनर्जागृत करतो. विनोद हा विजेच्या सौम्य झटक्यासारखा असतो. जो तुमच्या अंतरंगातील अणूरेणूत एक अनामिक पण उत्साही खळबळ माजवतो. हेच आहे हास्याचे सौंदर्य आणि हास्यरहस्य! नाही पटत? अं... थोडं अधिक विश्लेषण करूया हं.





विनोद ऐकल्यानंतर सर्वसामान्यपणे ऐकणार्याची (आणि तो समजणार्याची !) प्रतिक्रिया काय असते बरं? एरवी लांब चेहरा आणि आंबट तोंड करून बसणार्या व्यक्तीच्या चेहर्यावर हास्याचा वसंत फुलतो. इस्त्री फिरवल्याप्रमाणे गंभीर
चेहरा करून आणि ओठांची झिप घट्ट आवळून वावरणार्या शिष्टाच्या चेहर्यावरील काही रेषा सुरकुत्यांप्रमणे हलकेच विलग होतात. एक विनोद हा मुखदुर्बळ व्यक्तीला त्या क्षणापुरता लौकिकतेचा वा प्रशंसेचा किरीट बहाल करतो. कल्पना करा, भाषणांच्या भाऊगर्दीत लंब्याचवड्या (बहुतांशी आत्मस्तुतीपर वा उपदेशपर) भाषणांनी सगळे पेंगुळलेत, काही तर चक्क स्थळकाळाची तमा बाळगता जोरजोरात गोरू लागलेत तर काही प्रतिष्ठा जपणारे, अनावर होणार्या जांभयांना त्या पूर्ण व्हायच्या आतच थोपवायचा निष्फळ प्रयत्न करत आहेत आणि अशा वेळेस एखादा वक्ता वावटळीसारखा अचानक यावा आणि वळवाचा पाऊस बरसावा तशी चुटकुल्यांची बरसात करून भाषण, समस्त श्रोतेगण आणि आजूबाजूचा मलूल परिसर नव्याने जीव फुंकून ताजातवाना आणि धंद करून जावा... काय? झोपी गेलेले सगळे खडबडून जागे होणारच नं? हीच तर ताकद आहे विनोदाची!

विनोद तुमच्या आयुष्यात जागृती आणतो. कशी? तुम्हाला एखादा विनोद कान, दोळे, लक्ष एकवटून ऐकावाच लागतो. नाहीतर नेमकी पंचलाईनच मिस कराल! विनोदामधला एक शब्द जरी चुकवलात तरी त्याची सगळी मजा तुम्ही घालवलेली असेल. चुटकुला किंवा विनोद हा काही क्षणांचा... अवघ्या काही ओळींचा असतो. त्या क्षणापुरतं तरी तुम्हाला दुर्लक्ष करणं परवडण्याजोगं नसतं. हा विनोद तुम्हाला पुढचे काही क्षण गुदगुल्या करत खिदळत ठेवतो. अधूनमधून आठवून गुलाबपाण्याप्रमाणे आनंदाच्या तुषारांचा प्रसन्न शिडकावा करत राहतो आणि इतरत्र कुठे मित्रांच्या टोळक्यात किंवा फॅमिली फंक्शनमध्ये हा ऐकलेला (आणि बरोबर लक्षात ठेवलेला) विनोद सांगितलात तर तिथले वातावरण आपोआपच हलके फुलके बनवून तुम्हाला लोकप्रियतेचा सरताज घालतो वर हास्याची आणि प्रसंशेची दादही! आणि जर विनोद ऐकतानाच हा क्षण चुकवलात तर_?? तर तुम्हाला तो विनोद पूर्ण ऐकून हसणार्यांपैकी कोणालातरी त्याच्या हास्याचा धबधबा थांबवून अतीव कुतूहनाने, याचक बनून "काय झालं, काय झालं?" असं विचारावं लागतं. त्या समोरच्याचा हास्यधबधबा आटेपर्यंत वाट बघावी लागते. त्याने आता शिळा झालेला तो विनोद घाईघाईत, थोडक्यात, गंभीरपणे सांगितल्यावर मग तुम्ही ब्रेक लागल्यासारखे हसता; तोपर्यंत बाकीचे तो क्षण उपभोगून आपापल्या कामाकडे परतलेले असतात! गेला ना तो क्षण वाया?


