July 11, 2013

पाऊस खूप आहे आज... कोसळतोच आहे... मी बसलेय इतरजणींसारखीच... पावसाच्या झडींपासून अंग चोरत... एकेकजण येताहेत... चिप्प भिजलेल्या... ओढण्यांची टोकं पिळत, ड्रेस आणि छत्र्या झटकत... त्यांचे उडणारे थेंबही मी चुकवतेय.... आधीच आकसलेलं अंग अजूनच चोरून घेतेय ( जितकं जमेल तितकंच अर्थात.. :D ) त्या त्रासिकपणे म्हणताहेत "कित्ती पाऊसेय नै आज... श्शी बाई कंटाळाच आलाय..." पुन्हा त्राग्याने ड्रेसची ओलीचिप्प टोकं फडफडवणं... ते उडणारे तुषार शिताफीने चुकवत मी त्यांच्याकडे बघून हसते... थोडंसं ओळखीचं, थोडंसं अनोळखी, थोडंसं सांत्वनपर.. आणि खुपसं खुशीचं...! मी आज लवकर आलेली असते ना... इथेतिथे बघत टीपी करेपर्यंत "हा" धो धो कोसळायला लागतो... "वाचले बुवा!" माझं मन खुशीत मांडे खातं... चिप्प भिजून एसीच्या त्या बोचर्‍या थंडीत ओले कपडे अंगावर वाळवत बसायचं??? छ्या!!

रंगीबेरंगी ओल्याचिप्प गर्दीने ट्रेन फुगते... कोणी आडोसे शोधत दाराशीच उभ्या राहतात... कोणी खिडकीशी सुरक्षित अंतर राखत चिकटून चिकटून बसतात...एकमेकांना बिलगून तारेवर बसलेल्या भिजलेल्या पाखरांसारख्या...!
रोज विंडोसिट पकडायला धावणार्‍या आज उदार अंतःकरणाने विंडोसिट ऑफर करत होत्या...
थेंबथेंब पाणी गाळणार्‍या चिप्प छत्र्या खिडकीच्या हँडल्सवर विसावत होत्या... कॉलेजकन्यकांचा घोळका बाजूलाच चिवचिवत असतो... नव्या फ्रीलवाल्या छत्रीला ट्रेनमध्येच उघडून वर तीघींच्या डोक्यावर धरत फॅनखाली वाळवत असतो... स्वतःचे फंकी ट्रान्सपरंट सँडल्स दाखवत मग ते कुठून आणि कितीला मिळाले याचं साग्रसंगीत वर्णन करत... कॉलेजगर्ल्सला कुठल्याच विषयांचं वावडं नसतं ना... पावसाच्या थेंबासारखा एखादा विषय सापडावा आणि मग त्याचे हात धरून बाकीच्या थेंबांनी कोसळत राहावं संततधारेसारखं तशा कोसळत राहतात... मी हसते स्वतःशीच... तिथेच कोणीतरी हँडलवर चक्क ओढणी वाळत घातलेली असते... बायका म्हणजे ना... उपलब्ध सोर्सेसचा वापर आपल्याला हवा तसा कसा काय करायचा हे त्यांना कध्धीच शिकवावं लागत नाही.

इथे कोणी ऑफीसला जाणारी फॅशनेबल सुंदरी आपले लांबसडक केस हलकेच झटकते... खिडकी अन दरवाज्याच्या उरल्यासुरल्या फटीतून डोकावणार्‍या बाहेरच्या कित्येक भिरभिरत्या डोळ्यांना क्षणभर विश्रांती मिळते... काय म्हणत असतील मनात? "ना झटको जुल्फसे मोती...?" मी हसते पुन्हा स्वतःशीच!
तिथे कोणीतरी तल्लीनपणे आपले टप्पोरे डोळे काजळकाळे करण्यात गुंग असते... मग हळूच चिमुकला आरसा उघडला जातो... चिमुकला रूमाल चेहर्‍यावरून हलकेच फिरतो... आरश्याचे अँगल्स बदलतात चेहर्‍याच्या अँगल्सच्या प्रपोर्शन्मध्ये... मग एखादी सुखद गुलबट छटा नाजूक ओठांवर अलगद पसरते... ओठांच्या पाकळ्या एकमेकांशी मिटमिट करतात... हा सगळा शृंगारसोहोळा आजूबाजूच्या तोंड नी डोळे विस्फारून पाहत राहतात... काय विचार करत असतील मनात... "नटवी मेल्ली!!", "कित्ती सुंदर शेडंय नै? कुठल्या कंपनीची आहे पाहू... श्शीSS बाई दिसलीच नाही!!!", "ह्म्म आपल्यालाही अस्सं प्रेझेंटेबल राहायला हवं.... ठरवूनही ह्या कामाच्या धबगड्यात चिंबून जायला होतंय... स्वतःकडे लक्षच देता येत नाहीये... श्शी!!"
असंच काही बाही... आता मला थोडं जोरात हसायला येतं... कानात हेडफोनची ढेकणं कोंबलेली असल्याने माझ्या मेंदूच्या विकासावर वा विकारावर कोणी फारसा विचार करत नाही...

तेवढ्यात "ती" दिसते... कानात हेडफोन्स खुपसलेले... हातात मोबाईलचं धुड... आणि दरवाज्याच्या कोपर्‍यात स्टील बारला कवेत घेऊन लोंबकळत असते... तोंडावर प्रतिथयश गायिकेचे हजारो विभ्रम! स्वत:शीच मग्न... तालासुरात गाणं म्हणतेय कुठलंसं... दरवाज्याच्या फटीतून पाऊसझडी आत घुसखोरी करताहेत... हिला पर्वाच नाही... त्या झडींवर खुशाल चेहरा सोपवलाय... पाऊसझडी गालावर-नाकावर-कपाळावर थडाथड आपटताहेत... ही गातेच आहे... डोळे मिटून तल्लीनपणे... इथे बाकीच्या सगळ्याजणी मांजरीसारख्या अंग आकसून हाताचे पंजे उलटसुलट चेहर्‍यावर फिरवत शक्य तितकं कोरडं व्हायचा प्रयत्न करताहेत आणि ही बया खुशाल त्या पावसाला म्हणतेय... भिजव... आणखी!! वेडी कुठली... माझं स्टेशन आलं... मला जागा करून देत ती मागे सरकली... "उतरायचं नाहीये?" काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारते... जोरजोरात मान हालवत म्हणते "नाही.." "अगं मग?" मी हातानेच विचारते... ती गोडशी हसते... चेहर्‍यावरून ओघळणारे थेंब ओढणीनेच हलकेच पुसून काढते... मी जोरात हसते... आत खोलवर कुठेतरी छोटीशी वेदना सटपटते... का? कारण कळतच नाहीये... मी पुन्हा तिच्या कडे पाहते... ती दरवाज्यातून दिसणार्‍या आभाळाच्या तुकड्याला निरखत गातेच आहे... कसला मेघमल्हार आळवतेय कधीपासून कोणास ठाऊक! काय आहे माझ्या नजरेत... हेवा, अचंबा, कौतूक?? कळतच नाहीये... आत खोलवर कळ उमटतेच आहे...

स्टेशन दृष्टीपथात येतंय... उतरायचंय आता... मी पर्स, छत्री, ओढणी, स्वतः असा सगळा सरंजाम सावरते... आणि थोडीशी झेपावते दारातून बाहेर... पाऊस कोसळतच असतो... थोडे तुषार माझ्या चेहर्‍यावर धडपडत उड्या मारतात... मी मागे सरकायचा प्रयत्न करते पण मागे गड लढवणार्‍या मावळ्यांनी रस्ता बंद केलाय... पुढेच लढायचंय... मी नकळत डोळे मिटते... चेहरा आपसूक पुढे करते आणि म्हणते... भिजव... आणखी...! पाऊस खुशीत हसतो... झेपावतो आणि भिजवतो मला... मी भिजत राहते.. निशब्दपणे... कधीकाळचा तराणा भिजलेल्या ओठांवर अवतरतो... मी सूर पकडते, स्वतःच्याच नादात... चेहर्‍यावर प्रथितयश गायिकेचे भावविभ्रम आपसूक पांघरले जातात... मागून धक्के येताहेत... माझी समाधी भंग पावते... स्टेशन आलं वाट्टे... धुंदीत उतरते... उतरण्यापूर्वी आपसूक नजर "ति"च्याकडे वळते... ती हसते... खूपसं ओळखीचं!! मीही हसते... मोकळं, सैलावलेलं, स्वच्छ, निरभ्र!!

शब्द ओठातच घुटमळतात...तिला सांगायचे असलेले... "चार वर्षात पाहीलेली तू दुसरी वेडी! पाऊस बेभानपणे झेलणारी!! पावसाला बघून हसणारी... मला आवडतात, पावसाला बघून स्वतःशीच हसणारी माणसं!! आणि हो! पहीली वेडी... ती मीच गं!! कित्त्येक दिवसांनी सापडलेय... माझी मीच, मला, पुन्हा!!! थँक्स टू यू..."
माहीत नाही ती वेडी पुन्हा भेटेल की नाही... असेल कदाचित फेसबूक वर कुठेतरी... शेअर अन लाईक्सच्या साखळीत गुंतेलही कदाचित आणि मग ओळखीचं हसेलही स्वतःशीच, पुन्हा एकदा!!!

- स्वप्ना....
                  



तळटीपः सॉरी लोक्स, पुन्हा पुन्हा एकच फोटो अपलोड करतेय... पण काय करू प्रचंड म्हणजे प्रचंडच आवडलाय मला तो... प्रेमातच पडलीये मी त्याच्या!

चित्र सौ. : elenakalisphoto.com

ललित : पाऊस! माझा प्राणप्रिय सखा!!


इतके दिवस पावसाला वेड्यासारखी 'मिस' करत होते. काल एक छानसं ग्रीटींग ही बनवलं त्याच्यासाठी पण ते त्या वेड्याला कसं समजलं कुणास ठाऊक! बरसलाच की काल रात्री - मनसोक्त, आससून!! जणू तो सुद्धा मला खूप 'मिस' करत होता... खरं तर तो कित्येकांचा सखा!! प्रत्येकासाठी बरसतो-अगदी हातचं न राखून! पण जेव्हा कधी खिडकीत बसून त्याला डोळे भरून न्याहाळत असते- मला वाटतं तो फक्त आणि फक्त मलाच भेटायला आला आहे... कृष्ण सखा नाही का प्रत्येक गोपिकेला फक्त आपला एकटीचाच सखा वाटे तस्संच! रूसलेय ना मी, इतके दिवस मी त्याची चातकासारखी वाट पाहतेय आणि हा कुठे दडी मारून बसलेला कोणास ठाऊक!! मग हळूच येतो, छान मोकळं मोकळं प्रसन्न हसू हसतो... खरं तर त्याच्या चाहुलीनेच, त्याच्या अंगागंधाच्या मंद सुगंधानेच मी वेडीपिशी झालेली असते... पण जाम ताकास तूर लागू देत नाही! माझा रूसण्याचा हक्क, तुझं मनवण्याचं कर्तव्य! अगदी हाताची घडी घालून गुडघ्यात डोकं खुपसून बसते मी... पाहतही नाही त्याच्याकडे... तो माझी हरप्रकारे समजूत काढण्याचा प्रयत्न करतो... कधी कान पकडून, उठाबश्या काढून, क्वचित एखादी सुरम्य गाण्याची लकेर गुणगुणून... लटक्या रूसव्याने फुगलेल्या माझ्या गालावर फुंकर मारून तर माझ्या बटांना अल्लदपणे विस्कटून तर कधी चेहर्‍यावर असंख्य तुषारांची बरसात करून... कधी असंख्य सरींचे अलवार हात लडीवाळपणे गळ्यात टाकून..!! मी खुदकन हसते... नाहीच रूष्ट राहता येत त्याच्यावर फारसं!! कित्ती लोभस आहे तो...!!!
प्रियतमेला कसं खुलवायचं फुलवायचं हे तंत्र त्यानं चांगलंच आत्मसात केलंय! लब्बाड कुठला!! गालगुच्चाच घ्यावासा वाटतो त्याचा... पण तो कुठला थांबायला एवढा वेळ!! वेड लावून पसार व्हायचं ही जुनीच खोड आहे त्याची!! पण मी मात्र त्याच्या सुखद आठवणींनी एकाच वेळेस तृप्त नी घायाळ व्हायचं... त्या एकांतातल्या विजनात!!




