Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

जी ले जरा... (१)



रोजचं धकाधकीचं आयुष्य... कितीही काटेकोरपणे घड्याळाच्या हिशोबी काट्यांवर धावलं तरीही हमखास चुकवणारं... तसंही आपल्याला कुठे होता हा सोस हिशोबांचा...!! आपला आधीपासूनच मनमौजी कारभार!

सोनपिवळी गोजीरवाणी उबदार लुसलुशीत किरणे पापण्यांपर्यंत लुडबुडत रांगत आली की निवांत उठा... आळसावलेल्या देहाला सत्यसृष्टीत आणायचा अज्जिबात घिसडघाई अट्टाहास न करता तसंच पेंगूळलेल्या डोळ्यातल्या साखरस्वप्नांना गोंजारत पाच-दहा मिनिटं काढायची... पुन्हा काहीसं ठरवून पांघरूण डोक्यावर ओढून घ्यायचं पुढच्या पाच दहा मिनिटांसाठी, त्याच त्या साखरस्वप्नांना गोंजारत! स्वप्नांच्या चलतचित्रपटातील पुढील दृष्य मागील धाग्याला सांधत... अगदी आपल्या नावाने ठणाणा होऊन त्या स्वप्नचित्रपटात व्यत्यय येईपर्यंत! मग खिडकीशी रेंगाळायचं... बाहेरच्या झाडावरचं अल्लड पाखरू वेल्हाळपणे किलबिलाट करतंय... मग पहील्या चहाचा पहीला घोट!!! अहाहा स्वर्गीय अवर्णनीय सुख!! डोक्यात अज्जीबात कसले विचार नाहीत. खिडकीच्या कडेला ओठंगून हातातल्या स्पेशल गिफ्टेड मगातून आल्याने गंधाळलेल्या चहावरच्या वाफेचे वलय विरायच्या आत हळूच छोटासा घोट जीभेच्या टोकाला चटके देत घोळायचा... त्या चटक्याची वेदनाही सुखद वाटावी इतकं तोंडभर गंधाळलेला तो घोट क्षणात रंध्रा रंध्राला तजेलदार करून जातो... पुढचा गंधाळलेला घोट आणि मग तो चहाचा मग रिकामा होईपर्यंत ही अमृतघोटांची साखळी सुरूच... पेपर चहासोबत आवडलाच नाही कधी!! चहा आणि तोंडी लावायला भरपूर निवांतपणा!! हक्काचा आपला असा! त्या सुखसमाधीला कोणीही छेडू नये... जेव्हा तंद्री मोडेल तेव्हा मोडू द्यावी खुश्शाल... हा एकमेव तर वेळ जेव्हा आपण फक्त आपल्या स्वतःसोबत असतो... वेगळ्या मेडीटेशनची गरजच काय? झेन तत्वज्ञान याहून का वेगळं असतं???

ताज्या कोर्‍या वासाच्या, कोपराही दुमडला नसेल अशा परीटघडीसारख्या वर्तमानपत्राला हळूवार उलगडत बातम्या वाचायच्या... वैषम्य दाटवणार्‍याच बातम्या अधिक!! पण मघाच्या मेडीटेशनचा दांडगा प्रभाव मेंदूवर तरलपणे फिरत असल्यावर त्यांचं विशेष काही वाटूही नये...

दिवसभरात छानसं गाणं ऐकावं... एखादी स्वतःशीच आठवलेली एखादी लाघववेळ!!! स्वतःलाच ऐकू जाईल अशी खुदकन हास्याची नाजूक लकेर... एखादं कसदार साहित्य... कधी खूप स्फूर्ती देणारं.. कधी खूप विचार करायला लावून स्वतःशीच एक मोठ्ठा हम्म्म्म्म्म म्हणायला लावणारं... तर कधी स्वतःच्याही नकळत टचकन डोळ्यांतून पाणी काढणारं...
एखादा सर्वांगसुंदर चित्रपट... नावीन्यपूर्ण विषयाने आणि कसदार अभिनयाने नटलेला... कचकड्याच्या नाचगाण्यांपासून आणि चकचकीत कृत्रीम निसर्गसौंदर्य(!!!??) दृष्यांपासून दूर...

आणि मग अचानकपणे एक दिवस ढकलले जातो माणसांच्या समुद्रात!! घड्याळाच्या काट्यांवर अविरत धावणार्‍या गर्दीचा एक भाग बनून...!! आपले आपण आपल्यालाही अनोळखी वाटावे असे हरवून जातो...

हे सगळं आज असं अचानक आठवायचं कारण??? कालच नाही का "तारें जमीन पर" लागलेला कुठल्याशा वाहीनीवर... त्यातलं गाणं... "है दुनिया का नारा.. जमे रहो...." अचानक त्यातल्या इशानची एंट्री... सूर्याची किरणे झेलत कूस बदलणं असो किंवा आळसावून ब्रश तोंडात धरून बेसिनला ओठंगलेलं असो... किंवा मग निवांत वेळ सत्कारणी लावत खास कमोडवरच्या स्वनिर्मीत भारी भारी कल्पना... कुठेतरी स्वतःच्या त्या हरवलेल्या अंशाचं प्रतिबिंब सापडू पाहतेय तोच बॅकग्राऊंडला वाजतं ढँडSS ढँडSS "है दुनिया का नारा..SS जमे रहो....ss" आणि लगबगीने आपण आपलं जडावलेलं बूड टिव्ही समोरून हलवतो.. पुढच्या कामासाठी.. आपल्यातला सापडू पाहणारा मनमौजी इशान पुन्हा हरवतो घड्याळाच्या काट्यांच्या हिशोबात!!! त्याला तरी कुठे हा हिशोब जमत असतो!! मग अशाच या धावपळीत स्वतःसाठी अगदी चोरलेला छोटासा वेळ... त्यामध्ये वाचलेला व्हॉट्सअ‍ॅपवरचा इन्स्पायरिंग मेसेज किंवा फेसबूक वरची एन्करेजींग पोस्ट... नकळत आपल्या आतल्या घुसमटणार्‍या आणि विझू विझू लागलेल्या इशानच्या स्वप्नांना नवी धुगधुगी देणारा राम शंकर निकुंभ सापडतो!! आणि मग आठवणींच्या यादीतील मागचं पान हळूवारपणे उलगडलं जातं... लांबलचक यादीच!!! ठरवलेल्या अन करावयाच्या राहीलेल्या गोष्टींची... 





पुन्हा सापडू पाहणारा मनमौजी इशान...! आपल्याच आत...! आपणच खोलवर दडपून टाकलेला... आतल्या आत घुसमटणारा...पुन्हा एकदा बेधुंद बेभान निवांत जगू पाहणारा... मनापासून, मनासारखं!!! पकडून ठेवायचा अनिवार मोह होतोय नाही... काही क्षण तरी...! निदान पुढचा "है दुनिया का नारा.. जमे रहो...." चा ढँड ढँड पुकारा होईपर्यंत आणि आपल्यातले आपण हिशोबी दुनियेत हरवेपर्यंत...!! मग म्हणूयात का आपल्यातल्या या अतरंगी मनमौजी निरागस इशानला... "जी ले जरा..."

............................................................2..b...Continued...............................................................
 


                                                                                                                                   July 11, 2013

पाऊस खूप आहे आज... कोसळतोच आहे... मी बसलेय इतरजणींसारखीच... पावसाच्या झडींपासून अंग चोरत... एकेकजण येताहेत... चिप्प भिजलेल्या... ओढण्यांची टोकं पिळत, ड्रेस आणि छत्र्या झटकत... त्यांचे उडणारे थेंबही मी चुकवतेय.... आधीच आकसलेलं अंग अजूनच चोरून घेतेय ( जितकं जमेल तितकंच अर्थात.. :D ) त्या त्रासिकपणे म्हणताहेत "कित्ती पाऊसेय नै आज... श्शी बाई कंटाळाच आलाय..." पुन्हा त्राग्याने ड्रेसची ओलीचिप्प टोकं फडफडवणं... ते उडणारे तुषार शिताफीने चुकवत मी त्यांच्याकडे बघून हसते... थोडंसं ओळखीचं, थोडंसं अनोळखी, थोडंसं सांत्वनपर.. आणि खुपसं खुशीचं...! मी आज लवकर आलेली असते ना... इथेतिथे बघत टीपी करेपर्यंत "हा" धो धो कोसळायला लागतो... "वाचले बुवा!" माझं मन खुशीत मांडे खातं... चिप्प भिजून एसीच्या त्या बोचर्‍या थंडीत ओले कपडे अंगावर वाळवत बसायचं??? छ्या!!

रंगीबेरंगी ओल्याचिप्प गर्दीने ट्रेन फुगते... कोणी आडोसे शोधत दाराशीच उभ्या राहतात... कोणी खिडकीशी सुरक्षित अंतर राखत चिकटून चिकटून बसतात...एकमेकांना बिलगून तारेवर बसलेल्या भिजलेल्या पाखरांसारख्या...!
रोज विंडोसिट पकडायला धावणार्‍या आज उदार अंतःकरणाने विंडोसिट ऑफर करत होत्या...
थेंबथेंब पाणी गाळणार्‍या चिप्प छत्र्या खिडकीच्या हँडल्सवर विसावत होत्या... कॉलेजकन्यकांचा घोळका बाजूलाच चिवचिवत असतो... नव्या फ्रीलवाल्या छत्रीला ट्रेनमध्येच उघडून वर तीघींच्या डोक्यावर धरत फॅनखाली वाळवत असतो... स्वतःचे फंकी ट्रान्सपरंट सँडल्स दाखवत मग ते कुठून आणि कितीला मिळाले याचं साग्रसंगीत वर्णन करत... कॉलेजगर्ल्सला कुठल्याच विषयांचं वावडं नसतं ना... पावसाच्या थेंबासारखा एखादा विषय सापडावा आणि मग त्याचे हात धरून बाकीच्या थेंबांनी कोसळत राहावं संततधारेसारखं तशा कोसळत राहतात... मी हसते स्वतःशीच... तिथेच कोणीतरी हँडलवर चक्क ओढणी वाळत घातलेली असते... बायका म्हणजे ना... उपलब्ध सोर्सेसचा वापर आपल्याला हवा तसा कसा काय करायचा हे त्यांना कध्धीच शिकवावं लागत नाही.

इथे कोणी ऑफीसला जाणारी फॅशनेबल सुंदरी आपले लांबसडक केस हलकेच झटकते... खिडकी अन दरवाज्याच्या उरल्यासुरल्या फटीतून डोकावणार्‍या बाहेरच्या कित्येक भिरभिरत्या डोळ्यांना क्षणभर विश्रांती मिळते... काय म्हणत असतील मनात? "ना झटको जुल्फसे मोती...?" मी हसते पुन्हा स्वतःशीच!
तिथे कोणीतरी तल्लीनपणे आपले टप्पोरे डोळे काजळकाळे करण्यात गुंग असते... मग हळूच चिमुकला आरसा उघडला जातो... चिमुकला रूमाल चेहर्‍यावरून हलकेच फिरतो... आरश्याचे अँगल्स बदलतात चेहर्‍याच्या अँगल्सच्या प्रपोर्शन्मध्ये... मग एखादी सुखद गुलबट छटा नाजूक ओठांवर अलगद पसरते... ओठांच्या पाकळ्या एकमेकांशी मिटमिट करतात... हा सगळा शृंगारसोहोळा आजूबाजूच्या तोंड नी डोळे विस्फारून पाहत राहतात... काय विचार करत असतील मनात... "नटवी मेल्ली!!", "कित्ती सुंदर शेडंय नै? कुठल्या कंपनीची आहे पाहू... श्शीSS बाई दिसलीच नाही!!!", "ह्म्म आपल्यालाही अस्सं प्रेझेंटेबल राहायला हवं.... ठरवूनही ह्या कामाच्या धबगड्यात चिंबून जायला होतंय... स्वतःकडे लक्षच देता येत नाहीये... श्शी!!"
असंच काही बाही... आता मला थोडं जोरात हसायला येतं... कानात हेडफोनची ढेकणं कोंबलेली असल्याने माझ्या मेंदूच्या विकासावर वा विकारावर कोणी फारसा विचार करत नाही...

तेवढ्यात "ती" दिसते... कानात हेडफोन्स खुपसलेले... हातात मोबाईलचं धुड... आणि दरवाज्याच्या कोपर्‍यात स्टील बारला कवेत घेऊन लोंबकळत असते... तोंडावर प्रतिथयश गायिकेचे हजारो विभ्रम! स्वत:शीच मग्न... तालासुरात गाणं म्हणतेय कुठलंसं... दरवाज्याच्या फटीतून पाऊसझडी आत घुसखोरी करताहेत... हिला पर्वाच नाही... त्या झडींवर खुशाल चेहरा सोपवलाय... पाऊसझडी गालावर-नाकावर-कपाळावर थडाथड आपटताहेत... ही गातेच आहे... डोळे मिटून तल्लीनपणे... इथे बाकीच्या सगळ्याजणी मांजरीसारख्या अंग आकसून हाताचे पंजे उलटसुलट चेहर्‍यावर फिरवत शक्य तितकं कोरडं व्हायचा प्रयत्न करताहेत आणि ही बया खुशाल त्या पावसाला म्हणतेय... भिजव... आणखी!! वेडी कुठली... माझं स्टेशन आलं... मला जागा करून देत ती मागे सरकली... "उतरायचं नाहीये?" काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारते... जोरजोरात मान हालवत म्हणते "नाही.." "अगं मग?" मी हातानेच विचारते... ती गोडशी हसते... चेहर्‍यावरून ओघळणारे थेंब ओढणीनेच हलकेच पुसून काढते... मी जोरात हसते... आत खोलवर कुठेतरी छोटीशी वेदना सटपटते... का? कारण कळतच नाहीये... मी पुन्हा तिच्या कडे पाहते... ती दरवाज्यातून दिसणार्‍या आभाळाच्या तुकड्याला निरखत गातेच आहे... कसला मेघमल्हार आळवतेय कधीपासून कोणास ठाऊक! काय आहे माझ्या नजरेत... हेवा, अचंबा, कौतूक?? कळतच नाहीये... आत खोलवर कळ उमटतेच आहे...

स्टेशन दृष्टीपथात येतंय... उतरायचंय आता... मी पर्स, छत्री, ओढणी, स्वतः असा सगळा सरंजाम सावरते... आणि थोडीशी झेपावते दारातून बाहेर... पाऊस कोसळतच असतो... थोडे तुषार माझ्या चेहर्‍यावर धडपडत उड्या मारतात... मी मागे सरकायचा प्रयत्न करते पण मागे गड लढवणार्‍या मावळ्यांनी रस्ता बंद केलाय... पुढेच लढायचंय... मी नकळत डोळे मिटते... चेहरा आपसूक पुढे करते आणि म्हणते... भिजव... आणखी...! पाऊस खुशीत हसतो... झेपावतो आणि भिजवतो मला... मी भिजत राहते.. निशब्दपणे... कधीकाळचा तराणा भिजलेल्या ओठांवर अवतरतो... मी सूर पकडते, स्वतःच्याच नादात... चेहर्‍यावर प्रथितयश गायिकेचे भावविभ्रम आपसूक पांघरले जातात... मागून धक्के येताहेत... माझी समाधी भंग पावते... स्टेशन आलं वाट्टे... धुंदीत उतरते... उतरण्यापूर्वी आपसूक नजर "ति"च्याकडे वळते... ती हसते... खूपसं ओळखीचं!! मीही हसते... मोकळं, सैलावलेलं, स्वच्छ, निरभ्र!!

शब्द ओठातच घुटमळतात...तिला सांगायचे असलेले... "चार वर्षात पाहीलेली तू दुसरी वेडी! पाऊस बेभानपणे झेलणारी!! पावसाला बघून हसणारी... मला आवडतात, पावसाला बघून स्वतःशीच हसणारी माणसं!! आणि हो! पहीली वेडी... ती मीच गं!! कित्त्येक दिवसांनी सापडलेय... माझी मीच, मला, पुन्हा!!! थँक्स टू यू..."
माहीत नाही ती वेडी पुन्हा भेटेल की नाही... असेल कदाचित फेसबूक वर कुठेतरी... शेअर अन लाईक्सच्या साखळीत गुंतेलही कदाचित आणि मग ओळखीचं हसेलही स्वतःशीच, पुन्हा एकदा!!!

- स्वप्ना....
                  



तळटीपः सॉरी लोक्स, पुन्हा पुन्हा एकच फोटो अपलोड करतेय... पण काय करू प्रचंड म्हणजे प्रचंडच आवडलाय मला तो... प्रेमातच पडलीये मी त्याच्या!

चित्र सौ. : elenakalisphoto.com

ललित : पाऊस! माझा प्राणप्रिय सखा!!


इतके दिवस पावसाला वेड्यासारखी 'मिस' करत होते. काल एक छानसं ग्रीटींग ही बनवलं त्याच्यासाठी पण ते त्या वेड्याला कसं समजलं कुणास ठाऊक! बरसलाच की काल रात्री - मनसोक्त, आससून!! जणू तो सुद्धा मला खूप 'मिस' करत होता... खरं तर तो कित्येकांचा सखा!! प्रत्येकासाठी बरसतो-अगदी हातचं न राखून! पण जेव्हा कधी खिडकीत बसून त्याला डोळे भरून न्याहाळत असते- मला वाटतं तो फक्त आणि फक्त मलाच भेटायला आला आहे... कृष्ण सखा नाही का प्रत्येक गोपिकेला फक्त आपला एकटीचाच सखा वाटे तस्संच! रूसलेय ना मी, इतके दिवस मी त्याची चातकासारखी वाट पाहतेय आणि हा कुठे दडी मारून बसलेला कोणास ठाऊक!! मग हळूच येतो, छान मोकळं मोकळं प्रसन्न हसू हसतो... खरं तर त्याच्या चाहुलीनेच, त्याच्या अंगागंधाच्या मंद सुगंधानेच मी वेडीपिशी झालेली असते... पण जाम ताकास तूर लागू देत नाही! माझा रूसण्याचा हक्क, तुझं मनवण्याचं कर्तव्य! अगदी हाताची घडी घालून गुडघ्यात डोकं खुपसून बसते मी... पाहतही नाही त्याच्याकडे... तो माझी हरप्रकारे समजूत काढण्याचा प्रयत्न करतो... कधी कान पकडून, उठाबश्या काढून, क्वचित एखादी सुरम्य गाण्याची लकेर गुणगुणून... लटक्या रूसव्याने फुगलेल्या माझ्या गालावर फुंकर मारून तर माझ्या बटांना अल्लदपणे विस्कटून तर कधी चेहर्‍यावर असंख्य तुषारांची बरसात करून... कधी असंख्य सरींचे अलवार हात लडीवाळपणे गळ्यात टाकून..!! मी खुदकन हसते... नाहीच रूष्ट राहता येत त्याच्यावर फारसं!! कित्ती लोभस आहे तो...!!!
प्रियतमेला कसं खुलवायचं फुलवायचं हे तंत्र त्यानं चांगलंच आत्मसात केलंय! लब्बाड कुठला!! गालगुच्चाच घ्यावासा वाटतो त्याचा... पण तो कुठला थांबायला एवढा वेळ!! वेड लावून पसार व्हायचं ही जुनीच खोड आहे त्याची!! पण मी मात्र त्याच्या सुखद आठवणींनी एकाच वेळेस तृप्त नी घायाळ व्हायचं... त्या एकांतातल्या विजनात!!




