हे ही दिवस जातील...!!!


हातातील टिफीनबॉक्स काहीश्या नाराजीने टेबलावर ठेवत त्याने स्वतःला सोफ्यावर भिरकावले...अस्ताव्यस्त... काही क्षण जमीनीकडे खिळून पाहत तो गप्प राहीला. पाण्याचा ग्लास पुढे केलेला त्याचा बायकोचा हात काही क्षणासाठी थबकला. कडेवरच्या पिल्लाने बाबाकडे झेप घेण्यासाठी चळवळ केली... एरवी दारातूनच आपल्याला घेण्यासाठी हात आणि हास्य रूंदावणार्‍या बाबाने आज आपल्याकडे पाहीलेही नाही... काही झालंय का? असा प्रश्न त्या न...िरागस पिल्लाला कुठून पडणार. बायकोने ओळखले... काहीतरी अघटीत घडलेय! ती पिल्लाला चुचकारू लागली. तिच्या बांगड्यांच्या किनकिनाटाने तो भानावर आला. काही क्षण पिल्लाकडे पाहून त्याने बायकोकडे नजर वळवली... हताशपणे पुटपुटला... कामावरून काढून टाकलं... इन्टिमेशनही न देता...!

"आता???" हा त्यालाही छळणारा प्रश्न अलगद तिच्याही डोक्यात शिरला... पण चटकन स्वतःला सावरत ती त्याच्याशेजारी बसली... बाबाकडे झेपावणार्‍या पिल्लाला एका हाताने सावरत तिने त्याच्या केसांतून ममत्वाने हलकेच हात फिरवला... इतका वेळ थोपवलेल्या भावनांचा कल्लोळ झंझावत बाहेर पडला... "असं कसं करू शकतात ते माझ्यासोबत! आणखी दहा-बाराजणांनाही कमी केलं. पण माझा आजवरचा रेकॉर्ड बघायचा...परफॉर्मन्स तरी लक्षात घ्यायचा. दिवस रात्र एक करून या कंपनीसाठी झटलो... तुझ्या प्रेगनन्सीच्या वेळी तुला माझी सर्वात जास्त गरज असूनही प्रोजेक्टची डेडलाईन पाळण्यासाठी ओव्हरटाईम केला... पिल्लू चातकासारखी वाट बघतो, त्यालातरी कुठे वेळ देता येतोय... श्याSS वैताग आलाय या आयुष्याचा!" त्यानं त्राग्यानं हात सोफ्यावर आपटला. पिल्लू बिथरलं होतं, शांतपणे टकामका बाबाकडे पाहत होतं. तिला त्याचा त्रागा हताशपणा समजत होता. घरकुलासाठी, पिल्लाच्या भविष्याच्या तरतूदीसाठीची त्याची धावपळ ती बघत होती. पण ती गप्प राहीली. आत्ता त्याला भडास काढून टाकू दे... मोकळं होऊ दे. तो बरंच काही बोलत होता...अचानक थांबला... बायकोच्या डोळ्यांत पाहत कळवळून त्याने विचारलं, "आता???" मोठाच गहन प्रश्न होता... तिलाही तो सतावत होताच! महागाई वाढतेय. पिल्लाला सांभाळण्यासाठी आपण नोकरी सोडली. त्याच्या पगारात कसंबसं निभावत होतं पण वाढते खर्च भागवायचे म्हणजे... क्षणभरच! स्वत:च्या मनातील सर्व काळज्यांना मागे सारत तिने हलकेच त्याचा हात स्वतःच्या हातात घेतला... हळूवारपणे पण ठामपणे ती म्हणाली, " हे ही दिवस जातील..." त्या उबदार स्पर्शाने आश्वासक शब्दांनी त्याच्या चेहर्‍यावरील काजळी काहीशी मंदावली.

त्याने नवीन नोकरीसाठी धडपड चालू केली. पिल्लाला सांभाळून तीही त्याला मदत करत होती... पेपरमधील जाहीराती कापून ठेवणे, त्याचा बायोडेटा अपडेट करायला मदत करणे... पिल्लू मात्र खूश होतं... बाबा बराच वेळ मिळत होता त्याला. पिल्लाच्या निखळ खळखळाटाने, आनंदी किलबिलाटाने नी निरागस चेहर्‍याने त्याला नवीन हुरूप मिळत होता. इंटर्व्हूजचं चक्र चालूच होतं. पण अजूनही जमत नव्हतं कुठेच! पुंजी हळूहळू आटत चालली होती. धीर सुटतोय की काय अशी परीस्थिती निर्माण होते न होते तोच...
एक दिवस तो आला... धापा टाकत... तिला दारातूनच हाका मारत... धावत आला होता वाटते... धसकून घाईघाईने तिने दार उघडलं... तिचे दोन्ही खांदे अलगद दाबत हसर्‍या चेहर्‍याने त्याने तिच्याकडे पाहीलं... पिल्लू रांगत रांगत आलंच मागून... त्याला झटकन उचलून त्याने गरागरा फिरवलं... एवढा आनंद म्हणजे... तिच्या तोंडात पेढा कोंबत तो गदगदत्या स्वरांत म्हणाला... मला नवी नोकरी मिळालेय! आधीच्या कंपनीहून अधिक ऑफर केलेत, पोस्टही वरची आहे... आता सगळं नीट होईल... आता सगळंच अगदी छान होणारेय! त्याच्या डोळ्यात तरळलेल्या आनंदाश्रूंनी ती सुखावली. दोन्ही हात छातीशी धरून तिनं वर बघत देवाचे आभार मानले... अस्पष्ट स्वरांत पुटपुटली..." हे ही दिवस जातील..."!!!


.... स्वप्नाली वडके-तेरसे

0 comments:

Post a Comment