खरं तर झोकून देण्याची, सर्वस्व दुसर्‍यावर उधळून रितं होण्याची कला मी त्याच्याकडूनच शिकले... पण इतरांना तृप्त करताना आपण मात्र रिक्तच राहतो याची खंत तो फारसा कधी बाळगत नाही... हे मात्र अजूनही मला तितकंसं जमलेलं नाही!! त्या वेड्याला जाणवत तरी असेल का स्वतःचे रितेपण?? छे!! तो तर लुटवण्यात, उधळण्यात... स्वतःच्याच तालात उन्मुक्तपणे बरसण्यात तल्लीन!! एखाद्या कसलेल्या शास्त्रीयसंगीत गायकाने रियाझ करतानाही तल्लीन पणे स्वतःशीच एक अशी हरकत घ्यावी अन आजूबाजूच्यांना त्या सूरांच्या बरसातीने चिंब भिजवून टाकावे; स्वतःच्याही नकळत.. तसंच काहीसं!!

पावसाबद्दल लिहा-बोलायला लागले ना की मला माझंही भान राहत नाही. त्याचे कित्येक लोभस विभ्रम मला कित्येकदा वेड लावतात. खरं तर त्याच्या येण्याच्या चाहूलीनेच त्याने मला अर्धी गारद केलेली असते... त्याच्या आगमनाचा तो मादक मोहक सुगंध- इवले इवले थंडगार थेंब झेपावत कधी टप्पोरे होत जातात... आणि हलक्या सरींनी लुभावत तो आवेगपूर्ण पाऊसझडींनी कधी गुदमरून टाकायला लावतो ते समजतही नाही... तो बेभानपणे कोसळत राहतो... आंणि आपण ते फक्त अनुभवायचं- त्याचा आवेग, त्याचा जोष... निस्तब्धपणे, निशब्दपणे!!

तप्त रूष्ट धरणीला आपल्या थेंबांच्या नाजूक जादुई बोटांनी हळूवारपणे हसवतो, खुलवतो, फुलवतो... हलक्या सरीच्या अलवार हातांनी तिच्या भुरभुरणार्‍या शुष्क वेलींच्या बटा अलगद कानांमागे सारतो आणि तिच्या लालेलाल तत्प्त घामेजल्या चेहर्‍यावर अलगद प्रेमाची फुंकर घालतो आणि मग बरसतो- बरसत राहतो...बेभानपणे! तप्त धरित्रीची गात्रं गात्रं त्याचं ते बेभान प्रेम पिऊन श्रांत क्लांत होऊन तृप्त होईपर्यंत! त्याचे हे सारे भावविभोर, आत्ममग्न लोभस विभ्रम अन नवसृजनाचा हा सारा अविष्कार खिडकीतून डोळे भरून पाहत असते... धरणीचा मादक गंधभरला तो तृप्त निश्वास मला ऐकू येतो... स्त्रीसुलभ मत्सराने मी काहीशी अस्वस्थ होते... थोडीशी पेटूनही उठते... घायाळ होऊन कळवळून पाऊससख्याला विनवते... मी ही अशीच ग्रासलेय, त्रासलेय रे! दुखःच्या ग्रीष्मझळांनी माझ्या तनामनाची काहीली होतेय... मलाही असंच सचैल न्हाऊ घाल- चिंब, नखशिखांत! कणाकणाने- बेभानपणे!! तो येतो... माझ्या नकोश्या जाणीवानेणीवांतून तो अलगद हात देऊन मला बाहेर काढतो, स्वतःच्या बेभानपणाने मला भारून टाकतो... त्याचं ते बेभान होणं सुप्तपणे माझ्यात पेरून जातो... मी बेभान होत राहते पुन्हा पुन्हा... भानावर येईपर्यंत!!

वेड लावतात मला या पावसाची सगळीच वैविध्यपूर्ण रूपं- वार्‍याने त्रेधा उडव्त अवखळपणे भुरभुरणारा, थेंबांचा फेर धरून, तारांवरून, तृणपात्यांवरून थेंब बनून अल्लडपणे ओथंबणारा, कधी पागोळ्या बनून निरागसपणे बरसणारा, कधी तत्ववेत्त्याप्रमाणे गंभीरपणे संतत्धारेच्या रूपाने तर कधी उन्मुक्त बेभान प्रियकराप्रमाणे पाऊसझडींमध्ये अविरत कोसळून गुदमरून टाकणारा! बरसून रितं झाल्यानंतरचा त्याचा हवाहवासा मादक गंधगारवा मी अंगांगभर लपेटून घेते शहारत!!

एकांतात कधीकाळची विसरली गेलेली जखम त्या विजनात भक्ककन उघडी पडते, त्यावर काळाची धरलेली खपली उचकटली जाऊन भळभळत राहते- बाहेरच्या पावसासोबत! बाहेरच्या पावसाला माझ्या या आतल्या मूकपणे झरणार्‍या पावसाचा सुगावा कसा लागतो कोणास ठाऊक? पण मग तो एखाद्या समंजस प्रियकरासारखा शांतपणे बरसत राहतो. त्याच्या असंख्य रूपेरी शीतल हातांनी मला कवेत घेऊन हळूवार थोपटत राहतो. मी त्याच्या आश्वासक मिठीत विरघळून जाते...कणाकणाने!

कधी कधी मात्र पाऊससखा रंगात येतो. आपल्या वात्रट मित्राला, वार्‍याला हाताशी धरून उगाच छेडखानी करत राहतो.. कधी ओढणीमध्ये ओढाळपणे लपायला पाहील तर कधी केसांच्या उन्मुक्त बटांबरोबर खेळू पाहील... चिंब ओलेतं रूप चोरून पाहण्यासाठी उगाच धडपड करीत राहील... आणि मग माझ्या हातातील छ्त्री वार्‍याच्या एका जोरदार झोताने पलटी झाली की दोघंजणं "कश्शी मज्जा केली!!" असं मिस्कीलपणे म्हणत एकमेकांना टाळी देत अवखळपणे हसतील.. कसं रागावू या लोभस विभ्रमांवर?? मलाही तर ते सारेच्या सारे हवेहवेसे असतात. या भावविभोर विभ्रमांना डोळे भरून पाहण्यासाठी- अनुभवण्यासाठी मी चार महीने विजनाचा वैशाखवणवा सहन केलेला असतो- माझा पाऊस सखा येईल अन माझ्या सार्‍या ठसठसत्या वेदनांवर अलवार फुंकर घालेल... तो येतोही! माझ्या मनातले भाव बरोब्बर पकडत तो येतो. मी उदास गप्पगप्पशी दिसले तर पार अस्वस्थ होतो... स्वतःच अस्वस्थ होऊन बरसत राहतो... त्याला अजिब्बात आवडत नाही मला त्रास झालेला... वेडा आहे तो-- माझ्यासारखाच! अवखळपणे, कधी लडीवाळपणे तर कधी बेभानपणे मला त्याच्या प्रेमवर्षावात चिंब चिंब न्हाऊ घालतो. तापलेल्या अवनीप्रमाणे मीही त्याला पिऊन टाकते... तो रिता रिता होतो... मी तृप्त तृप्त होते... श्रांत-क्लांत!!

मला पुन्हा एकदा वेड लावून माझ्या पाऊससख्याने दडी मारलेली असते... मी बेभान सुखाने गुंगावलेली असते...
एव्हाना परीसराने ओलसर मखमली जांभळट काळोखाची दुलई ओढलेली असते. आकाशाच्या गर्दगडद पटलावर एखाद्या गुबगुबीत करड्या जांभळ्या ढगाआडून चंद्र हलकेच डोळे मिचकावत हसतो! आत रेडिओवर कधीपासून वाजत असलेला मिलींद इंगळेचा 'गारवा' एव्हाना संपत आलेला असतो... रित्या धीरगंभीर सुरात उर्वरीत स्वर गंधाळत राहतात...

"पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्र चिंब भिजलेला..
विझवून चांदण्या सार्‍या, विझलेला शांत निजलेला!"


--- स्वप्नाली वडके तेरसे

ललित : रंगायतन!!

नुकतीच रंगपंचमी पार पडली... धुलीवंदन/धुळवड आणि पंचमीच्या दिवशी रंगपंचमी! रंगांचा उत्सव! ऋतूराज वसंताच्या आगमनाप्रित्यर्थ स्वागतासाठी निसर्गाने केलेली मुबलक रंगागंधांची उधळण अनुभवत आपणही त्या निसर्गरंगात मनसोक्त डुंबून घेतो... राज्यातील अन समस्त देशभरातीलच कोरड्या दुष्काळाने ग्रासलेल्या लोकांचा विचार करत सरकारने केलेल्या पानी बचाओ आवाहनाला समस्त देशभरातील आबालवृद्धांनी कौतुकास्पद साद दिली अन कोरडी होळी(धुलीवंदन) साजरी केली...

यावेळी रंग खेळायला नवरा नव्हता सोबत!
[तसंही तो बोका आहे, अंघोळीच्या वेळी काय भिजेल तोच! एरवी पाण्याचा शिंतोडा उडाला तरी हात झटकत बसणार... पावसात भिजणे-बिजणे तर सोडाच! तेव्हडा रोमँटिकपणा नाहीये हो आमच्या नशीबात!! : (
बाहेर पाऊस पडायला लागला की माझ्या मनमोराचा पिसारा हाSS फुलारून येतो!!! तो गुलाबी गारवा... एकांतातला शहारा... कुंद हवा... धुंद वातावरण खिडकीतून मी पाहून पाहून वेडी होत असते... मनात पिंगा घातलेला असतो आल्याने गंधाळलेल्या वाफाळत्या कडक चहाचा व गरमागरम कुरकुरीत खमंग खेकडाभज्यांचा वास... झालंच तर मग मोगर्‍याच्या अर्धवट उमललेल्या धुंद कळ्यांचा आणि ओलसर मातीचा खरपूस वास, जगजीतच्या मधाळ कातील गझला आये हाये!!! आणि फुस्स आमचं अर्धांग आळसावलेल्या बोक्यासारखं सोफ्यावर हात पाय जितके म्हणून वळकटी वळता येइल तितके पोटाखाली मुडपून लोळत असतं... माझ्या मनातले आल्याचा चहा नी भज्यांचे वास ही साम्यस्थळं सोडल्यास बाकीचे प्रकार कशाशी खातात हे गावीही नसतं यांच्या!!! आणि रंगपंचमीचे रंग!!! अर्रे माझ्या कर्मा!! चमचमीत नॉनव्हेज्/मिसळ ओरपताना मसलट तेलाचा एखादा पुसटसा शिंतोडा जरी पांढर्‍याशुभ्र बनियन वर पडला तरी हे राम!!! हे रंगाबिंगाचं काय घेऊन बसलात!!!]
मी मात्र खेळले मनसोक्त रंगपंचमी माझ्या पिल्लूसोबत... अगदी नैसर्गिक! हळदीने, आणि त्याच्या माश्याच्या पिचकारीत जेवढं पाणी मावेल तेवढ्या पाव वाटीभर पाण्यात!!! वर पिल्लूने चिमुकल्या हातांनी गालाला लावलेल्या हळदीने थोडेतरी गाल उजळलेत का तेही चोरून बघून घेतलं आरशात... पी हळद हो गोरी! च्या अतिउत्साहाने!!


