मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा आहे?

प्रसंग : मला लवकरात लवकर काही कामानिमित्त स्टेशनकडे जायचं होतं म्हणून दादरवरून मी व मैत्रीणीने टॅक्सी पकडली... टॅक्सीचा मध्यमवयीन चालक सिगारेट ओढत होता. मी त्यांना सांगितलं काका, मला अॅलर्जीआहे, ५ मिनिटं सिगारेट नका ओढू प्लीज. तर आम्हाला म्हणाला, "मेरी टॅक्सी है, मै मेरी टॅक्सीमें कुछभी करूंगा, तुम्हे नहीं जमता है तो उतर जाओ!" आम्हाला घाई असल्याने झक मारत जावं लागलं.

प्रसंग : ४ दिवसांपूर्वी रिक्षेने घरी चालले होते... रिक्षेमध्ये जोरजोरात गाणी लावली होती म्हणून मी व इतरदोन सहप्रवाश्यांनी गाणी बंद करण्या स सांगितले, तर त्या रिक्षेवाल्याने उर्मटपणे म्हटले "गाने बंद नहीं होंगे, बैठना है तो बैठो!" आम्ही म्हणालो "आम्हाला नाही ऐकायचेत गाणी, तू नंतर ऐकत बस.." त्याने आधीचा उर्मट स्वर जराही कमी न करता शांतपणे सुनावलं,"तो फिर उतर जाओ" आम्ही उतरलो आणि दुसरी रिक्षा पकडून गेलो.

प्रसंग : माझा नवरा बोरीवली पश्चिमेकडील गो. रा. गांधी रेस्तराँमध्ये गेलेला... दुपारची वेळ आणि अज्जिबात गर्दी नसल्याने तिथील गारव्याचे टेबल पकडून त्याने ऑर्डर दिली. ऑर्डर घेऊन वेटर आल्यावर तेथील मालक म्हणवणार्‍या माणसाने नवर्‍याला उटून दुसर्‍या टेबलावर बसावयास सांगितले. तर नवर्‍याने सौम्य शब्दांत सांगितले गर्दी नाहीय ना, मग इथे बसलं तर काय प्रॉब्लेम आहे? तर म्हणाला, "क्या खिचखिच करता है, ये मेरा हॉटेल है! बोला है, वहापे बैठना है; तो बैठो, वरना चले जाओ!" माझा नवरा उठला नाही. त्याने सांगितलं इथे येऊन धंदा करायचा तर नीट करा. दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.

अर्थातच हे अनुभव मराठी माणूस म्हणून आलेले नाहीत, पण या अन्य भाषिकांची दादागिरी अंमळ वाढत चालली आहे.

हे आमचे अनुभव! असेच अनुभव इतरही अनेकांना येतच असतात. मराठी माणसाच्या मवाळपणाचा उदासिनतेचा, अलिप्तपणाचा गैरार्थ काढून त्याला गृहीत धरले जात आहे का?



अन्य भाषिकांनी मुंबईमधील जागा उद्योगधंदे काबिज केले आहेत. रिक्षावाल्यांची, टॅक्सीवाल्यांची, हॉटेल हॉटेलवाल्यांची मुजोरी वाढतेय.. संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे देशभरातील कोणीही कुठेही जाऊन काम करणे कसे न्याय्य आहे हे अन्यभाषिक गळा काढून सांगतात. महाराष्ट्रात त्यांच्यावर कसा अन्याय होतो याचेही सहानुभूतीप्राप्तीसाठी रूदन करीत सांगतात. काही बिल्डींगमध्ये मांस-मच्छी खाणारे म्हणून मराठी लोकांना जागाही देणे नाकारले जातेय...
मुंबई खरंच महाराष्ट्राची आहे?? मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा आहे?


मराठी शाळांवर बंदी आली आहे. मराठी चित्रपटांना प्रदर्शित करवून घेण्यासाठी मल्टीप्लेक्स चित्रपटगृह मालकांशी झगडावं लागतं!!! मराठी माणसाने स्वतःच मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे.



