ललित : विकणे आहे...! "मार्केटिंग - एक कला"

मायबोलीवर आणि मराठीमाया.कॉम मासिकामध्ये पूर्वप्रकाशितः मायबोलीबर इथे वाचता येईल.




Marketing
ऑफीसच्या टेरेसवरील पत्राकँटीनमध्ये चिकन खायला गेलेलो. कँटीनचे मामा सुकं चिकन अप्रतिम बनवतात. "वाSSह अप्रतिम!" बोटं चाटत तृप्तीचा ढेकर देत मी मामांना विचारलं, "रेसिपी द्या हो मामा..."
"नेहमीसारखंच केलंय बेटा. प्रत्येकाच्या हाताची चव वेगळीच असते." असं मोघम बोलत अन "बकरा पटविल्याच्या" आवेशात चेहर्‍यावर विजयी हास्य खेळवत हातातली ताटं तोलत मामा पुढे सरकले. चवीला चटावलेला इमानेइतबारे दर बुधवारी येउन सुकं चिकन चापणारा एक प्रामाणिक गिर्‍हाईक त्यांनी हसत हसत कमावला होता, डाव्या हाताचा मळ असल्याप्रमाणे आणि पुन्हा स्वत:ची रेसिपी "ट्रेड सिक्रेट" ठेऊन... म्हणजे हो ना... उगाच गिर्‍हाईकाला "पर्याय" मिळता कामा नये...
"सही मार्केटिंग!" माझ्या तोंडून पुन्हा तृप्तीच्या ढेकरासोबातच नकळत दादही निसटली...



Advertising, marketingमार्केटिंग हा शब्द अगदी जीवनावश्यक गरजांइतकाच परवलीचा झाला आहे नाही?
का नाही? अगदी शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यापासून्च बघा नं... तिथे तुम्हाला आत्तापर्यंत 'शिकलेला' चुणचुणीतपणा 'प्रेझेंट' करावा लागतो... मुलाला आणि त्याच्या आईबाबांनाही!
शिक्षण पूर्ण झालं? नोकरी हवीय? इंटरव्ह्यूजला जाताना 'प्रेझेंटेबल' राहाणं हे थोडक्यात स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचं मार्केटिंगच असतं. आत्तापर्यंतच्या ज्ञानाला आकर्षक व चटपटीत वागण्या-बोलण्याच्या रंगीबेरंगी आकर्षक वेष्टनात व्यवस्थितपणे 'पॅक' करून मांडल्यास नोकरीसाठी तुमचं सिलेक्शन झालंच म्हणून समजा.

नोकरी झाली आता छोकरी! लग्नासारखी उत्तम दुसरी 'मार्केटप्लेस' नाही. संस्कारी मनाला हे वाक्य थोड्डंसं टोचेलही... कपाळावरील हलक्या आठ्यांच्या जाळयांबरोबरच "काहीतरीच वाह्यातपणा!" अशीही प्रतिक्रिया नकळतपणे उमटेल. पण थोडा विचार करून पाहा. कस्टमर रिक्वायरमेंट्स आणि वर/वधूपक्षाच्या अपेक्षा यांत फार फरक नसतो... 'प्रॉडक्ट' दिसायला चांगलं हवं, आकर्षक हवं, ब्राईट-चमकदार हवं. दोषरहीत हवं. टिकाऊ हवं. वापरण्यास सर्वार्थानं उपयुक्त हवं. 'लाईफटाईमचा वादा' असेल तर आणखी आटीव दुधात केशरकांडीच!