नवरेबुवांचं रंगांचं तथाकथित ज्ञान तसंही अगाध(!!???) आहे! नुकतच लग्न झालं तेव्हा साडी घेताना प्राथमिक रंगांचीच माहीती असल्याने बॉटलग्रीन, हिरवाजर्द, मेहंदी, पोपटी, पिस्ता, मग झालंच तर चटणी वगैरे छ्टांपर्यंत आमची गाडी घसरल्याने येताना समोसे नी पुदीना चटनी आणून चट्टामट्टा करत बसायला हवं होतं... पोटात कावळ्या-उंदरांनी फेर धरलाय!! असे काहीसे अस्वस्थ भाव त्याच्या चेहर्‍यावर पसरलेले... टोमॅटो रंगाचा शालू नी चटणी रंगाची साखरपुड्याची साडी घेतल्यावर आता गृहप्रवेशाला काय चिंचेच्या कोळाचा कलर पाहूयात का? सँडविचच्या सगळ्या झणझणीत चटण्या त्याच्या डोळ्यांत उतरलेल्या आणि टोमणे अधिकाधिक आंबट झालेले... खरेदी आवरती घेऊन आधी पोपूला धावावं लागलं होतं...

खरेदीसाठी गेल्यावर सरळसाध्या लाल रंगाला लाल न म्हणता उग्गाच डाळींबी, कोकमी, कुसुंबी, टोमॅटो, मरून, तपकीरी, विटकरी अशी विशेषणं का देतात याचा विचार करकरून नवरोबांच्या उत्साहाला वीट अन मेंदूला झीट आलेली असते...
 



तरी नशीब!! हल्ली हल्लीच फ्याशनमॅनियाक झाल्यासारखं जबाँग, फॅब इंडिया नी पँटालून्सच्या साईट्स वर भरकटून मिंत्राने दिलेल्या फॅशन मंत्रानुसार इंग्लिश कलर्स सांगत बसत नाही त्याला!! "लिनन-- हा कलरेय? हे तर कापडेय ना..." (कित्ती गं बाई गुणाचा माझा नवरा तो!! नश्शीब!! कापडाचे प्रकार तरी माहीतेत! नाहीतर कॉटन एके कॉटन!!!) मनातूनच अलाबला करत मधाळ नजरेने त्याला म्हटलं "नाही रे राजा ही पांढर्‍या रंगाची शेड आहे..!"

"पांढर्‍याची शेड?? हॅ!! पांढरा म्हणजे पांढरा शुभ्र!!! दुधासारखा! झालंच तर अगदी धुतल्या तांदळासारखा!! (लग्नाची बायको शोधताना कॅरॅक्टरचा हा क्रायटेरिया घरात बोलला गेला असावा... नाहीतर भात लावण्याआधी तांदूळ-बिंदूळ धुतात, मोदकाचे तांदूळ धुवून वाळवलेले असतात हे माहीत असणे शक्यच नाही!!) , नाहीतर रिन की अगदीच हाईट म्हणजे उजालाकी निळसर सफेदी!! बास!!"

नाही रे राजा... मी तत्ववेत्त्याच्या सूरात समजावत म्हणाले, अरे क्रीम, आयवरी(हस्तीदंती), व्हॅनिला, एगशेल, स्मोकी(धुरकट), पिवळसर पांढरा, निळसर सफेद, गुलबटसर पांढरा(लिनन/बेज), पोपटीसर पांढरी अमका नी ढमका! नवर्‍याचा मेंदू धुरकट पांढरा पडलेला एव्हाना माझं पंडूर प्रवचन ऐकून!!! अजून पुढचे सेकंडरी कलर शेड्स व अमक्या ढमक्या असंख्य रंगछटा शिल्लक होत्या... पुढचा धोका सूज्ञपणे ओळखत दुसर्‍या कुठल्याही समंजस नवर्‍याने त्याप्रसंगी केलं असतं तेच प्रसंगावधान राखत आमच्या नवरोबांनी 'फोन आलाय वाट्टं..' असं 'कोण आहे रे तिकडे??' च्या चालीवर पलायन केलं!! हे समजण्याइतकी मी हुशार बायको आहे, पण जाऊंदे मला काय?? त्याचंच नुकसान!! आणि तसंही.. 'आमच्या हिला माझ्यापेक्षा जरा जास्त फॅशनसेंस आहे' असं नवर्‍याने कधीकाळी केलेलं कौतूक पदरात पाडून घ्यायला कुठल्या बायकोला नाही बरं आवडणार??

पण या रंगांचा प्रॉब्लेम माझ्याच कशाला, सगळ्याच बायकांच्या नवर्‍यांना असतो वाटते...लाँड्रीला दिलेली बेडशिट बरेच दिवस परत न मिळाल्याने मी लाँड्रीवाल्याला समजावत होते," भैय्या ती पांढरी बेडशिट नाही दिलीत परत... वो सफेद, उसपर वेली वेली का निळसर डिझाईन है ना... और निळे छोटे छोटे ठिपके..." त्याचा चेहरा एका मोठ्या निळ्या ठिपक्यासारखा अनभिज्ञ! नवर्‍याने सांगितलं "भैय्या परसों दी थी सफेद चद्दर बेडशिट वो लाके नही दी!" निळा ठिपका माणसात आला.... "लाता हूं" असं म्हणत हसत हसत कपड्यांचं गाठोडं खांद्याला अडकवत तो पसार झाला...
नवर्‍याला त्याचा प्रॉब्लेम (आपबिती वरून) लग्गेच समजला... आणि लग्गेच मदतीला गेला... नवर्‍याचा चेहरा, "तेरा दर्द मै समझ सकता हूं मेरे भाई...!" अरे वा एकमेकां करू साहाय्य!!! छाने!!

परवा नवर्‍याने मात्र कहर केला... ऑफीसातनं फोन केला, "अचानक माझं(त्याचं) माहेरी(त्याच्या) जाणं ठरतंय तर ती गोल्डन ब्राऊन बॅग भरून ठेव!!"

बाई गं!! गोल्डन ब्राऊन??? माझ्या नजरेसमोर नुकत्याच धुळवडीत रंगलेले असंख्य चंदेरी-सोनेरी ऑईलपेंट कलर्स तरळून गेले... बघीतलं तर बेडच्या तळाशी एक मिलीटरी ग्रीन रंगाची, एक डार्क कॉफी रंगाची आवि त्याची नेहमीची बेज रंगाची!!! आता यात गोल्डन ब्राऊन म्हणजे मिलीटरी नक्कीच नसणार नाहीतर तो कोथींबीर चटणी हिरवी वगैरे म्हटला असता..आता उरल्या दोन!! तरी खात्री करण्यासाठी त्यातली एक कपाटाला लाऊन बघितली... मग त्याला फोन केला... "आपलं कपाट कुठल्या रंगाचंय रे?" माझा स्थितप्रज्ञ आवाज! "ते ना... फिकट तपकीरी!!" त्याचं आत्मविश्वासपूर्ण उत्तर! बरं म्हणत मी फोन ठेवला...

घरी आल्यावर त्याची "त्याला हवी असलेली" मी भरून ठेवलेली बॅग उचलून त्याच्या माहेरी प्रयाण केलं.

अवांतर माहीतीसाठी: त्या बॅगेचा आणि कपाटाचा रंग डिटो सेम आहे आणि तो आहे बेज!!!!असो! आता कानाला खडा!! नवर्‍याला प्रायमरी - लाल,हिरवा, निळा रंग सांगायची परवानगी आहे... छ्टा नकोच!!! अर्थ लावता लावता माझ्या चेहर्‍याचा रंग उडतो... :)


१४ फेब्रूवारी, व्हॅलेंटाईन्स डे! पाश्चात्य संस्कृतीतील प्रेमिकांचा दिवस!! पण यावर्षी १४ फेब्रूवारी २०१३ याच दिवशी भारतीय संस्कृतीमधील प्रेमाचा देव कामदेव अर्थात मदन याचा जन्मदिवस! 'माघ शुक्ल पंचमी' हा कामदेवाचा जन्मदिवस 'वसंत पंचमी' म्हणून ओळखला जातो. वसंत पंचमीला दांपत्यसुखासाठी प्रेमाच्या, सौंदर्याच्या आणि शृंगाराच्या देवता 'कामदेव - रती' यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत या दिवसापासून वसंतोत्सवाची सुरूवात होते. ऋतूराज वसंत नवसृजनाचे, चैतन्याचे, आनंद- उत्साहाचे लेणे घेऊन येतो. रंगांची, गंधाची, प्रेमाची, चैतन्याची मुक्तहस्ते उधळण करीत येणार्‍या वसंताच्या आगमनाची तयारी म्हणून वसंतपंचमी या दिवशी संपूर्ण भारतभरात चैतन्याचे प्रतिक असलेल्या पिवळ्या रंगाची वस्त्रे परीधान करून आनंदोत्सव साजरा केला जातो. नवसृजनाचे, चैतन्याचे, प्रेमाचे प्रतिक असलेल्या वसंत ऋतूचा आणि कामदेवाचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणून प्रेमाचे प्रतीपादन करणार्‍या कामदेवाच्या जन्मदिवसास 'वसंत पंचमी' हे नाव!


कामदेव हा पाश्चात्य संस्कृतीमधील क्युपिडचाच भारतीय संस्कृतीतील अवतार! जणू शंकराच्या तिसर्‍या चक्षूतील क्रोधमयी अग्नीमध्ये भस्मसात झालेल्या कामदेवाने पाश्चात्य देशात क्युपिडबाळाच्या रूपाने अवतार घेतला. दोघांच्याही हातात हृदयाला प्रेमविभोरांनी घायाळ करणारे प्रेमबाण असतात.

तब्बल ४६ वर्षांनी १४ फेब्रूवारी या दिवशी व्हॅलेंटाईन्स डे व 'वसंत पंचमी' दिनानिमित्त दोन्ही संस्कृतींचा सुंदर मिलाफ झाला आहे. भारतीय काय किंवा पाश्चात्य काय दोन्ही संस्कृती प्रेमाचा संदेश देताहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन्स डे चे वावडे असणार्‍यांनी या वर्षी १४ फेब्रूवारी ला 'वसंत पंचमी' प्रेमदिन साजरा करण्यास हरकत नाही.
तशीही आपली संस्कृती प्रेमाचाच संदेश देते. मित्रांवर तसेच शत्रूंवरही प्रेम करण्याचा संदेश देते. आणि आपल्या संस्कृतीमध्ये प्रेमाचा अर्थ फक्त शृंगारापर्यंतच मर्यादित नाही. आपल्या संस्कृतीतील प्रेम जितकं रांगडं, रगेल- रंगेल आहे तितकंच राजस आणि लोभस, नाजूक आणि नजाकतदार, हळवं आणि हळूवार आहे. वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी, स्नेह, लळा, कळकळ, काळजी, धाक, आधार, भूतदया, कळवळा,माया, ममता, श्रद्धा, भक्ती, त्याग, समर्पण ही सर्व प्रेमाचीच रूपे! कृष्णाच्या प्रती असलेली राधेची भक्ती हे प्रेमाचेच रूप तर मीरेचे समर्पणही प्रेमच!

