ललितः सिंधूचा बाप


                                                                                                                     मायबोलीवर पूर्वप्रकाशित....


"आज माझा प्रत्येक अश्रू
हरएक शब्द बनला आहे;
म्हणूनच जीभेला धार अन
डोळ्यांना कोरडेपणा आला आहे..."

ग्रॅज्युएशनपर्यंत चौकटीतलं आयुष्य जगत होते. चौकटीतल्या परीघाला स्वतःचं जग समजून सुखी होते. डिग्री, मग नोकरी आणि मग लग्न- सगळं कसं चौकटीसारखं आखीव्-रेखीव. लग्नाबद्दलच्याही अपेक्षा चौकटीतल्या! आईबाबांनी बघून दिलेला, अनुरूप आणि मला समजून घेणारा नवरा...माफक अपेक्षा होत्या माझ्या. अगदी स्मार्ट, देखणा वगैरे कॅटेगरी नको पण डोळे आणि हास्य छान असावं निदान छाप पाडणारं असं आपलं उगाचच वाटायचं. अर्थात तिथेही तडजोडीची तयारी होतीच. (काये की 'मुलगी' म्हणून जन्माला आलं तर बंडखोरी वगैरे एका विशिष्ट वयापर्यंत खपवून घेतली जाते... मग अपेक्षांचं जू मानेवर बसतं ते कायमचं)
पण अचानकच वार्‍याने रोख बदललामुळे ढगांनी वार्‍याबरोबर पाठ फिरवून चालू लागावं तसं तू भेटलास आणि माझ्या अपेक्षांच्या ढगांची पांगापांग झाली. चौकट विस्कळीत कधी झाली आणि फ्रेमच्या कोपर्‍यातून अपेक्षांचा एक तुकडा बाहेर कधी डोकवायला लागला कळलंच नाही. प्रकर्षाने वाटलं की तू चारचौघांपेक्षा खूप वेगळा आहेस आणि काही बाबतीत तू आहेसही. आईने आणि मी आटोकाट प्रयत्न केला फ्रेमच्या चौकटी रूंदावण्याचा (आईला कदाचित खात्री होती माझ्या निवडीवर!) पण बाबा मात्र परंपरांची चौकट सोडायला तयार नव्हते...
मग मीही हट्टाला पेटले. आयुष्यात पहिल्यांदाच! अपेक्षांचा तो डोकावलेला तुकडा तुझ्यासकट आणि माझ्या स्वप्नांसकट बाबांच्या परंपरावादी रूढीप्रिय चौकटीत कोंबायचा निष्फळ प्रयत्न करून पाहीला... नाहीच जमलं... मग टराटरा फाडून टाकली ती चौकट! बाबा बिथरले... आणि त्यांच्यापेक्षा जास्त मी..! माझंच हे रूप मला अनोळखी होतं... आपले सर्व हट्ट पूर्ण करणार्‍या बाबांना कधी दुखवायचं नाही असं ठरवूनही...
तसंही आपण आपल्याच अपेक्षा कुठे पूर्ण करू शकतो? हातातून निसटून आरसा फुटल्यावर विखुरलेल्या आरश्याच्या तुकड्यांत दिसणारी असंख्य प्रतिबिंबे एकाच व्यक्तिची असली तरी सारखी थोडीच असतात??
प्रवाहाविरूद्ध पोहताना बरीच दमछाक होणार हे माहीती होतंच... पण तारूण्याची रग आणि तुझ्या प्रेमाने बहाल केलेली बंडखोरी ही दोन वल्ही पुरेशी वाटली तेव्हा, माझ्या आयुष्याचं तारू जीवनसागराच्या अथांग प्रवाहात झोकून द्यायला. वाटलं तुझी साथ मिळेल... आत्ता आत्ता कुठे भार हलका करतोयस माझा असं वाटेपर्यंत धडपडायचे... असंख्यवेळा तोंडघशी पडले...