खरं तर झोकून देण्याची, सर्वस्व दुसर्‍यावर उधळून रितं होण्याची कला मी त्याच्याकडूनच शिकले... पण इतरांना तृप्त करताना आपण मात्र रिक्तच राहतो याची खंत तो फारसा कधी बाळगत नाही... हे मात्र अजूनही मला तितकंसं जमलेलं नाही!! त्या वेड्याला जाणवत तरी असेल का स्वतःचे रितेपण?? छे!! तो तर लुटवण्यात, उधळण्यात... स्वतःच्याच तालात उन्मुक्तपणे बरसण्यात तल्लीन!! एखाद्या कसलेल्या शास्त्रीयसंगीत गायकाने रियाझ करतानाही तल्लीन पणे स्वतःशीच एक अशी हरकत घ्यावी अन आजूबाजूच्यांना त्या सूरांच्या बरसातीने चिंब भिजवून टाकावे; स्वतःच्याही नकळत.. तसंच काहीसं!!

पावसाबद्दल लिहा-बोलायला लागले ना की मला माझंही भान राहत नाही. त्याचे कित्येक लोभस विभ्रम मला कित्येकदा वेड लावतात. खरं तर त्याच्या येण्याच्या चाहूलीनेच त्याने मला अर्धी गारद केलेली असते... त्याच्या आगमनाचा तो मादक मोहक सुगंध- इवले इवले थंडगार थेंब झेपावत कधी टप्पोरे होत जातात... आणि हलक्या सरींनी लुभावत तो आवेगपूर्ण पाऊसझडींनी कधी गुदमरून टाकायला लावतो ते समजतही नाही... तो बेभानपणे कोसळत राहतो... आंणि आपण ते फक्त अनुभवायचं- त्याचा आवेग, त्याचा जोष... निस्तब्धपणे, निशब्दपणे!!

तप्त रूष्ट धरणीला आपल्या थेंबांच्या नाजूक जादुई बोटांनी हळूवारपणे हसवतो, खुलवतो, फुलवतो... हलक्या सरीच्या अलवार हातांनी तिच्या भुरभुरणार्‍या शुष्क वेलींच्या बटा अलगद कानांमागे सारतो आणि तिच्या लालेलाल तत्प्त घामेजल्या चेहर्‍यावर अलगद प्रेमाची फुंकर घालतो आणि मग बरसतो- बरसत राहतो...बेभानपणे! तप्त धरित्रीची गात्रं गात्रं त्याचं ते बेभान प्रेम पिऊन श्रांत क्लांत होऊन तृप्त होईपर्यंत! त्याचे हे सारे भावविभोर, आत्ममग्न लोभस विभ्रम अन नवसृजनाचा हा सारा अविष्कार खिडकीतून डोळे भरून पाहत असते... धरणीचा मादक गंधभरला तो तृप्त निश्वास मला ऐकू येतो... स्त्रीसुलभ मत्सराने मी काहीशी अस्वस्थ होते... थोडीशी पेटूनही उठते... घायाळ होऊन कळवळून पाऊससख्याला विनवते... मी ही अशीच ग्रासलेय, त्रासलेय रे! दुखःच्या ग्रीष्मझळांनी माझ्या तनामनाची काहीली होतेय... मलाही असंच सचैल न्हाऊ घाल- चिंब, नखशिखांत! कणाकणाने- बेभानपणे!! तो येतो... माझ्या नकोश्या जाणीवानेणीवांतून तो अलगद हात देऊन मला बाहेर काढतो, स्वतःच्या बेभानपणाने मला भारून टाकतो... त्याचं ते बेभान होणं सुप्तपणे माझ्यात पेरून जातो... मी बेभान होत राहते पुन्हा पुन्हा... भानावर येईपर्यंत!!

वेड लावतात मला या पावसाची सगळीच वैविध्यपूर्ण रूपं- वार्‍याने त्रेधा उडव्त अवखळपणे भुरभुरणारा, थेंबांचा फेर धरून, तारांवरून, तृणपात्यांवरून थेंब बनून अल्लडपणे ओथंबणारा, कधी पागोळ्या बनून निरागसपणे बरसणारा, कधी तत्ववेत्त्याप्रमाणे गंभीरपणे संतत्धारेच्या रूपाने तर कधी उन्मुक्त बेभान प्रियकराप्रमाणे पाऊसझडींमध्ये अविरत कोसळून गुदमरून टाकणारा! बरसून रितं झाल्यानंतरचा त्याचा हवाहवासा मादक गंधगारवा मी अंगांगभर लपेटून घेते शहारत!!

एकांतात कधीकाळची विसरली गेलेली जखम त्या विजनात भक्ककन उघडी पडते, त्यावर काळाची धरलेली खपली उचकटली जाऊन भळभळत राहते- बाहेरच्या पावसासोबत! बाहेरच्या पावसाला माझ्या या आतल्या मूकपणे झरणार्‍या पावसाचा सुगावा कसा लागतो कोणास ठाऊक? पण मग तो एखाद्या समंजस प्रियकरासारखा शांतपणे बरसत राहतो. त्याच्या असंख्य रूपेरी शीतल हातांनी मला कवेत घेऊन हळूवार थोपटत राहतो. मी त्याच्या आश्वासक मिठीत विरघळून जाते...कणाकणाने!

कधी कधी मात्र पाऊससखा रंगात येतो. आपल्या वात्रट मित्राला, वार्‍याला हाताशी धरून उगाच छेडखानी करत राहतो.. कधी ओढणीमध्ये ओढाळपणे लपायला पाहील तर कधी केसांच्या उन्मुक्त बटांबरोबर खेळू पाहील... चिंब ओलेतं रूप चोरून पाहण्यासाठी उगाच धडपड करीत राहील... आणि मग माझ्या हातातील छ्त्री वार्‍याच्या एका जोरदार झोताने पलटी झाली की दोघंजणं "कश्शी मज्जा केली!!" असं मिस्कीलपणे म्हणत एकमेकांना टाळी देत अवखळपणे हसतील.. कसं रागावू या लोभस विभ्रमांवर?? मलाही तर ते सारेच्या सारे हवेहवेसे असतात. या भावविभोर विभ्रमांना डोळे भरून पाहण्यासाठी- अनुभवण्यासाठी मी चार महीने विजनाचा वैशाखवणवा सहन केलेला असतो- माझा पाऊस सखा येईल अन माझ्या सार्‍या ठसठसत्या वेदनांवर अलवार फुंकर घालेल... तो येतोही! माझ्या मनातले भाव बरोब्बर पकडत तो येतो. मी उदास गप्पगप्पशी दिसले तर पार अस्वस्थ होतो... स्वतःच अस्वस्थ होऊन बरसत राहतो... त्याला अजिब्बात आवडत नाही मला त्रास झालेला... वेडा आहे तो-- माझ्यासारखाच! अवखळपणे, कधी लडीवाळपणे तर कधी बेभानपणे मला त्याच्या प्रेमवर्षावात चिंब चिंब न्हाऊ घालतो. तापलेल्या अवनीप्रमाणे मीही त्याला पिऊन टाकते... तो रिता रिता होतो... मी तृप्त तृप्त होते... श्रांत-क्लांत!!

मला पुन्हा एकदा वेड लावून माझ्या पाऊससख्याने दडी मारलेली असते... मी बेभान सुखाने गुंगावलेली असते...
एव्हाना परीसराने ओलसर मखमली जांभळट काळोखाची दुलई ओढलेली असते. आकाशाच्या गर्दगडद पटलावर एखाद्या गुबगुबीत करड्या जांभळ्या ढगाआडून चंद्र हलकेच डोळे मिचकावत हसतो! आत रेडिओवर कधीपासून वाजत असलेला मिलींद इंगळेचा 'गारवा' एव्हाना संपत आलेला असतो... रित्या धीरगंभीर सुरात उर्वरीत स्वर गंधाळत राहतात...

"पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्र चिंब भिजलेला..
विझवून चांदण्या सार्‍या, विझलेला शांत निजलेला!"


--- स्वप्नाली वडके तेरसे

ललित : रंगायतन!!

नुकतीच रंगपंचमी पार पडली... धुलीवंदन/धुळवड आणि पंचमीच्या दिवशी रंगपंचमी! रंगांचा उत्सव! ऋतूराज वसंताच्या आगमनाप्रित्यर्थ स्वागतासाठी निसर्गाने केलेली मुबलक रंगागंधांची उधळण अनुभवत आपणही त्या निसर्गरंगात मनसोक्त डुंबून घेतो... राज्यातील अन समस्त देशभरातीलच कोरड्या दुष्काळाने ग्रासलेल्या लोकांचा विचार करत सरकारने केलेल्या पानी बचाओ आवाहनाला समस्त देशभरातील आबालवृद्धांनी कौतुकास्पद साद दिली अन कोरडी होळी(धुलीवंदन) साजरी केली...

यावेळी रंग खेळायला नवरा नव्हता सोबत!
[तसंही तो बोका आहे, अंघोळीच्या वेळी काय भिजेल तोच! एरवी पाण्याचा शिंतोडा उडाला तरी हात झटकत बसणार... पावसात भिजणे-बिजणे तर सोडाच! तेव्हडा रोमँटिकपणा नाहीये हो आमच्या नशीबात!! : (
बाहेर पाऊस पडायला लागला की माझ्या मनमोराचा पिसारा हाSS फुलारून येतो!!! तो गुलाबी गारवा... एकांतातला शहारा... कुंद हवा... धुंद वातावरण खिडकीतून मी पाहून पाहून वेडी होत असते... मनात पिंगा घातलेला असतो आल्याने गंधाळलेल्या वाफाळत्या कडक चहाचा व गरमागरम कुरकुरीत खमंग खेकडाभज्यांचा वास... झालंच तर मग मोगर्‍याच्या अर्धवट उमललेल्या धुंद कळ्यांचा आणि ओलसर मातीचा खरपूस वास, जगजीतच्या मधाळ कातील गझला आये हाये!!! आणि फुस्स आमचं अर्धांग आळसावलेल्या बोक्यासारखं सोफ्यावर हात पाय जितके म्हणून वळकटी वळता येइल तितके पोटाखाली मुडपून लोळत असतं... माझ्या मनातले आल्याचा चहा नी भज्यांचे वास ही साम्यस्थळं सोडल्यास बाकीचे प्रकार कशाशी खातात हे गावीही नसतं यांच्या!!! आणि रंगपंचमीचे रंग!!! अर्रे माझ्या कर्मा!! चमचमीत नॉनव्हेज्/मिसळ ओरपताना मसलट तेलाचा एखादा पुसटसा शिंतोडा जरी पांढर्‍याशुभ्र बनियन वर पडला तरी हे राम!!! हे रंगाबिंगाचं काय घेऊन बसलात!!!]
मी मात्र खेळले मनसोक्त रंगपंचमी माझ्या पिल्लूसोबत... अगदी नैसर्गिक! हळदीने, आणि त्याच्या माश्याच्या पिचकारीत जेवढं पाणी मावेल तेवढ्या पाव वाटीभर पाण्यात!!! वर पिल्लूने चिमुकल्या हातांनी गालाला लावलेल्या हळदीने थोडेतरी गाल उजळलेत का तेही चोरून बघून घेतलं आरशात... पी हळद हो गोरी! च्या अतिउत्साहाने!!


नवरेबुवांचं रंगांचं तथाकथित ज्ञान तसंही अगाध(!!???) आहे! नुकतच लग्न झालं तेव्हा साडी घेताना प्राथमिक रंगांचीच माहीती असल्याने बॉटलग्रीन, हिरवाजर्द, मेहंदी, पोपटी, पिस्ता, मग झालंच तर चटणी वगैरे छ्टांपर्यंत आमची गाडी घसरल्याने येताना समोसे नी पुदीना चटनी आणून चट्टामट्टा करत बसायला हवं होतं... पोटात कावळ्या-उंदरांनी फेर धरलाय!! असे काहीसे अस्वस्थ भाव त्याच्या चेहर्‍यावर पसरलेले... टोमॅटो रंगाचा शालू नी चटणी रंगाची साखरपुड्याची साडी घेतल्यावर आता गृहप्रवेशाला काय चिंचेच्या कोळाचा कलर पाहूयात का? सँडविचच्या सगळ्या झणझणीत चटण्या त्याच्या डोळ्यांत उतरलेल्या आणि टोमणे अधिकाधिक आंबट झालेले... खरेदी आवरती घेऊन आधी पोपूला धावावं लागलं होतं...

खरेदीसाठी गेल्यावर सरळसाध्या लाल रंगाला लाल न म्हणता उग्गाच डाळींबी, कोकमी, कुसुंबी, टोमॅटो, मरून, तपकीरी, विटकरी अशी विशेषणं का देतात याचा विचार करकरून नवरोबांच्या उत्साहाला वीट अन मेंदूला झीट आलेली असते...
 



तरी नशीब!! हल्ली हल्लीच फ्याशनमॅनियाक झाल्यासारखं जबाँग, फॅब इंडिया नी पँटालून्सच्या साईट्स वर भरकटून मिंत्राने दिलेल्या फॅशन मंत्रानुसार इंग्लिश कलर्स सांगत बसत नाही त्याला!! "लिनन-- हा कलरेय? हे तर कापडेय ना..." (कित्ती गं बाई गुणाचा माझा नवरा तो!! नश्शीब!! कापडाचे प्रकार तरी माहीतेत! नाहीतर कॉटन एके कॉटन!!!) मनातूनच अलाबला करत मधाळ नजरेने त्याला म्हटलं "नाही रे राजा ही पांढर्‍या रंगाची शेड आहे..!"

"पांढर्‍याची शेड?? हॅ!! पांढरा म्हणजे पांढरा शुभ्र!!! दुधासारखा! झालंच तर अगदी धुतल्या तांदळासारखा!! (लग्नाची बायको शोधताना कॅरॅक्टरचा हा क्रायटेरिया घरात बोलला गेला असावा... नाहीतर भात लावण्याआधी तांदूळ-बिंदूळ धुतात, मोदकाचे तांदूळ धुवून वाळवलेले असतात हे माहीत असणे शक्यच नाही!!) , नाहीतर रिन की अगदीच हाईट म्हणजे उजालाकी निळसर सफेदी!! बास!!"

नाही रे राजा... मी तत्ववेत्त्याच्या सूरात समजावत म्हणाले, अरे क्रीम, आयवरी(हस्तीदंती), व्हॅनिला, एगशेल, स्मोकी(धुरकट), पिवळसर पांढरा, निळसर सफेद, गुलबटसर पांढरा(लिनन/बेज), पोपटीसर पांढरी अमका नी ढमका! नवर्‍याचा मेंदू धुरकट पांढरा पडलेला एव्हाना माझं पंडूर प्रवचन ऐकून!!! अजून पुढचे सेकंडरी कलर शेड्स व अमक्या ढमक्या असंख्य रंगछटा शिल्लक होत्या... पुढचा धोका सूज्ञपणे ओळखत दुसर्‍या कुठल्याही समंजस नवर्‍याने त्याप्रसंगी केलं असतं तेच प्रसंगावधान राखत आमच्या नवरोबांनी 'फोन आलाय वाट्टं..' असं 'कोण आहे रे तिकडे??' च्या चालीवर पलायन केलं!! हे समजण्याइतकी मी हुशार बायको आहे, पण जाऊंदे मला काय?? त्याचंच नुकसान!! आणि तसंही.. 'आमच्या हिला माझ्यापेक्षा जरा जास्त फॅशनसेंस आहे' असं नवर्‍याने कधीकाळी केलेलं कौतूक पदरात पाडून घ्यायला कुठल्या बायकोला नाही बरं आवडणार??

पण या रंगांचा प्रॉब्लेम माझ्याच कशाला, सगळ्याच बायकांच्या नवर्‍यांना असतो वाटते...लाँड्रीला दिलेली बेडशिट बरेच दिवस परत न मिळाल्याने मी लाँड्रीवाल्याला समजावत होते," भैय्या ती पांढरी बेडशिट नाही दिलीत परत... वो सफेद, उसपर वेली वेली का निळसर डिझाईन है ना... और निळे छोटे छोटे ठिपके..." त्याचा चेहरा एका मोठ्या निळ्या ठिपक्यासारखा अनभिज्ञ! नवर्‍याने सांगितलं "भैय्या परसों दी थी सफेद चद्दर बेडशिट वो लाके नही दी!" निळा ठिपका माणसात आला.... "लाता हूं" असं म्हणत हसत हसत कपड्यांचं गाठोडं खांद्याला अडकवत तो पसार झाला...
नवर्‍याला त्याचा प्रॉब्लेम (आपबिती वरून) लग्गेच समजला... आणि लग्गेच मदतीला गेला... नवर्‍याचा चेहरा, "तेरा दर्द मै समझ सकता हूं मेरे भाई...!" अरे वा एकमेकां करू साहाय्य!!! छाने!!

परवा नवर्‍याने मात्र कहर केला... ऑफीसातनं फोन केला, "अचानक माझं(त्याचं) माहेरी(त्याच्या) जाणं ठरतंय तर ती गोल्डन ब्राऊन बॅग भरून ठेव!!"

बाई गं!! गोल्डन ब्राऊन??? माझ्या नजरेसमोर नुकत्याच धुळवडीत रंगलेले असंख्य चंदेरी-सोनेरी ऑईलपेंट कलर्स तरळून गेले... बघीतलं तर बेडच्या तळाशी एक मिलीटरी ग्रीन रंगाची, एक डार्क कॉफी रंगाची आवि त्याची नेहमीची बेज रंगाची!!! आता यात गोल्डन ब्राऊन म्हणजे मिलीटरी नक्कीच नसणार नाहीतर तो कोथींबीर चटणी हिरवी वगैरे म्हटला असता..आता उरल्या दोन!! तरी खात्री करण्यासाठी त्यातली एक कपाटाला लाऊन बघितली... मग त्याला फोन केला... "आपलं कपाट कुठल्या रंगाचंय रे?" माझा स्थितप्रज्ञ आवाज! "ते ना... फिकट तपकीरी!!" त्याचं आत्मविश्वासपूर्ण उत्तर! बरं म्हणत मी फोन ठेवला...

घरी आल्यावर त्याची "त्याला हवी असलेली" मी भरून ठेवलेली बॅग उचलून त्याच्या माहेरी प्रयाण केलं.

अवांतर माहीतीसाठी: त्या बॅगेचा आणि कपाटाचा रंग डिटो सेम आहे आणि तो आहे बेज!!!!असो! आता कानाला खडा!! नवर्‍याला प्रायमरी - लाल,हिरवा, निळा रंग सांगायची परवानगी आहे... छ्टा नकोच!!! अर्थ लावता लावता माझ्या चेहर्‍याचा रंग उडतो... :)


१४ फेब्रूवारी, व्हॅलेंटाईन्स डे! पाश्चात्य संस्कृतीतील प्रेमिकांचा दिवस!! पण यावर्षी १४ फेब्रूवारी २०१३ याच दिवशी भारतीय संस्कृतीमधील प्रेमाचा देव कामदेव अर्थात मदन याचा जन्मदिवस! 'माघ शुक्ल पंचमी' हा कामदेवाचा जन्मदिवस 'वसंत पंचमी' म्हणून ओळखला जातो. वसंत पंचमीला दांपत्यसुखासाठी प्रेमाच्या, सौंदर्याच्या आणि शृंगाराच्या देवता 'कामदेव - रती' यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत या दिवसापासून वसंतोत्सवाची सुरूवात होते. ऋतूराज वसंत नवसृजनाचे, चैतन्याचे, आनंद- उत्साहाचे लेणे घेऊन येतो. रंगांची, गंधाची, प्रेमाची, चैतन्याची मुक्तहस्ते उधळण करीत येणार्‍या वसंताच्या आगमनाची तयारी म्हणून वसंतपंचमी या दिवशी संपूर्ण भारतभरात चैतन्याचे प्रतिक असलेल्या पिवळ्या रंगाची वस्त्रे परीधान करून आनंदोत्सव साजरा केला जातो. नवसृजनाचे, चैतन्याचे, प्रेमाचे प्रतिक असलेल्या वसंत ऋतूचा आणि कामदेवाचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणून प्रेमाचे प्रतीपादन करणार्‍या कामदेवाच्या जन्मदिवसास 'वसंत पंचमी' हे नाव!