राधेच्या भक्ती कथांचे विवेचन सर्वत्र आढळते. पण मीरेचे समर्पण... याविषयी मायबोलीवर सुंदर विवेचन वाचावयास मिळाले. जवळपास सर्वच स्त्रियांच्या अंतरात एक मिस्टर राईट वा मिस्टर परफेक्ट दडलेला असतो. म्हणजे त्या मि. परफेक्टच्या ठायी असलेल्या अपेक्षित गुणांचे जिगसॉ पझल्ससारखे तुकडेच! भेटलेल्या प्रत्येक पुरूषामध्ये ती स्त्री आपल्या अपेक्षित गुणांचे तुकडे ठेऊन पाहते. सर्व तुकडे सांधले जाऊन मि. परफेक्टचं पूर्ण कोडं उकलतच नाही. पण त्यातील जास्तीत जास्त अपेक्षांचे तुकडे ज्यामध्ये बसतील त्याला ती आपला मि. परफेक्ट म्हणून स्वीकारते. पण मीरेचं तसं नव्हतं. मीरेने श्रीकृष्णालाच तिचा मि. परफेक्ट म्हणून निवडले. त्याच्याविषयी कुठलाही पूर्वग्रह वा अपेक्षा न बाळगता... त्याच्या सर्व गुणांनाच तिने मि. परफेक्टचे गूण म्हणून स्वीकारले. त्यामुळे तिच्या मनातील मि. परफेक्टची प्रतिमा आधीपासून परफेक्टच होती...परीपूर्ण, एकसंध, अभंग! ज्या प्रतिमेला ती परीपूर्णपणे समर्पित झाली. तिचा विरह, व्याकूळता, समर्पण यांतून अवीट मार्दव व माधुर्याची गोडी असलेली भक्तीगीते जन्मास आली. मीरेचा हा समर्पणभाव आपल्या ठायी येईल त्यादिवशी आपला मिस्टर परफेक्ट/मिस परफेक्टचा शोध संपूष्टात येईल.

म्हणून या वर्षी खर्‍या अर्थाने प्रेम करा... प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्या.
कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...
तुमचं आणि आमचं अगदी...


व्हॅलेंटाईन्स डे आणि 'वसंत पंचमी' च्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा!!

--- स्वप्नाली वडके तेरसे
('वसंत पंचमी' संदर्भ : लोकसत्ता, मुंबई वृत्तांत, मंगळवार, १२ फेब्रु. २०१३)

आयडियाची व्हॅलेंटाईन्स डे ची नवी जाहीरात... "हॅ! बीस रूपयेका फ्लॉवर?? इससे अच्छा तो कॉलीफ्लॉवरही ले आते..." म्हातारी हेटाळणीच्या सूरांत म्हणते आणि जवळजवळ त्याच क्षणी तू चमकून माझ्याकडे पाहीलंस आणि एका डोळ्याने मी तुझ्याकडे! तुझी ती प्रतिक्रिया अपेक्षित होतीच मला! वर हसून म्हणालासही..."म्हातारी तुझाच अवतार दिसतेय!" मी हसले. तुझ्या अपेक्षित प्रतिक्रियेवर आणि त्या म्हातारबाबांच्या डिट्टो तुझ्यासारख्याच हताश प्रतिक्रियेवर!



तू महागडं गिफ्ट आवडीने आणायचंस आणि मी टॅग चाचपडत "खूप महाग आहे नै.." असा आंबट चेहरा करत तुझ्या उत्साहावर विरजण घालायचं हे तर ठरलेलंच असतं. खरंतर आपण कित्ती वेगवेगळे आहोत ना... मी खूप्प गोडमिट्ट खाणारी आणि तू झणझणीत चमचमीत मसालेदार! तुला चायनीज प्रिय तर मला अज्जिबात आवडत नाहीत ते बुळबुळीत प्रकार... (अर्धी भीती की पॅक पॅक ऐवजी क्वॅक क्वॅक्/चींचीं किंवा मग अगदीच डरावचा एखादा बुळबुळीत लेग पुढ्यात येईल... विचारानेच पोटात ढवळलं बघ यॅक्क!!)
मला पंजाबी ग्रेव्हीवाल्या डिशेस आणि कुल्चा/पराठा/नान ऑल टाईम फेव तर तुला ते काजू, कांदा- टोमॅटोंच्या गोडूस ग्रेव्हीजचं वावडं! त्यामुळे हॉटेलात दोघांपैकी एकाला नित्यनेमाने खवय्येगिरीची इच्छा दडपून टाकावी लागते. तू काटेकोर स्वच्छतेवाला, परफेक्शनिस्ट आणि माझा आपला बागडबिल्ली गबाळखाना! तू ब्रँड कॉन्शस अगदी 'शूजपण वूडलँड्सचेच हवेत' कॅटॅगिरीवाला आणि मी मात्र श्शी ते कळकट्ट शूज २००० वाले वाटतात तरी कै? असं नाकं मुरडत ऑल सिझनची २५०-३०० वाली दादर पूर्वच्या एखाद्या छोट्याशा चप्पल स्टोअर मधून चप्पल घेणारी! तुझे ड्रेसेस मॉलमधले... मी मात्र 'जय हिंदमाता' वाली!!

आपल्या इवल्याश्या किचनमध्ये माझी झारे-चमचे-सुर्‍या आयुधांसह मारामारी चालू असताना तुझी अनावश्यक लुडबूड आणि हजारभर स्वच्छतेचे नियम कम सूचना मला फार इरिटेट करतात तर माझं दिवसभर सोशल नेटवर्कींगच्या साईटवर सतत 'माझे अभिनव विचार' पोस्टत पडीक असल्याने तुझ्या डोक्यात तिडीक जाते. खरंच आपण खूप वेगवेगळे आहोत ना! अगदी दोन ध्रुवांसारखे विरूद्ध स्वभावाचे! आपल्या नावांची आद्याक्षरं पण बघ 'S' आणि 'N' अगदी साऊथ आणि नॉर्थ पोल! यावर तू कौतुकाने म्हणालेलास, "अपोझिट पोल्स अ‍ॅट्रॅक्ट इच अदर!" आपलं अगदी तसंच आहे ना?

खुपदा विचार करते आपण एवढे वेगळे तरीही आपण एकत्र कसे? बर्‍याचदा या वेगळेपणातही साम्य जाणवतात... चंगोच्या चारोळ्या, सौरव गांगुली, फोटोग्राफीची, नाटकांची, क्रिकेटची, आर्ट आणि पेट्रिओटिक सिनेमांची आवड, छान काही वाचण्याची-पाहण्याची, फिरण्याची आवड, (कित्तीही नाकं मुरडली-शिव्या घातल्या तरी) तुझ्या प्रिय वपुंची फिलॉसॉफी, बरीचशी मतं-तत्वं आहेत मिळतीजुळती! आणि आपल्याला घट्ट जोडणारी लिंक आहेच त्याशिवाय का बर्‍याचदा तुला काही बोलायचं असताना मीच आधी ते बोलून टाकते...'तुमने मूंह की बात छीन ली...' असं नेहमी होतं. मग तरीही आपण बर्‍याचदा एकमेकांसाठी अनभिज्ञ का असतो? माझ्या बर्‍याचशा आवडीनिवडी तुला माहीतच नाहीयेत अजूनही ही माझी तक्रार तर तुला सध्या मी फार गृहीत धरते, तुझ्याकडे दुर्लक्ष करते ही तुझी तक्रार.

त्यादिवशी फेसबूकच्या माझ्या पेजवरील छान काहीसं सुचलेलं तुला वाचायला दिलंस तेव्हा नेहमीसारखाच भारावून गेलेलास, भावूक झालेलास. तुझ्या डोळ्यांतील हे भारावलेपण, माझ्याबद्दलच्या कौतुकाची चमक मला फार फार आवडते... पेज लाईक्सपेक्षा कित्येक पटींनी जास्त! मी पटकन बोलून गेले,"मला हे सगळं सर्वात आधी तुला वाचायला द्यायचं असतं रे, पण तू भेटतच नाहीस बघ हे लिहील्या लिहील्या वाचायला द्यायला..."
"मी असतो गं, तुझ्याकडेच वेळ नसतो माझ्यासाठी...!" मी चमकून पाहीलं तर तुझ्या डोळ्यांत दुखावलेपणाचं पाणी! क्षणभर माझ्या हृदयाचंच पाणी पाणे झालं...

खरंच रे... बाळ झाल्यापासून, टिव्ही आणल्यापासून, लॅपटॉप घेतल्यापासून आपण एकमेकांना खूप कमीवेळा भेटतो ना... खूप काही सांगायचं असतं मनातलं, काही लाडीक तक्रारी... प्लॅनिंग्ज असतात, स्वप्नं असतात, खूप काही शेअर करायचं... सारं सारं राहूनच जातंय का? गृहीत धरतोय एकमेकांना... आणि मग त्यातून गैरसमज! तू निदान मनातलं सगळं सांगतोस, मला जमतच नाही मनातलं सांगायला. त्यादिवशी सगळे लेख कौतुकाने वाचलेस, अचानक विचारलंस, "एकदा लिहीशील फक्त माझ्याबद्द्ल? माझ्यासाठी??"

तुझ्याबद्दल लिहावंसं?? काय लिहू? तुला ऐकायचं असतं माझ्याकडून तुझ्याबद्द्ल... बरंच काही!! जमतच नाही मला सांगायला... तुझ्याबद्दल आवडणारं, खटकणारं... कधी जमेल माहीत नाही! एवढ्याशा लेखात, आपलं वेगळेपण तरीही एकत्र असणं, आपलं नातं, चुकत माकत, धडपडत, एकमेकाला सावरत इथपर्यंत आलोय तो प्रवास, एकमेकांना जे काही भरभरून दिलं ते प्रेम कधी कधी दु:खंही... मावणार नाहीच सारं काही इथे! सांगायचंय तुला, जमेल तसं... जमेल तेव्हा... व्यक्त व्हायचंय तुझ्यापुढे! तुझं परफेक्शनिस्ट असणं, राग किंवा तक्रारही त्रागा न करता हळूवारपणे स्पष्टपणे मांडणं, तुझा देशाबद्दलचा अभिमान, तुझं अतिसंवेदनाशील असणं, तुझं छान माणूस असणं, गरीब-गरजूंना जमेल तितकी मदत करणं, माझ्यापुढे अगदी लहान मूल होऊन लाड पुरवून घेणं, गाल फुगवून तक्रारी करणं, आपल्या बाळाचा लाडका बाबा नव्हे आईच असणं (त्याला मी तर फक्त जन्म दिलाय, खरं आईपण - अतिकाळजीने निभावतोस तूच!) सगळं सगळं खूप लोभस आहे रे... सांगेन तुला हे सर्व कधीतरी थकून भागून घरी येशील, माझ्या मांडीवर डोकं ठेवशील, तेव्हा तुझ्या केसांतून हळूवारपणे हात फिरवत सांगेन ना... जमेल तसं.

माझ्या एका खूप खास मैत्रीणीने (ओळखलं असशीलच ती मैत्रीण कोण ते! बरोब्बर! सासूच तुझी!!!) सांगितलेलं, "नवरा लहान मुलासारखाच असतो, त्याला कधी कधी स्वतःचा खूप खास वेळ द्यायचा, त्याचे लाड-कोड पुरवायचे, विशेषतः आपल्याला बाळ झालं की त्याच्याकडे दुर्लक्ष अज्जिबात होऊ द्यायचं नाही!" तिचं म्हणणं पाळेन बरं मी तंतोतंत, न कंटाळता! कायम माझा पहीला मुलगाच राहा!! तुला बरंच काही सांगायचं असतं मला, माझ्याकडून ऐकायचं असतं... आजपासून तू घरी आल्यानंतरचा स्पेशल टाईम फक्त आणि फक्त तुझ्यासाठी!


आणि हो कधी सांगितलं नव्हतं पण गेल्यावर्षी तुझी छोटीशी डिट्टो कार्बनकॉपी मला गिफ्ट दिल्याबद्दल मी तुझी आयुष्यभर ऋणी राहीन. या वर्षीचा आपला व्हॅलेंटाईन डे फार खास असणारेय माहीतेय? आपल्या नात्याला दृढ करणारे, आपल्या हातांची गुंफण अधिकच घट्ट करणारे चिमुकले हात आपल्यासोबत असणारेत... सो हॅप्पी हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे!!!


-- स्वप्नाली वडके तेरसे

ललितः सिंधूचा बाप


                                                                                                                     मायबोलीवर पूर्वप्रकाशित....


"आज माझा प्रत्येक अश्रू
हरएक शब्द बनला आहे;
म्हणूनच जीभेला धार अन
डोळ्यांना कोरडेपणा आला आहे..."