मराठी बोलणं हे स्वतः मराठी माणसालाच कमीपणाचं वाटू लागलं आहे... फळवाले, भाजीवाले, रिक्षावाले, नारळपाणीवाले, वेटर, दुकानदार इतकंच काय ट्रेनमध्ये भांडतानाही आपण हिंदी भाषाच नकळतपणे का वापरतो??

कोणीही यावे आणि मराठी माणसाला टपली मारून जावे यावर मराठी भाषिकांची स्वतःची भूमिका काय आहे? त्यावर अन्य भाषिक व मराठी नेत्यां च्या भूमिका अवलंबून आहेत! नाहीतर काही दिवसांनी मराठी माणसाला मुंबई ही महाराष्ट्राची आहे हे सिद्ध करण्यासाठी लढा द्यावा लागल्यास नवल नाही...

आपलं काय, वाचून विचार करणार आणि नेहमीच म्हणून सोडून देणार! आपण स्वतः तोडक्या मोडक्या बंबईया (मुंबईया नव्हे बरं का!!) हिंदी भाषेत बोलायचं; पडेल टाकाऊ हिंदी पिक्चरपण मल्टीप्लेक्सच्या गारव्यात पाहायचं नी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपटाच्या स्टेशनाबाहेरील पायरेटेड सीडीज आणून रविवारच्या टी. पी. साठी बघायचं; कोणा राज्यकर्त्यांनी मराठी साठी आंदोलन केलं या बातम्या वर्तमानपत्रात वाचून "मतं मिळवायचे धंदे" असल्या कमेंटसह चहाचे घुटके गिळायचे... या व्यतिरिक्त किंवा याच्यापेक्षा जास्त आपण करू तरी काय शकतो?? नाही का??

MBA नंतर...ग्रीन कार्ट कोकोनट एक्प्रेस???

MBA केल्यानंतर काय करावं??? समजा एखाद्या MNC मध्ये मॅनेजरपदी राहून मस्त स्वतंत्र एसी केबीनमध्ये पाच सहा आकडी पगार घ्यावा, मस्त लोण्यासारखी चालणारी गाडी, मुंबई-पुण्यात मस्त आधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि आकर्षक फर्निचर, इंटेरिअरने सजलेला फ्लॅट, हिरवळीवर दिमाखात उभी राहीलेली छोटेखानी टुमदार बंगली कम सेकंड होम... व्वा! नुसत्या विचाराने गुलाबी, गुबगुबीत, गोजीरवाणी सप्तरंगी स्वप्नं पापण्यांआडून रांगायला लागले ना??? आणि... मी म्हटलं नारळपाण्याची गाडी काढली तर कशी काय आहे आयडीया?? "काय भिकेचे डोहाळे!!!" अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नक्कीच उमटतील नाही???

आजच्याच लोकसत्तेत वाचलंत का? अभिजीत कुलकर्णी यांनी एका आगळ्या मराठी (हो हे स्पष्टपणे नमूद करायलाच हवं!) MBA आंत्रप्रुनरची ओळख करून दिलेय... अविनाश इघे...! अर्थशास्त्र व्यवस्थापनातील मास्टर्स पदवी घेतल्यानंतर नाशिकातील या मराठमोळ्या तरूणाला वर नमूद केलेल्या गोंडस स्वप्नांनी गुदगुल्या करीत खुणावलं असेलही कदाचित! पण या स्वप्नांकडे धाडसाने दुर्लक्ष करून कमोडिटी बिझनेसांतर्गत "ग्रीन स्ट्रीट कार्ट" या डोळ्यांना सुखद गारवा देणार्‍या मस्त फ्रेश पिस्ता हिरव्या शेडमधल्या आधुनिक नारळपाण्याच्या गाड्यांचा ब्रँड सर्व शहरांत वसवण्याच्या मोठ्ठ्या स्वप्नाने आणि ध्येयाने त्यांच्या डोळ्यांनाच काय पण मेंदूलाही पार झपाटून टाकलेय!