कामदेव हा पाश्चात्य संस्कृतीमधील क्युपिडचाच भारतीय संस्कृतीतील अवतार! जणू शंकराच्या तिसर्‍या चक्षूतील क्रोधमयी अग्नीमध्ये भस्मसात झालेल्या कामदेवाने पाश्चात्य देशात क्युपिडबाळाच्या रूपाने अवतार घेतला. दोघांच्याही हातात हृदयाला प्रेमविभोरांनी घायाळ करणारे प्रेमबाण असतात.

तब्बल ४६ वर्षांनी १४ फेब्रूवारी या दिवशी व्हॅलेंटाईन्स डे व 'वसंत पंचमी' दिनानिमित्त दोन्ही संस्कृतींचा सुंदर मिलाफ झाला आहे. भारतीय काय किंवा पाश्चात्य काय दोन्ही संस्कृती प्रेमाचा संदेश देताहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन्स डे चे वावडे असणार्‍यांनी या वर्षी १४ फेब्रूवारी ला 'वसंत पंचमी' प्रेमदिन साजरा करण्यास हरकत नाही.
तशीही आपली संस्कृती प्रेमाचाच संदेश देते. मित्रांवर तसेच शत्रूंवरही प्रेम करण्याचा संदेश देते. आणि आपल्या संस्कृतीमध्ये प्रेमाचा अर्थ फक्त शृंगारापर्यंतच मर्यादित नाही. आपल्या संस्कृतीतील प्रेम जितकं रांगडं, रगेल- रंगेल आहे तितकंच राजस आणि लोभस, नाजूक आणि नजाकतदार, हळवं आणि हळूवार आहे. वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी, स्नेह, लळा, कळकळ, काळजी, धाक, आधार, भूतदया, कळवळा,माया, ममता, श्रद्धा, भक्ती, त्याग, समर्पण ही सर्व प्रेमाचीच रूपे! कृष्णाच्या प्रती असलेली राधेची भक्ती हे प्रेमाचेच रूप तर मीरेचे समर्पणही प्रेमच!

राधेच्या भक्ती कथांचे विवेचन सर्वत्र आढळते. पण मीरेचे समर्पण... याविषयी मायबोलीवर सुंदर विवेचन वाचावयास मिळाले. जवळपास सर्वच स्त्रियांच्या अंतरात एक मिस्टर राईट वा मिस्टर परफेक्ट दडलेला असतो. म्हणजे त्या मि. परफेक्टच्या ठायी असलेल्या अपेक्षित गुणांचे जिगसॉ पझल्ससारखे तुकडेच! भेटलेल्या प्रत्येक पुरूषामध्ये ती स्त्री आपल्या अपेक्षित गुणांचे तुकडे ठेऊन पाहते. सर्व तुकडे सांधले जाऊन मि. परफेक्टचं पूर्ण कोडं उकलतच नाही. पण त्यातील जास्तीत जास्त अपेक्षांचे तुकडे ज्यामध्ये बसतील त्याला ती आपला मि. परफेक्ट म्हणून स्वीकारते. पण मीरेचं तसं नव्हतं. मीरेने श्रीकृष्णालाच तिचा मि. परफेक्ट म्हणून निवडले. त्याच्याविषयी कुठलाही पूर्वग्रह वा अपेक्षा न बाळगता... त्याच्या सर्व गुणांनाच तिने मि. परफेक्टचे गूण म्हणून स्वीकारले. त्यामुळे तिच्या मनातील मि. परफेक्टची प्रतिमा आधीपासून परफेक्टच होती...परीपूर्ण, एकसंध, अभंग! ज्या प्रतिमेला ती परीपूर्णपणे समर्पित झाली. तिचा विरह, व्याकूळता, समर्पण यांतून अवीट मार्दव व माधुर्याची गोडी असलेली भक्तीगीते जन्मास आली. मीरेचा हा समर्पणभाव आपल्या ठायी येईल त्यादिवशी आपला मिस्टर परफेक्ट/मिस परफेक्टचा शोध संपूष्टात येईल.

म्हणून या वर्षी खर्‍या अर्थाने प्रेम करा... प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्या.
कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...
तुमचं आणि आमचं अगदी...


व्हॅलेंटाईन्स डे आणि 'वसंत पंचमी' च्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा!!

--- स्वप्नाली वडके तेरसे
('वसंत पंचमी' संदर्भ : लोकसत्ता, मुंबई वृत्तांत, मंगळवार, १२ फेब्रु. २०१३)

आयडियाची व्हॅलेंटाईन्स डे ची नवी जाहीरात... "हॅ! बीस रूपयेका फ्लॉवर?? इससे अच्छा तो कॉलीफ्लॉवरही ले आते..." म्हातारी हेटाळणीच्या सूरांत म्हणते आणि जवळजवळ त्याच क्षणी तू चमकून माझ्याकडे पाहीलंस आणि एका डोळ्याने मी तुझ्याकडे! तुझी ती प्रतिक्रिया अपेक्षित होतीच मला! वर हसून म्हणालासही..."म्हातारी तुझाच अवतार दिसतेय!" मी हसले. तुझ्या अपेक्षित प्रतिक्रियेवर आणि त्या म्हातारबाबांच्या डिट्टो तुझ्यासारख्याच हताश प्रतिक्रियेवर!



तू महागडं गिफ्ट आवडीने आणायचंस आणि मी टॅग चाचपडत "खूप महाग आहे नै.." असा आंबट चेहरा करत तुझ्या उत्साहावर विरजण घालायचं हे तर ठरलेलंच असतं. खरंतर आपण कित्ती वेगवेगळे आहोत ना... मी खूप्प गोडमिट्ट खाणारी आणि तू झणझणीत चमचमीत मसालेदार! तुला चायनीज प्रिय तर मला अज्जिबात आवडत नाहीत ते बुळबुळीत प्रकार... (अर्धी भीती की पॅक पॅक ऐवजी क्वॅक क्वॅक्/चींचीं किंवा मग अगदीच डरावचा एखादा बुळबुळीत लेग पुढ्यात येईल... विचारानेच पोटात ढवळलं बघ यॅक्क!!)
मला पंजाबी ग्रेव्हीवाल्या डिशेस आणि कुल्चा/पराठा/नान ऑल टाईम फेव तर तुला ते काजू, कांदा- टोमॅटोंच्या गोडूस ग्रेव्हीजचं वावडं! त्यामुळे हॉटेलात दोघांपैकी एकाला नित्यनेमाने खवय्येगिरीची इच्छा दडपून टाकावी लागते. तू काटेकोर स्वच्छतेवाला, परफेक्शनिस्ट आणि माझा आपला बागडबिल्ली गबाळखाना! तू ब्रँड कॉन्शस अगदी 'शूजपण वूडलँड्सचेच हवेत' कॅटॅगिरीवाला आणि मी मात्र श्शी ते कळकट्ट शूज २००० वाले वाटतात तरी कै? असं नाकं मुरडत ऑल सिझनची २५०-३०० वाली दादर पूर्वच्या एखाद्या छोट्याशा चप्पल स्टोअर मधून चप्पल घेणारी! तुझे ड्रेसेस मॉलमधले... मी मात्र 'जय हिंदमाता' वाली!!

आपल्या इवल्याश्या किचनमध्ये माझी झारे-चमचे-सुर्‍या आयुधांसह मारामारी चालू असताना तुझी अनावश्यक लुडबूड आणि हजारभर स्वच्छतेचे नियम कम सूचना मला फार इरिटेट करतात तर माझं दिवसभर सोशल नेटवर्कींगच्या साईटवर सतत 'माझे अभिनव विचार' पोस्टत पडीक असल्याने तुझ्या डोक्यात तिडीक जाते. खरंच आपण खूप वेगवेगळे आहोत ना! अगदी दोन ध्रुवांसारखे विरूद्ध स्वभावाचे! आपल्या नावांची आद्याक्षरं पण बघ 'S' आणि 'N' अगदी साऊथ आणि नॉर्थ पोल! यावर तू कौतुकाने म्हणालेलास, "अपोझिट पोल्स अ‍ॅट्रॅक्ट इच अदर!" आपलं अगदी तसंच आहे ना?

खुपदा विचार करते आपण एवढे वेगळे तरीही आपण एकत्र कसे? बर्‍याचदा या वेगळेपणातही साम्य जाणवतात... चंगोच्या चारोळ्या, सौरव गांगुली, फोटोग्राफीची, नाटकांची, क्रिकेटची, आर्ट आणि पेट्रिओटिक सिनेमांची आवड, छान काही वाचण्याची-पाहण्याची, फिरण्याची आवड, (कित्तीही नाकं मुरडली-शिव्या घातल्या तरी) तुझ्या प्रिय वपुंची फिलॉसॉफी, बरीचशी मतं-तत्वं आहेत मिळतीजुळती! आणि आपल्याला घट्ट जोडणारी लिंक आहेच त्याशिवाय का बर्‍याचदा तुला काही बोलायचं असताना मीच आधी ते बोलून टाकते...'तुमने मूंह की बात छीन ली...' असं नेहमी होतं. मग तरीही आपण बर्‍याचदा एकमेकांसाठी अनभिज्ञ का असतो? माझ्या बर्‍याचशा आवडीनिवडी तुला माहीतच नाहीयेत अजूनही ही माझी तक्रार तर तुला सध्या मी फार गृहीत धरते, तुझ्याकडे दुर्लक्ष करते ही तुझी तक्रार.

त्यादिवशी फेसबूकच्या माझ्या पेजवरील छान काहीसं सुचलेलं तुला वाचायला दिलंस तेव्हा नेहमीसारखाच भारावून गेलेलास, भावूक झालेलास. तुझ्या डोळ्यांतील हे भारावलेपण, माझ्याबद्दलच्या कौतुकाची चमक मला फार फार आवडते... पेज लाईक्सपेक्षा कित्येक पटींनी जास्त! मी पटकन बोलून गेले,"मला हे सगळं सर्वात आधी तुला वाचायला द्यायचं असतं रे, पण तू भेटतच नाहीस बघ हे लिहील्या लिहील्या वाचायला द्यायला..."
"मी असतो गं, तुझ्याकडेच वेळ नसतो माझ्यासाठी...!" मी चमकून पाहीलं तर तुझ्या डोळ्यांत दुखावलेपणाचं पाणी! क्षणभर माझ्या हृदयाचंच पाणी पाणे झालं...

खरंच रे... बाळ झाल्यापासून, टिव्ही आणल्यापासून, लॅपटॉप घेतल्यापासून आपण एकमेकांना खूप कमीवेळा भेटतो ना... खूप काही सांगायचं असतं मनातलं, काही लाडीक तक्रारी... प्लॅनिंग्ज असतात, स्वप्नं असतात, खूप काही शेअर करायचं... सारं सारं राहूनच जातंय का? गृहीत धरतोय एकमेकांना... आणि मग त्यातून गैरसमज! तू निदान मनातलं सगळं सांगतोस, मला जमतच नाही मनातलं सांगायला. त्यादिवशी सगळे लेख कौतुकाने वाचलेस, अचानक विचारलंस, "एकदा लिहीशील फक्त माझ्याबद्द्ल? माझ्यासाठी??"

तुझ्याबद्दल लिहावंसं?? काय लिहू? तुला ऐकायचं असतं माझ्याकडून तुझ्याबद्द्ल... बरंच काही!! जमतच नाही मला सांगायला... तुझ्याबद्दल आवडणारं, खटकणारं... कधी जमेल माहीत नाही! एवढ्याशा लेखात, आपलं वेगळेपण तरीही एकत्र असणं, आपलं नातं, चुकत माकत, धडपडत, एकमेकाला सावरत इथपर्यंत आलोय तो प्रवास, एकमेकांना जे काही भरभरून दिलं ते प्रेम कधी कधी दु:खंही... मावणार नाहीच सारं काही इथे! सांगायचंय तुला, जमेल तसं... जमेल तेव्हा... व्यक्त व्हायचंय तुझ्यापुढे! तुझं परफेक्शनिस्ट असणं, राग किंवा तक्रारही त्रागा न करता हळूवारपणे स्पष्टपणे मांडणं, तुझा देशाबद्दलचा अभिमान, तुझं अतिसंवेदनाशील असणं, तुझं छान माणूस असणं, गरीब-गरजूंना जमेल तितकी मदत करणं, माझ्यापुढे अगदी लहान मूल होऊन लाड पुरवून घेणं, गाल फुगवून तक्रारी करणं, आपल्या बाळाचा लाडका बाबा नव्हे आईच असणं (त्याला मी तर फक्त जन्म दिलाय, खरं आईपण - अतिकाळजीने निभावतोस तूच!) सगळं सगळं खूप लोभस आहे रे... सांगेन तुला हे सर्व कधीतरी थकून भागून घरी येशील, माझ्या मांडीवर डोकं ठेवशील, तेव्हा तुझ्या केसांतून हळूवारपणे हात फिरवत सांगेन ना... जमेल तसं.

माझ्या एका खूप खास मैत्रीणीने (ओळखलं असशीलच ती मैत्रीण कोण ते! बरोब्बर! सासूच तुझी!!!) सांगितलेलं, "नवरा लहान मुलासारखाच असतो, त्याला कधी कधी स्वतःचा खूप खास वेळ द्यायचा, त्याचे लाड-कोड पुरवायचे, विशेषतः आपल्याला बाळ झालं की त्याच्याकडे दुर्लक्ष अज्जिबात होऊ द्यायचं नाही!" तिचं म्हणणं पाळेन बरं मी तंतोतंत, न कंटाळता! कायम माझा पहीला मुलगाच राहा!! तुला बरंच काही सांगायचं असतं मला, माझ्याकडून ऐकायचं असतं... आजपासून तू घरी आल्यानंतरचा स्पेशल टाईम फक्त आणि फक्त तुझ्यासाठी!


आणि हो कधी सांगितलं नव्हतं पण गेल्यावर्षी तुझी छोटीशी डिट्टो कार्बनकॉपी मला गिफ्ट दिल्याबद्दल मी तुझी आयुष्यभर ऋणी राहीन. या वर्षीचा आपला व्हॅलेंटाईन डे फार खास असणारेय माहीतेय? आपल्या नात्याला दृढ करणारे, आपल्या हातांची गुंफण अधिकच घट्ट करणारे चिमुकले हात आपल्यासोबत असणारेत... सो हॅप्पी हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे!!!


-- स्वप्नाली वडके तेरसे

ललितः सिंधूचा बाप


                                                                                                                     मायबोलीवर पूर्वप्रकाशित....


"आज माझा प्रत्येक अश्रू
हरएक शब्द बनला आहे;
म्हणूनच जीभेला धार अन
डोळ्यांना कोरडेपणा आला आहे..."

ग्रॅज्युएशनपर्यंत चौकटीतलं आयुष्य जगत होते. चौकटीतल्या परीघाला स्वतःचं जग समजून सुखी होते. डिग्री, मग नोकरी आणि मग लग्न- सगळं कसं चौकटीसारखं आखीव्-रेखीव. लग्नाबद्दलच्याही अपेक्षा चौकटीतल्या! आईबाबांनी बघून दिलेला, अनुरूप आणि मला समजून घेणारा नवरा...माफक अपेक्षा होत्या माझ्या. अगदी स्मार्ट, देखणा वगैरे कॅटेगरी नको पण डोळे आणि हास्य छान असावं निदान छाप पाडणारं असं आपलं उगाचच वाटायचं. अर्थात तिथेही तडजोडीची तयारी होतीच. (काये की 'मुलगी' म्हणून जन्माला आलं तर बंडखोरी वगैरे एका विशिष्ट वयापर्यंत खपवून घेतली जाते... मग अपेक्षांचं जू मानेवर बसतं ते कायमचं)
पण अचानकच वार्‍याने रोख बदललामुळे ढगांनी वार्‍याबरोबर पाठ फिरवून चालू लागावं तसं तू भेटलास आणि माझ्या अपेक्षांच्या ढगांची पांगापांग झाली. चौकट विस्कळीत कधी झाली आणि फ्रेमच्या कोपर्‍यातून अपेक्षांचा एक तुकडा बाहेर कधी डोकवायला लागला कळलंच नाही. प्रकर्षाने वाटलं की तू चारचौघांपेक्षा खूप वेगळा आहेस आणि काही बाबतीत तू आहेसही. आईने आणि मी आटोकाट प्रयत्न केला फ्रेमच्या चौकटी रूंदावण्याचा (आईला कदाचित खात्री होती माझ्या निवडीवर!) पण बाबा मात्र परंपरांची चौकट सोडायला तयार नव्हते...
मग मीही हट्टाला पेटले. आयुष्यात पहिल्यांदाच! अपेक्षांचा तो डोकावलेला तुकडा तुझ्यासकट आणि माझ्या स्वप्नांसकट बाबांच्या परंपरावादी रूढीप्रिय चौकटीत कोंबायचा निष्फळ प्रयत्न करून पाहीला... नाहीच जमलं... मग टराटरा फाडून टाकली ती चौकट! बाबा बिथरले... आणि त्यांच्यापेक्षा जास्त मी..! माझंच हे रूप मला अनोळखी होतं... आपले सर्व हट्ट पूर्ण करणार्‍या बाबांना कधी दुखवायचं नाही असं ठरवूनही...
तसंही आपण आपल्याच अपेक्षा कुठे पूर्ण करू शकतो? हातातून निसटून आरसा फुटल्यावर विखुरलेल्या आरश्याच्या तुकड्यांत दिसणारी असंख्य प्रतिबिंबे एकाच व्यक्तिची असली तरी सारखी थोडीच असतात??
प्रवाहाविरूद्ध पोहताना बरीच दमछाक होणार हे माहीती होतंच... पण तारूण्याची रग आणि तुझ्या प्रेमाने बहाल केलेली बंडखोरी ही दोन वल्ही पुरेशी वाटली तेव्हा, माझ्या आयुष्याचं तारू जीवनसागराच्या अथांग प्रवाहात झोकून द्यायला. वाटलं तुझी साथ मिळेल... आत्ता आत्ता कुठे भार हलका करतोयस माझा असं वाटेपर्यंत धडपडायचे... असंख्यवेळा तोंडघशी पडले...