ग्रॅज्युएशनपर्यंत चौकटीतलं आयुष्य जगत होते. चौकटीतल्या परीघाला स्वतःचं जग समजून सुखी होते. डिग्री, मग नोकरी आणि मग लग्न- सगळं कसं चौकटीसारखं आखीव्-रेखीव. लग्नाबद्दलच्याही अपेक्षा चौकटीतल्या! आईबाबांनी बघून दिलेला, अनुरूप आणि मला समजून घेणारा नवरा...माफक अपेक्षा होत्या माझ्या. अगदी स्मार्ट, देखणा वगैरे कॅटेगरी नको पण डोळे आणि हास्य छान असावं निदान छाप पाडणारं असं आपलं उगाचच वाटायचं. अर्थात तिथेही तडजोडीची तयारी होतीच. (काये की 'मुलगी' म्हणून जन्माला आलं तर बंडखोरी वगैरे एका विशिष्ट वयापर्यंत खपवून घेतली जाते... मग अपेक्षांचं जू मानेवर बसतं ते कायमचं)
पण अचानकच वार्‍याने रोख बदललामुळे ढगांनी वार्‍याबरोबर पाठ फिरवून चालू लागावं तसं तू भेटलास आणि माझ्या अपेक्षांच्या ढगांची पांगापांग झाली. चौकट विस्कळीत कधी झाली आणि फ्रेमच्या कोपर्‍यातून अपेक्षांचा एक तुकडा बाहेर कधी डोकवायला लागला कळलंच नाही. प्रकर्षाने वाटलं की तू चारचौघांपेक्षा खूप वेगळा आहेस आणि काही बाबतीत तू आहेसही. आईने आणि मी आटोकाट प्रयत्न केला फ्रेमच्या चौकटी रूंदावण्याचा (आईला कदाचित खात्री होती माझ्या निवडीवर!) पण बाबा मात्र परंपरांची चौकट सोडायला तयार नव्हते...
मग मीही हट्टाला पेटले. आयुष्यात पहिल्यांदाच! अपेक्षांचा तो डोकावलेला तुकडा तुझ्यासकट आणि माझ्या स्वप्नांसकट बाबांच्या परंपरावादी रूढीप्रिय चौकटीत कोंबायचा निष्फळ प्रयत्न करून पाहीला... नाहीच जमलं... मग टराटरा फाडून टाकली ती चौकट! बाबा बिथरले... आणि त्यांच्यापेक्षा जास्त मी..! माझंच हे रूप मला अनोळखी होतं... आपले सर्व हट्ट पूर्ण करणार्‍या बाबांना कधी दुखवायचं नाही असं ठरवूनही...
तसंही आपण आपल्याच अपेक्षा कुठे पूर्ण करू शकतो? हातातून निसटून आरसा फुटल्यावर विखुरलेल्या आरश्याच्या तुकड्यांत दिसणारी असंख्य प्रतिबिंबे एकाच व्यक्तिची असली तरी सारखी थोडीच असतात??
प्रवाहाविरूद्ध पोहताना बरीच दमछाक होणार हे माहीती होतंच... पण तारूण्याची रग आणि तुझ्या प्रेमाने बहाल केलेली बंडखोरी ही दोन वल्ही पुरेशी वाटली तेव्हा, माझ्या आयुष्याचं तारू जीवनसागराच्या अथांग प्रवाहात झोकून द्यायला. वाटलं तुझी साथ मिळेल... आत्ता आत्ता कुठे भार हलका करतोयस माझा असं वाटेपर्यंत धडपडायचे... असंख्यवेळा तोंडघशी पडले...

नाकारले जाण्याचा पहिला प्रसंग... "तू आमच्या जातीची नाहीस, घरी पसंत नाही..."अरेरे! लग्नातही तेथे पाहीजे जातीचे??
आता तुमच्या जातीत जन्माला नाही आले, हा माझा दोष कसा? आणि तुम्ही आमच्यापेक्षा उच्च कुळात जन्माला आलात त्यात तुमचं क्रेडिट कितीसं? पण हे प्रश्न गौण होते आणि ते विचारण्याचा मला मुळीच अधिकार नव्हता. एकतर मी मुलगी त्यातून खालच्या जातीची! मग वाटलं असू दे. माझं प्रेम, माझा चांगुलपणा यातूनही तारून नेईल मला.
एकीकडे मानसिक कुतरओढ तर होतंच होती... तू आणि बाबा यातील निवड करण्याची वेळ येऊ नये एवढीच प्रार्थना करत होते... नसतेच करू शकले...
पण तरीही कळत नकळत तुझ्याकडे पारडं झुकतं ठेवलं आणि बाबांना गृहीत धरलं, आजवर लेकीचे हट्ट पुरवले... आता आयुष्याचा निर्णय घ्यायच्यावेळी कसे अडवतील? आणि मी बाबांच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकले तरी माझ्या बाबांनी बापाचं कर्तव्य पार पाडलं... माझा बाप नरमला लेकीच्या हट्टापुढे!
माझा हळवेपणा, माझं तुझ्यासाठी झुरणं, तुझ्याबाबतीत फक्त ह्रदयाने विचार करणं तुला आवडायचं बहुतेक. प्रत्येक पुरूषाला आवडतं तसं 'सांभाळणं'. मग हळव्या क्षणी वाहावत जायचास. (मी तर कधीच वाहावत गेले होते, डोळ्यांना पट्टी बांधून स्वतःचं भविष्य नशीबाच्या हवाली करणार्‍या गांधारीप्रमाणे.)
"मला तुझ्याइतकं कोणीच सांभाळू शकणार नाही. तू खूप वेगळी मुलगी आहेस, माझं तुझ्याशी लग्न झालं तर माझ्याइतका नशीबवान दुसरा कोणीच नसेल..." अशासारखी तुझी वाक्ये अंगावर मोरपिस फिरवून जायची. मी सुखवायचे तात्पुरती का होईना.... मग 'लग्न झालं त'' ही शक्यताही नकळत नजरेआड व्हायची आणि माझ्या लग्नाची स्वप्ने पाहीलेल्या माझ्या बाबांच्याही माझ्याकडून काही अपेक्षा असू शकतात्-असतील हे त्या तात्पुरत्या सुखाच्या धुंदीत पूर्णपणे विसरून जायचे.
पण मी मात्र अजूनही नाकारले जातच होते, कधी तुझ्याकडून तर कधी तुझ्या घरच्यांकडून. तुझ्या प्रत्येक अटी मान्य करायचे, रडायचे, कळवळायचे. न केलेल्या चुकीची माफी मागायचे; आयुष्य त्रिशंकूसारखं अधांतरी लोंबकळत ठेऊन, याच आशेवर की कधीतरी माझी संसारची स्वप्ने पूर्ण होतील. तू बोलवायचास तेव्हा बोलवायचास तिथे यायचे, धावत पळत. तू रूसायचास, नाराज व्हायचास. कधी मला उशीर झाला म्हणून तर कधी माझ्या घामेजलेल्या अवताराकडे बघून. मी गयावाया करायचे, रडायचे तो तुला तमाशा वाटायचा..
प्रेमासारख्या अत्यंत अव्यवहार्य गोष्टीवर अजिबात विश्वास न टाकणार्‍या माझ्या बापाशी मात्र मी हिरीरीने भांडायचे, माझी बाजू मांडायचे.
तुला माहीत होतं मी माझ्या बाबांवर किती प्रेम करते ते... एक दिवस तू चिडलेलास आणि मी गयावाया करत होते. अचानक म्हणालास, "म्हण, माझा बाप नालायक आहे..." मी रडत रडत म्हणाले... खाडकन जाणवलं, हे काय बोलतेय मी... कोणासाठी...
मी रडत रडत पुन्हा फोन केला तुला आणि म्हणाले, "माझा बाप नालायक नाहीये, तुला माझ्याशी लग्न नाही करायचं तर नको करूस!" तुलाही ते जाणवलं, तू सॉरी सॉरी बोलत राहीलास... मी तुटत गेले, स्वप्नांची फुले तर कधीच कोमेजली... कुठल्या तोंडाने सांगू बाबांना, ज्याच्यासाठी तुम्हाला त्यादिवशी एवढं तोडून बोलले तो माझ्या मनाचाही साधा विचार करू शकत नाहीये... मग म्हटलं राहू दे, ते जरी तोंडावर कुत्सितपणे बोलले की,"बघ आधीच म्हटलं नव्हतं तुला..." तरी माझी तडफड त्यांना नाही बघवणार...
तू माफी मागितलीस, फ्रस्ट्रेशन आलेलं म्हणून राग तुझ्यावर काढला म्हणालास... काहीही चूक नसणार्‍या माझ्या बापावर तू निष्कारण राग काढलास हे तूही विसरलास आणि मी तर एक स्वार्थी, प्रेमांध, नतद्रष्ट मुलगी बनले होते, जिला आपल्या बापाच्या स्वप्नांपेक्षा स्वतःची स्वप्नं महत्वाची वाटत होती...
मग एके दिवशी परवानगी मिळाली तुमच्या घरून आपल्या लग्नासाठी. मी मागचं सगळं विसरून पुन्हा नव्याने स्वप्न बघू लागले... आतापर्यंतच्या माझ्या धडपडीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. पण सुखाच्या सायीची तृप्ती अंगभर पसरण्याआधीच पुन्हा कोलमडले. आजपर्यंत 'खालच्या जातीतली' म्ह्णून फक्त मला ऐकावं लागत होतं, आता माझ्या बापालाही ऐकावं लागलं होतं - लेकीला लंकेची पार्वती म्हणून 'दान' करणार असल्याबद्दल. आजपर्यंत त्यांनी केलेल्या संस्कारांचं, शिक्षणाचं, चांगुलपणाचं काहीच मोल नव्हतं. त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा माझ्यामुळे आणि माझ्यासमोर माझा बाप ढसाढसा रडला-"मला वाटत नाही का गं तुला काहीच कमी पडता कामा नये? परिस्थिती असती माझी तर केलं असतं गं तुझं सालंकृत कन्यादान..." आधी परिस्थितीने हतबल, नंतर पोरीच्या प्रेमापोटी हतबल आणि मग असहायतेनी हतबल! मुलीच्या बापाच्या अश्रूंमधील तडफड आणि हतबलता समजायला मुलीचा बापच व्हावं लागतं. सिंधूचा बाप पुन्हा एकदा मुलीमुळे असहाय ठरला होता, अपमानित झाला होती, हतबल झाला होता; एका लाचार प्रेमांधळ्या सिंधूमुळे!
मी एकटीच लढत होते, झगडत होते. तुझ्या साथीची अपेक्षा केव्हाच सोडून दिली होती, जेव्हा तू 'मुलाकडची बाजू' म्हणून स्वतःचं आणि घरच्यांचं समर्थन केलंस. आतून पुन्हा पुन्हा तुटत राहीले. कीव वाटली. अहं, तुझी नव्हे! समाजव्यवस्थेचीही नाही. स्वत:चीच! मुलीच्या सुखासाठी जबाबदारीचे जोखड अडकवलेल्या मान तुकवून निमूट अपमान सहन करणार्‍या सगळ्या वधूपित्यांची!
मी ज्या व्यक्तीला स्वतःच्या मर्जीने स्वत:च्या जोखमीवर आयुष्यभरासाठी निवडले त्याचेच विचार इतके कमजोर कसे? मी चुकले का तुला समजून घ्यायला? नाही! 'कशी त्यजू या पदाला' म्हणत तुझ्या पायाशी लीन होणारी मीही एक सिंधूच! आणि माझा बाप? तो या कथेमध्ये कुठंच नाहीये. 'एकच प्याला' या नाटकात तरी 'सिंधूचा बाप कुठे होता? तो व्यक्त झाला त्याच्या असहायतेतून, हतबलतेततून! मुलीच्या सुखासाठी अपमानाचे कडूजहर घोट निमुटपणे गिळणार्‍या एका मुलीच्या बापाच्या भुमिकेतून! मुलगी जन्माला आल्यापासून त्याला या भुमिकेचा सराव करावा लागत असेल. माझा बापही शेवटी सिंधूचा बाप ठरला- असहाय, हतबल - फक्त शिर्षकापुरता!
गडकर्‍यांना मुलींच्या दु:खी असहाय बापवर्गावरून 'सिंधूचा बाप' सुचला असावा. ते तरी काय करणार? समाजव्यवस्थेच्या विरूद्ध पोहोण्याचं ताकद आणि धाडस कमी लोकांमध्ये असतं. प्रवाहाविरूद्ध पोहोणार्‍यांची होणारी दमछाक पचवण्याइतकी ताकद सर्वांच्यातच असते असं नाही. पुन्हा किनारा गाठलाच तरी त्या यशाचा आनंद साजरा करायला कोणी सोबत असेल की नाही कुणास ठाऊक! गडकर्‍यांनी प्रवाहासोबत पोहण्याचा सोयिस्कर मार्ग निवडला. अश्रू ढाळणारी, पतीपरमेश्वराच्या चरणांत स्वर्ग समजणारी सोशिक सिंधू ही समाजाच्या दृष्टीने सर्वगुणसंपन्न संसारी स्त्री गडकर्‍यांच्या 'एकच प्याला'ने अजरामर केली. (सिंधूच्या बापाला त्यात स्थानच नव्हते, समाजाच्या दृष्टीने तो एक उपेक्षित आणि उपकृत घटक!)