आणि मग तुमच्या जन्माच्या वेळेपासून सुरू झालेला मार्केटिंगचा हा प्रवास तुमच्या आयुष्याच्या शेवटापर्य़ंत साथ करतो. एवढंच कशाला, राजस्थानमधील खेड्यांतील प्रथेनुसार माणसांच्या मयताला "मरण्याचं मार्केटिंग करण्यासाठी" रडण्यासाठी भाडोत्री बायका आणत ज्य़ांना 'रूदाली' असं संबोधलं जायचं. विचित्र वाटतेय? आठवा डिंपल कपाडियाचा "रूदाली"मधला अप्रतिम अभिनय! आणि आता तर तुमची जन्ममृत्यूच्या फेरयातूनाही सुटका नाही. रामगोपाल वर्मा, विक्रम भट्ट यांसारखे 'महान आत्मे' रामसेंची परंपरा पुढे चालवत मृत्यूनंतरचे मार्केटिंग करण्याचे विक्रमी उपक्रम करीत आहेत... त्यामुळे आता तुम्हाला मार्केटिंगशिवाय पर्यायच नाही. मार्केटिंगमध्ये व्यवस्थापन करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतेय त्याचे कारणही हेच असावे.

Marketing
मार्केटिंग तर सगळेच करतात... कलाकार आपल्या कलेचे, व्यापारी आपल्या मालाचे, विद्यार्थी आपल्या ज्ञानाचे, शिक्षकवर्ग आपल्या शिकवण्याच्या कौशल्याचे, नोकरदार वर्ग आपल्या परफॉर्मन्सचे... मार्केटिंग तर सगळेच करतात... पण त्याला अभ्यासपूर्ण प्रयत्नांची साथ द्यायचा आणि मार्केटिंगमध्ये करीयर करण्याचा विचार करत असाल तर तुम्हा योग्य टिकाणी सर्फिंग करत आहात. हा लेख 'मार्केटिंग'चे मार्केटिंग करत आहे.
मार्केटिंगच्य व्याख्येपासूनच सुरूवात करूया... स्वच्छ आणि स्पष्ट भाषेत मार्केटिंग म्हणजे ग्राहकांना आकर्षीत करून मालाची विक्री करणे आणि पर्यायाने कंपनीला जास्तीत जास्त फायदा करून देणे यासाठी राबविले जाणारे अनेकविध उपक्रम! मार्केटिंग करण्यासाठी थोडसं संशोधन करण्याची गरज आहे; ज्याला 'मार्केटिंग ऍनालीसीस' असं म्हटलं जातं.

१) आपल्या मालासाठी सुयोग्य बाजार्पेठ आणि ग्राहक यांची यादी करणे हे मुख्य काम! २) नंतर त्यातून अंतीम यादी ठरवल्यावर त्या ग्राहकाच्या मागण्यांची एक सुची करणे हे दूसरे महत्त्वाचे काम. ३)ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टमध्ये कुठले संभाव्य बदल करणे आवश्यक आहेत का हे तपासून गरज असल्यास त्यासंदर्भातील बदलांची यादी करणे. ४) थोडंसं मार्केटिंग रिसर्च करणे किंवा बाजार्भावावर नजर ठेवणेही महत्वाचे. ५) तुमच्या मालाच्या संभाव्य स्पर्धकांची यादी करून त्यांच्या चालू बाजारभावाशी तुमच्या मालाच्या ठरवलेल्या किंमतीची तुलना करणे. ६) जर ती किंमत स्पर्धकांच्या मालाच्या तुलनेत खुपच महाग असल्यास किंमतीबाबत तडजोड करता येतेय की नाही ते पाहणे. कारण ग्राहकांच्या आदीम गरजांमध्ये परवडण्याजोगी किंमत हा मुद्दा अग्रगणी असतो हे विसरून चालणार नाही. ७) जाहीरातबाजी (ऍडवर्टायझिंग), ग्राहक सेवा (कस्टमर सर्विसेस), माध्यमे (मिडीया), ग्राहक-मालक यांतील आदानप्रदान परस्परसंबंध (पब्लीक रिलेशन्स) यांचा विचार करणेही आवश्यक आहे.

दूरदर्शन, वर्तमानपत्रे, रेडियो यांसारख्या पारंपारीक जाहीरात्बाजीबरोबर सध्याचे आघाडीचे आणि आवडते मार्केटिंग माध्यम आहे इंटरनेट अर्थात माहीतीमायाजाल!
तुलनात्मकदृष्टया इतर माध्यमांपेक्षा कमी किंमतीत आणि आकर्षक रूपात जगभर पसरण्याची क्षमता असलेल्या या माध्यमाला मार्केटिंग क्षेत्रात पहीली पसंती मिळाली नसती तरच नवल!