नाकारले जाण्याचा पहिला प्रसंग... "तू आमच्या जातीची नाहीस, घरी पसंत नाही..."अरेरे! लग्नातही तेथे पाहीजे जातीचे??
आता तुमच्या जातीत जन्माला नाही आले, हा माझा दोष कसा? आणि तुम्ही आमच्यापेक्षा उच्च कुळात जन्माला आलात त्यात तुमचं क्रेडिट कितीसं? पण हे प्रश्न गौण होते आणि ते विचारण्याचा मला मुळीच अधिकार नव्हता. एकतर मी मुलगी त्यातून खालच्या जातीची! मग वाटलं असू दे. माझं प्रेम, माझा चांगुलपणा यातूनही तारून नेईल मला.
एकीकडे मानसिक कुतरओढ तर होतंच होती... तू आणि बाबा यातील निवड करण्याची वेळ येऊ नये एवढीच प्रार्थना करत होते... नसतेच करू शकले...
पण तरीही कळत नकळत तुझ्याकडे पारडं झुकतं ठेवलं आणि बाबांना गृहीत धरलं, आजवर लेकीचे हट्ट पुरवले... आता आयुष्याचा निर्णय घ्यायच्यावेळी कसे अडवतील? आणि मी बाबांच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकले तरी माझ्या बाबांनी बापाचं कर्तव्य पार पाडलं... माझा बाप नरमला लेकीच्या हट्टापुढे!
माझा हळवेपणा, माझं तुझ्यासाठी झुरणं, तुझ्याबाबतीत फक्त ह्रदयाने विचार करणं तुला आवडायचं बहुतेक. प्रत्येक पुरूषाला आवडतं तसं 'सांभाळणं'. मग हळव्या क्षणी वाहावत जायचास. (मी तर कधीच वाहावत गेले होते, डोळ्यांना पट्टी बांधून स्वतःचं भविष्य नशीबाच्या हवाली करणार्‍या गांधारीप्रमाणे.)
"मला तुझ्याइतकं कोणीच सांभाळू शकणार नाही. तू खूप वेगळी मुलगी आहेस, माझं तुझ्याशी लग्न झालं तर माझ्याइतका नशीबवान दुसरा कोणीच नसेल..." अशासारखी तुझी वाक्ये अंगावर मोरपिस फिरवून जायची. मी सुखवायचे तात्पुरती का होईना.... मग 'लग्न झालं त'' ही शक्यताही नकळत नजरेआड व्हायची आणि माझ्या लग्नाची स्वप्ने पाहीलेल्या माझ्या बाबांच्याही माझ्याकडून काही अपेक्षा असू शकतात्-असतील हे त्या तात्पुरत्या सुखाच्या धुंदीत पूर्णपणे विसरून जायचे.
पण मी मात्र अजूनही नाकारले जातच होते, कधी तुझ्याकडून तर कधी तुझ्या घरच्यांकडून. तुझ्या प्रत्येक अटी मान्य करायचे, रडायचे, कळवळायचे. न केलेल्या चुकीची माफी मागायचे; आयुष्य त्रिशंकूसारखं अधांतरी लोंबकळत ठेऊन, याच आशेवर की कधीतरी माझी संसारची स्वप्ने पूर्ण होतील. तू बोलवायचास तेव्हा बोलवायचास तिथे यायचे, धावत पळत. तू रूसायचास, नाराज व्हायचास. कधी मला उशीर झाला म्हणून तर कधी माझ्या घामेजलेल्या अवताराकडे बघून. मी गयावाया करायचे, रडायचे तो तुला तमाशा वाटायचा..
प्रेमासारख्या अत्यंत अव्यवहार्य गोष्टीवर अजिबात विश्वास न टाकणार्‍या माझ्या बापाशी मात्र मी हिरीरीने भांडायचे, माझी बाजू मांडायचे.
तुला माहीत होतं मी माझ्या बाबांवर किती प्रेम करते ते... एक दिवस तू चिडलेलास आणि मी गयावाया करत होते. अचानक म्हणालास, "म्हण, माझा बाप नालायक आहे..." मी रडत रडत म्हणाले... खाडकन जाणवलं, हे काय बोलतेय मी... कोणासाठी...
मी रडत रडत पुन्हा फोन केला तुला आणि म्हणाले, "माझा बाप नालायक नाहीये, तुला माझ्याशी लग्न नाही करायचं तर नको करूस!" तुलाही ते जाणवलं, तू सॉरी सॉरी बोलत राहीलास... मी तुटत गेले, स्वप्नांची फुले तर कधीच कोमेजली... कुठल्या तोंडाने सांगू बाबांना, ज्याच्यासाठी तुम्हाला त्यादिवशी एवढं तोडून बोलले तो माझ्या मनाचाही साधा विचार करू शकत नाहीये... मग म्हटलं राहू दे, ते जरी तोंडावर कुत्सितपणे बोलले की,"बघ आधीच म्हटलं नव्हतं तुला..." तरी माझी तडफड त्यांना नाही बघवणार...
तू माफी मागितलीस, फ्रस्ट्रेशन आलेलं म्हणून राग तुझ्यावर काढला म्हणालास... काहीही चूक नसणार्‍या माझ्या बापावर तू निष्कारण राग काढलास हे तूही विसरलास आणि मी तर एक स्वार्थी, प्रेमांध, नतद्रष्ट मुलगी बनले होते, जिला आपल्या बापाच्या स्वप्नांपेक्षा स्वतःची स्वप्नं महत्वाची वाटत होती...
मग एके दिवशी परवानगी मिळाली तुमच्या घरून आपल्या लग्नासाठी. मी मागचं सगळं विसरून पुन्हा नव्याने स्वप्न बघू लागले... आतापर्यंतच्या माझ्या धडपडीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. पण सुखाच्या सायीची तृप्ती अंगभर पसरण्याआधीच पुन्हा कोलमडले. आजपर्यंत 'खालच्या जातीतली' म्ह्णून फक्त मला ऐकावं लागत होतं, आता माझ्या बापालाही ऐकावं लागलं होतं - लेकीला लंकेची पार्वती म्हणून 'दान' करणार असल्याबद्दल. आजपर्यंत त्यांनी केलेल्या संस्कारांचं, शिक्षणाचं, चांगुलपणाचं काहीच मोल नव्हतं. त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा माझ्यामुळे आणि माझ्यासमोर माझा बाप ढसाढसा रडला-"मला वाटत नाही का गं तुला काहीच कमी पडता कामा नये? परिस्थिती असती माझी तर केलं असतं गं तुझं सालंकृत कन्यादान..." आधी परिस्थितीने हतबल, नंतर पोरीच्या प्रेमापोटी हतबल आणि मग असहायतेनी हतबल! मुलीच्या बापाच्या अश्रूंमधील तडफड आणि हतबलता समजायला मुलीचा बापच व्हावं लागतं. सिंधूचा बाप पुन्हा एकदा मुलीमुळे असहाय ठरला होता, अपमानित झाला होती, हतबल झाला होता; एका लाचार प्रेमांधळ्या सिंधूमुळे!
मी एकटीच लढत होते, झगडत होते. तुझ्या साथीची अपेक्षा केव्हाच सोडून दिली होती, जेव्हा तू 'मुलाकडची बाजू' म्हणून स्वतःचं आणि घरच्यांचं समर्थन केलंस. आतून पुन्हा पुन्हा तुटत राहीले. कीव वाटली. अहं, तुझी नव्हे! समाजव्यवस्थेचीही नाही. स्वत:चीच! मुलीच्या सुखासाठी जबाबदारीचे जोखड अडकवलेल्या मान तुकवून निमूट अपमान सहन करणार्‍या सगळ्या वधूपित्यांची!
मी ज्या व्यक्तीला स्वतःच्या मर्जीने स्वत:च्या जोखमीवर आयुष्यभरासाठी निवडले त्याचेच विचार इतके कमजोर कसे? मी चुकले का तुला समजून घ्यायला? नाही! 'कशी त्यजू या पदाला' म्हणत तुझ्या पायाशी लीन होणारी मीही एक सिंधूच! आणि माझा बाप? तो या कथेमध्ये कुठंच नाहीये. 'एकच प्याला' या नाटकात तरी 'सिंधूचा बाप कुठे होता? तो व्यक्त झाला त्याच्या असहायतेतून, हतबलतेततून! मुलीच्या सुखासाठी अपमानाचे कडूजहर घोट निमुटपणे गिळणार्‍या एका मुलीच्या बापाच्या भुमिकेतून! मुलगी जन्माला आल्यापासून त्याला या भुमिकेचा सराव करावा लागत असेल. माझा बापही शेवटी सिंधूचा बाप ठरला- असहाय, हतबल - फक्त शिर्षकापुरता!
गडकर्‍यांना मुलींच्या दु:खी असहाय बापवर्गावरून 'सिंधूचा बाप' सुचला असावा. ते तरी काय करणार? समाजव्यवस्थेच्या विरूद्ध पोहोण्याचं ताकद आणि धाडस कमी लोकांमध्ये असतं. प्रवाहाविरूद्ध पोहोणार्‍यांची होणारी दमछाक पचवण्याइतकी ताकद सर्वांच्यातच असते असं नाही. पुन्हा किनारा गाठलाच तरी त्या यशाचा आनंद साजरा करायला कोणी सोबत असेल की नाही कुणास ठाऊक! गडकर्‍यांनी प्रवाहासोबत पोहण्याचा सोयिस्कर मार्ग निवडला. अश्रू ढाळणारी, पतीपरमेश्वराच्या चरणांत स्वर्ग समजणारी सोशिक सिंधू ही समाजाच्या दृष्टीने सर्वगुणसंपन्न संसारी स्त्री गडकर्‍यांच्या 'एकच प्याला'ने अजरामर केली. (सिंधूच्या बापाला त्यात स्थानच नव्हते, समाजाच्या दृष्टीने तो एक उपेक्षित आणि उपकृत घटक!)

तशीच ही सिंधू आमच्याही मनात अजरामर होऊ पाहतेय, पण मी ही सिंधूंची असहाय जमात नष्ट करणार. प्रवाहाविरूद्ध पोहोण्याचं धाडस यापूर्वीही एकदा केलंय, पुन्हा करेन आणि खात्रीने तीर गाठेन. आणि हा आनंद साजरा करायला मी एकटी नसेन तर त्या माझ्या सार्‍या भगिनी असतील ज्या धडपडताहेत या असहायतेच्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी!
मी नक्की लढेन, एकटी- समाजव्यवस्थेविरूद्ध, परंपरेच्या चौकटीविरूद्ध कारण माझी असहायता, घुसमट या चौकटीत मावत नाहीये. ती चौकट रूंदावण्याचा प्रयत्न करेन. नाहीच जमलं तर फाडून टाकेन. आधीही फाडली होतीच की चौकट तुझ्यासाठी. आता मी ही चौकट फाडणार आहे माझ्या बापासाठी, सिंधूच्या असहाय बापासाठी! त्याला न्याय देण्यासाठी!! उगाच लेकीचं दु:ख बघून त्यानं असहायतेने झुरून मरण्यापेक्षा या लढ्यात तिच्या पाठीवर हात ठेऊन लढ म्हणावं, तेही स्वतःचा कणा ताठ ठेऊन!
माझ्या या लढ्यात मला साथ देशील आशी आशा आहे, अपेक्षा नाही... सप्तपदीवेळी आयुष्यभराच्या साथीच्या शपथा घेतल्यावर तेवढ्या साथीची आशा तर करू शकते ना... नाहीतर कुणी सांगावं, तू ही एका सिंधूचा असहाय बाप असू शकशील!

ललितः I'm Good At Being Me....


छान हे विशेषण व्यक्तीसापेक्ष आहे. व्यक्तीपरत्वे बदलते.
म्हणजे जर मी "आपण भलं आपलं काम भलं" या कॅटॅगरीतली आहे तर काहीजणांच्या मते मी छान आहे... कारण मी त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात त्यांना नको असताना विनाकारण नाक खुपसत नाही. सहज चौकशी केल्यासारखे दाखवून त्यांच्या दुखर्‍या नसांवर बोट ठेवत नाही, खवचटपणे हसत हसत भोचकपणा करत त्यांच्या बातम्या काढत नाही त्यांच्यासमोर गुडी गुडी बनत इतरांकडे त्यांच्या बातम्या माझ्याकडच्या मीठमसाल्यात घोळवून चविष्टपणे चघळत नाही... पण याउलट मात्र काहीजणांच्या विशेषतः काहीजणींच्या मते मी फारच शिष्ट या कॅटॅगरीत मोडते. माणूसघाणी, कोणाकडे यायला नको कोणाकडे जायला नको, कोणाची कसलीही 'विचारपूस' करीत नाही, कोणी केलीच तर स्वतःचा ताकास तूर लागू न देता हसत हसत प्रश्नांना बगल देते वगैरे... पक्की आतल्या गाठीची!


छान हे विशेषण परीस्थितीसापेक्षसुद्धा आहे. म्हणजे असा बघा हं... आता एखाद्याला मदतीची खूप खूप गरज आहे, आणि कर्मधर्मसंयोगाने मी ती मदत करू शकले तर मी खूप छान असते. पण माझी हीच किर्ती ऐकून दुसर्‍यानेही माझ्याकडून मदतीची अपेक्षा केली पण ती माझ्या आवाक्याबाहेर असल्याने मी सौम्यपणे नाकारले तरी मी वाईट होत नाही पण मग छानही नसते.


छान हे विशेषण कालसापेक्षही आहे. कसे?
आज आत्ता माझ्याकडे वेळ आहे, मी निवांतपणे एखाद्याकडे जातेय, गप्पा मारतेय... मी खूप खेळकर, गप्पिष्ट आणि छान असते. पण उद्या जर मी काही व्यापात अडकले तर पूर्वीचा वेळ देऊ शकेनच असे नाही. "बघा, तेव्हा गरज होती आमची म्हणून सतत येणं व्हायचं आणि आता काय 'मोठ्ठे लोक' झालेत... वेळ कुठाय आमच्यासारख्यांसाठी?" अर्थातच मी छानच्या सिंहासनावरून पायउतार!






छान हे विशेषण अनुभवसापेक्षपण आहे.
मला एखाद्या व्यक्तीचा पूर्वीचा अनुभव तितकासा चांगला नाही आणि तरीही मी मनात अढी न ठेवता तिच्याशी पूर्वीच्याच मोकळेपणाने वागले तर मी खूपच छान असते, पण जर मला नाही जमलं मोकळेपणाने वागायला तर तो माझा नैसर्गिक मनुष्यस्वभाव मला छानपणाच्या किताबापासून लांब ठेवतो.

हे झालं माझ्याबद्दल! पण "मी अशीच आहे, हवे तर स्वीकारा नाहीतर राहीलं" असं म्हणताना इथे मीही समोरच्याच्या जागी असतेच की बर्‍याचवेळेस! आपण समोरच्याबद्दल पटकन मत बनवून मोकळे होतो. त्याला उसंतही देत नाही पुरेशी, व्यक्त होण्यासाठी! आपण आपल्याला त्याच्या जागी ठेऊन किती वेळा पाहतो? बर्‍याचवेळेस आधी घमेंडी, माणूसघाणी शिष्ट वगैरे वाटलेली व्यक्ती काहीकाळाच्या संपर्काने छान मनमोकळी फ्रेंडली वगैरे वाटू शकतेच ना. आणि कधी कधी गोSSड वागणारी वाटणारी व्यक्ती तुमचा गैरफायदा घेऊ शकते. त्यामुळे छान बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुम्ही तुम्हीच राहणं महत्वाचं आणि विशेषणांच्या घोळात अडकवण्यापेक्षा समोरच्यालाही तोच राहू देणं!!! कारण कोणीच परफेक्ट नसतं!!

ललितः Share Smiles... Be Santa Claus





२४ डिसेंबरच्या रात्री, उशाशी हळूच मोजा लटकवून, डोळे मिटून सँटाला हळूच विशलिस्ट सांगण्याऐवजी कधी व्हावे आपणच एक मोठ्ठा सँटा!लालमलाल वेलवेटचा तंग पोशाख चढवून लालचुटूक टोपीच्या पांढर्‍याशुभ्र फरचा गोंडा उडवत स्वार व्हावे बेभान रेनडिअर गाडीवर! स्वारी करावी शहराशहरांतून! लालेलाल मखमली जादुई पोतडीतून हास्य वाटत फिरावे. घराघरांच्या खिडक्यांतून हळूच डोकवावे अन पाहावे... उशाशी लटकवलेले मोजे... मग निरखावे न...िरागस चेहरे- श्रांत क्लांत निजलेले; सार्‍या आशा अपेक्षांचा भार सँटाच्या दमदार खांद्यांवर निश्चिंतपणे सोपवून; अपार विश्वासापोटी!!
हवे ते सर्व देईलच की सँटा आणि सर्व दु:खे पळवून लावेल आपल्या गडगडाटी हास्याने.

त्यांचा हा सँटावरील भाबडा विश्वास सार्थ ठरवत प्रत्येकाच्या मोज्यात टाकावे मूठभर प्रेम, एखादं निखळ हास्य आणि चिमूटभर विश्वास्-पुढच्या नाताळपर्यंत पुएल एवढा! बस्स!! आणखी काय हवं असतं? आणि कधी किलबील डोळे जागे दिसलेच - भिरभिरणारे अन सँटाची वाट बघत जागणारे, 'मागच्यावेळी हवं ते दिलंच नाही, आता प्रत्यक्षच मागूया' असं म्हणत रूसून बसलेले... तर द्यावा एक गोडसा पापा आणि बाऊल भरलेल्या लालचुटूक आरस्पानी जेलीसारखे थुलथुलणारे पोट हलवत गडगडाटी हसावे, "हो हो हो!" अन म्हणावे, "काय हवंय सांग तुला_ प्रयत्न नक्की करेन देण्याचा!"

जादुच्या पोतड्यातील गमतीजमती पटापट सगळ्यांना वाटून आणि सगळ्यांचे मोजे आनंदाने भरून मग दमून भागून परतावे आपल्या घरी-- रात्र सरायच्या आत!! हळूच आपल्या उशाशी ठेवावा एक छोटासा मोजा लटकावून -- कुणी सांगावं, आपल्यासारखाच एखादा सँटा त्यात काय काय गम्माडीजम्मत ठेऊन जाईल!!!

कारण- "आपल्या सर्वांच्यातच एक हसरा प्रेमळ सँटाक्लॉज लपलेला असतो..." Share Smiles... Be Santa claus
                                                                                                                  ... स्वप्नाली वडके तेरसे

ललित : मुंबई - यंगीस्तानची!!!




मुंबई - उत्फुल्ल चैतन्याची! सळसळत्या नवतारूण्याची, उमेदीची, जिद्दीची, कर्तृत्वाची!! आकर्षक रंगांची, मनमोहक सुगंधांची!! खळखळून हसण्याची, भरभरून जगण्याची!! नवनवीन ट्रेण्ड्सची, विविध फॅशनची!! मुंबई - यंगीस्तानची!!!

लिवाईस, पेपे इत्यादी ब्रँण्ड्सबद्दल चोखंदळ असलेले मुंबई यंगीस्तान तितक्याच उत्साहाने आणि उत्सुकतेने फॅशनस्ट्रीटवरही शॉपिंग करतात. तसेच चटपटीत चाट आवडीने चाखणार्‍या या मुंबई यंगीस्तानने वि...विध "खाऊब्रँण्ड्स"नासुद्धा आपले फ्रेंण्ड्स बनवले आहे. मकडी उर्फ मॅकडी उर्फ मॅकडोनल्ड्सचे बर्गर्स, पफ्स, सोनेरी फ्राईज, पिझ्झाहट व डॉमिनोजचे एक्स्ट्रा चीज पिझ्झाज... "पार्टी करनेवालोंको पार्टी का बहाना चाहीये". डेलिशिअस हँडी मेन्यू, होम डिलीव्हरी, सोबतीला चिल्ड कोल्ड्रिंक्स आणि धिंगाणा घालणारा मित्रपरीवार असेल तर सेलिब्रेशनसाठी वेगळा बहाणा कशाला? एकत्र जमलो की पार्टीमूड आपोआपच येतो!

घरात बोअर होतंय? तर मग मित्रांसोबत चिलआऊट करायला बरीस्ता वा सीसीडी आहेतच की! न संपणार्‍या गप्पा, धम्माल खेचाखेची आणि सोबत गंधाळलेली वाफाळती कॉफी.... अन तोंडात विरघळणार्‍या मुलायम यम्म्म्म्म्म्म्म्म्म्म पेस्ट्रीज!!!

बर्थ डे आहे तर केक हवाच राव! पण आता केक खाण्यासाठी बर्थ डेजची वाट कशाला बघायची? लुसलुशीत केक्सचे स्मॉल व्हर्जन्स असतात ना माँजिनीजमध्ये... तितकेच डिलीशियस, तितकेच यम्मी क्रिमी!!