नाकारले जाण्याचा पहिला प्रसंग... "तू आमच्या जातीची नाहीस, घरी पसंत नाही..."अरेरे! लग्नातही तेथे पाहीजे जातीचे??
आता तुमच्या जातीत जन्माला नाही आले, हा माझा दोष कसा? आणि तुम्ही आमच्यापेक्षा उच्च कुळात जन्माला आलात त्यात तुमचं क्रेडिट कितीसं? पण हे प्रश्न गौण होते आणि ते विचारण्याचा मला मुळीच अधिकार नव्हता. एकतर मी मुलगी त्यातून खालच्या जातीची! मग वाटलं असू दे. माझं प्रेम, माझा चांगुलपणा यातूनही तारून नेईल मला.
एकीकडे मानसिक कुतरओढ तर होतंच होती... तू आणि बाबा यातील निवड करण्याची वेळ येऊ नये एवढीच प्रार्थना करत होते... नसतेच करू शकले...
पण तरीही कळत नकळत तुझ्याकडे पारडं झुकतं ठेवलं आणि बाबांना गृहीत धरलं, आजवर लेकीचे हट्ट पुरवले... आता आयुष्याचा निर्णय घ्यायच्यावेळी कसे अडवतील? आणि मी बाबांच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकले तरी माझ्या बाबांनी बापाचं कर्तव्य पार पाडलं... माझा बाप नरमला लेकीच्या हट्टापुढे!
माझा हळवेपणा, माझं तुझ्यासाठी झुरणं, तुझ्याबाबतीत फक्त ह्रदयाने विचार करणं तुला आवडायचं बहुतेक. प्रत्येक पुरूषाला आवडतं तसं 'सांभाळणं'. मग हळव्या क्षणी वाहावत जायचास. (मी तर कधीच वाहावत गेले होते, डोळ्यांना पट्टी बांधून स्वतःचं भविष्य नशीबाच्या हवाली करणार्‍या गांधारीप्रमाणे.)
"मला तुझ्याइतकं कोणीच सांभाळू शकणार नाही. तू खूप वेगळी मुलगी आहेस, माझं तुझ्याशी लग्न झालं तर माझ्याइतका नशीबवान दुसरा कोणीच नसेल..." अशासारखी तुझी वाक्ये अंगावर मोरपिस फिरवून जायची. मी सुखवायचे तात्पुरती का होईना.... मग 'लग्न झालं त'' ही शक्यताही नकळत नजरेआड व्हायची आणि माझ्या लग्नाची स्वप्ने पाहीलेल्या माझ्या बाबांच्याही माझ्याकडून काही अपेक्षा असू शकतात्-असतील हे त्या तात्पुरत्या सुखाच्या धुंदीत पूर्णपणे विसरून जायचे.
पण मी मात्र अजूनही नाकारले जातच होते, कधी तुझ्याकडून तर कधी तुझ्या घरच्यांकडून. तुझ्या प्रत्येक अटी मान्य करायचे, रडायचे, कळवळायचे. न केलेल्या चुकीची माफी मागायचे; आयुष्य त्रिशंकूसारखं अधांतरी लोंबकळत ठेऊन, याच आशेवर की कधीतरी माझी संसारची स्वप्ने पूर्ण होतील. तू बोलवायचास तेव्हा बोलवायचास तिथे यायचे, धावत पळत. तू रूसायचास, नाराज व्हायचास. कधी मला उशीर झाला म्हणून तर कधी माझ्या घामेजलेल्या अवताराकडे बघून. मी गयावाया करायचे, रडायचे तो तुला तमाशा वाटायचा..
प्रेमासारख्या अत्यंत अव्यवहार्य गोष्टीवर अजिबात विश्वास न टाकणार्‍या माझ्या बापाशी मात्र मी हिरीरीने भांडायचे, माझी बाजू मांडायचे.
तुला माहीत होतं मी माझ्या बाबांवर किती प्रेम करते ते... एक दिवस तू चिडलेलास आणि मी गयावाया करत होते. अचानक म्हणालास, "म्हण, माझा बाप नालायक आहे..." मी रडत रडत म्हणाले... खाडकन जाणवलं, हे काय बोलतेय मी... कोणासाठी...
मी रडत रडत पुन्हा फोन केला तुला आणि म्हणाले, "माझा बाप नालायक नाहीये, तुला माझ्याशी लग्न नाही करायचं तर नको करूस!" तुलाही ते जाणवलं, तू सॉरी सॉरी बोलत राहीलास... मी तुटत गेले, स्वप्नांची फुले तर कधीच कोमेजली... कुठल्या तोंडाने सांगू बाबांना, ज्याच्यासाठी तुम्हाला त्यादिवशी एवढं तोडून बोलले तो माझ्या मनाचाही साधा विचार करू शकत नाहीये... मग म्हटलं राहू दे, ते जरी तोंडावर कुत्सितपणे बोलले की,"बघ आधीच म्हटलं नव्हतं तुला..." तरी माझी तडफड त्यांना नाही बघवणार...
