ललित : पाऊस! माझा प्राणप्रिय सखा!!


इतके दिवस पावसाला वेड्यासारखी 'मिस' करत होते. काल एक छानसं ग्रीटींग ही बनवलं त्याच्यासाठी पण ते त्या वेड्याला कसं समजलं कुणास ठाऊक! बरसलाच की काल रात्री - मनसोक्त, आससून!! जणू तो सुद्धा मला खूप 'मिस' करत होता... खरं तर तो कित्येकांचा सखा!! प्रत्येकासाठी बरसतो-अगदी हातचं न राखून! पण जेव्हा कधी खिडकीत बसून त्याला डोळे भरून न्याहाळत असते- मला वाटतं तो फक्त आणि फक्त मलाच भेटायला आला आहे... कृष्ण सखा नाही का प्रत्येक गोपिकेला फक्त आपला एकटीचाच सखा वाटे तस्संच! रूसलेय ना मी, इतके दिवस मी त्याची चातकासारखी वाट पाहतेय आणि हा कुठे दडी मारून बसलेला कोणास ठाऊक!! मग हळूच येतो, छान मोकळं मोकळं प्रसन्न हसू हसतो... खरं तर त्याच्या चाहुलीनेच, त्याच्या अंगागंधाच्या मंद सुगंधानेच मी वेडीपिशी झालेली असते... पण जाम ताकास तूर लागू देत नाही! माझा रूसण्याचा हक्क, तुझं मनवण्याचं कर्तव्य! अगदी हाताची घडी घालून गुडघ्यात डोकं खुपसून बसते मी... पाहतही नाही त्याच्याकडे... तो माझी हरप्रकारे समजूत काढण्याचा प्रयत्न करतो... कधी कान पकडून, उठाबश्या काढून, क्वचित एखादी सुरम्य गाण्याची लकेर गुणगुणून... लटक्या रूसव्याने फुगलेल्या माझ्या गालावर फुंकर मारून तर माझ्या बटांना अल्लदपणे विस्कटून तर कधी चेहर्‍यावर असंख्य तुषारांची बरसात करून... कधी असंख्य सरींचे अलवार हात लडीवाळपणे गळ्यात टाकून..!! मी खुदकन हसते... नाहीच रूष्ट राहता येत त्याच्यावर फारसं!! कित्ती लोभस आहे तो...!!!
प्रियतमेला कसं खुलवायचं फुलवायचं हे तंत्र त्यानं चांगलंच आत्मसात केलंय! लब्बाड कुठला!! गालगुच्चाच घ्यावासा वाटतो त्याचा... पण तो कुठला थांबायला एवढा वेळ!! वेड लावून पसार व्हायचं ही जुनीच खोड आहे त्याची!! पण मी मात्र त्याच्या सुखद आठवणींनी एकाच वेळेस तृप्त नी घायाळ व्हायचं... त्या एकांतातल्या विजनात!!
खरं तर झोकून देण्याची, सर्वस्व दुसर्‍यावर उधळून रितं होण्याची कला मी त्याच्याकडूनच शिकले... पण इतरांना तृप्त करताना आपण मात्र रिक्तच राहतो याची खंत तो फारसा कधी बाळगत नाही... हे मात्र अजूनही मला तितकंसं जमलेलं नाही!! त्या वेड्याला जाणवत तरी असेल का स्वतःचे रितेपण?? छे!! तो तर लुटवण्यात, उधळण्यात... स्वतःच्याच तालात उन्मुक्तपणे बरसण्यात तल्लीन!! एखाद्या कसलेल्या शास्त्रीयसंगीत गायकाने रियाझ करतानाही तल्लीन पणे स्वतःशीच एक अशी हरकत घ्यावी अन आजूबाजूच्यांना त्या सूरांच्या बरसातीने चिंब भिजवून टाकावे; स्वतःच्याही नकळत.. तसंच काहीसं!!

पावसाबद्दल लिहा-बोलायला लागले ना की मला माझंही भान राहत नाही. त्याचे कित्येक लोभस विभ्रम मला कित्येकदा वेड लावतात. खरं तर त्याच्या येण्याच्या चाहूलीनेच त्याने मला अर्धी गारद केलेली असते... त्याच्या आगमनाचा तो मादक मोहक सुगंध- इवले इवले थंडगार थेंब झेपावत कधी टप्पोरे होत जातात... आणि हलक्या सरींनी लुभावत तो आवेगपूर्ण पाऊसझडींनी कधी गुदमरून टाकायला लावतो ते समजतही नाही... तो बेभानपणे कोसळत राहतो... आंणि आपण ते फक्त अनुभवायचं- त्याचा आवेग, त्याचा जोष... निस्तब्धपणे, निशब्दपणे!!