ऊऊऊऊऊऊ स्पाईसी लव्हर्स!! तंदूरी आणि ज्युसी कबाब्ज तुमच्यासाठीच! इटालियन, चायनीज, कॉन्टीनेन्टल... टेस्ट बड्स कमी पडतील पण चवी??? अहं!!! मॅकरोनी, स्पघेटी, पास्ताज, नूडल्स, टॅकोज आणि इतरही बर्र्च काही!! डाएट कॉन्शस असाल तर सँडविचेस त्यातही थोडा स्पाईस तो चलता है- तर ग्रील्ड! स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स चुरचुरीत, कुरकुरीत, खुसखुशीत, लुसलुशीत, कुडकुडीत... क्रिस्पी, क्रंची, टँगी, टॅकी, स्पाईसी, क्रिमी, सॉफ्टी... विविध चवीढवी! देशविदेशांतील फ्लेवर्स आपल्या चटपटीत झणझणीत मसाल्यांमध्ये घोळून अधिकच खमंग होतात आणि जिभेला बोलण्याचीही उसंत न देता कधी पोटात गडप्प होतात... समजतही नाही!

खरं तर इतर गोष्टींप्रमाणे चवीच्या बाबतीतही चोखंदळ असलेल्या यंगीस्तानला खाण्याचा तर एक बहाणा असतो... नाहीतर घरपोच मिळणार्‍या एक्स्ट्रा चीज पिझ्झ्याचे सहाच्या सहा पिसेस एकट्याने गट्टम करण्यापेक्षा खोक्यात उरलेला एकुलता एक पिझ्झ्याचा तुकडा, दोस्तांच्या नकळत गट्टम करण्यात आणि लागलंच तर शेअरिंगपेक्षा "जो माझा आहे तो माझाच आहे, जो तुझा आहे तोही माझा" असं हक्कानं म्हणत झगडण्याची जी वेगळीच लज्जत आणि खुमारी आहे ती त्या पदार्थाला अधिकच लज्जतदार खुमासदार बनवते आणि आयुष्यालाही!!!

                                                                                                                  ...स्वप्नाली वडके तेरसे






मुंबई - मायानगरी, चकमकाटाचं झगमगाटाचं शहर, गर्दी गोंगाटाचं शहर, घड्याळाच्या काट्यावर धावणार्‍या घामट चिंबट जीवांचं शहर, कष्टकर्‍यांचं शहर, हातावरच्या पोटाचं शहर, चालता चालता खाणार्‍यांचं शहर, चटपटीत चमचमीत स्वस्त आणि मस्त खाऊ खिलवणार्‍यांचं... शहर...
हॉटेल्स, रेस्तराँ, मॉटेल्स, कॅफेज, स्टॉल्स मॉल्सचं शहर... ढाब्यांचं खाऊगल्ल्यांचं, चाट, उसाचा रस, नारळपाणी, बर्फाचा गोळ्या इत्यादींच्या गाड्यांचं नी ठेल्यांचं शहर!

पाणीपुरी, सेवपुरी, रगडापूरी, बटाटापूरी, भेलपूरी, दहीपूरी यांची लिस्ट कधी होईल पुरी? झणझणीत वडापाव, खमंग बटाटाभजी, कुरकुरीत खेकडा कांदा भजी, चुरचुरीत समोसेपाव, चटपटीत मिसळ पाव, मसालेदार पावभाजी, मेस्सालेवाला डोसा यांची लज्जत एका वाफाळत्या कटींग्शिवाय फारच अधूरी!
तोंड गोड करायचंय? कशाला हवीय बर्फी नी स्वीट्स? गारेगार बर्फाचा गोळा, गर्मागरम जलेबी, मलईदार थंड लस्सी, गोड गोड नारळाचं पाणी, मिरेपूड नी चाट पावडर भुरभुरवलेलं फ्रूट सॅलड, थंडगार आले-लिंबू मिश्रीत ऊसाचा रस- स्वस्त नी मस्त!

वेळ कोणाला आहे हॉटेलात जा नी ऑर्डर सोडून ताटकळत बसा... हातातच वडापाव घ्या नी पटकन ट्रेन पकडा... एका हाताने वर पकडून वजन तोलत दुसर्‍या हातातील वडापावचा आस्वाद गर्दीमध्येच घ्या... लोकांच्या कलकलाटात, रेल्वेच्या खडखडाटात! मॅक्डोनल्ड चे बर्गर, पिझ्झाहटचे चीजवाले पिझ्झाज, डॉमिनोजचे मेन्यूज नी डीप्स झक मारतात चटपटीत चाट, खमंग वडापाव आणि हिरव्या लाल झणझणीत चटण्यांपुढे! सीसीडीची नी बरीस्ताची कॉफी असेलही हो बरी पण वाफाळत्या कटींगची चवच न्यारी! भुरभुरत्या पावसात काय लागतं? सोबतीला "आपलं" माणूस नी हातात लिंबू तिखट चोळलेला गरमागरम भुट्टा... अहाहा! आजारी पडू? हरकत नाय! भेसळीचे खाऊन तरी मिळतंय काय?
आपली मुंबई- जीवाची मुंबई --- "जिव्हा"ळ्याची मुंबई!!!
                                                                                                                 ...स्वप्नाली वडके तेरसे

ललित : ग्रे शेड






"There is no black-and-white situation. It's all part of life. Highs, lows, middles." - Van Morrison


कोणीही अगदी काळेकुट्ट आणि पांढरेधोप्प व्यक्तीमत्वाचे नसते. आपल्यापैकी सर्वचजणांच्या व्यक्तीमत्वाला कमीअधिक प्रमाणात ग्रे शेड असते.
खरं तर... संपूर्ण काळ्या किंवा संपूर्ण पांढर्‍या व्यक्तीमत्वाचे लोक असूच नयेत. संपूर्ण काळ्या व्यक्तीमत्वाचे लोक इतरांना जगू देत नाहीत आणि संपूर्ण पांढर्‍या व्यक्तीमत्वाच्या लोकांना इतर जगू देत नाहीत. त्यापेक्षा करडा परवडला. जसा हल्लीच्या कंटेपररी इंटेरिअर डेकोर मध्ये ग्रे कलर थीम रॉयल मानली जाते... तसंच हे! हा करडा रंग तुमच्या व्यक्तीमत्वाला आवश्यक तितका करारीपणा आणि सौम्यपणा यांचे अनोखे मिश्रण बहाल करतो... रॉयल रिचनेस बहाल करतो...

ग्रे..करडा..राखाडी.. काळ्या-पांढर्‍याचा बेमालूम मिलाफ! परीस्थिती, वेळ, समोरील व्यक्ती आणि अनुभवांच्या जोरावर आपण आपल्या व्यक्तीमत्वातील पोतांमध्ये काळ्या किंवा पांढर्‍या छटेचा अंश वाढवत/कमी करत असतो...

                                                                                                                              .... स्वप्नाली वडके-तेरसे

हे ही दिवस जातील...!!!


हातातील टिफीनबॉक्स काहीश्या नाराजीने टेबलावर ठेवत त्याने स्वतःला सोफ्यावर भिरकावले...अस्ताव्यस्त... काही क्षण जमीनीकडे खिळून पाहत तो गप्प राहीला. पाण्याचा ग्लास पुढे केलेला त्याचा बायकोचा हात काही क्षणासाठी थबकला. कडेवरच्या पिल्लाने बाबाकडे झेप घेण्यासाठी चळवळ केली... एरवी दारातूनच आपल्याला घेण्यासाठी हात आणि हास्य रूंदावणार्‍या बाबाने आज आपल्याकडे पाहीलेही नाही... काही झालंय का? असा प्रश्न त्या न...िरागस पिल्लाला कुठून पडणार. बायकोने ओळखले... काहीतरी अघटीत घडलेय! ती पिल्लाला चुचकारू लागली. तिच्या बांगड्यांच्या किनकिनाटाने तो भानावर आला. काही क्षण पिल्लाकडे पाहून त्याने बायकोकडे नजर वळवली... हताशपणे पुटपुटला... कामावरून काढून टाकलं... इन्टिमेशनही न देता...!

"आता???" हा त्यालाही छळणारा प्रश्न अलगद तिच्याही डोक्यात शिरला... पण चटकन स्वतःला सावरत ती त्याच्याशेजारी बसली... बाबाकडे झेपावणार्‍या पिल्लाला एका हाताने सावरत तिने त्याच्या केसांतून ममत्वाने हलकेच हात फिरवला... इतका वेळ थोपवलेल्या भावनांचा कल्लोळ झंझावत बाहेर पडला... "असं कसं करू शकतात ते माझ्यासोबत! आणखी दहा-बाराजणांनाही कमी केलं. पण माझा आजवरचा रेकॉर्ड बघायचा...परफॉर्मन्स तरी लक्षात घ्यायचा. दिवस रात्र एक करून या कंपनीसाठी झटलो... तुझ्या प्रेगनन्सीच्या वेळी तुला माझी सर्वात जास्त गरज असूनही प्रोजेक्टची डेडलाईन पाळण्यासाठी ओव्हरटाईम केला... पिल्लू चातकासारखी वाट बघतो, त्यालातरी कुठे वेळ देता येतोय... श्याSS वैताग आलाय या आयुष्याचा!" त्यानं त्राग्यानं हात सोफ्यावर आपटला. पिल्लू बिथरलं होतं, शांतपणे टकामका बाबाकडे पाहत होतं. तिला त्याचा त्रागा हताशपणा समजत होता. घरकुलासाठी, पिल्लाच्या भविष्याच्या तरतूदीसाठीची त्याची धावपळ ती बघत होती. पण ती गप्प राहीली. आत्ता त्याला भडास काढून टाकू दे... मोकळं होऊ दे. तो बरंच काही बोलत होता...अचानक थांबला... बायकोच्या डोळ्यांत पाहत कळवळून त्याने विचारलं, "आता???" मोठाच गहन प्रश्न होता... तिलाही तो सतावत होताच! महागाई वाढतेय. पिल्लाला सांभाळण्यासाठी आपण नोकरी सोडली. त्याच्या पगारात कसंबसं निभावत होतं पण वाढते खर्च भागवायचे म्हणजे... क्षणभरच! स्वत:च्या मनातील सर्व काळज्यांना मागे सारत तिने हलकेच त्याचा हात स्वतःच्या हातात घेतला... हळूवारपणे पण ठामपणे ती म्हणाली, " हे ही दिवस जातील..." त्या उबदार स्पर्शाने आश्वासक शब्दांनी त्याच्या चेहर्‍यावरील काजळी काहीशी मंदावली.

त्याने नवीन नोकरीसाठी धडपड चालू केली. पिल्लाला सांभाळून तीही त्याला मदत करत होती... पेपरमधील जाहीराती कापून ठेवणे, त्याचा बायोडेटा अपडेट करायला मदत करणे... पिल्लू मात्र खूश होतं... बाबा बराच वेळ मिळत होता त्याला. पिल्लाच्या निखळ खळखळाटाने, आनंदी किलबिलाटाने नी निरागस चेहर्‍याने त्याला नवीन हुरूप मिळत होता. इंटर्व्हूजचं चक्र चालूच होतं. पण अजूनही जमत नव्हतं कुठेच! पुंजी हळूहळू आटत चालली होती. धीर सुटतोय की काय अशी परीस्थिती निर्माण होते न होते तोच...
एक दिवस तो आला... धापा टाकत... तिला दारातूनच हाका मारत... धावत आला होता वाटते... धसकून घाईघाईने तिने दार उघडलं... तिचे दोन्ही खांदे अलगद दाबत हसर्‍या चेहर्‍याने त्याने तिच्याकडे पाहीलं... पिल्लू रांगत रांगत आलंच मागून... त्याला झटकन उचलून त्याने गरागरा फिरवलं... एवढा आनंद म्हणजे... तिच्या तोंडात पेढा कोंबत तो गदगदत्या स्वरांत म्हणाला... मला नवी नोकरी मिळालेय! आधीच्या कंपनीहून अधिक ऑफर केलेत, पोस्टही वरची आहे... आता सगळं नीट होईल... आता सगळंच अगदी छान होणारेय! त्याच्या डोळ्यात तरळलेल्या आनंदाश्रूंनी ती सुखावली. दोन्ही हात छातीशी धरून तिनं वर बघत देवाचे आभार मानले... अस्पष्ट स्वरांत पुटपुटली..." हे ही दिवस जातील..."!!!


.... स्वप्नाली वडके-तेरसे

ललित : मै अपनी फेवरेट हूं!!!


पूलाखालून धडधडत येणारं रेल्वेचं धूड ओझरतं पाहीलं तिने आणि पावलांचा वेग वाढवून चक्क पळत सुटली...आजूबाजूच्या गर्दीची, धक्क्यांची तमा न बाळगता... लोंढ्यासोबत लेडीज डब्यात स्वतःला झोकून देत एका कोपर्‍यात स्थिरावली. गाडीने वेग घेतला. संध्याकाळच्या पिवळसर सोनेरी उजेडाने आणि मंद वार्‍याने ताण सैलावला. अचानक काहीतरी आठवून... मगाशी पूलावरून धावतानाचा तो ओंगळ स्पर्श... अगदीच नकोसा... रागाने नापसंतीचा कटाक्ष टाकला तर ते लाचार ओंगळ हास्य गाळणारा चेहरा!!! आजूबाजूच्या गर्दीतलाच! रूमालाने खसखसून पुसला दंड तिने! "श्शीSS काय सुख मिळवतात असल्या चोरट्या स्पर्शाने?" सोनेरी संध्याकाळ, मंद सुखावणारा वारा कश्श्या कश्श्यानं तिचा गेलेला मूड परत येणार नव्हता... त्या नकोश्या आठवणी तोंड कडू कडू करून गेल्या.
रोजच्या रोज याच बातम्या... आज हिच्यावर रेप उद्या तिचा विनयभंग, आज हिच्यावर बलात्कार उद्या तिच्यावर अत्याचार! प्रसंग, ठिकाणे, व्यक्ती, तारखा, अत्याचारी व पीडीत वयोगट, चेहरे, नाती... वेगवेगळे... वेदना त्याच!! आयुष्यभरासाठीची स्वतःच्याच शरीराची किळस वाटायला लावणार्‍या... झोपेतही ते ओंगळ स्पर्श, बिभत्स चेहरे जाणवून देणार्‍या... आरश्यातील स्वतःच्याच प्रतिबिंबाला स्वतःसकट संपवावं असं कित्येकदा वाटायला लावणार्‍या... आयुष्यभर!!!

काल सकाळीपण रोजच्या गर्दीला, विखारी नजरांना, ओंगळ स्पर्शांना चुकवत धापा टाकत ती ऑफीसात शिरली. कपाळावरचा घाम टिपत दम खाईपर्यंत बॉयने चहाचा वाफाळता कप पुढ्यात ठेवला. शेजारच्या टेबलावर चाय टाईम मैफील जमली होती. "शी किती दिवस हे अत्याचारी लोक असे उजळ माथ्याने नवनवे गुन्हे करत नवीन सावजं शोधत फिरणार?" " तर काय? त्या बिच्चार्‍या मुलीचं काय? तिच्या घरचे? तोंड लपवून आयुष्य काढावं लागत असेल नै?" "कोण लग्न करणार अशा मुलींशी?" "पण काय हक्क आहे अशा रितीने कोणाचे आयुष्य उध्वस्त करायचा?"
सावज काय, बिच्चारी काय? छान आलं-वेलचीने गंधाळलेल्या चहाचा घोट तिच्या तोंडात कडवटपणे फिरत राहीला. "पण मुलींनीही जरा आवर घातला पाहीजे ना स्वतःच्या वर्तनाला... स्टाईल्स, फॅशन्सच्या नावाखाली प्रव्होकेटींग ड्रेसेस घालून सुंदर, नोटीसेबल दिसण्याची हौस तर त्यांनाच असते ना... कशाला वेळी अवेळी पब्ज, मूव्हीज, पार्टीज हवेत?" ताडकन तिने नजर वळवून बघीतलं... तिचा प्रोजेक्ट लीड!!! चहाचा कप जवळजवळ टेबलावर आपटून तिने त्या मैफीलीकडे मोर्चा वळवला... "ओ प्रव्होकेटिंग ड्रेसेस? आई किती वर्षांची आहे रे तुझी? काम करते? कपडे वगैरे धूत असेल... बादलीतून कपड्यांचे पिळे वाळत घालताना तिचा पदर सरकला तर ती प्रव्होकेट करते का रे बघणार्‍याला? तुझी बायको नोकरी करते ना? प्रोजेक्ट रिलीजच्या वेळी उशीरापर्यंत ऑफीसात थांबून कंपनीच्या बसड्रायव्हरला ती मोटीव च देते कि नाही की आ बैल मुझे मार! मुलगी आहे ना तुला? झाली असेल आता पाच-सहा महीन्यांची! गोड गोंडस हसून शेजारच्यांना प्रोवोकेट करत असेल... बातम्या वाचतोस ना रोज आणि टिव्हीवरचे न्यूज चॅनेल्स सर्फ करतोस की नाही? नव्वद टक्के पीडीत मुली सहा महीन्यांच्या अजाण बाळांपासून चौदा पंधरा वर्षांच्या नुकत्याच उमलू पाहणार्‍या कोवळ्या कळ्या असतात. त्या काय प्रव्होकेट करणार रे? बसमध्ये गर्दीत जागा नसताना शरीर आकसून स्पर्श चुकवताना मागून पुढून चिकटल्यानंतर तुमच्या अवयवाला स्वर्गीय सुख मिळतं ना? आम्हाला आमचा आणि कधी कधी तुमचाही अवयव कापून टाकावासा वाटतो. अंगाप्रत्यंगावरून फिरणार्‍या नजरा पाहील्या की अंगभर ओढणी असेल तरी सारखी करायला हात वर जातो... लाळ गाळणारे चेहरे नजरेसमोर आणि किळस वाटायला लावणारे स्पर्श  अंगावर, मनावर घेऊन दिवसभर वावरतो. दगडाचं का बनत नाहीये हे मन! प्रयत्न केला तरी पुसले का जात नाहीयेत हे स्पर्श? मनातून रेंगाळत राहतात आणि शरीरावर वळवळत राहतात... सात वर्षांच्या मुलीला समजतात का रे हे स्पर्श काय सुख देतात ते? आय वॉज रेप्ड इन द एज ऑफ सेव्हन!! अ‍ॅण्ड एव्री नाईट बीईंग रेप्ड इन माय मेमरीज!!!" आपला आवाज वाढलाय हे समजल्यावर तिने आटोपतं घेतलं... "सो कॉल्ड इंजिनीअर म्हणे! अडाणी रेपीस्ट परवडले यांच्या मेंटॅलिटीपुढे... करतात, सोडून देतात! हे आयुष्यभर आठवण करून देतात आमच्या सडलेल्या शरीराची आणि सो कॉल्ड योनीशुचितेची!!!" धुमसत तिने ऑफीस सोडलं होतं!