आता
या कार्टमध्ये वेगळेपणा काय तर आता कळकट कपडा मांडीवर टाकत अर्धवट गंजलेल्या कोयत्याने नारळ फोडत त्याचा वरचा टवका उडवताना "नारियलपानी"वाल्याकडून अर्धेअधिक पाणी खाली सांडत तुम्हाला कपड्यांना सावरत तो मोठ्ठा नारळ पेलण्याची कसरत करायला नको. या कार्टमधील मशिनच्या सहाय्याने वरचेवर नारळाला मस्तपैकी छिद्र पाडून त्यातील पाणी कार्टमधील एका छोट्या कंटेनरमध्ये टाकायचं आणि अवघ्या ५ सेकंदांमध्ये थंडगार, स्वच्छ, गोड नारळपाणी तुमच्यापुढे हजर!!! आणि पुन्हा कागदाच्या ग्लासमधून त्यामुळे पर्यावरणासाठी आणि तुमच्यासाठीही सुरक्षित!! आहे की नाही अभिनव कल्पना...! उन्हाळी सुट्ट्या पण सुरू होतीलच लवकरच! त्याच्या आतच सुर्योबांनी आपल्या तप्त झळांचे किरणदूत फैलावण्यास सुरूवात केलीच आहे! तर नारळपाणी हा आयुर्वेदाने सुचवलेला आरोग्य आणि सौंदर्यवर्धक थंडगार आणि चवदार उपाय या उन्हाळ्यावरचा अक्सीर उतारा म्हणून होऊ शकतो.

सध्या नाशिकधल्या काही महत्त्वाच्या नाक्यांवर, चौकांमध्ये सध्या कोकोनट एक्स्प्रेस दिसू लागल्या असून त्याला पहिल्याच टप्प्यात अपेक्षेहून चांगला प्रतिसाद असल्याचे अविनाशकडून समजल्याचे लोकसत्ताच्या अभिजीत कुलकर्णी यांनी लेखात नमूद केले आहे. या कोकोनट एक्प्रेसचं वेगळ्या पद्धतीने ब्रँडींग करण्यासाठी या गाडय़ांवर उभे राहून सेवा देणाऱ्या तरुणांसाठी विशिष्ट रंगाचा टी शर्ट आणि टोपी असा ड्रेस कोडही अविनाशने निश्चित केला आहे. गजनीच्या ब्रँडींगसाठी सिनेमॅक्सच्या स्टाफला खास गजनी कट ठेवण्यास सुचवणार्‍या परफेक्शनिस्ट आमीरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलाय वाटते...!

थोडक्यात काय, कायमस्वरूपी नोकरी, महीना अखेरीस निश्चित स्वरूपाचा पगार आणि गुंतवणूकीचे, घराचे हप्ते फेडून गाठीला पै पै जोडून गंगाजळी जोडणारे सुरक्षित स्वप्न पाहणार्‍या मराठी माणसाने कल्पनेचे गरूडपंख लावत मोठ्या स्वप्नांच्या जोरावर बिझीनेस स्पर्धेच्या अवकाशात झेप घेतली आहे... ही तर सुरूवात आहे... येत्या काळात त्या त्या ठिकाणच्या स्थानिकांना व्यवसाय संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून अन्य शहरांमध्ये देखील ग्रीन कार्टची साखळी निर्माण करण्याचा अविनाशचा मानस असल्यामुळे भविष्यात उच्चशिक्षित बेरोजगार तरूणाने संधी उपलब्ध नाहीत हे कारण देण्यापूर्वी स्वयंरोजगाराचा हा मार्ग नक्कीच पडताळून पाहावा.

माझ्या बाबतीत म्हणाल तर... "पातळ मलईवालं नारळपाणी दे..." (हो! सुरूवातीला मराठीच बोलून बघते... समजतंय का ते!) असं म्हटल्यावर पातळ मलई (लुसलुशीत साईसारखं खोबरं हे फारच डोक्यावरून जाईल ना!) म्हणजे काय
ते अण्णा किंवा भैय्याच्या गाडीसमोर घसा आणि डोकंफोड करत बसायला नको!!! :)

संदर्भः
["पहिला फोटो लोकसत्ता १४--२०११ च्या अंकातून साभार] "
१४-३-२०११च्या लोकसत्तामधील अभिजीत कुलकर्णी यांचा "रस्त्यावर उतरुन ‘एमबीए’ अविनाश बनला नारळ पाणीवाला!" लेख!