तशीच ही सिंधू आमच्याही मनात अजरामर होऊ पाहतेय, पण मी ही सिंधूंची असहाय जमात नष्ट करणार. प्रवाहाविरूद्ध पोहोण्याचं धाडस यापूर्वीही एकदा केलंय, पुन्हा करेन आणि खात्रीने तीर गाठेन. आणि हा आनंद साजरा करायला मी एकटी नसेन तर त्या माझ्या सार्‍या भगिनी असतील ज्या धडपडताहेत या असहायतेच्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी!
मी नक्की लढेन, एकटी- समाजव्यवस्थेविरूद्ध, परंपरेच्या चौकटीविरूद्ध कारण माझी असहायता, घुसमट या चौकटीत मावत नाहीये. ती चौकट रूंदावण्याचा प्रयत्न करेन. नाहीच जमलं तर फाडून टाकेन. आधीही फाडली होतीच की चौकट तुझ्यासाठी. आता मी ही चौकट फाडणार आहे माझ्या बापासाठी, सिंधूच्या असहाय बापासाठी! त्याला न्याय देण्यासाठी!! उगाच लेकीचं दु:ख बघून त्यानं असहायतेने झुरून मरण्यापेक्षा या लढ्यात तिच्या पाठीवर हात ठेऊन लढ म्हणावं, तेही स्वतःचा कणा ताठ ठेऊन!
माझ्या या लढ्यात मला साथ देशील आशी आशा आहे, अपेक्षा नाही... सप्तपदीवेळी आयुष्यभराच्या साथीच्या शपथा घेतल्यावर तेवढ्या साथीची आशा तर करू शकते ना... नाहीतर कुणी सांगावं, तू ही एका सिंधूचा असहाय बाप असू शकशील!

ललितः I'm Good At Being Me....


छान हे विशेषण व्यक्तीसापेक्ष आहे. व्यक्तीपरत्वे बदलते.
म्हणजे जर मी "आपण भलं आपलं काम भलं" या कॅटॅगरीतली आहे तर काहीजणांच्या मते मी छान आहे... कारण मी त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात त्यांना नको असताना विनाकारण नाक खुपसत नाही. सहज चौकशी केल्यासारखे दाखवून त्यांच्या दुखर्‍या नसांवर बोट ठेवत नाही, खवचटपणे हसत हसत भोचकपणा करत त्यांच्या बातम्या काढत नाही त्यांच्यासमोर गुडी गुडी बनत इतरांकडे त्यांच्या बातम्या माझ्याकडच्या मीठमसाल्यात घोळवून चविष्टपणे चघळत नाही... पण याउलट मात्र काहीजणांच्या विशेषतः काहीजणींच्या मते मी फारच शिष्ट या कॅटॅगरीत मोडते. माणूसघाणी, कोणाकडे यायला नको कोणाकडे जायला नको, कोणाची कसलीही 'विचारपूस' करीत नाही, कोणी केलीच तर स्वतःचा ताकास तूर लागू न देता हसत हसत प्रश्नांना बगल देते वगैरे... पक्की आतल्या गाठीची!


छान हे विशेषण परीस्थितीसापेक्षसुद्धा आहे. म्हणजे असा बघा हं... आता एखाद्याला मदतीची खूप खूप गरज आहे, आणि कर्मधर्मसंयोगाने मी ती मदत करू शकले तर मी खूप छान असते. पण माझी हीच किर्ती ऐकून दुसर्‍यानेही माझ्याकडून मदतीची अपेक्षा केली पण ती माझ्या आवाक्याबाहेर असल्याने मी सौम्यपणे नाकारले तरी मी वाईट होत नाही पण मग छानही नसते.


छान हे विशेषण कालसापेक्षही आहे. कसे?
आज आत्ता माझ्याकडे वेळ आहे, मी निवांतपणे एखाद्याकडे जातेय, गप्पा मारतेय... मी खूप खेळकर, गप्पिष्ट आणि छान असते. पण उद्या जर मी काही व्यापात अडकले तर पूर्वीचा वेळ देऊ शकेनच असे नाही. "बघा, तेव्हा गरज होती आमची म्हणून सतत येणं व्हायचं आणि आता काय 'मोठ्ठे लोक' झालेत... वेळ कुठाय आमच्यासारख्यांसाठी?" अर्थातच मी छानच्या सिंहासनावरून पायउतार!






छान हे विशेषण अनुभवसापेक्षपण आहे.
मला एखाद्या व्यक्तीचा पूर्वीचा अनुभव तितकासा चांगला नाही आणि तरीही मी मनात अढी न ठेवता तिच्याशी पूर्वीच्याच मोकळेपणाने वागले तर मी खूपच छान असते, पण जर मला नाही जमलं मोकळेपणाने वागायला तर तो माझा नैसर्गिक मनुष्यस्वभाव मला छानपणाच्या किताबापासून लांब ठेवतो.

हे झालं माझ्याबद्दल! पण "मी अशीच आहे, हवे तर स्वीकारा नाहीतर राहीलं" असं म्हणताना इथे मीही समोरच्याच्या जागी असतेच की बर्‍याचवेळेस! आपण समोरच्याबद्दल पटकन मत बनवून मोकळे होतो. त्याला उसंतही देत नाही पुरेशी, व्यक्त होण्यासाठी! आपण आपल्याला त्याच्या जागी ठेऊन किती वेळा पाहतो? बर्‍याचवेळेस आधी घमेंडी, माणूसघाणी शिष्ट वगैरे वाटलेली व्यक्ती काहीकाळाच्या संपर्काने छान मनमोकळी फ्रेंडली वगैरे वाटू शकतेच ना. आणि कधी कधी गोSSड वागणारी वाटणारी व्यक्ती तुमचा गैरफायदा घेऊ शकते. त्यामुळे छान बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुम्ही तुम्हीच राहणं महत्वाचं आणि विशेषणांच्या घोळात अडकवण्यापेक्षा समोरच्यालाही तोच राहू देणं!!! कारण कोणीच परफेक्ट नसतं!!

ललितः Share Smiles... Be Santa Claus





२४ डिसेंबरच्या रात्री, उशाशी हळूच मोजा लटकवून, डोळे मिटून सँटाला हळूच विशलिस्ट सांगण्याऐवजी कधी व्हावे आपणच एक मोठ्ठा सँटा!लालमलाल वेलवेटचा तंग पोशाख चढवून लालचुटूक टोपीच्या पांढर्‍याशुभ्र फरचा गोंडा उडवत स्वार व्हावे बेभान रेनडिअर गाडीवर! स्वारी करावी शहराशहरांतून! लालेलाल मखमली जादुई पोतडीतून हास्य वाटत फिरावे. घराघरांच्या खिडक्यांतून हळूच डोकवावे अन पाहावे... उशाशी लटकवलेले मोजे... मग निरखावे न...िरागस चेहरे- श्रांत क्लांत निजलेले; सार्‍या आशा अपेक्षांचा भार सँटाच्या दमदार खांद्यांवर निश्चिंतपणे सोपवून; अपार विश्वासापोटी!!
हवे ते सर्व देईलच की सँटा आणि सर्व दु:खे पळवून लावेल आपल्या गडगडाटी हास्याने.

त्यांचा हा सँटावरील भाबडा विश्वास सार्थ ठरवत प्रत्येकाच्या मोज्यात टाकावे मूठभर प्रेम, एखादं निखळ हास्य आणि चिमूटभर विश्वास्-पुढच्या नाताळपर्यंत पुएल एवढा! बस्स!! आणखी काय हवं असतं? आणि कधी किलबील डोळे जागे दिसलेच - भिरभिरणारे अन सँटाची वाट बघत जागणारे, 'मागच्यावेळी हवं ते दिलंच नाही, आता प्रत्यक्षच मागूया' असं म्हणत रूसून बसलेले... तर द्यावा एक गोडसा पापा आणि बाऊल भरलेल्या लालचुटूक आरस्पानी जेलीसारखे थुलथुलणारे पोट हलवत गडगडाटी हसावे, "हो हो हो!" अन म्हणावे, "काय हवंय सांग तुला_ प्रयत्न नक्की करेन देण्याचा!"

जादुच्या पोतड्यातील गमतीजमती पटापट सगळ्यांना वाटून आणि सगळ्यांचे मोजे आनंदाने भरून मग दमून भागून परतावे आपल्या घरी-- रात्र सरायच्या आत!! हळूच आपल्या उशाशी ठेवावा एक छोटासा मोजा लटकावून -- कुणी सांगावं, आपल्यासारखाच एखादा सँटा त्यात काय काय गम्माडीजम्मत ठेऊन जाईल!!!

कारण- "आपल्या सर्वांच्यातच एक हसरा प्रेमळ सँटाक्लॉज लपलेला असतो..." Share Smiles... Be Santa claus
                                                                                                                  ... स्वप्नाली वडके तेरसे

ललित : मुंबई - यंगीस्तानची!!!




मुंबई - उत्फुल्ल चैतन्याची! सळसळत्या नवतारूण्याची, उमेदीची, जिद्दीची, कर्तृत्वाची!! आकर्षक रंगांची, मनमोहक सुगंधांची!! खळखळून हसण्याची, भरभरून जगण्याची!! नवनवीन ट्रेण्ड्सची, विविध फॅशनची!! मुंबई - यंगीस्तानची!!!

लिवाईस, पेपे इत्यादी ब्रँण्ड्सबद्दल चोखंदळ असलेले मुंबई यंगीस्तान तितक्याच उत्साहाने आणि उत्सुकतेने फॅशनस्ट्रीटवरही शॉपिंग करतात. तसेच चटपटीत चाट आवडीने चाखणार्‍या या मुंबई यंगीस्तानने वि...विध "खाऊब्रँण्ड्स"नासुद्धा आपले फ्रेंण्ड्स बनवले आहे. मकडी उर्फ मॅकडी उर्फ मॅकडोनल्ड्सचे बर्गर्स, पफ्स, सोनेरी फ्राईज, पिझ्झाहट व डॉमिनोजचे एक्स्ट्रा चीज पिझ्झाज... "पार्टी करनेवालोंको पार्टी का बहाना चाहीये". डेलिशिअस हँडी मेन्यू, होम डिलीव्हरी, सोबतीला चिल्ड कोल्ड्रिंक्स आणि धिंगाणा घालणारा मित्रपरीवार असेल तर सेलिब्रेशनसाठी वेगळा बहाणा कशाला? एकत्र जमलो की पार्टीमूड आपोआपच येतो!