मैफिलीत हसण्यासारखी मजा नाही. एकेकटं हसण्यात कसली आलेय मजा? आणि "जाऊ दे, मला नाही असल्या पाचकळ गोष्टींम
ध्ये रस!" असं शिष्टपणे म्हणून तुम्ही तुमचं कुतूहल दाबून ठेवण्याचं काही काळ उसनं अवसान आणत असाल... तर मग मी म्हणेन तुम्ही फार्रSS अरसिक बुवा!!! आणखी एक छोटुकलं रहस्य सांगू?? पांढर्याशुभ्र दंतपंक्तींनी सुशोभित केलेल्या संपूर्ण चेहर्याला उत्साहाने उजळवणारे प्रसन्न हास्य असणार्या आणि चैतन्याने सळसळणार्या माणसाकडे कोणीही आकर्षित होईल की चेहरा लांब ओढून बसलेल्या, निर्जीव बुब्बूळांची संवेदनाहीन नजर कुठेतरी लांबवर लावून आणि खांदे पाडून बसलेल्या, एरंडेल प्यायल्यासारखे आंबटढाण तोंड करून बसलेल्या दु:खी आत्म्याकडे... हे तुम्हीच सांगा!

विनोद हा नेहमीच तार्किक असतो असं नाही. तो फारसा तात्विकही असत नाही आणि म्हणून मला विनोद आवडतो. विनोदाचे मूळ काम क्षणभराचा विरंगूळा! मोठमोठाले उपदेशाचे डोस पाजणे हे त्याचे कामच नव्हे! आणि जर पाजायचेच असतील असे उपदेशाचे डोस, तर ते विनोदाच्या शर्करेने अवगुंठीत असतील तर पचण्यास, गिळण्यास अधिक सुलभ, नाही का? काही विनोद अतार्किक असतात पण तरीही जाणकार त्यातून बरोब्बर तर्क काढून त्याचा हवा तो मतितार्थ समजावून घेऊ शकतात. खरं तर तार्किक विनोदाला खर्या अर्थाने विनोद म्हणताच येणार नाही. विनोद हा अतार्कीक असला पाहीजे. का? म्हणजे असं बघा हं- दोन अधिक दोन असं समोरच्याने म्हणेपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर ठाऊक असतं- चार! शे दोनशे घालवून जेव्हा तुम्ही एखाद्या महागड्या थिएटरात एखादं पिक्चर बघायला जाता तेव्हा पुढच्या प्रसंगांचा इतकंच नव्हे तर थोड्याफार फरकाने संवादांचाही अंदाज येऊ देणार्रं सरळ्धोपट कथानक तुमचा सपशेल विरस करतं कारण ते कथानक तुम्हाला तीन तासांच्या घटकांचा विरंगूळा मिळवून देऊ शकत नाही. पण हेच जर कथानकामध्ये अनपेक्षित कलाटणी मिळत असेल आणि संवादांमध्ये जागोजागी शाब्दीक विनोदाचे पंचेस पेरले असतील तर तुम्ही एवढे फुटून फुटून हसाल की तुम्हाला खाली पडू की काय या भीतीने तुमची खूर्ची पकडून ठेवावी लागेल.