"Never, never, never give up!!!"

२०१० च्या डिसेंबरला जपानला भूकंपाद्वारे सावधानतेचा इशारा देणार्‍या निसर्गाच्या रौद्ररूपाने अखेर सुनामीच्या प्रलयाने स्वतःचे वामन रूप प्रकट केलेच! जपानच्या आग्नेय भागात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. याआधीही अशा कित्येक मानवी/नैसर्गिक आपत्तींच्या भोवर्‍यामधून जपानी माणूस तावून सुलाखून निघाला आहे.
पण चिवट जपानी माणूस हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुनर्जन्म घेतो... नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती जपानला रोखू शकत नाही. प्रत्येक जपानी माणूस विंस्टन चर्चिल यांच्या एकाच मंत्राचा जप करत असतो... "Never, never, never give up." त्यांच्या धाडसाला सलाम!!!


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!!
प्रत्येक व्हॅलेंटाईन डे ला ही कविता नक्कीच आठवत असेल ना?? हा प्रेमाचा संदेश देणारे आणि इतर अनेक विविध विषयांवरील लोकप्रिय कविता, चित्रपट गाणी, बालगीते, वात्रटिका, कथा लिहीणारे जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर यांचा आज ८२ वा वाढदिवस!

मंगेश केशव पाडगांवकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या समुद्राने वेढलेल्या अत्यंत निसर्गरम्य गावात झाला. मुंबई युनिव्हर्सिटीमधून कला शाखेमध्ये संस्कृत आणि मराठी विषय घेऊन विशेष प्राविण्य प्राप्त केले. त्यांच्या पत्नीचे नाव यशोदा असून डॉम अजित पाडगांवकर, अभय पाडगांवकर व सौ. अंजली कुलकर्णी अशी तीन मुले आहेत.

मुंबईमधील रूईया महाविद्यालयामध्ये त्यांनी काही वर्षे मराठी विषय शिकवला. मुळातच कलेची आवड, साहित्यकलेमधील आणि लेखनातील विशेष प्राविण्य आणि अवघड विषय रोचकपणे, रंजकपणे व सहजपणे समजावून सांगण्याची हातोटी यांमुळे ते विद्यार्थी मंडळींचे आवडते होते. १९७० ते १९९० या कालावधीमध्ये त्यांनी मुंबई मधील यु. एस. इन्फर्मेशन सर्वीस येथे संपादक म्हणून काम केले.
सुमारे ४० प्रकाशने त्यांच्या क्रेडीटवर दाखल आहेत. U.S. Library of Congress हे त्यापैकीच एक!

मंगेश पाडगांवकरांना अगणित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.१९५३ आणि १९५५ चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, १९५६ मध्ये एम. पी. साहित्य संघाचा पुरस्कार, "सलाम" या काव्यसंग्रहासाठी १९८० मध्ये साहित्य संघ पुरस्कार...२००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

पाडगांवकरांच्या मनाच्या अद्भूत गाभार्‍यातून अलगद लेखणीद्वारे झरून अन अरूण दाते यांच्या मधाळ विरघळणार्‍या स्वरांचा साज पांघरून जादुई शब्द तुमच्यावर मखमली तलम गारूड कसं करतात समजतही नाही. उदाहरणादाखल काही गाणी हवीत???

हिर्‍याप्रमाणे तेजस्वी आभेने चमकणारा शुक्रतारा, रात्रीचा गुलाबी शहारा आणणारा मंद वारा, आणि पिठूर चांदण्यातील तीचा मऊसर उबदार सहारा... आणखीन काय हवं?? हा हवाहवासा सहवास किती हळूवार रोमँटिकपणे शब्दबद्ध केलेय पाडगावकरांनी त्यांच्या "शुक्रतारा मंद वारा" या गीतात...
आणि प्रेमातील आर्तता मग ती "त्या"ची असो वा "ति"ची समर्थपणे पोहोचवण्याचं काम करावं ते पाडगांवकरांच्या "भेट तुझी माझी स्मरते" आणि "असा बेभान हा वारा" या गीतद्वयींनीच! अरूण दाते आणि लता मंगेशकरांच्या आर्त स्वरांचा साज लेवून या स्वर-शब्द संगमाने तुमच्या ह्रदयात हलकीशी कळ नाही निर्माण केली तर तुम्ही फार्रच अरसिक बुवा!

