ललितः I'm Good At Being Me....


छान हे विशेषण व्यक्तीसापेक्ष आहे. व्यक्तीपरत्वे बदलते.
म्हणजे जर मी "आपण भलं आपलं काम भलं" या कॅटॅगरीतली आहे तर काहीजणांच्या मते मी छान आहे... कारण मी त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात त्यांना नको असताना विनाकारण नाक खुपसत नाही. सहज चौकशी केल्यासारखे दाखवून त्यांच्या दुखर्‍या नसांवर बोट ठेवत नाही, खवचटपणे हसत हसत भोचकपणा करत त्यांच्या बातम्या काढत नाही त्यांच्यासमोर गुडी गुडी बनत इतरांकडे त्यांच्या बातम्या माझ्याकडच्या मीठमसाल्यात घोळवून चविष्टपणे चघळत नाही... पण याउलट मात्र काहीजणांच्या विशेषतः काहीजणींच्या मते मी फारच शिष्ट या कॅटॅगरीत मोडते. माणूसघाणी, कोणाकडे यायला नको कोणाकडे जायला नको, कोणाची कसलीही 'विचारपूस' करीत नाही, कोणी केलीच तर स्वतःचा ताकास तूर लागू न देता हसत हसत प्रश्नांना बगल देते वगैरे... पक्की आतल्या गाठीची!


छान हे विशेषण परीस्थितीसापेक्षसुद्धा आहे. म्हणजे असा बघा हं... आता एखाद्याला मदतीची खूप खूप गरज आहे, आणि कर्मधर्मसंयोगाने मी ती मदत करू शकले तर मी खूप छान असते. पण माझी हीच किर्ती ऐकून दुसर्‍यानेही माझ्याकडून मदतीची अपेक्षा केली पण ती माझ्या आवाक्याबाहेर असल्याने मी सौम्यपणे नाकारले तरी मी वाईट होत नाही पण मग छानही नसते.


छान हे विशेषण कालसापेक्षही आहे. कसे?
आज आत्ता माझ्याकडे वेळ आहे, मी निवांतपणे एखाद्याकडे जातेय, गप्पा मारतेय... मी खूप खेळकर, गप्पिष्ट आणि छान असते. पण उद्या जर मी काही व्यापात अडकले तर पूर्वीचा वेळ देऊ शकेनच असे नाही. "बघा, तेव्हा गरज होती आमची म्हणून सतत येणं व्हायचं आणि आता काय 'मोठ्ठे लोक' झालेत... वेळ कुठाय आमच्यासारख्यांसाठी?" अर्थातच मी छानच्या सिंहासनावरून पायउतार!






छान हे विशेषण अनुभवसापेक्षपण आहे.
मला एखाद्या व्यक्तीचा पूर्वीचा अनुभव तितकासा चांगला नाही आणि तरीही मी मनात अढी न ठेवता तिच्याशी पूर्वीच्याच मोकळेपणाने वागले तर मी खूपच छान असते, पण जर मला नाही जमलं मोकळेपणाने वागायला तर तो माझा नैसर्गिक मनुष्यस्वभाव मला छानपणाच्या किताबापासून लांब ठेवतो.

हे झालं माझ्याबद्दल! पण "मी अशीच आहे, हवे तर स्वीकारा नाहीतर राहीलं" असं म्हणताना इथे मीही समोरच्याच्या जागी असतेच की बर्‍याचवेळेस! आपण समोरच्याबद्दल पटकन मत बनवून मोकळे होतो. त्याला उसंतही देत नाही पुरेशी, व्यक्त होण्यासाठी! आपण आपल्याला त्याच्या जागी ठेऊन किती वेळा पाहतो? बर्‍याचवेळेस आधी घमेंडी, माणूसघाणी शिष्ट वगैरे वाटलेली व्यक्ती काहीकाळाच्या संपर्काने छान मनमोकळी फ्रेंडली वगैरे वाटू शकतेच ना. आणि कधी कधी गोSSड वागणारी वाटणारी व्यक्ती तुमचा गैरफायदा घेऊ शकते. त्यामुळे छान बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुम्ही तुम्हीच राहणं महत्वाचं आणि विशेषणांच्या घोळात अडकवण्यापेक्षा समोरच्यालाही तोच राहू देणं!!! कारण कोणीच परफेक्ट नसतं!!

0 comments:

Post a Comment