Online or Internet Marketing
ऑनलाईन बिझीनेस किंवा इंटरनेट मार्केटिंग हा प्रकार अत्यंत लोकप्रिय होउ पाहत आहे. नेटसॅव्ही म्हणजे कुठल्याही वयोगटातील इंग्रजी लिहीता वाचता येणारी आणि कॉम्युटरची तोंडओळख असलेली पिढी सर्रास ऑनलाईन शॉपिंग आपला खरेदीतील खर्ची पडणारा बहुमुल्य वेळ इतर 'महत्त्वाची कामे(!)' मार्गी लावण्यासाठी वापरते. आजकाल जवळपास सर्वचजण वेबसाईटच्या आकर्षक रूपातली छोटी मोठी दुकाने इंटरनेटवर थाटतात. वडेवाले, डबेवाले, पानपट्टीवालेही याबाबत मागे नाहीत, सर्वांच्याच आकर्षक वेबसाईट्स आहेत. नेत्रसुखद रंगसंगती, आकर्षक 2D-3D ग्राफीक्स, नजर ठरणार नाही असे झॅप झूप करत उघडमीट करणारे आकर्षक फ्लॅश! तुमचं ऑनलाईन ब्रँडनेम ज्याला तांत्रिक भाषेत डोमेन नेम म्हणतात (उदा: www.google.com हे Google चे डोमेन नेम आहे ) आणि तुमचे फ्लॅश, इमेजेस आणि html पाने अपलोड करण्यासाठी सर्वरवर हक्काची जागा (वेबहोस्टींग आणि ईमेल होस्टींग) बस्स! ऑनलाईन बिझीनेससाठी एवढं भांडवल पुरेसं असतं.

भांडवलाची प्राथमिक जमवाजमव केल्यावर मुख्य काम असतं ते आपल्या मालाची प्रॉडक्टची किंवा सॉफ्टवेअरची जाहीरातबाजी! जगभरातून कित्येकजण फक्त एका माउसक्लीकवर या तंत्रज्ञानाच्या लाटांवर अनिर्बंधपणे स्वार करत असतात. त्यापैकी जास्तीत जास्त जणांना भुलवून आपल्या वेबसाईटपर्यंत पोहोचवण्याचे काम SEO करतात. SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टीमायझर्स अर्थात इंटरनेटवरील दुकानांचे मार्केटिंग तंत्रज्ञ!

तुमच्यामधील टेक्नोसॅव्ही लोकांना सर्च इंजिन्स ही कन्सेप्ट बऱ्यापैकी ज्ञात असेलच. तुम्ही एखादा शब्द वा आज्ञावली शोधण्यासाठी गुगलच्या सर्च इंजीनवर टाकता आणि गुगल त्याच्या डाटाबेसमध्ये असलेल्या सूचीमधून तुम्ही शोधत असलेला शब्द आणि त्या संबंधीत सर्व लिंक्स आणि त्यांच्या वेबसाईट्सची एक यादीच तुमच्यापुढे उघडून ठेवतो.

आपले सर्च इंजिन ऑप्टिमायझर्स लोक या सर्च इंजिनला आंजारून गोंजारून तुमच्या वेबसाईट्ची सगळी माहीती त्या सर्च इंजिन्सना खाऊ घालतात. मग या सर्च इंजिन्सवर लहरणारे सर्फर्स जर तुमच्या प्रॉडक्टविषयी शोध घेत असतील तर ते अलगदपणे तुमच्या वेबसाईटच्या माहीतीजालापाशी येऊन थबकतात. असे तुमच्या वेबसाइटच्या लिंकपाशी येऊन थबकणारे शोधक तुमच्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करतात. हेच शोधक तुमचे संभाव्य ग्राहक असतात.

डोळे कान उघडे ठेवा, नवीन कल्पनांना मनात रुजवा... मार्केटिंग फार अवघड गोष्ट नाही...