यांच्यातील आर्त प्रेमिक कवी कधी "अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी; लाख चूका असतील केल्या, केली पण प्रीती" (स्वरः अरूण दाते) अशी बेधडकपणे प्रेमाची कबूली देऊन टाकतो तर कधी प्रेयसीच्या भेटीमुळे आत्यंतिक आनंदाने अंतर्बाह्य मोहरलेला प्रेमिक "जेव्हा तीची नी माझी" असे जगाचे भान हरपून गाऊ लागतो... (स्वरः अरूण दाते) तर कधी "अशी पाखरे येती.." (स्वरः सुधीर फडके) असं भूतकाळातील हिंदोळ्यावर उदासपणे झुलत उसासे टाकत गुणगुणतो.

"माझे जीवनगाणे" समर्थपणे गुणगुणणारे (स्वरः पंडीत जीतेंद्र अभिषेकी), कधी "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असा आशावादी आश्वासक संदेश देणारे, तर कधी "धुके दाटलेले उदास उदास" (स्वरः अरूण दाते) असे फिकुटलेले उदास निश्वास टाकणारे शब्द यांचेच!

"भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी" (स्वरः अरूण दाते) यांच्या खेळातून मांडलेल्या लग्नाच्या अर्धवट डावातील अधूरी कहाणी, त्यातील आर्त हुरहूर समर्थपणे पोहोचवणारे शब्दही पाडगांवकरांच्याच समर्थ लेखणीतून उतरलेले आहेत.

कधी यांच्यातील प्रेमिक "शब्दाविना कळले सारे" (स्वरः पंडीत जीतेंद्र अभिषेकी) म्हणत "शब्द शब्द जपून ठेव" (स्वरः सुमन कल्याणपूर) असा मौलिक सल्ला देण्यास विसरत नाही.
कधी यांच्यातील तत्ववेत्ता "जग हे बंदीशाला, इथे न कोणी भला चांगला; जो तो पथ चुकलेला.." हे जीवनाचे गहन तत्व रहस्य सांगून जातो.

"दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे" (स्वरः अरूण दाते) असे एखाद्या अल्लड षोडशेला सप्तरंगी स्पप्नांच्या दुनियेत अलगद नेणारे पिसाहून हलके शब्द, "तिन्हीसांजा सखे मिळाल्या" म्हणून कातरवेळी सखीला दिलेली आर्त साद, "मेंदीच्या पानावर" (स्वरः लता मंगेशकर) अलवारपणे झुलणारे हळवे मन, "येरे घना येरे घना" म्हणून थेळ घनालाच आपल्या हळव्या कातावलेल्या मनाला फुलवण्यासाठी न्हाऊ घालण्याची व्याकुळ विनंती... कित्ती रूपे वर्णावी या शब्दसंपदेची!! भावगीतांतील अलवार, हळवा, आर्त, नाजूक, आरस्पानी, व्याकूळ, मोहीत, मधाळ भाव थेटपणे पोहोचवण्याचे शिवधनुष्य या शब्दसामर्थ्याने लीलया पेलले आहे.

"ही वाट दूर जाते", "झाली फूले कळ्यांची", "हात तुझा हातातून", "अनामवीरा", "जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा", "तुझे गीत गाण्यासाठी", "भावनांचा तू रे भुकेला मुरारी" ही भावगीत, भक्तीगीत, प्रणयगीत, देशभक्तीपरगीत ही विविधता हे पाडगांवकरांच्या लेखणीचे सामर्थ्य!