सतत २ दिवस विचार करकरून डोकं जड झालेलं त्यामुळे अचानक वाजलेल्या बेलचा आवाज अजूनच कर्कश्य वाटला. कुरकुरतच तिने दरवाजा उघडला. बाहेर एक प्रसन्न व्यक्तीमत्व होतं. "मी डिस्टर्ब तर नाही ना केलं?" बाहेरील सकाळपेक्षा प्रसन्न हसत त्या तरूणाने विचारलं. तिच्या कपाळावरील अस्पष्ट आठ्यांना दुर्लक्षित त्याने स्वतःची ओळख करून दिली. अत्याचारी पीडीत मुलींच्या पुनर्वसनासाठी सेवाभावी संस्थेत तो सक्रीय कार्यकर्ता होता. अत्याचारी मुलीला तिच्या नातेवाईकांच्या हेटाळणीपासून वाचवून, आईवडीलांनी वाळीत टाकल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहून समर्थपणे मानाने आयुष्य जगायला शिकवले जायचे तिथे. मुलींना स्वतःबद्दलची अपराधी भावना काढून टाकून स्वतःवर प्रेम करायला शिकवले जायचे.
'बरं मग'? या तिच्या चेहर्‍यावरील प्रश्नचिन्हाचे उत्तर म्हणून तो पुन्हा प्रसन्न मंद हासला. आपले तिच्याकडे जाण्याचे प्रयोजन तिला समजावून सांगत म्हणाला..

 "नकोसे स्पर्श झेलत, नकोश्या नजरांना टाळत तर कधी दुर्लक्षत पण ते ओझे कायम स्वतःच्या संवेदनाशील मनावर बाळगत कितीजणी जगत असतात. अपराधी भावनेने त्या स्पर्शांपासून स्वतःचंच अंग चोरत! आपली यात काहीच चूक नाही... हे शरीर आपलं आहे, सुंदर आहे... अजूनही!!! हे कायम त्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करावा लागतो. मी करतो पण लिंगभेदामुळे त्यांना पुरेसा विश्वासार्ह वाटत नाही, रादर मी स्वतःच तितकंसं रिलेट करू शकत नाही... "एका श्वासाच्या विश्रांतीनंतर आपले काळेभोर शार्प डोळे तिच्यावर रोखत तो स्पष्टपणे म्हणाला..."जितकं तू करू शकशील! मला, आमच्या संस्थेला तुझी गरज आहे. आणि कदाचित तुलाही..."

तिला "हो / नाही"च्या आंदोलनांमध्ये तसेच सोडत तो उठला... जाता जाता वळून म्हणाला... "मला तुझा अ‍ॅड्रेस तुझ्या प्रोजेक्ट लिडने दिला... आणि हो त्यानं तुला मनापासून सॉरीही म्हटलंय! उद्या ऑफीसात म्हणेलच! तो म्हणाला की तू खूप सिन्सीअर, हुशार आणि संवेदनाशील व्यक्ती आहेस, प्रसन्न आणि आनंदीही असावीस पण स्वतःला कोशात दडवून ठेवलं आहेस... तुला खरंच गरज आहे, व्यक्त होण्याची!! मुक्त होण्याची!! जमेल तुला नक्की, विचार कर. तुझ्यासारख्या कितीतरी जणींना गरज आहे तुझी!!!" तो गेला... तिला एक नवी दृष्टी देऊन! स्वतःवरच प्रेम करायला शिकवून! त्याच्या पाठमोर्‍या प्रतिमेकडे कितीतरी वेळ ती पाहतच राहीली... कितीतरी दिवसांनी आजची सकाळ प्रसन्नपणे हसतीये काय? आरश्यातल्या प्रतिबिंबाकडे स्वतःलाच न्याहाळत असताना एक गोड लाडीक गिरकी घ्यायचा अनावर मोह झाला... लहानपणी घ्यायची तसा... "मै अपनी फेवरेट हूं" म्हणणार्‍या जब वी मेटमधील गीतसारखा!!!
                                                                          ...स्वप्नाली वडके तेरसे.

पालवी... (दीर्घकथा)




"या कातरवेळी, पाहीजेस तू जवळी..."

धीरगंभीर सूर, ही हूरहूर लावणारी वेळ - या गाण्यातील चटका लावणारा आर्त स्वर, ती ओढ, तो विरह... तू असतीस तर असोशीने माझ्या गळ्यात हातांचा हार घालून तुझ्या पाणीदार डोळ्यांची नजरभूल घातली असतीस! हो, अगदी या वयातही! तुझा धबधब्यासारखा ओसंडून वाहणारा खळखळता उत्साह, हौशीनं आणि आपुलकीनं सर्वांचं करणं, कधी लहान मुलीसारखं उगीच छोट्या छोट्या गोष्टींसाठी फुरंगटून बसणं तर कधी माझ्यातील लहान मुलाचे सगळे हट्ट पुरवणं! खरंच, का गं गेलीस मला पोरकं करून? आयुष्यभराचा विरह देऊन???

अण्णांनी हलकेच अनुताईंच्या हसर्‍या छबीवरून थरथरता हात फिरवला. एवढावेळ पापण्यांशी झगडणारे मोती खळकन सांडलेच. नाक पुसायला नकळत गळ्यातल्या मफलरकडे हात वळला..."शीSS काय हे? रूमाल नाही का सापडला? आणि आता काय झालंय नाकाच्या सूरनळ्या ओढायला?" चिरपरिचित किनरा आवाज कानांच्या पडद्यांना गुदगुल्या करून गेला. छे! किती सवय झालेय हिच्या आवाजाची, अस्तीत्वाची, सोबतीची...! आता फक्त आठवणीच उरल्या आहेत.

थंडगार वारे बोचायला लागले तसं शहारत अण्णांनी गळ्याभोवतीचा मफलर कानांभोवती गुंडाळला. शालीची उब पांघर्त खिडकीची खिट्टी घट्ट केली. रेडीओचा आवाज कमी करून त्यांनी आपला मोर्चा झुलत्या आरामखुर्चीकडे वळवला. डोळे मिटून त्या खूर्चीवर झुलत जुन्या आठवणींना उजाळा देणे हा त्यांचा आवडता छंद होता. हिनेच आपल्या मागे लागून ही खूची घ्यायला लावली होती. पण पुढच्या आठवडाभरातच समजलं की बाईसाहेबांनी स्वतःसाठी घेतलेली ही खूची! आपण खूर्चीवर जरा टेकायला मोर्चा वळवला की धावत येऊन लहान मुलीसारखी स्वतःच पटकवायची खूर्ची आणि मग मस्त मांजरीसारखी डोळे मिटून त्यात झुलत बसायची. वर नाक उडवत म्हणायची,"झोपाळा बसवून घ्या म्हणून कध्धीपासून सांगत होते. ती हौस राहीलीच ना! आता काय बाबा- दुधाची तहान ताकावर भागवावी लागतेय!" तिच्या त्या आठवणीने सुरकुतल्या ओठांच्या घडीच्या कोनातून अलगद हसू सांडलं. खूर्चीकडे काहीवेळ पहात अण्णा तसेच थबकले...
पुन्हा हिची जीवघेणी आठवण! छे! डोळ्यांमध्ये आपसूक गर्दी करू लागलेल्या अश्रूंमुळे चष्म्याच्या जाड भिंगांवर धुक्याचा पडदा तयार झाला आणि समोरच्या खूर्चीत झुलणारी धुसरशी इवली मूर्ती दिसू लागली. थरथरत्या हातांनी चष्मा काढत अण्णांनी मनगटांनी हलकेच पापण्या कोरड्या केल्या आणि मोठे डोळे करून निरखून पाहीलं - "हे काय हो अण्णा! तुम्हाला माहीतेय ना मला गोष्ट ऐकल्याशिवाय झोप ये नाही ते. आज एक नवीन गोष्ट सांगितल्याशिवाय मी नाही हं तुम्हाला झोपू द्यायची!" खूर्चीतल्या गोंडस आकृतीने ऑर्डर सोडली.

"माऊSS हे हे हे" सुरकुत्यांचं जाळं रूंदावत अण्णा तोंडभर हसले.
"काय चाललंय आमच्या लाडोबांचं? आधी खूर्चीतून उतर तर मग सांगतो हो तुला छानपैकी गोष्ट."
'ठमाबाई अगदी आजीसारखी लुच्ची आहे हो! खुर्ची पटकावते माझी!' त्यांनी माऊचं रेशमी बोचकं अलगद उचललं आणि आरामखुर्चीवर झुलता झुलता चिमणगोष्टी सुरू झाल्या.
..............................................................................................................................................................


सकाळची सोनहळदी उन्हं सांडायला लागली तशी अण्णांची झोप चाळवली. 'काल रात्री बराच वेळ डोळ्याला डोळा लागत नव्हता. किती वेळ कूस बदलत जागे होतो कोणास ठाऊक! आताशा तशी झोप कमीच झालेय म्हणा.' मुखमार्जन करून चहाची वाट बघत ते खिडकीशी बसले. सकाळचा वाफाळता चहा आणि प्रिंटींगचा वास येणारी कोर्‍या पेपराची घडी या स्वर्गसुखात सकाळी त्यांना कोणाचीही लुडबूड खपत नसे. त्यांच्या अर्धांगिनीला, अनूला, माहीत होतं ते. दात न घासता बेड टी घ्यायची सवय होती त्यांची.
"शीSS कसली मेली घाणेरडी सवय ती!" असं दहा वेळा सवयीने कुरकुरूनही सकाळी उठल्या उठल्या वाफाळत्या चहाचा कप सवयीने त्यांच्या हातात पडायचा;निदान - अनू असेपर्यंत तरी! आता - प्रितीला, त्यांच्या सुनेला सकाळी तारेवरची कसरत करावी लागते हे त्यांना माहीतच होतं. सकाळचा चहा-नाष्टा, अनिकेतच्या ऑफीसची तयारी, प्रितीचं स्वत:चं ऑफीस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माऊची शाळा! हो, ते एक मोठ्ठं प्रकरणच असायचं. रोज सकाळी माऊला उठवून शाळेची तयारी करणं म्हणजे एक दिव्यंच असायचं. एरवी अगदी गुणी बाळ असलेल्या माऊच्या, शाळेत जाताना काय अंगात यायचं कोणास ठाऊक!

'एवढा गूण मात्र अगदी बापाचा घेतलाय. अनिकेतनी काय कमी त्रास नाही दिला अनूला. बापरे! काय तो धिंगाणा काय ती रडारड!! बिचारी अनू! आपल्याला या सगळ्यातून अगदी अलिप्त ठेवायची. चहाची वेळ नाही चुकवली कधी. आई चिडायचीही तिच्यावर कधी कधी,"सूनबाई, कशाला एवढं लाडावून ठेवलंस नवर्‍याला? डोईजड होणारेय बघ तुला." अनू मात्र हसून सगळं साजरं करायची. दोन मुलांत तिसरं मूल म्हणून आपला गालगुच्चा घ्यायची. अगदी मुलासारखेच लाड केले तिनं. भजी खावीशी वाटतेय म्हटल्यावर कित्तेकदा अगदी ताटावरून उठून.... सूनेच्या बाबतीतला समजूतदारपणा आपल्याला तेव्हा पत्नीच्या बाबतीत दाखवायला का नाही जमला? की जाणवलीच नाही अनूची तारांबळ? तिला गृहीतच धरत आलो का आपण नेहमी?'

'आपला स्वभाव तसा आत्ममग्नच - बराचसा रिझर्व! अनूच्या अगदी विरूद्ध! फसफसणारी शॅम्पेन म्हणायचो आपण तिला. खाण्याची प्रचंड आवड तशीच खिलवण्याचीही. एकूण एक हॉटेल, रेस्तराँ, ढाबे पालथे घातलेले. कुठून कुठून शोधून काढायची - अमूक एक डिश या हॉटेलात झकास मिळते आणि तमूक रेस्तराँची ही ही स्पेशालिटी आहे. आणि मग तशा प्रकारच्या डिशेस घरी करायचा खटाटोप आणि आम्ही गिनीपिग! जमायचाच बर्‍याचवेळेस, पण आपणच मस्करी करायचो. तिला चिडवायला खूप आवडायचं आपल्याला.'

'अनू दिसायला तशी साधारणच! आपण त्यामानाने खरंच देखणे होतो. कॉलेजात असताना कितीतरी लाजर्‍य नजरा पुन्हा पुन्हा आपल्याकडे वळायच्या.' अण्णांना त्या विचाराने आताही हसू आलं. 'गालात हसू घोळवत आपण दुर्लक्ष करायचो. अनू मात्र आईची पसंती. लाडाने अगदी तिचं नावही आईनेच ठेवलेलं 'अनुप्रिया'! अगदे वेगळं आणि लोभस नाव. आत्या मात्र म्हणालेली तेव्हा,"नावाइतकी काही सुंदर नाहीये हं! आपल्या श्री ला कशी गोजिरवाणी बायको मिळायला हवी होती." पण आईने अनुमध्ये काय बघितलेलं तिलाच ठाऊक. ती मात्र ठाम होती - हीच सून हवी या निर्णयावर. आणि अनू माझी अर्धांगिनी झाली - सर्वार्थानं. अपोझिट पोल्स या तत्वाला अनुसरून अगदी विरूद्ध स्वभाव असूनही मेड फॉर इच अदर म्हणावं अशी आमची जोडी होती. आपण मात्र तिला धम्माल चिडवायचो.

आपल्याशी ती भांडायला लागली की मुद्दामच मोठ्याने बोलायचो,"आई, अगं काय ध्यान बांधलेस माझ्या गळ्यात! हिच्यापेक्षा बर्‍या मुली अजूनही माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेत." पण अनू कसली खमकी!
"हो, ती उलट्या पंखाची कोंबडी असेल तय्यार! बघावं तेव्हा चिकटलेलीच असते नुस्ती. मागच्या ऑफीस पार्टीला पाहीलं नं."
ही मुक्ताफळं ऑफीसातल्या कलिगसाठी! अरे बापरे! तिला तर रोज नवनवीन उपाध्या मिळायच्या - भवानी काय, ढालगज काय, झिपरी वानरीण काय, सफेद चिचुंद्री काय! प्रत्येक उपाधीबरोबर हिच्या नाकाचा शेंडा लालीलाल होई. अगदी क्वचित प्रसंगी डोळ्यात पाणीही डोकवायचं पण तिचे डोळे मूलतःच एवढे पाणीदार होते की समोरचा सहज त्यात विरघळून जावा. अपार भावूक, हसरे आणि सुंदर होते तिचे डोळे. सतत एक खोडकरपणाची, आनंदाची चमक त्यात डोकवत असायची. तिचे हे भावस्पर्शी डोळे तिच्या सामान्य चेहर्‍याला असामान्य सौंदर्य बहाल करायचे. तिच्या त्या खोडकर, भावूक, चमकदार डोळ्यांची मला नेहमीच भूल पडायची. माऊच्या डोळ्यांत मला हीच चमक जाणवते - निरागस, उत्साही, खोडकर चमक!'

अण्णा, चहा!" अण्णांची विचारशृंखला क्षणभर खंडीत झाली.
"प्रिती, आवरलं का माऊचं?"
"हो, बघा ना काय त्रास देते कार्टी! रोजचा गोंधळ नुसता. तुम्ही बघता नं किती घाई होते ती सकाळी? अण्णा, सॉरी हं, तुमच्या चहाला आजपण उशीर झाला. केव्हा उठलात? आजचा दिवस हा सँडविचवाला नाष्टा अ‍ॅडजस्ट करा ना प्लीज. मला माहीतेय तुम्हाला ते ब्रेड्स नाही आवडत, पण- खूप उशीर झालाय हो ऑफीसला जायला. आणि हो, मटकीची उसळ केलेय. डाळभाताचा कुकर पण उतरवलाय. दुपारी पोळ्यांची बाई येईल. तीच तुम्हाला जेवण गरम करून वाढेल. निघू का मी? काही हवंय? अजून अंघोळपण राहीलीये हो! या अनिकेतला आईंनी नुसतं लाडावून ठेवलंय. इकडची काडी तिकडे करता येत नाही. किती धावपळ होते माझ्या एकटीची!"

'प्रितीपण एक धबधबा आहे. बोलायला लागली की सुसाट एकटीच बोलत सुटेल. तिचीपण बिचारीची तारांबळ उडते. गुणी आहे पण पोर. जास्तीत जास्त जमेल तितकं करायचा प्रयत्न करते. आणि काय काय सांभाळेल ती तरी? घरची कामं, ऑफीसचं टेन्शन, माऊची शाळा आणि पुन्हा कोणाची मदत नाही. अनू होती तोपर्यंत ठीक होतं. अनिकेतलाच काय आपल्यालातरी कुठे येते इकडची काडी तिकडे करता? अनूने खरंच लाडावून ठेवलेय आम्हा दोघांना. एकदा तर वैतागून बोललीही होती अनू " खुश्शाल करा हं दुसरीशी लग्न! सगळी कामं स्वतःची स्वतःला करावी लागतील तेव्हा समजेल. आई बरोबर बोलायच्या. माझंच चुकलं, फार लाडावून ठेवलेय मी तुम्हाला. मी गेले की आपोआप शिकाल स्वतःची कामं करायला!"

'फार दुष्टपणा करायची अनू! माहीत होतं नं माझा वीक पॉईंट काय आहे ते! तिच्याशिवाय जगण्याचा तर मी विचारही करू शकत नव्हतो. आपसूक डोळ्यांत पाणी यायचं तेव्हाही.'
"काय झालं नाकाच्या सुरनळ्या वाजवायला? जरा काही बोलायला नको. मला किती ऐकवत असता दिवसभर? मी पण रडू का मुळूमुळू? आणि ते नाक पुसलेले हात सोफ्याला नका पुसू! रूमाल नाहीये?"
'काय झालंय आपल्याला? का तिचा आवाज सतत कानात घुमतोय? आजकाल आधीपेक्षाही जास्तच हळवं झालोय का आपण? अनू, कसा राहू गं तुझ्याशिवाय? कधी विचारच नव्हता गं केला.' समोरचं सँडविच चिवडत अण्णांनी हताशपणे मान हलवली.


'उपमा! अनूच्या हातचा उपमा तर उडप्याच्या हॉटेलातही मिळायचा नाही. साजूक तुपात खमंग भाजलेल्या, झणझणीत मिरची, हिंग, कडीपत्ता, जिर्‍याची फोडणी मारलेला, टोमॅटोचा गुलाबी रंग चढलेला लुसलुशीत उपमा! वर तळलेल्या शेंगदाण्यांची आणि बारीक शेव, कोथिंबीरीची पखरण! आहा, काय स्वर्गीय सुख होतं ते!' एक हताश उसासा आपसूक तोंडातून निसटला. समोरचा चहा ही निवला होता एव्हाना.
'गारढोण चहा पोटात ढकलावा लागणार बहुतेक. फार कंटाळा आलाय चहा गरम करून घ्यायचा.' एक दीर्घ सुस्कारा सोडून अण्णा खिडकीतून बाहेर पाहायला लागले.

बाहेर पेरूचं एक डेरेदार झाड होतं. पेरू खायला रोज वेगवेगळी पाखरं यायची. 'अनूला कचकचीत अर्धे कच्चे पेरू खूप आवडायचे. अरूंधतीच्या वेळेला तिला पेरूचेच डोहाळे लागलेले. पोपटांनी उष्टावलेले पेरू शोधून शोधून काढायला लावायची. तेव्हा त्या गर्द पर्णराजींतून पेरू चटकन सापडतच नसे. आताशा पानगळ सुरू झाली होती. शिशिर ऋतूच मोठा जीवघेणा! पानगळतीने अधिकच विदीर्ण, एकाकी करणारा!! या झाडाला समजेल का ही पानगळती? एकेकाळी रसरशीत फळांचं नी गिच्च हिरव्या पर्णराजींचं वैभव मिरवणार्‍या पर्णहीन वृक्षाकडे आता ही पाखरे पाठ फिरवतील. त्या अकाली वठलेल्या वृक्षाला हा जीवघेणा एकाकीपणा सहन होईल?'