एकदा बांद्राला टॉप्स बघायला गेले होते.. तिथला माणूस, आहा, शेखर सुमन काय 'मूव्हर्स ऍन्ड शेखर्स' चं निवेदन करेल अशा थाटात नॉन्स्टॉप बडबड करत होता... मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू या भाषांवर तर प्रभुत्व होतंच (ठळक नोंद १: मार्केटिंग वाल्याने सर्वधर्मसमभाव भावना प्रमाण मानावी आणि भाषा द्वेष्टी असता कामा नये...) पण कॉन्फ़ीडेंटली चुकीचं इंग्रजीसुद्धा हासुरे स्पिकींग कोर्स केल्यागत फ़ाडफाड फाडत होता... (ठळक नोंद २: चुकलात तरी चालेल... पण मुद्दा सोडायचा नाही... समोरच्याला बोलायला विचार करायला वेळच देऊ नका...) एकेका टॉपला लहरवत हलके हलके झटके देत दाखवण्याची अदा... अहा! असं वाटत होतं की कोणी नुकती तारुण्याच्या प्रांगणात पदार्पण करणारी कॉलेजकळी लहरत मोहरत लाडीक अंगविक्षेप करतेय.. काय बिशाद माझी की मी तो टॉप घेतला नसता...

मार्केटिंगच्या तळटीपा शिकवणार्‍या आणि मार्केटिंगचे कुठलेही शिक्षण न घेता गिर्‍हाईकाला 'खुश' करण्याचे उपजत गुण असणार्‍या मार्केटिंग तज्ञाला मनोमन सलाम करावासा वाटला...

मार्केटिंग ही संकल्पना खूप मोठी आहे. तुमच्या मनाला जर कल्पनेचे गरूडपंख लाभले असतील तर मोठ्या मार्केटप्लेसचे आभाळ तुमच्या कल्पनाभराऱ्यांसाठी उपलब्ध आहे. फक्त थोडसं मागे जाऊन झेप घेण्याचा अवकाश!


ऑनलाईन (इंटरनेट) मार्केटिंग बद्दल पुन्हा केव्हातरी...

ललित : 'मदर्स डे' च्या निमित्ताने...


खरं तर 'मदर्स डे!' च्या निमित्ताने... हा लेख लिहीला होता.. मायबोलीवर आणि मराठीमाया.कॉम मासिकामध्ये पूर्वप्रकाशितः मायबोलीबर इथे वाचता येईल.

इथे उशीरा पोस्टतेय.. जरूर
वाचा... आपल्या प्रतिक्रियांच्या आणि सूचनांच्या प्रतीक्षेत...

मे महिन्याचा दूसरा रविवार - 'मदर्स डे!'

'सातच्या आत घरात' मध्ये मकरंद अनासपुरे
च्या तोंडी एक वाक्य आहे, "मदर्स डे, फादर्स डे असे जिवंतपणीच आईबापाचे दिवस कसले घालता रे...?"

मदर्स डेच्या निमित्ताने एक घटना आठवली... तेव्हा मी मुंबईत नवीन होते, नुकतीच नोकरीला लागलेले... अंधेरीमध्ये एका आज्जींकडे पी. जी. म्हणून राहायचे. ती पूर्ण सोसायटीच म्हातार्‍यांनी भरलेली. का तर
त्यांच्यापैकी बर्‍याचजणांची मुले अमेरिका आणि इतर देशांत स्थायिक आणि इतरेजन पुण्यात! त्यांच्या बायकांचं या म्हातार्‍यांशी पटायचं नाही...मग म्हातार्‍यांची रवानगी जुन्या घरांत. आपण नाही का नको असलेल्या पण टाकून देणे जीवावर येणार्‍या वस्तू अडगळीच्या खोलीत टाकतो... तस्संच.