एखादा गंभीर चेहरा करून विनोद सांगतोय- तो विनोद आहे याची पूर्वकल्पना देता! आणि तुम्ही मन लावून गंभीरपणे ते ऐकताय आणि मग अचानक अशी कलाटणी मिळते की ते समजून घ्यायला तुम्ही दोन सेकंदाचा अवधी (अर्थात ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार वाढीव) अवधी थबकता आणि मग जो हास्यल्लोळ होतो की बस्स! तार्कीक, पुढचा अंदाज बांधू देणारी सरळधोपट वाक्य म्हणजे विनोद असू शकत नाही कारण तो तुम्हाला, तुमच्या पेंगुळल्या सुप्त गात्रांना जागृत कर नाही, तुमच्यात चैतन्याची पिचकारी मारत नाही. तर्क हा पुढे जाणारा असतो- एकेका पायरीवरून अंदाज बांधत पुढच्या पायरीकडे वळणारा! पण विनोद शेवटाकडून सुरूवातीकडे वळतो. पुढे काय असेल याचा तर्क बांधत असतानाच आधी गौप्यस्फोट होतो आणि मग हास्यस्फोट! आणि मग तुम्ही विचार करता अरे सुरूवात काय होती बरं? काय जादू आहे पाहा विनोदाची! प्रत्येक वाक्यागणिक तो तुम्हाला अधिकाधिक सावध करतो, तुमची उत्सुकता शिगेला पोहोचवतो आणि मग एखाद्या रहस्याचा उलगडा केल्यासारखी प्रसंगावर वरताण पंचलाईन! शेवटाबद्दल तुम्ही कदाचित काही अंदाज बांधलेही असतील पण हे अंदाज बर्याचवेळेस चुकतातच कारण अतार्किकतेमुळे शेवट काय असेल हे शेवटपर्यंत फक्त तो विनोद सांगणार्यालाच माहीत असतं आणि त्यातून तो विनोद सांगणारा अधिक संवादकुशल असेल आणि गंभीरपणे सुरूवात करून रहस्याने श्रोत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवत आवाजाचे योग्य चढउतार करत पंचलाईनची कलाटणी देण्यात पटाईत असेल तर मग काय आटीव दुधात केशरकांडीच म्हणायची!

विनोद सांगणे हीसुद्धा एक कला आहे. शेवटपर्यंत उत्सुकता ताणत नेणे आणि मग अचान रहस्याचा उलगडा केल्यासारखं दाखवणे आणि वाक्यागणिक श्रोत्यांच्या चेहर्यावरील बदलणार्या रेषा आणि भाव न्याहाळणे हा कार्यक्रमच मोठा रोचक असतो. त्यामुळे विनोद वाचण्यापेक्षा सांगणे आणि ऐकणे जास्त परिणामकारक ठरू शकते. कारण श्रोत्यांची समोरासमोर मिळणारी दाद आणि मित्र आप्तस्वकीयांच्या सहवासात उपभोगता येणारा निर्भेळ आनंद! यात वक्ता तर तो क्षण पुरेपूर उपभोगून घेत असतोच पण श्रोत्यांनाही त्याचा त्याहीपेक्षा जास्त आनंद मिळतो.



विनोद ऐकताना, अंदाजाच्या माड्या बांधत जाणं आणि मग अचानक समजणं की अरे खोलीचा दरवाजा तर दुसरीकडूनच होता! पण अंदाजाच्या या कोसळलेल्या माड्यांमुळे श्रोत्यांना दु: वगैरे होत नाही उलट अचानक कलाटणी मिळाल्यामुळे धक्का बसून त्याचा उगम हास्यात होतो आणि ऐकणारे "अर्रे, अस्सं होतं काय!" असं म्हणत त्या हास्यमैफीलीत सामील होतात. कलाटणीचा वैचारिक धक्का जेवढा अधिक, तेवढा हास्यस्त्रोत जास्त आणि खळखळता! आजूबाजूचा परिसर चैतन्याने उत्फुल्ल बनवणारा, प्रसन्नतेने हिरवागार बनवणारा, तुमचे नैराश्य टेन्शन्स क्षणार्धात दूर पळवणारा, तुमच्यातील कार्यक्षमता वाढवणारा, वातावरणातील ताण कमी करणारा!! चेहर्यावरची हास्याची एक वक्र रेषा सर्व वक्र गोष्टी सरळ करू शकते हेच ते हास्यरहस्य! म्हणून विनोद ऐकत राहा, वाचत राहा, सांगत राहा; "हास्यरंग" वाचत राहा; निर्मळ, निर्व्याज आणि निर्भेळ हसत राहा, हसवत राहा! [ म्हणजे मग टेन्शन्स दूर करण्यासाठी कृत्रीम हास्यासाठी मोठी रक्कम गुंतवून हास्यक्लबात जायही गरजच उरणार नाही...! खरं नं?]