तप्त रूष्ट धरणीला आपल्या थेंबांच्या नाजूक जादुई बोटांनी हळूवारपणे हसवतो, खुलवतो, फुलवतो... हलक्या सरीच्या अलवार हातांनी तिच्या भुरभुरणार्‍या शुष्क वेलींच्या बटा अलगद कानांमागे सारतो आणि तिच्या लालेलाल तत्प्त घामेजल्या चेहर्‍यावर अलगद प्रेमाची फुंकर घालतो आणि मग बरसतो- बरसत राहतो...बेभानपणे! तप्त धरित्रीची गात्रं गात्रं त्याचं ते बेभान प्रेम पिऊन श्रांत क्लांत होऊन तृप्त होईपर्यंत! त्याचे हे सारे भावविभोर, आत्ममग्न लोभस विभ्रम अन नवसृजनाचा हा सारा अविष्कार खिडकीतून डोळे भरून पाहत असते... धरणीचा मादक गंधभरला तो तृप्त निश्वास मला ऐकू येतो... स्त्रीसुलभ मत्सराने मी काहीशी अस्वस्थ होते... थोडीशी पेटूनही उठते... घायाळ होऊन कळवळून पाऊससख्याला विनवते... मी ही अशीच ग्रासलेय, त्रासलेय रे! दुखःच्या ग्रीष्मझळांनी माझ्या तनामनाची काहीली होतेय... मलाही असंच सचैल न्हाऊ घाल- चिंब, नखशिखांत! कणाकणाने- बेभानपणे!! तो येतो... माझ्या नकोश्या जाणीवानेणीवांतून तो अलगद हात देऊन मला बाहेर काढतो, स्वतःच्या बेभानपणाने मला भारून टाकतो... त्याचं ते बेभान होणं सुप्तपणे माझ्यात पेरून जातो... मी बेभान होत राहते पुन्हा पुन्हा... भानावर येईपर्यंत!!

वेड लावतात मला या पावसाची सगळीच वैविध्यपूर्ण रूपं- वार्‍याने त्रेधा उडव्त अवखळपणे भुरभुरणारा, थेंबांचा फेर धरून, तारांवरून, तृणपात्यांवरून थेंब बनून अल्लडपणे ओथंबणारा, कधी पागोळ्या बनून निरागसपणे बरसणारा, कधी तत्ववेत्त्याप्रमाणे गंभीरपणे संतत्धारेच्या रूपाने तर कधी उन्मुक्त बेभान प्रियकराप्रमाणे पाऊसझडींमध्ये अविरत कोसळून गुदमरून टाकणारा! बरसून रितं झाल्यानंतरचा त्याचा हवाहवासा मादक गंधगारवा मी अंगांगभर लपेटून घेते शहारत!!

एकांतात कधीकाळची विसरली गेलेली जखम त्या विजनात भक्ककन उघडी पडते, त्यावर काळाची धरलेली खपली उचकटली जाऊन भळभळत राहते- बाहेरच्या पावसासोबत! बाहेरच्या पावसाला माझ्या या आतल्या मूकपणे झरणार्‍या पावसाचा सुगावा कसा लागतो कोणास ठाऊक? पण मग तो एखाद्या समंजस प्रियकरासारखा शांतपणे बरसत राहतो. त्याच्या असंख्य रूपेरी शीतल हातांनी मला कवेत घेऊन हळूवार थोपटत राहतो. मी त्याच्या आश्वासक मिठीत विरघळून जाते...कणाकणाने!

कधी कधी मात्र पाऊससखा रंगात येतो. आपल्या वात्रट मित्राला, वार्‍याला हाताशी धरून उगाच छेडखानी करत राहतो.. कधी ओढणीमध्ये ओढाळपणे लपायला पाहील तर कधी केसांच्या उन्मुक्त बटांबरोबर खेळू पाहील... चिंब ओलेतं रूप चोरून पाहण्यासाठी उगाच धडपड करीत राहील... आणि मग माझ्या हातातील छ्त्री वार्‍याच्या एका जोरदार झोताने पलटी झाली की दोघंजणं "कश्शी मज्जा केली!!" असं मिस्कीलपणे म्हणत एकमेकांना टाळी देत अवखळपणे हसतील.. कसं रागावू या लोभस विभ्रमांवर?? मलाही तर ते सारेच्या सारे हवेहवेसे असतात. या भावविभोर विभ्रमांना डोळे भरून पाहण्यासाठी- अनुभवण्यासाठी मी चार महीने विजनाचा वैशाखवणवा सहन केलेला असतो- माझा पाऊस सखा येईल अन माझ्या सार्‍या ठसठसत्या वेदनांवर अलवार फुंकर घालेल... तो येतोही! माझ्या मनातले भाव बरोब्बर पकडत तो येतो. मी उदास गप्पगप्पशी दिसले तर पार अस्वस्थ होतो... स्वतःच अस्वस्थ होऊन बरसत राहतो... त्याला अजिब्बात आवडत नाही मला त्रास झालेला... वेडा आहे तो-- माझ्यासारखाच! अवखळपणे, कधी लडीवाळपणे तर कधी बेभानपणे मला त्याच्या प्रेमवर्षावात चिंब चिंब न्हाऊ घालतो. तापलेल्या अवनीप्रमाणे मीही त्याला पिऊन टाकते... तो रिता रिता होतो... मी तृप्त तृप्त होते... श्रांत-क्लांत!!

मला पुन्हा एकदा वेड लावून माझ्या पाऊससख्याने दडी मारलेली असते... मी बेभान सुखाने गुंगावलेली असते...
एव्हाना परीसराने ओलसर मखमली जांभळट काळोखाची दुलई ओढलेली असते. आकाशाच्या गर्दगडद पटलावर एखाद्या गुबगुबीत करड्या जांभळ्या ढगाआडून चंद्र हलकेच डोळे मिचकावत हसतो! आत रेडिओवर कधीपासून वाजत असलेला मिलींद इंगळेचा 'गारवा' एव्हाना संपत आलेला असतो... रित्या धीरगंभीर सुरात उर्वरीत स्वर गंधाळत राहतात...

"पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्र चिंब भिजलेला..
विझवून चांदण्या सार्‍या, विझलेला शांत निजलेला!"


--- स्वप्नाली वडके तेरसे

0 comments:

Post a Comment