घरात बोअर होतंय? तर मग मित्रांसोबत चिलआऊट करायला बरीस्ता वा सीसीडी आहेतच की! न संपणार्‍या गप्पा, धम्माल खेचाखेची आणि सोबत गंधाळलेली वाफाळती कॉफी.... अन तोंडात विरघळणार्‍या मुलायम यम्म्म्म्म्म्म्म्म्म्म पेस्ट्रीज!!!

बर्थ डे आहे तर केक हवाच राव! पण आता केक खाण्यासाठी बर्थ डेजची वाट कशाला बघायची? लुसलुशीत केक्सचे स्मॉल व्हर्जन्स असतात ना माँजिनीजमध्ये... तितकेच डिलीशियस, तितकेच यम्मी क्रिमी!!

ऊऊऊऊऊऊ स्पाईसी लव्हर्स!! तंदूरी आणि ज्युसी कबाब्ज तुमच्यासाठीच! इटालियन, चायनीज, कॉन्टीनेन्टल... टेस्ट बड्स कमी पडतील पण चवी??? अहं!!! मॅकरोनी, स्पघेटी, पास्ताज, नूडल्स, टॅकोज आणि इतरही बर्र्च काही!! डाएट कॉन्शस असाल तर सँडविचेस त्यातही थोडा स्पाईस तो चलता है- तर ग्रील्ड! स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स चुरचुरीत, कुरकुरीत, खुसखुशीत, लुसलुशीत, कुडकुडीत... क्रिस्पी, क्रंची, टँगी, टॅकी, स्पाईसी, क्रिमी, सॉफ्टी... विविध चवीढवी! देशविदेशांतील फ्लेवर्स आपल्या चटपटीत झणझणीत मसाल्यांमध्ये घोळून अधिकच खमंग होतात आणि जिभेला बोलण्याचीही उसंत न देता कधी पोटात गडप्प होतात... समजतही नाही!

खरं तर इतर गोष्टींप्रमाणे चवीच्या बाबतीतही चोखंदळ असलेल्या यंगीस्तानला खाण्याचा तर एक बहाणा असतो... नाहीतर घरपोच मिळणार्‍या एक्स्ट्रा चीज पिझ्झ्याचे सहाच्या सहा पिसेस एकट्याने गट्टम करण्यापेक्षा खोक्यात उरलेला एकुलता एक पिझ्झ्याचा तुकडा, दोस्तांच्या नकळत गट्टम करण्यात आणि लागलंच तर शेअरिंगपेक्षा "जो माझा आहे तो माझाच आहे, जो तुझा आहे तोही माझा" असं हक्कानं म्हणत झगडण्याची जी वेगळीच लज्जत आणि खुमारी आहे ती त्या पदार्थाला अधिकच लज्जतदार खुमासदार बनवते आणि आयुष्यालाही!!!

                                                                                                                  ...स्वप्नाली वडके तेरसे






मुंबई - मायानगरी, चकमकाटाचं झगमगाटाचं शहर, गर्दी गोंगाटाचं शहर, घड्याळाच्या काट्यावर धावणार्‍या घामट चिंबट जीवांचं शहर, कष्टकर्‍यांचं शहर, हातावरच्या पोटाचं शहर, चालता चालता खाणार्‍यांचं शहर, चटपटीत चमचमीत स्वस्त आणि मस्त खाऊ खिलवणार्‍यांचं... शहर...
हॉटेल्स, रेस्तराँ, मॉटेल्स, कॅफेज, स्टॉल्स मॉल्सचं शहर... ढाब्यांचं खाऊगल्ल्यांचं, चाट, उसाचा रस, नारळपाणी, बर्फाचा गोळ्या इत्यादींच्या गाड्यांचं नी ठेल्यांचं शहर!

पाणीपुरी, सेवपुरी, रगडापूरी, बटाटापूरी, भेलपूरी, दहीपूरी यांची लिस्ट कधी होईल पुरी? झणझणीत वडापाव, खमंग बटाटाभजी, कुरकुरीत खेकडा कांदा भजी, चुरचुरीत समोसेपाव, चटपटीत मिसळ पाव, मसालेदार पावभाजी, मेस्सालेवाला डोसा यांची लज्जत एका वाफाळत्या कटींग्शिवाय फारच अधूरी!
तोंड गोड करायचंय? कशाला हवीय बर्फी नी स्वीट्स? गारेगार बर्फाचा गोळा, गर्मागरम जलेबी, मलईदार थंड लस्सी, गोड गोड नारळाचं पाणी, मिरेपूड नी चाट पावडर भुरभुरवलेलं फ्रूट सॅलड, थंडगार आले-लिंबू मिश्रीत ऊसाचा रस- स्वस्त नी मस्त!

वेळ कोणाला आहे हॉटेलात जा नी ऑर्डर सोडून ताटकळत बसा... हातातच वडापाव घ्या नी पटकन ट्रेन पकडा... एका हाताने वर पकडून वजन तोलत दुसर्‍या हातातील वडापावचा आस्वाद गर्दीमध्येच घ्या... लोकांच्या कलकलाटात, रेल्वेच्या खडखडाटात! मॅक्डोनल्ड चे बर्गर, पिझ्झाहटचे चीजवाले पिझ्झाज, डॉमिनोजचे मेन्यूज नी डीप्स झक मारतात चटपटीत चाट, खमंग वडापाव आणि हिरव्या लाल झणझणीत चटण्यांपुढे! सीसीडीची नी बरीस्ताची कॉफी असेलही हो बरी पण वाफाळत्या कटींगची चवच न्यारी! भुरभुरत्या पावसात काय लागतं? सोबतीला "आपलं" माणूस नी हातात लिंबू तिखट चोळलेला गरमागरम भुट्टा... अहाहा! आजारी पडू? हरकत नाय! भेसळीचे खाऊन तरी मिळतंय काय?
आपली मुंबई- जीवाची मुंबई --- "जिव्हा"ळ्याची मुंबई!!!
                                                                                                                 ...स्वप्नाली वडके तेरसे

ललित : ग्रे शेड






"There is no black-and-white situation. It's all part of life. Highs, lows, middles." - Van Morrison


कोणीही अगदी काळेकुट्ट आणि पांढरेधोप्प व्यक्तीमत्वाचे नसते. आपल्यापैकी सर्वचजणांच्या व्यक्तीमत्वाला कमीअधिक प्रमाणात ग्रे शेड असते.
खरं तर... संपूर्ण काळ्या किंवा संपूर्ण पांढर्‍या व्यक्तीमत्वाचे लोक असूच नयेत. संपूर्ण काळ्या व्यक्तीमत्वाचे लोक इतरांना जगू देत नाहीत आणि संपूर्ण पांढर्‍या व्यक्तीमत्वाच्या लोकांना इतर जगू देत नाहीत. त्यापेक्षा करडा परवडला. जसा हल्लीच्या कंटेपररी इंटेरिअर डेकोर मध्ये ग्रे कलर थीम रॉयल मानली जाते... तसंच हे! हा करडा रंग तुमच्या व्यक्तीमत्वाला आवश्यक तितका करारीपणा आणि सौम्यपणा यांचे अनोखे मिश्रण बहाल करतो... रॉयल रिचनेस बहाल करतो...

ग्रे..करडा..राखाडी.. काळ्या-पांढर्‍याचा बेमालूम मिलाफ! परीस्थिती, वेळ, समोरील व्यक्ती आणि अनुभवांच्या जोरावर आपण आपल्या व्यक्तीमत्वातील पोतांमध्ये काळ्या किंवा पांढर्‍या छटेचा अंश वाढवत/कमी करत असतो...

                                                                                                                              .... स्वप्नाली वडके-तेरसे

हे ही दिवस जातील...!!!


हातातील टिफीनबॉक्स काहीश्या नाराजीने टेबलावर ठेवत त्याने स्वतःला सोफ्यावर भिरकावले...अस्ताव्यस्त... काही क्षण जमीनीकडे खिळून पाहत तो गप्प राहीला. पाण्याचा ग्लास पुढे केलेला त्याचा बायकोचा हात काही क्षणासाठी थबकला. कडेवरच्या पिल्लाने बाबाकडे झेप घेण्यासाठी चळवळ केली... एरवी दारातूनच आपल्याला घेण्यासाठी हात आणि हास्य रूंदावणार्‍या बाबाने आज आपल्याकडे पाहीलेही नाही... काही झालंय का? असा प्रश्न त्या न...िरागस पिल्लाला कुठून पडणार. बायकोने ओळखले... काहीतरी अघटीत घडलेय! ती पिल्लाला चुचकारू लागली. तिच्या बांगड्यांच्या किनकिनाटाने तो भानावर आला. काही क्षण पिल्लाकडे पाहून त्याने बायकोकडे नजर वळवली... हताशपणे पुटपुटला... कामावरून काढून टाकलं... इन्टिमेशनही न देता...!

"आता???" हा त्यालाही छळणारा प्रश्न अलगद तिच्याही डोक्यात शिरला... पण चटकन स्वतःला सावरत ती त्याच्याशेजारी बसली... बाबाकडे झेपावणार्‍या पिल्लाला एका हाताने सावरत तिने त्याच्या केसांतून ममत्वाने हलकेच हात फिरवला... इतका वेळ थोपवलेल्या भावनांचा कल्लोळ झंझावत बाहेर पडला... "असं कसं करू शकतात ते माझ्यासोबत! आणखी दहा-बाराजणांनाही कमी केलं. पण माझा आजवरचा रेकॉर्ड बघायचा...परफॉर्मन्स तरी लक्षात घ्यायचा. दिवस रात्र एक करून या कंपनीसाठी झटलो... तुझ्या प्रेगनन्सीच्या वेळी तुला माझी सर्वात जास्त गरज असूनही प्रोजेक्टची डेडलाईन पाळण्यासाठी ओव्हरटाईम केला... पिल्लू चातकासारखी वाट बघतो, त्यालातरी कुठे वेळ देता येतोय... श्याSS वैताग आलाय या आयुष्याचा!" त्यानं त्राग्यानं हात सोफ्यावर आपटला. पिल्लू बिथरलं होतं, शांतपणे टकामका बाबाकडे पाहत होतं. तिला त्याचा त्रागा हताशपणा समजत होता. घरकुलासाठी, पिल्लाच्या भविष्याच्या तरतूदीसाठीची त्याची धावपळ ती बघत होती. पण ती गप्प राहीली. आत्ता त्याला भडास काढून टाकू दे... मोकळं होऊ दे. तो बरंच काही बोलत होता...अचानक थांबला... बायकोच्या डोळ्यांत पाहत कळवळून त्याने विचारलं, "आता???" मोठाच गहन प्रश्न होता... तिलाही तो सतावत होताच! महागाई वाढतेय. पिल्लाला सांभाळण्यासाठी आपण नोकरी सोडली. त्याच्या पगारात कसंबसं निभावत होतं पण वाढते खर्च भागवायचे म्हणजे... क्षणभरच! स्वत:च्या मनातील सर्व काळज्यांना मागे सारत तिने हलकेच त्याचा हात स्वतःच्या हातात घेतला... हळूवारपणे पण ठामपणे ती म्हणाली, " हे ही दिवस जातील..." त्या उबदार स्पर्शाने आश्वासक शब्दांनी त्याच्या चेहर्‍यावरील काजळी काहीशी मंदावली.