तू माफी मागितलीस, फ्रस्ट्रेशन आलेलं म्हणून राग तुझ्यावर काढला म्हणालास... काहीही चूक नसणार्‍या माझ्या बापावर तू निष्कारण राग काढलास हे तूही विसरलास आणि मी तर एक स्वार्थी, प्रेमांध, नतद्रष्ट मुलगी बनले होते, जिला आपल्या बापाच्या स्वप्नांपेक्षा स्वतःची स्वप्नं महत्वाची वाटत होती...
मग एके दिवशी परवानगी मिळाली तुमच्या घरून आपल्या लग्नासाठी. मी मागचं सगळं विसरून पुन्हा नव्याने स्वप्न बघू लागले... आतापर्यंतच्या माझ्या धडपडीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. पण सुखाच्या सायीची तृप्ती अंगभर पसरण्याआधीच पुन्हा कोलमडले. आजपर्यंत 'खालच्या जातीतली' म्ह्णून फक्त मला ऐकावं लागत होतं, आता माझ्या बापालाही ऐकावं लागलं होतं - लेकीला लंकेची पार्वती म्हणून 'दान' करणार असल्याबद्दल. आजपर्यंत त्यांनी केलेल्या संस्कारांचं, शिक्षणाचं, चांगुलपणाचं काहीच मोल नव्हतं. त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा माझ्यामुळे आणि माझ्यासमोर माझा बाप ढसाढसा रडला-"मला वाटत नाही का गं तुला काहीच कमी पडता कामा नये? परिस्थिती असती माझी तर केलं असतं गं तुझं सालंकृत कन्यादान..." आधी परिस्थितीने हतबल, नंतर पोरीच्या प्रेमापोटी हतबल आणि मग असहायतेनी हतबल! मुलीच्या बापाच्या अश्रूंमधील तडफड आणि हतबलता समजायला मुलीचा बापच व्हावं लागतं. सिंधूचा बाप पुन्हा एकदा मुलीमुळे असहाय ठरला होता, अपमानित झाला होती, हतबल झाला होता; एका लाचार प्रेमांधळ्या सिंधूमुळे!
मी एकटीच लढत होते, झगडत होते. तुझ्या साथीची अपेक्षा केव्हाच सोडून दिली होती, जेव्हा तू 'मुलाकडची बाजू' म्हणून स्वतःचं आणि घरच्यांचं समर्थन केलंस. आतून पुन्हा पुन्हा तुटत राहीले. कीव वाटली. अहं, तुझी नव्हे! समाजव्यवस्थेचीही नाही. स्वत:चीच! मुलीच्या सुखासाठी जबाबदारीचे जोखड अडकवलेल्या मान तुकवून निमूट अपमान सहन करणार्‍या सगळ्या वधूपित्यांची!
मी ज्या व्यक्तीला स्वतःच्या मर्जीने स्वत:च्या जोखमीवर आयुष्यभरासाठी निवडले त्याचेच विचार इतके कमजोर कसे? मी चुकले का तुला समजून घ्यायला? नाही! 'कशी त्यजू या पदाला' म्हणत तुझ्या पायाशी लीन होणारी मीही एक सिंधूच! आणि माझा बाप? तो या कथेमध्ये कुठंच नाहीये. 'एकच प्याला' या नाटकात तरी 'सिंधूचा बाप कुठे होता? तो व्यक्त झाला त्याच्या असहायतेतून, हतबलतेततून! मुलीच्या सुखासाठी अपमानाचे कडूजहर घोट निमुटपणे गिळणार्‍या एका मुलीच्या बापाच्या भुमिकेतून! मुलगी जन्माला आल्यापासून त्याला या भुमिकेचा सराव करावा लागत असेल. माझा बापही शेवटी सिंधूचा बाप ठरला- असहाय, हतबल - फक्त शिर्षकापुरता!
गडकर्‍यांना मुलींच्या दु:खी असहाय बापवर्गावरून 'सिंधूचा बाप' सुचला असावा. ते तरी काय करणार? समाजव्यवस्थेच्या विरूद्ध पोहोण्याचं ताकद आणि धाडस कमी लोकांमध्ये असतं. प्रवाहाविरूद्ध पोहोणार्‍यांची होणारी दमछाक पचवण्याइतकी ताकद सर्वांच्यातच असते असं नाही. पुन्हा किनारा गाठलाच तरी त्या यशाचा आनंद साजरा करायला कोणी सोबत असेल की नाही कुणास ठाऊक! गडकर्‍यांनी प्रवाहासोबत पोहण्याचा सोयिस्कर मार्ग निवडला. अश्रू ढाळणारी, पतीपरमेश्वराच्या चरणांत स्वर्ग समजणारी सोशिक सिंधू ही समाजाच्या दृष्टीने सर्वगुणसंपन्न संसारी स्त्री गडकर्‍यांच्या 'एकच प्याला'ने अजरामर केली. (सिंधूच्या बापाला त्यात स्थानच नव्हते, समाजाच्या दृष्टीने तो एक उपेक्षित आणि उपकृत घटक!)