'अं... बेल वाजली वाटते. पोळ्या लाटणार्‍या बाई आल्या असतील. वातड असतात त्या पोळ्या. पीठपण जास्त लावलेलं असतं. प्रितीला सांगावं का? हल्ली चावता येत नाहेत त्या पोळ्या- मला आपला डाळ भातच करत जा म्हणून! अनूच्या हातच्या मऊसूत पोळ्या फार आठवतायंत. ती एक गंमतच होती म्हणा. लग्नानंतर कुठे काय जमायचं अनूला स्वयंपाकाचं विशेष? पोळ्या तर असे एकेक नकाशे करून ठेवायची, हरे राम!' अण्णा त्या आठवणींनी स्वतःशीच खुदखुदले.

'जाम खेचायचो आपण त्यावरून- "भारतातले नकाशे संपले वाटते आता. अरे वा! विदेशी नकाशे चालू केले? छान! प्रगती होतेय! चांगलंय!"

पण अनू मात्र मोठी जिद्दीची! महीनाभरातच नकाशे जाऊन पृथ्वीसारख्या गोल, छान मऊसूत पोळ्या करायला शिकली. खवय्यी तर होतीच ती, त्यामुळे नवनवीन पदार्थ करून पाहायचा कोण उत्साह! पण एकदम मूडी होता कारभार! कधी कशावरून बाईसाहेबांचं बिनसेल सांगू शकणार नाही. चायनीज आणि त्यातल्या त्यात नॉनव्हेज डिशेस आपले टेस्टींग बड्स चाळवणारं. अनूचा आणि चायनीजचा मात्र छत्तीसचा आकडा! तरी बिचारीने आपल्या एका वाढदिवसाला कौतुकाने चायनीजचा घाट घातला होता. घाट कसला - हाSS पसारा! वेज मंचुरियन चायनीज! आणि मग तो प्रयत्न फसल्यावर मंचुरियन बॉल्सचे मस्तपैकी मंचुरियन थालिपीठ विथ करी करून टाकलं. वर ठस्क्यात सांगून टाकलं पिंक ड्रॅगनवाल्याला नवी रेसिपी देऊन याचं पेटंट घेणारेय! मी आणि अनिकेतने चेष्टा केल्यावर रूसून बसलेली. आणि मग समजूत काढता काढता माझी पुरेवाट! ह्म्म नंतर बाईसाहेबांनीच कधीतरी रंगात येऊन स्वतःला मनवण्याचा उपाय सांगितलेला - मिडलक्लास बायकोला नवर्‍याकडून फार काही नको असतं. एखादं आईसक्रीम, मोगर्‍याचा गजरा, कौतुकाचा कटाक्ष आणि प्रेमभरले चार शब्द! आठवणीने बायकोचा वाढदिवस लक्षात ठेऊन सरप्राईज गिफ्ट म्हणून साधीशी साडीसुद्धा चालते हो! बस्स! खरंच बस्स? एवढंच? आपण उगाच त्यांना कॉम्प्लीकेटेड समजतो. '

'माझी अनू खूप साधी होती. काही अपेक्षा नव्हत्या तिच्या. असेल त्यात समाधान मानायची. साधे साधे छोटे छोटे हट्ट. तेदेखील पुरे व्हावेतच असा अट्टाहास नाही. फार हौशी! पण मुलं झाल्यापासून कधी तिला तिला साधं दोन तासांवरच्या हिलस्टेशनला फिरायला घेऊन जाऊ शकलो नाही. पोरांच्या शाळा, आजारपणं, कसल्या कसल्या स्पर्धा परीक्षा, आईचं आजारपण, माझ्या ऑफीस टूर्स! तिची हौस राहूनच गेली असेल. बोलूनच दाखवलं नाही कधी... की आपणच विचारलं नाही?'

"अण्णा, जेवण गरम केलेय. वाढू का आत्ता?" पोळीवाल्या बाईंच्या किनर्‍या हाकेने अण्णांची तंद्री तुटली.
"अरे बापरे! एकवेळ बायकोला समजून घेणे एवढं कॉम्प्लीकेटेड नसेल पण हे जेवण घशाखाली ढकलणं म्हणजेSSS... चला श्रीनिवासराव, आलिया भोगासी..." असं पुटपुटत अण्णा डायनिंग टेबलाकडे वळले.
'दुपारच्या गोळ्याही घ्यायच्यात अजून. जेवल्यावर लवंडावं जरासं!' रिटायर झाल्यानंतर सकाळचा मस्त चहा नी भरपेट नाश्टा, सोबतीला पेपरच्या बातम्या, दुपारी अनूच्या हातचं गरम गरम जेवण जेऊन तृप्त व्हावं नी सुस्त होऊन अख्खी दुपार वामकुक्षीचं स्वर्गसुख अनुभवावं बस्स एवढाच होता त्यांचा दिनक्रम.

जेमतेम पाऊण पोळी खाऊन अण्णांनी बाकीचं आवरून ठेवलं. बाई मगाशीच गेलेल्या. अंथरूणावर पाठ टेकली, पण डोळा काही लागेना. ह्या कुशीवरून त्या कुशीवर अस्वस्थपणे हालचाल करून झाली, पण छे! अनूच्या आठवणी काही पिच्छा सोडायला तयारच नव्हत्या. खरंतर तिच्या आठवणीसुद्धा तिच्यासारख्याच -हव्याहव्याशा, सुखद! पण जीवघेण्या!! विरहाची, एकटेपणाची प्रकर्षाने आठवण करून देणार्‍या!

'कुंकवाचा धनी जेव्हा एकटाच पुढे निघून जातो तेव्हा त्या बाईचं अस्तीत्व संपलं, तिचा आधार गेला म्हणून सगळे हळहळतात. पण खरं तर ती बाई स्वतः फार लवकर सावरते. दु:ख तर होतंच- एवढ्या वर्षांच्या सहवासानंतरच्या विरहाचं; पण बाई संसारात, मुलाबाळांत, नातवंडांत मन रमवते. तिची ती नाळ कायम असल्यामुळे की काय, पण हा जीवघेणा एकटेपणा तिला त्यामानाने कमी जाणवत असावा. संसाराच्या धबगड्यात स्वतःच्या छंदांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता ती काहीशी मोकळी होते, स्वतःसाठी पुरेसा वेळ देऊ शकते. वाचन, देवपूजा, मैत्रीणी वगैरे! पण एखादा पुरूष त्याच्या बायकोच्या विरहाने किती एकटा पडतो, असहाय होतो याची कल्पना फक्त तोच करू शकतो. नोकरीच्या निमित्ताने तसं बायको संसाराच्या धबगड्यापासून अलिप्तच ठेवते, त्यातून अनूसारखी सगळं हातात नी बोटात ठेवणारी बायको असेल तर मग काय विचारायलाच नको!'

'अनू, अनिकेत गुणी आहे गं आणि आपली प्रितीसुद्धा! खूप काळजी घेतात गं माझी! घरातील सणवार, रात्रीच्या एकत्र जेवणाच्या वेळच्या गप्पा, माझी औषधं - धावपळीच्या आयुष्यातही जमेल तितकं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मागच्या वाढदिवसाला दोघं मला आग्रहाने नाटकाला घेऊन गेलेले. आपली अरू आणि जावईही येतात वर्षा-दोन वर्षातून भारतात! त्यांच्याही तिथल्या नोकर्‍या-प्रोजेक्ट्स! काय काय छान आणते अरू तिथून. मागच्या वेळेस येताना मस्त क्रीम कलरचा पोलो नेकचा टी शर्ट घेऊन आलेली. छान दिसतो हो मला! आणि आपली माऊ - तुझी "पालवी". फार लाडाने ठेवलेलंस ना तिचं नाव? तू आम्हाला सोडून गेलीस तेव्हा फारतर चार्-पाच महीन्यांची असेल ती! अगदी गोंडस गोडंबा आहे गं! अगदी तुझी कार्बनकॉपी! ठमाबाई अगदी तुझ्यासारखी नाक उडवत ऑर्डरी सोडत असते बरं! आणि सगळा जोर, सगळे हट्ट माझ्याकडेच! तसं सगळं आलबेल आहे गं अनू, पण - का कुणास ठाऊक मन कशात रमतच नाही बघ. सारखं तुझ्या आठवणींच्या जंगलात पळू पाहतं. घायाळ होतं, कळवळतं पण फिरून पुन्हा तुझ्याच विरहाच्या कोषात अडकून राहू पाहतं.


त्या चंगोच्या चारोळी सारखं -
'माझ्या प्रत्येक क्षणात तुझा वाटा अर्धा आहे,
भूतकाळ आठवायचा तर तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे!'


'अनू, तू माझं अस्तीत्व होतीस. माझं सर्वस्व! मी कधी विचारसुद्धा केला नव्हता की तुझ्याशिवाय जगण्याची वेळ माझ्यावर आली तर मी काय करेन. मुळात तुझ्याशिवाय कधीकाळी रहावं लागेल हाच विचार कधी माझ्या मनाला शिवला नव्हता. मला खात्री होती - आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्यावर इमानेइतबारे तू त्या पाळशीलच! का इतकी सवय लावलीस तुझ्या सहवासाची की तुझ्या सोबतीची गरज भासावी?'

"ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे
तरी मन तुझी वाट पाहणं सोडत नाही
मी ही म्हणतो जाऊ दे
मी त्याचं मन मोडत नाही..."


'पुन्हा चंद्रशेखर गोखलेची चारोळी!! या चारोळ्या मला तुझ्या आठवणींत रमवण्यासाठी आहेत की आठवणींनी मारण्यासाठी? छे! इतक्या कश्याकाय रिलेट होताहेत माझ्या मनःस्थितीला? सोबत करताहेत माझ्या उदास एकटेपणाला... गोंजारून अधिकच गडद जीवघेण्या करताहेत तुझ्या आठवणींना!!!'

'छे! आता कसली झोप येतेय!' अण्णा अस्वस्थपणे धडपडत उठले. अस्वस्थपणे दोनचार येरझार्‍या घातल्यावर ड्रॉवरमधून अलगद डयरी बाहेर काढली. अनूनेच गिफ्ट दिलेली. नेहमी तक्रार करायची,"तुम्ही मनमोकळेपणानी काही बोलत नाहीत. सगळ्या गोष्टी मनातच ठेवता नेहमी." आणि मग नवीन वर्षाचा संकल्प सोडायला लावला,"मनात जे काही येतं ते लिहून तरी ठेवत जा." अण्णांनी हळूवारपणे त्या डायरीवरून हात फिरवला. डायरीचे काही पानं हलकेच उलटली. भूतकाळाची पानेही अलवारपणे उलगडली गेली. मनातलं विशेष काही लिहीलंच गेलं नव्हतं. काही आवडणार्‍या चारोळ्या, कविता आठवतील तशा, जमतील तशा!

"कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी;
ती साथ गमावण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यांतून अश्रूंची सर ओघळावी..."



त्या वळणदार अक्षरांना अलगद कुरवाळताना अश्रूंची सर खळकन ओघळलीच आणि मग उमाळ्यांमागून उमाळे! अण्णा गदगदून हुंदके देऊ लागले. 'साथ गमावण्याची भीती? मी ती भीती मूर्तीमंत अनुभवतोय गं अनू!' अण्णांनी कळवळून साद घातली. काही काळ तसेच निशब्द बसून राहीले. ओघळलेले अश्रू पुसायचेही भान राहीले नव्हते. दु:खाचा उमाळा ओसरल्याव्र डायरीची आणखी काही पाने उलटली.
"तू गेल्यावर वाटतं, खूपसं सांगायचं होतं;
तू खूपसं दिलंस तरी आणखी मागायचं होतं..."


'अनू, तू खरंच खूप भरभरून दिलंस मला आयुष्यात. अनिकेत आणि अरूंधतीसारखी गुणी मुलं, एक सुखी समाधानी संसार, प्रेमळ उबदार सहवास, खंबीर आधार - आणि न मागता दिलास तो नकोसा विरह! परत ये अनू, खरंच परत ये. तुझा श्री एकटा आहे गं! आपल्या माणसांच्या गर्दीतही तुझ्या आठवणी पोरक्या करतात गं मला.'

दाराची कडी वाजली तशी अण्णांची विचारशृंखला पुन्हा खंडीत झाली. 'अरे बापरे! किती वाजले? केव्हापासून असाच बसून आहे. दुपारच्या गोळ्याही राहील्या घ्यायच्या. आत्ता कोण असेल बरं?' डायरी घाईघाईने ड्रॉवरमध्ये ढकलून अण्णांनी आपला मोर्चा हॉलमध्ये वळवला. कडी वाजवणार्‍याला धीर नव्हता. "अरे हो आलो आलोSS" अण्णा दार उघडतात न उघडतात तोच वावटळ - अक्षरशः वावटळ घरात घुसली! "अगं अगं, माऊ, पडशील गं पोरी!"
"आज्जोSS" करून ते गोडूलं गळ्यात पडलं तसे मगासचे सर्व नैराश्यवादी विचार जणू वितळून गेले त्या रेशमी उबदार मिठीत!
'ह्म्म! बाईसाहेबांचा मूड जास्तच छान दिसतोय - आज्जो बिज्जो म्हणताहेत मॅडम! स्कूलमधल्या गमतीजमती ऐकवण्यासाठी हक्काचा माणूस हवा असणार! 'माहीतेय अण्णा, आज किनई आमच्या मिसने अमूक अमूक सांगितलं' किंवा 'ती सायली माहीतेय फार भाव खाते फर्स्ट प्राईझ मिळाल्यापासून!' नाहीतर मग 'पार्थच्या पप्पांची ट्रान्सफर झाली ना, आता तो जाणारेय आमचं स्कूल सोडून!' असंच काही बाही... सगळी गोडूली गुपितं आणि तिचे टप्पोरे पाणीदार डोळे मोठ्ठे मोठ्ठे करत हातवारे करत सांगण्याची मजेदार खूबी - सगळंच खूप खूप लाघवी असे.

"चला पिल्लू, आधी फ्रेश व्हा, जेऊन घ्या पटदिशी.. मग पोटभर गप्पा! काय?" अण्णांनी तिचा युनिफॉर्म बदलत म्हटलं.
"शीSS मला कंटाळा आलाय त्या पावडर गंध वाल्या पोळ्यांचा!" माऊ कुरकुरली.
"काय! पावडर गंध्?"अण्णांनी हसतच विचारलं.
"तर काय? पिठाने भरलेल्या नी काळे काळे डाग असलेल्या! तुम्ही कसे खाता त्या पोळ्या? कंटाळा नाही येत? अम्म त्यापेक्षा मला बोर्नव्हिटा चालेल आज!" हातपाय धुवत माऊने ऑर्डर कम सूचना केली.
अण्णांनी थोडं बटर लावून पोळी शेकवली. त्यावर मटकीच्या उसळीचं सारण लावून वर थोडंसं टोमॅटो केचप लावलं, वर चीज किसून टाकलं. त्या पोळीचा रोल आणि बोर्नव्हिटाचा ग्लास पुढ्यात ठेवत माऊची गंमतीदार किलबील ऐकायला ते सज्ज झाले.
............................................................................................................................................................



"अरे या झाडाला कीड लागलेय की काय? नाहीतर पेरूचं झाड इतकं शुष्क निष्पर्ण नाही होत सहसा! बारमाही फळ ते!" खिडकीतून बाहेर बघत अण्णा पुटपुटले.
"कुणास ठाऊक! पानगळ चालू आहे नं? बरं तुम्ही नाश्ता करून घ्या अण्णा. मी आज मस्त कांदापोहे केलेत बरं तुम्हाला आवडतात तसे. भरपूर ओलं खोबरं कोथिंबीर घालून! शेव हवेय का वरून?" प्रितीने नाश्त्याची बशी नी चहाचा कप टेबलावर ठेवत विचारले.
अण्णा स्वतःच्याच विचारात हरवलेले. एवढ्यात मांडीवर उबदार बोचकं धप्पदिशी पडलं.
"अगं माऊ, उठलीस का? आणि आवरायचं नाहीये का गं?" तिचं अपरं नाक बोटांच्या चिमटीत पकडत अण्णा बोलले.
"हे हो काय अण्णा, विसरलात? आज सॅटर्डे! आमच्या स्कूलला आज बुट्टी!"
"अच्छा बुट्टी तर बुट्टी! मग काय आहे बरं बाईसाहेबांचा आजचा प्लॅन?"
"आत्ताच तर स्कूल चालू झालेय. यावेळची सुट्टी कसली बोर गेली ना. बाबाला वेळच नव्हता. बाहेर कुठ्ठेच नाही घेऊन गेला" गाल फुगवत रूसक्या स्वरात बाईसाहेब कुरकुरल्या. "अम्म, तसा प्लॅनबिन काहीच नाहीये आत्ता! आपण थोडावेळ खिड्कीत बसूयात."
"माऊSS, ब्रश करून ये, पोहे देते तुला." आईच्या हाकेकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत पिल्लू अण्णांच्या हातावरच्या सुरकुत्या चिवडत बसली.

"अण्णा काय हो बघताय एवढावेळ त्या झाडाकडे?" हातांच्या चिमुकल्या घडीवर कलती मान ठेवत तिनं विचारलं.
"काही नाही गं पोरी, एवढा तगडा, कालपरवापर्यंत मस्त लगडलेला वृक्ष पार वठून गेलाय गं!" अण्णा थोडं स्वतःशी थोडं माऊशी बोलल्यासारखं पुटपुटले.
"ह्म्म आत्ता त्याच्याकडे पेरू नाहीयेत ना, मग पक्षी येत नाहीत खाऊ खायला. त्याला कित्ती एकटं एकटं वाटत असेल ना?" कोपरं खिडकीच्या कठड्यावर टेकवून चिमुकल्या हातांच्या ओंजळीत निरागस चेहरा जमेल तितका गंभीर करून माऊ पुटपुटली.
अण्णांनी चमकून तिच्याकडे पाहीलं, 'पोरगी कधी कधी वयाला शोभणार नाही अशी बोलते चुरूचुरू!'
"खरंय गं पोरी! म्हातारा झालाय तो वृक्ष!!"
"हॅ! आता थंडी संपली की मग पाऊस येईल. मग पाऊस पडला की थोड्या दिवसांनी पुन्हा त्याला पेरू येतील. ते पेरू खायला खूप सारे पक्षी येतील. आम्ही पण जाऊ पेरू काढायला. मग त्याला नाही एकटं वाटायचं. मग ते झाड पुन्हा तरूण होईलच ना..." हातवारे करत माऊ चिवचिवली.