त्याने नवीन नोकरीसाठी धडपड चालू केली. पिल्लाला सांभाळून तीही त्याला मदत करत होती... पेपरमधील जाहीराती कापून ठेवणे, त्याचा बायोडेटा अपडेट करायला मदत करणे... पिल्लू मात्र खूश होतं... बाबा बराच वेळ मिळत होता त्याला. पिल्लाच्या निखळ खळखळाटाने, आनंदी किलबिलाटाने नी निरागस चेहर्‍याने त्याला नवीन हुरूप मिळत होता. इंटर्व्हूजचं चक्र चालूच होतं. पण अजूनही जमत नव्हतं कुठेच! पुंजी हळूहळू आटत चालली होती. धीर सुटतोय की काय अशी परीस्थिती निर्माण होते न होते तोच...
एक दिवस तो आला... धापा टाकत... तिला दारातूनच हाका मारत... धावत आला होता वाटते... धसकून घाईघाईने तिने दार उघडलं... तिचे दोन्ही खांदे अलगद दाबत हसर्‍या चेहर्‍याने त्याने तिच्याकडे पाहीलं... पिल्लू रांगत रांगत आलंच मागून... त्याला झटकन उचलून त्याने गरागरा फिरवलं... एवढा आनंद म्हणजे... तिच्या तोंडात पेढा कोंबत तो गदगदत्या स्वरांत म्हणाला... मला नवी नोकरी मिळालेय! आधीच्या कंपनीहून अधिक ऑफर केलेत, पोस्टही वरची आहे... आता सगळं नीट होईल... आता सगळंच अगदी छान होणारेय! त्याच्या डोळ्यात तरळलेल्या आनंदाश्रूंनी ती सुखावली. दोन्ही हात छातीशी धरून तिनं वर बघत देवाचे आभार मानले... अस्पष्ट स्वरांत पुटपुटली..." हे ही दिवस जातील..."!!!


.... स्वप्नाली वडके-तेरसे

ललित : मै अपनी फेवरेट हूं!!!


पूलाखालून धडधडत येणारं रेल्वेचं धूड ओझरतं पाहीलं तिने आणि पावलांचा वेग वाढवून चक्क पळत सुटली...आजूबाजूच्या गर्दीची, धक्क्यांची तमा न बाळगता... लोंढ्यासोबत लेडीज डब्यात स्वतःला झोकून देत एका कोपर्‍यात स्थिरावली. गाडीने वेग घेतला. संध्याकाळच्या पिवळसर सोनेरी उजेडाने आणि मंद वार्‍याने ताण सैलावला. अचानक काहीतरी आठवून... मगाशी पूलावरून धावतानाचा तो ओंगळ स्पर्श... अगदीच नकोसा... रागाने नापसंतीचा कटाक्ष टाकला तर ते लाचार ओंगळ हास्य गाळणारा चेहरा!!! आजूबाजूच्या गर्दीतलाच! रूमालाने खसखसून पुसला दंड तिने! "श्शीSS काय सुख मिळवतात असल्या चोरट्या स्पर्शाने?" सोनेरी संध्याकाळ, मंद सुखावणारा वारा कश्श्या कश्श्यानं तिचा गेलेला मूड परत येणार नव्हता... त्या नकोश्या आठवणी तोंड कडू कडू करून गेल्या.
रोजच्या रोज याच बातम्या... आज हिच्यावर रेप उद्या तिचा विनयभंग, आज हिच्यावर बलात्कार उद्या तिच्यावर अत्याचार! प्रसंग, ठिकाणे, व्यक्ती, तारखा, अत्याचारी व पीडीत वयोगट, चेहरे, नाती... वेगवेगळे... वेदना त्याच!! आयुष्यभरासाठीची स्वतःच्याच शरीराची किळस वाटायला लावणार्‍या... झोपेतही ते ओंगळ स्पर्श, बिभत्स चेहरे जाणवून देणार्‍या... आरश्यातील स्वतःच्याच प्रतिबिंबाला स्वतःसकट संपवावं असं कित्येकदा वाटायला लावणार्‍या... आयुष्यभर!!!

काल सकाळीपण रोजच्या गर्दीला, विखारी नजरांना, ओंगळ स्पर्शांना चुकवत धापा टाकत ती ऑफीसात शिरली. कपाळावरचा घाम टिपत दम खाईपर्यंत बॉयने चहाचा वाफाळता कप पुढ्यात ठेवला. शेजारच्या टेबलावर चाय टाईम मैफील जमली होती. "शी किती दिवस हे अत्याचारी लोक असे उजळ माथ्याने नवनवे गुन्हे करत नवीन सावजं शोधत फिरणार?" " तर काय? त्या बिच्चार्‍या मुलीचं काय? तिच्या घरचे? तोंड लपवून आयुष्य काढावं लागत असेल नै?" "कोण लग्न करणार अशा मुलींशी?" "पण काय हक्क आहे अशा रितीने कोणाचे आयुष्य उध्वस्त करायचा?"
सावज काय, बिच्चारी काय? छान आलं-वेलचीने गंधाळलेल्या चहाचा घोट तिच्या तोंडात कडवटपणे फिरत राहीला. "पण मुलींनीही जरा आवर घातला पाहीजे ना स्वतःच्या वर्तनाला... स्टाईल्स, फॅशन्सच्या नावाखाली प्रव्होकेटींग ड्रेसेस घालून सुंदर, नोटीसेबल दिसण्याची हौस तर त्यांनाच असते ना... कशाला वेळी अवेळी पब्ज, मूव्हीज, पार्टीज हवेत?" ताडकन तिने नजर वळवून बघीतलं... तिचा प्रोजेक्ट लीड!!! चहाचा कप जवळजवळ टेबलावर आपटून तिने त्या मैफीलीकडे मोर्चा वळवला... "ओ प्रव्होकेटिंग ड्रेसेस? आई किती वर्षांची आहे रे तुझी? काम करते? कपडे वगैरे धूत असेल... बादलीतून कपड्यांचे पिळे वाळत घालताना तिचा पदर सरकला तर ती प्रव्होकेट करते का रे बघणार्‍याला? तुझी बायको नोकरी करते ना? प्रोजेक्ट रिलीजच्या वेळी उशीरापर्यंत ऑफीसात थांबून कंपनीच्या बसड्रायव्हरला ती मोटीव च देते कि नाही की आ बैल मुझे मार! मुलगी आहे ना तुला? झाली असेल आता पाच-सहा महीन्यांची! गोड गोंडस हसून शेजारच्यांना प्रोवोकेट करत असेल... बातम्या वाचतोस ना रोज आणि टिव्हीवरचे न्यूज चॅनेल्स सर्फ करतोस की नाही? नव्वद टक्के पीडीत मुली सहा महीन्यांच्या अजाण बाळांपासून चौदा पंधरा वर्षांच्या नुकत्याच उमलू पाहणार्‍या कोवळ्या कळ्या असतात. त्या काय प्रव्होकेट करणार रे? बसमध्ये गर्दीत जागा नसताना शरीर आकसून स्पर्श चुकवताना मागून पुढून चिकटल्यानंतर तुमच्या अवयवाला स्वर्गीय सुख मिळतं ना? आम्हाला आमचा आणि कधी कधी तुमचाही अवयव कापून टाकावासा वाटतो. अंगाप्रत्यंगावरून फिरणार्‍या नजरा पाहील्या की अंगभर ओढणी असेल तरी सारखी करायला हात वर जातो... लाळ गाळणारे चेहरे नजरेसमोर आणि किळस वाटायला लावणारे स्पर्श  अंगावर, मनावर घेऊन दिवसभर वावरतो. दगडाचं का बनत नाहीये हे मन! प्रयत्न केला तरी पुसले का जात नाहीयेत हे स्पर्श? मनातून रेंगाळत राहतात आणि शरीरावर वळवळत राहतात... सात वर्षांच्या मुलीला समजतात का रे हे स्पर्श काय सुख देतात ते? आय वॉज रेप्ड इन द एज ऑफ सेव्हन!! अ‍ॅण्ड एव्री नाईट बीईंग रेप्ड इन माय मेमरीज!!!" आपला आवाज वाढलाय हे समजल्यावर तिने आटोपतं घेतलं... "सो कॉल्ड इंजिनीअर म्हणे! अडाणी रेपीस्ट परवडले यांच्या मेंटॅलिटीपुढे... करतात, सोडून देतात! हे आयुष्यभर आठवण करून देतात आमच्या सडलेल्या शरीराची आणि सो कॉल्ड योनीशुचितेची!!!" धुमसत तिने ऑफीस सोडलं होतं!

सतत २ दिवस विचार करकरून डोकं जड झालेलं त्यामुळे अचानक वाजलेल्या बेलचा आवाज अजूनच कर्कश्य वाटला. कुरकुरतच तिने दरवाजा उघडला. बाहेर एक प्रसन्न व्यक्तीमत्व होतं. "मी डिस्टर्ब तर नाही ना केलं?" बाहेरील सकाळपेक्षा प्रसन्न हसत त्या तरूणाने विचारलं. तिच्या कपाळावरील अस्पष्ट आठ्यांना दुर्लक्षित त्याने स्वतःची ओळख करून दिली. अत्याचारी पीडीत मुलींच्या पुनर्वसनासाठी सेवाभावी संस्थेत तो सक्रीय कार्यकर्ता होता. अत्याचारी मुलीला तिच्या नातेवाईकांच्या हेटाळणीपासून वाचवून, आईवडीलांनी वाळीत टाकल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहून समर्थपणे मानाने आयुष्य जगायला शिकवले जायचे तिथे. मुलींना स्वतःबद्दलची अपराधी भावना काढून टाकून स्वतःवर प्रेम करायला शिकवले जायचे.
'बरं मग'? या तिच्या चेहर्‍यावरील प्रश्नचिन्हाचे उत्तर म्हणून तो पुन्हा प्रसन्न मंद हासला. आपले तिच्याकडे जाण्याचे प्रयोजन तिला समजावून सांगत म्हणाला..

 "नकोसे स्पर्श झेलत, नकोश्या नजरांना टाळत तर कधी दुर्लक्षत पण ते ओझे कायम स्वतःच्या संवेदनाशील मनावर बाळगत कितीजणी जगत असतात. अपराधी भावनेने त्या स्पर्शांपासून स्वतःचंच अंग चोरत! आपली यात काहीच चूक नाही... हे शरीर आपलं आहे, सुंदर आहे... अजूनही!!! हे कायम त्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करावा लागतो. मी करतो पण लिंगभेदामुळे त्यांना पुरेसा विश्वासार्ह वाटत नाही, रादर मी स्वतःच तितकंसं रिलेट करू शकत नाही... "एका श्वासाच्या विश्रांतीनंतर आपले काळेभोर शार्प डोळे तिच्यावर रोखत तो स्पष्टपणे म्हणाला..."जितकं तू करू शकशील! मला, आमच्या संस्थेला तुझी गरज आहे. आणि कदाचित तुलाही..."

तिला "हो / नाही"च्या आंदोलनांमध्ये तसेच सोडत तो उठला... जाता जाता वळून म्हणाला... "मला तुझा अ‍ॅड्रेस तुझ्या प्रोजेक्ट लिडने दिला... आणि हो त्यानं तुला मनापासून सॉरीही म्हटलंय! उद्या ऑफीसात म्हणेलच! तो म्हणाला की तू खूप सिन्सीअर, हुशार आणि संवेदनाशील व्यक्ती आहेस, प्रसन्न आणि आनंदीही असावीस पण स्वतःला कोशात दडवून ठेवलं आहेस... तुला खरंच गरज आहे, व्यक्त होण्याची!! मुक्त होण्याची!! जमेल तुला नक्की, विचार कर. तुझ्यासारख्या कितीतरी जणींना गरज आहे तुझी!!!" तो गेला... तिला एक नवी दृष्टी देऊन! स्वतःवरच प्रेम करायला शिकवून! त्याच्या पाठमोर्‍या प्रतिमेकडे कितीतरी वेळ ती पाहतच राहीली... कितीतरी दिवसांनी आजची सकाळ प्रसन्नपणे हसतीये काय? आरश्यातल्या प्रतिबिंबाकडे स्वतःलाच न्याहाळत असताना एक गोड लाडीक गिरकी घ्यायचा अनावर मोह झाला... लहानपणी घ्यायची तसा... "मै अपनी फेवरेट हूं" म्हणणार्‍या जब वी मेटमधील गीतसारखा!!!
                                                                          ...स्वप्नाली वडके तेरसे.