बालगीतांचा रूणूझूणू किलबिलाट व्यक्त करण्यासाठी पाडगांवकरांचे शब्द असतील तर ती बालगीते अधिकच लडिवाळ रूपडं लेऊन दुडदुडत कुशीत शिरतात...
"असावा सुंदर चॉकलेटचा बंगला", "शाळेला निघताना", "आजोबा म्हणतात फणस", "आणायची माझ्या दादाला बायको आणायची", "खोडी माझी काढाल तर", "पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा", "कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा" या सर्व बालगीतांच्या ग्रामोफोनच्या गोल काळ्या रेकॉर्ड्स अजूनही बाबांनी माझ्या लहानपणाच्या आठवणी म्हणून जपून ठेवल्या आहेत... त्या बालगीतांबरोबर मी बागडत बागडत बोबड्या स्वरांत केलेली किलबीलही त्यांच्या आठवणींच्या पोतडीत अजून ताजी आहे.

पाऊस हा सानथोरांप्रमाणेच पाडगांवकरांच्या जिव्हाळ्याचा विषय! "सांग सांग भोलानाथ", "पिरपिर पिरपिर पावसाची"," येरे येरे पावसा रूसलास का, माझ्याशी गट्टी फू केलीस का?", "आला आला पाऊस आला", "ए आई, मला पावसात जाऊ दे", "टप टप टप टप थेंब वाजती" या बालगीतांतून तसेच वर वर्णन केलेल्या "येरे घना येरे घना", "श्रावणात घन निळा बरसला", "बाहेर बरसती धारा रे"... आणि ही यादी अशीच पाऊस धारांप्रमाणे अखंड बरसत राहील... आपण डोळे बंद करून शब्दधारांमध्ये चिंब भिजायचं

जीवनावर भरभरून प्रेम करणार्‍या कवी मंगेश पाडगांवकरांचा आज जन्मदिवस!
सर्व मराठी रसिकांच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा!!!

खरंच आजची स्त्री सामर्थ्यवान आहे??



८ मार्च - जागतिक महिला सामर्थ्य दिन...
९ मार्च - अरूणा शानबाग... केईएम इस्पितळाची नर्स जी तिच्या स्त्रीत्वाची किंमत चुकवून गेली ३५ वर्षे आयुष्याशी झगडतेय..(आयुष्याशी?? की... मृत्यूशी!!! तिला जगायचंय की मरायचंय?? कदाचित हेही ठरवण्याचा अधिकार नाहीये तिला :( ) सुप्रिम कोर्टाने तिचे दयामरण नाकारले!
१० मार्च - सावित्रीबाई फुले, स्त्री साठी शिक्षणाचे दरवाजे उघडून तिला तिच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारी सामर्थवान स्त्री... सावित्रीबाईंचा आज स्मृतीदिन... या निमीत्ताने स्त्री सामर्थ्याला नव्याने उजाळा देण्याचा दिवस!
किती... किती दोलायमान स्थिती आहे...!!! कळत नाहीये नक्की काय चांगले काय वाईट!!! अरूणाची परिस्थिती पाहता वाटतं... खरंच आजची स्त्री सामर्थ्यवान आहे?? अंSSS तुम्हाला काय वाटतं??







आई, मुलगी, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, मार्गदर्शिका, शिक्षिका, काकी, मामी, मावशी, आत्या, आजी, सासू, बॉस, सहकारी... कित्ती रूपे... एका रूपातून किती सहजपणे दुसर्‍या रूपात शिरते... ती जादुगार आहे? क्षमा, दया, कणखरपणा, वात्सल्य, सात्विकता, संस्कार, सोज्वळपणा हे अलंकार दिमाखाने मिरवते. ती कोण्या राज्याची राणी आहे? कल्पना, कला, बुद्धीमत्ता, सौंदर्य, आत्मविश्वास, प्रेम, न्याय, प्रामाणिकपणा यांच्या जोरावर आकाशाला गवसणी घालू पाहते... ती अस्मानीची परी आहे? अहं! ती स्त्री आहे! सामर्थ्यवान तरीही प्रामाणिक, कणखर तरीही हळवी, सोज्वळ तरीही आत्मविश्वासपूर्ण, मॉडर्न तरीही सोज्वळ! ती स्त्री आहे... जगभरातील सर्व स्त्रियांना सलाम!