अण्णा काही बोलायच्या आत अचानक एका जोराच्या थंड झुळकीसरशी धुळीचा लोट उठला आणि खिडकीची तावदानं झपकन आपटली. उडालेल्या धुळीबरोबरच गळालेली वाळकी पानंही उडाली आणि वाहत्या वार्‍याच्या झोतासोबत असहायपणे उडू लागली.
"आज्जो, वादळ झालं, वादळ झालं!" माऊ टाळ्या पिटत उड्या मारू लागली.
"अगं वादळ नव्हे ते; वावटळ आहे ती! चल आत हो बरं"
"म्हंजे?"
"वावटळ म्हणजे पाऊस पडायच्या आधी छोटूसं वादळ येतं आता पाऊस सुरू होणारेय ते सांगायला. पावसाच्या आगमनाची वर्दी द्यायला... पण पाऊस आत्ता असा अवेळी?? पावसाळा तर तसा कोरडाच गेला... यंदा खुप उशीर केलेला बेट्यानं...!!! जून सुरू झाला तरी पत्ता नव्हता... आणि आला तरी दोन दिवस पडून चार दिवस दडी!! आणि आता थंडीत कुठला पाऊस???" पावसाळ्यातील अनुच्या ओलेत्या जीवघेण्या आठवणींच्या काजळ ढगांनी पुन्हा गर्दी करायला सुरूवात केली. "बोका म्हणायची अनू मला... तीला पाऊस खूप आवडायचा... मला मात्र फारसं आवडत नसे भिजायला..."
"अय्या कसली मज्जा! आत्ता पुन्हा पाऊस येणार, मग मी माझी फुलाफुलांची छत्री घेऊन स्कूलमध्ये जाणार. आज्जो, तुम्हाला माहीतेय, आमच्या स्कूलजवळ किनई मोठ्ठा खड्डा आहे. त्यात आता पाणी साठलं की मी खूप होड्या सोडणार त्यात. " बाईसाहेब पळाल्या देखील होड्यांसाठी कागदं फाडायला.
"अग्गं माऊ पावसाळा सुरू नाही झालाय बेटा..." अण्णांची हाक विरायच्या आत माऊ पसार झालेली.
'अगदी आजीवर गेलेय! अनूलाही पाऊस म्हणजे जीव की प्राण! याच खिडकीत बसायची बाहेरच्या पावसाचे थेंब अलगद झेलत. माझी पावसाची व्याख्या म्हणजे कोबी नी कांद्याची कुरकुरीत खमंग भजी, आल्याचा वाफाळता चहा आणि बाहेरच्या पावसाचा सुखद गारवा! बाहेरचा पाऊस घरातूनच अनुभवावासा वाटायचा. कळत नाहीये थंडीत हा अवेळी असा पाऊस का पडतोय? अनुच्या आठवणींना हाताशी धरत.... शिशिरातली कोरडी हाड्म गोठवणारी थंडी आणि आता हा अवेळी पाऊस!!  ओह्ह्ह!! हा पाऊस मला कधीच आवडला नाही... कधीच नाही!!!'

' मुलांचं जग किती निरागस असतं तो तो क्षण त्या त्या वेळेस आससून उपभोगणारं आणि मुख्य म्हणजे तो बदल आहे तसा आहे तेव्हा स्वीकारणारं... त्यांना कुठे असले निरर्थक प्रश्न पडतात... आत्ताच का पाऊस? पुन्हा का पाऊस? थंडीत का पाऊस? त्यांना पडणारे प्रश्नही किती निरागस!! पुन्हा त्यांची समाधानकारक उत्तरं मिळण्याचा अट्टाहासही नाही त्यात! बस्स मनात आलं विचारून मोकळं झालं... तो क्षण सरला... विसरलं. मग ते दु:ख असो, आनंद असो, जखम असो, भांडण असो, आईचा धपाटा असो, गाल फुगवण्याइतपत, कोपर्‍यात गप्प बसून राहण्याइतपत आलेला राग असो... तो क्षण महत्वाचा तो आहे तसा स्वीकारायचा, जगायचा, उपभोगायला मिळाला आनंदाने जगायचा नाहीतर असाच जाऊ द्यायचा. त्याचा फार काळ शोक नाही की खंत नाही. झोपेत मग कधी तो जगलेला क्षण आठवून निरागस हसायचं. तेव्हा पुन्हा एकदा जगायचा हवाहवासा तो क्षण.'

बाहेरच्या वावटळीने एव्हाना चांगलाच जोर धरला होता. धुळीचा जाड पडदा तयार झाला. आपटणार्‍या खिडक्यांची तावदाने घट्ट लावून घेत अण्णा आरामखूर्चीत विसावले. भूतकाळाचे काळे ढग सवयीने जोर धरू लागले. "कुंद हवेचं मळभाशी काय सख्य असते कुणास ठाऊक! मनामध्येही भूतकाळातील आठवणींचे मळभ दाटून येते. फार अस्वस्थ करतो हा पाऊस! म्हणूनच आपल्याला तो कधी कांदाभजीपलिकडे फारसा आवडलाच नाही."

आपसूक हात डायरीकडे वळला. पानं पुढे उलटली गेली तसा जीवनपट मागे उलगडू लागला. अचानक एका चारोळीपाशी येऊन आतूर डोळे थबकले,

 "  सगळीच वादळं मी खिडकीत बसून पाहीली;
पण परवाच्या वादळात माझी खिडकीच वाहीली...
"


सगळे क्षण तिथल्या तिथे गोठल्यासारखे झाले. या चारोळीचा आज नव्याने संदर्भ सापडला- अगदी गर्भीतार्थासह!
'हक्काच्या खिडकीत बसून बाहेरची वादळं नेहमीच सुरक्षित भासतात. ती खिडकी तुम्हाला बाहेरच्या प्रत्येक वादळापासून सुरक्षित अंतरावर ठेवते, अलिप्त ठेवते. त्या एवढ्याशा खिडकीचा तेव्हा केवढा वाटतो, हे तेव्हा समजतही नाही. पण समजा, तुमचा तो आधारच हरवला तर? अनू माझ्या आधाराची खिडकी होती, मला प्रत्येक वादळापासून अलिप्त, सुरक्षित ठेवणारी! हक्काची कदाचित म्हणूनच प्रत्येक वेळेस गृहीत धरली जाणारी! आता तो आधारच निखळलाय म्हटल्यावर...
आहे आपल्यात हिंमत, प्रत्येक वादळाबरोबर समर्थपणे सामना करण्याची? की वार्‍याच्या झंझावाती झोताबरोबर असहायपणे फरफटलं जाईल आपलं पाचोळ्यासारखं विकलांग मन?'

मानसिक ताणामुळे अण्णांनी डोळे क्षणभर मिटून घेतले. खमंग पोह्यांवरची इच्छा केव्हाच उडून गेली होती. 'प्रितीने बिचारीने किती खपून केले होते! पण अनूच्या आठवणींनी जोर धरला की मन त्या झंझावातात पाचोळ्यासारखं हरवून जातं; बाकी कशाचं भानच राहत नाही.'

'चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्या नेहमीच आमच्या नात्यामधला दुवा होता. अरूंधतीने आमच्या मॅरेज अ‍ॅनिवर्सरीला दिलेली छोटीशी गिफ्ट! तसं आमचं नातं आधीपासूनच समजूतदार होतंच (अर्थात तेही अनुच्याच समजूतदारपणामुळे!) पण 'मी माझा' तल्या प्रत्येक चारोळीमध्ये आमच्या नात्याचे संदर्भ नव्याने सापडत गेले, त्या चारोळीच्या नव्या अर्थासह! प्रत्येक लटक्या भांडणानंतर एकमेकाला सॉरी बोलताना वाचून दाखवलेल्या प्रत्येक चारोळीमुळे आम्ही दोघं एकमेकांना नव्याने समजत गेलो. मग ती चारोळी डायरीतल्या पानांवर विराजमान होऊ लागली, नव्याने सापडलेल्या संदर्भा-अर्थासह! मस्करीने म्हणालोदेखील... "अरू, तुझ्या या चंगो ने आधी लिहीलं असतं हे पुस्तक तर तेव्हा भांडणांनंतर तुझ्या आईची समजूत काढणं फार सोप्पं गेलं असतं गं :)" दिवसागणिक आमचं नातं अधिकाधिक समृद्ध होत गेलं. (मी खर्‍या अर्थाने अनुला समजून घेऊ लागलो होतो का? कुणास ठाऊक...) इतकं की - एकमेकांच्या सोबतीची, सहवासाची नुसती सवयच झाली नाही तर गरज भासू लागली. म्हणूनच आज असं अपूर्ण रितं रितं वाटतंय; तिच्याशिवायचं आयुष्य - व्यर्थ, नीरस, निरर्थक! सर्व काही असूनही!!
"  तुला वजा केल्यावर बाकी काही उरत नाही;
तुझ्यशिवाय आयुष्य, मी आयुष्यच धरत नाही..."


अनूच्या प्रत्येक आठवणीसोबत चंगोच्या चारोळ्यांची पारायणं होत होती. प्रत्येक चारोळीतल्या अर्थासह अनू नव्याने सापडत होती, समजत होती....
बाहेरची वावटळ एव्हाना काहीशी मंदावली होती. आचानक वळवाचा पाऊस सुरू झाला. थंडी असूनही हवेत सुखद गारवा आणि उर भरून घ्यावा असा धुंद मृद्गंध पसरला. मगासच्या दु:खद उमाळ्यांचं मळभही पांगलं. अण्णा काहीसे सैलावले. भूतकाळातल्या सुखद आठवणींच्या पागोळ्या वेचू लागले.

...........................................................................................................................................................


बदललेल्या हवामानामुळे गेले काही दिवस अंगात थोडी कणकण जाणवत होती... पेज पिऊन तोंडाची चवही गेली होती. थोडा अशक्तपणा जाणवत होता. प्रिती आणि अनिकेत काळजी घेत होतेच पण आजारपणात अगदी जवळची व्यक्ती कपाळावरून फक्त हात फिरवत शेजारी बसून राहावी या विचारानेही अंगात धुगधुगी येते असं काहीसं अण्णांना वाटत होतं आज. अंथरूणावर नुसतं पडून पडूनही कंटाळा आलेला. हळूवारपणे उठून टेबलाचा आधार घेत हळू हळू ते खिडकीजवळ आले. हवेतल्या गारठ्यामुळे खिडकी काही दिवस बंदच होती. पण का कुणास ठाऊक, आज तो गारठा अंगावर पांघरायची अतीव इच्छा होत होती. थरथरत्या हातानं त्यांनी खिडकीची तावदानं अलगद ढकलली. थंडगार हवेचा एक चुकार झोत आतला उबदारपणा घुसळून काढत झपकन खोलीत शिरला. अंगातल्या कणकणीमुळे थोडासा शहारा आला पण का कुणास ठाऊक तो गारवा तनामनाला शांत करणारा हवाहवासा वाटला. आज थोडं हलकं हलकं वाटत होतं. कुठलेही निरूत्साही विचार पिंगा घालत नव्हते.

गेले काही दिवस पडून पडून विचार करायला पुरेसा वेळ मिळाला होता. 'सगळं आलबेल असूनही आपल्याला हे सुख का बोचतंय?' हा प्रश्न स्वतःच्या मनाला वारंवार विचारला. समाधानकारक उत्तर मिळालं नव्हतं अजूनही पण कुठंतरी काहीतरी चुकतंय ही जाणीव होत होती.

खरं पाहता सगळं आलबेल होतं... अनिकेत, प्रीती आजारपणापासून जरा जास्तच काळजी घेत होते. प्रितीने तर तीनचार दिवस ऑफीसला सुट्टीच टाकली होती. दुपारचं गरमागरम जेवण पोटात जात होतं. रात्री कधीमधी अनिकेत ऑफीसातून येताना नाटकांच्या डिव्हीडीज घेऊन यायचा. 'दिवसभर पडून असता... म्हणून म्हटलं तेवढाच विरंगुळा' असं म्हणत...!!
'खरंच अनू अपराधी वाटतं गं... पोरं जमेल तसं करताहेत पण हे कसलं सुख बोचतंय? अनिकेत-प्रिती ला काय वाटत असेल गं की इतकी मनापासून काळजी घेऊनही अण्णा परक्यासारखं करतात... छे!! खरंच कळत नाहीये गं ही उदासी का घेरून राहीलीये!! "आपल्या माणसाचं जाणं" इतकी विरक्ती आणू शकतं का गं की आपल्या आसपासच्या, आपली काळजी घेण्यासाठी मनापासून झटणार्‍या, जित्याजागत्या इतर "आपल्या माणसांकडे" आपलं इतकं दुर्लक्ष व्हावं!! सतत आपलं स्वतःच्या कोशात नी कोशात! स्वतःच्याच स्वतःपुरत्या विचारांच्या धाग्यात सुरवंटासारखं गुरफटून... इतकं की बाहेरच्या जगाची पर्वाही नसावी...

...........................................................................................................................................................'दिवस कापरासारखे भुरूभुरू उडून गेले... शिशिरानं कूस बदलली... वसंतानं जादूची कांडी फिरवली... पण ग्रीष्माची चटकेदार धगच व्यापून राहीलेय... हल्ली पडूनच असतो बर्‍याच वेळेस आपल्या खोलीत. नाही जावंसं वाटत बाहेर... कोपर्‍यातल्या वळणावर जिथे आपण रोज संध्याकाळी पाय मोकळे करायला जायचो... माऊ नी मी जायचो अधे मधे... हल्ली तर ते ही बंद केलंय.
बाकी सगळ्यांचं मात्र आपापलं रूटीन चालू आहे. नित्यनेमाने अनिकेत, प्रितीचं ऑफीस, माझं खाणं -पिणं औषधं... बाईच्या पावडरगंधवाल्या थंड सुस्तावलेल्या पोळ्या... माऊची अखंड चिवचिव, तिच्या निरागस गप्पा, तिचं थेट तुझ्यासारखं अपरं नाक उडवत माझ्यावर हक्क दाखवत ऑर्डर सोडणं, आणि हल्लीच तिचे कसले सुरू झालेले ड्रॉईंगचे नी आर्टचे क्लासेस... घरभर नुसते चित्रांनी भरलेल्या रंगीबेरंगी नी हस्तकलेच्या कागदांची गर्दी... अगदी तुझ्यासारखं जिभेचं टोक बाहेर काढत तल्लीनपणे कातरकाम!! रात्रीच्या जेवणाच्यावेळी सगळ्यांचा एकत्र हास्य कलकलाट.. तरीपण मी आपला तिथेच आहे का गं अनू? तिथेच अगदी त्याच क्षणाला ओठंगून उभा, जिथे तू मला एकटं सोडून गेली होतीस?'

तुला माहीतेय, तू गेल्यापासून तसं म्हटलं तर माऊची बडबड आणि खिडकीबाहेर पाहणं हेच खर्‍या अर्थानं विरंगुळे! अम्म नाही खरं तर तसं म्हटलं तर एकमेव विरंगुळा म्हणजे तुझ्या आठवणींचा मध घोळवणं... मन एका मधाच्या पोळ्यासारखं झालंय... तुझ्या आठवणींच्या मधमाश्या अखंड गुंजारव करत भुणभुणत असतात अवतीभवती... आपल्या नात्यातील मुरलेल्या लाघवी क्षणांची भरती करत... आता ते तुडूंब भरून टपटपू लागलंय!!! त्या गोडमिट्टपणाचाही अखंड सहवास जीवघेणा वाटू लागलाय... तुझ्या मधाळ आठवणी, हव्याशा तरी नकोश्या!!! का असं होतंय?? मी त्या आठवणींमध्ये पार बुडतोय! कधी कधी तर फारच कासावीस होतं श्वास गुदमरतो... तरीही त्यातून बाहेर पडावसं वाटत नाहीये! हा कसला जीवघेणा अनामिक मोह? मी असलं काही बाही बोलू लागलो तर तू काहीच बोलायची नाहीस... (अर्थात मला स्वतःला कुठे समजायचं की मी काय बोलतोय नी मला काय सलतंय?) तू फक्त शेजारी बसायचीस, माझा हात घट्ट हातात धरून. निशब्द सोबत! 

"  गप्पच राहावसं वाटतं तुझ्याजवळ बसल्यावर
वाटतं तूच सगळं ओळखावं मी नुसतं हसल्यावर"   
                                                   -  इति गोखले अर्थातच!! कधी वाटतं माझ्या भावनाच हा शब्दबध्द करतो की काय!!

  ...........................................................................................................................................................

'बर्‍याच दिवसांनी खिडकीशी बसलोय. आज बर्‍याच दिवसांनी बाहेरचं जग पाहावसं वाटतंय... अनुभवावंसं वाटतंय... एवढे दिवस डायरीतल्या चारोळ्यांना आणि त्यांचा हात धरून हलकेच अवतरणार्‍या हृदयातल्या तुझ्या आठवणींना कुरवाळत बसलेलो... झाडापानांच्या बेचक्याबेचक्यांतून उबदार कोवळी हळदी उन्हं सांडलेत. उगीचच प्रसन्न वगैरे वाटतंय का आज? नेहमीसारखा एक दिवस... फक्त नव्याने उगवलेला... नव्याने उगवलेल्या पालवीसारखा... हिरव्याकोवळ्या आशा अन स्वप्नांची तजेलदार मखमल पांघरलेला!! पण आजचा हा आज आपल्यालाही खास वाटतोय हे वेगळेपण! रेंगाळणारा कंटाळा नाहीय की उदास कातर एकाकी आठवणींचं मोहोळ नाहीय... फक्त आज आणि आत्ता!! हवाहवासा हा क्षण पकडून ठेवायला हवा. ठेवता आला पाहीजे कायमसाठीच. निसटून देता कामा नये.'
नकळत नजर पेरूच्या झाडाकडे वळली. कीड लागून पूर्ण वठू लागलेल्या त्या झाडाच्या खोडाच्या बेचकीतून मखमली हिरवीपिवळी कोवळी पालवी डोकवायला लागलेली. पानगळ, कीड लागणे हे तर निसर्गानुरूप होतंच राहते पण काळ सरला, ऋतू बदलला की वठलेला वृक्षही मरगळ झटकून तग धरू लागतो. या मरू घातलेल्या वठलेल्या वृक्षाला कोवळे कोंब फुटताहेत - जगण्याच्या नव्या उमेदीचे! अण्णांचे डोळे आश्चर्याने आणि आनंदाने विस्फारले. अचानक - चंगोच्या चारोळीची जादुई कांडी सरकन डोक्यात फिरली,
"सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला एकदा पालवी फुटली
त्यालाच कळेना ही, जगायची जिद्द कुठली!!!"




अचानक त्यांच्या कमरेला रेशीममिठी जाणवली. माऊ नुकतीच झोपेतून उठून अण्णांच्या कमरेला लोंबकळलेली.
"काय करताय अण्णा?" झोपाळलेल्या आवाजात पिल्लू चिवचिवली.
"पालवी!" स्वतःच्याच नकळत अण्णा पुटपुटले.
'त्यात काय! आत्ता थोड्या दिवसांनी त्याला पुन्हा पेरू येतीलच ना? मग सगळे पक्षी तो खाऊ खायला परत येतीलच. मग ते झाड पुन्हा तरूण होईलच ना?' माऊचे आश्वासक उबदार शब्द पुन्हा एकदा कानात किणकिणल्याचा भास झाला.



माऊचं रेशमी गाठोडं अण्णांनी झपकन उचलून कडेवर घेतलं.
"आत्ता समजलं, तुझं नाव अनूने हौशीने 'पालवी' का ठेवलं ते! एवढे दिवस विसरूनच गेलेलो बघ. या वठलेल्या वृक्षाला जगण्याची आस लावण्याची ताकद तुझ्या संजीवनीत आहे पोरी!" अण्णा बेभानपणे बोलत सुटले होते...
"माझी अनू नव्या संजीवनीचं, नव्याने फुलण्याचं-बहरण्याचं देणं देऊन गेलीय तुझ्या रूपानं! आणि मी करंटा मात्र अजून भूतकाळातील पानगळीचा शोक करत पाचोळा चिवडत, स्वतःचं दु:ख कुरवाळत बसलोय. आपण फुलता फुलता अल्लद दुसर्‍याला फुलवावं हेच तर पालवीचं वैशिष्ट्य! अनू आयुष्यभर हा वसा जपत आली आणि आता मला तो जपला पाहीजे. मला जपलाच पाहीजे - माझ्या कुटूंबासाठी, माझ्या या छोट्या पालवीसाठी - माझ्या माऊसाठी आणि माझ्या... माझ्या अनुसाठी!" हसर्‍या, आनंदाश्रू चमकणार्‍या डोळ्यांनी माऊकडे पाहत भरलेल्या रूद्ध कंठाने अण्णा बोलतच राहीले...
माऊ काही न समजून डोळे मोठ्ठे करून निरागसपणे तिच्या आज्जोकडे बघत होती. एका वठलेल्या वृक्षाला नकळतपणे पालवी फुटली होती.


    ...................................................................समाप्त
...................................................................