तशीच ही सिंधू आमच्याही मनात अजरामर होऊ पाहतेय, पण मी ही सिंधूंची असहाय जमात नष्ट करणार. प्रवाहाविरूद्ध पोहोण्याचं धाडस यापूर्वीही एकदा केलंय, पुन्हा करेन आणि खात्रीने तीर गाठेन. आणि हा आनंद साजरा करायला मी एकटी नसेन तर त्या माझ्या सार्‍या भगिनी असतील ज्या धडपडताहेत या असहायतेच्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी!
मी नक्की लढेन, एकटी- समाजव्यवस्थेविरूद्ध, परंपरेच्या चौकटीविरूद्ध कारण माझी असहायता, घुसमट या चौकटीत मावत नाहीये. ती चौकट रूंदावण्याचा प्रयत्न करेन. नाहीच जमलं तर फाडून टाकेन. आधीही फाडली होतीच की चौकट तुझ्यासाठी. आता मी ही चौकट फाडणार आहे माझ्या बापासाठी, सिंधूच्या असहाय बापासाठी! त्याला न्याय देण्यासाठी!! उगाच लेकीचं दु:ख बघून त्यानं असहायतेने झुरून मरण्यापेक्षा या लढ्यात तिच्या पाठीवर हात ठेऊन लढ म्हणावं, तेही स्वतःचा कणा ताठ ठेऊन!
माझ्या या लढ्यात मला साथ देशील आशी आशा आहे, अपेक्षा नाही... सप्तपदीवेळी आयुष्यभराच्या साथीच्या शपथा घेतल्यावर तेवढ्या साथीची आशा तर करू शकते ना... नाहीतर कुणी सांगावं, तू ही एका सिंधूचा असहाय बाप असू शकशील!

2 comments:

भोवरा said...

खुप खुप खुप भारी लिहिलेय...
भावना पोहचल्या....अप्रतिम!!!

भोवरा said...

तुम्ही कमेंट मध्ये Word Verification ठेवल्यामुळे कदाचित तुम्हाला कमेंट मिळत नाही आहे...ते ह्या ब्लॉग च्या थीम मध्ये योग्य execute होत नाही आहे.

Post a Comment