तर तेव्हा दर रविवारी कपड्यांचा धोबीघाट काढणे हे आमचं नित्यनेमाचं काम! घराच्या बाहेर छोटीशी कॉमन बाल्क
नी होती. दर रविवारप्रमाणेच एका रविवारी मी त्या बाल्कनीत उभी राहू बाहेर ओले कपडे पिळत होते... आतून आजी ओरडल्या...'अगं गधडे, कपडे बाहेर पिळू नको, खाली पाणी पडेल कोणाच्यातरी अंगावर!" त्या धांदलीत खाली पडलेला कपड्यांचा क्लीप आणायला मी दडदडत खाली उतरून आले आणि क्लीप उचलायला खाली वाकले तो... माझ्या समोरच्या बाल्कनीत सुरकुत्यांनी भरलेलं एक मुटकुळं बसलं होतं; मी पिळलेल्या कपड्यांच्या पाण्याचे उडालेले शिंतोडे पूसत... मी दोन मिनिटं ओशाळून तिथेच थबकले...

जेमतेम पाय मुडपून झोपू शकेल एवढं बाकडं, तिथंच पिण्याच्या पाण्याचं भांडं, अर्धवट जेवलेलं खरकटं ताट आणि त्या पसाऱ्याचाच जणू भाग असलेलं ते मुटकुळं.... घराचं दार बंद! मग या आजींचं मुटकुळं असं बाहेरच्या लाकडी बाकड्यावर का?

वर येऊन आमच्या
आजींना विचारलं तर त्या करवादल्या,"त्यांच्या बोडख्या सुनेला सासूची अडचण होतेय. घरात घाण करते म्हातारी म्हणून बाहेर टाकलेय..." आजींची बडबड सुरू झाली तमाम सूनवर्गाला शिव्यांची लाखोली वाहत...

खरंच का
आईची एवढी अडचण होते??? काय वाटत असेल त्या माऊलीला? असल्या करंट्या मुलाला जन्म देण्यापरीस वांझोटी राहीले असतं तर बरं? की सोबत नाकारून पुढच्या प्रवासाला गेलेल्या वैकुंठवासी नवऱ्याला आणि त्या वैकुंठनरेशाच्या नावाने कडाकड बोटे मोडत असेल? की दैवाला बोल लावत सुरकुत्यांच्या जाळ्याआड मिचमिच्या डोळ्यांनी मूकपणे नुसतीच आसवं ढाळत असेल? कोणास ठाऊक!

सर्वच बाबतीत पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करणारे आपण 'मदर्स डे'ला वगैरे का नाव ठेवतो? त्यांचं निदान बरं, एक दिवस तरी आईला तिच्या आईपणासाठी धन्यवाद देतात...आपल्यासारखं नाही, अडगळीत टाकून 'दिवस घालताना' मगरीच्या अश्रूंनी डोळे ओले करण्यापलिकडे काही करत नाही...(काही अपवादही असू शकतील पण दुर्दैवाने ते प्रमाणही अपवादात्मकच आहे...)

लहानपणी 'माझी आई' या विषयावर सानेगुरूजींचे दाखले देत भरभरून निबंध लिहीणारे आपण आणि बायकोला खूष करण्यासाठी
तिच्याशी भांड भांड भांडणारेही आपणच! लहानपणी चिमुकल्या हातांनी तिच्या गालांवरचे अश्रू पुसणारे आपण आणि पुढे भावाभावांच्या प्रॉपर्टीत आईला वेठीला धरून तिला रोज अश्रू ढाळायला लावणारेही आपणच! 'मी मोठ्ठा झाल्यावर तुझी सगळी स्वप्नं पूर्ण करेन' असं म्हणून तिच्या डोळ्यांत स्वप्नांचे इमले बांधणारे आपण आणि मग मोठ्ठ झाल्यावर विमानाने भुर्रर्रर दूरदेशी उडून जाऊन 'प्रोजेक्ट्समधून सुट्ट्या मिळत नाहीत'च्या नावाखाली तिच्या डोळ्यांना चातकासारखी वाट पाहायला लावणारेही आपणच!

आठवतोय तिच्या आईपणाचा सोहळा, तुम्ही जन्माला आल्यावर तिने साजरा केलेला? कसा आठवणार? तेव्हा तुम्ही '
नकळते' होतात ना... नऊ महीने आपल्या उबदार कुशीत आपल्या रक्तामांसावर वाढवून, अतीव प्रसवकळा सहन करून एका 'टॅहँ'च्या आवाजाने धन्य होउन 'आईपणाचा उत्सव' एका आनंदभरल्या निश्वासाने आणि डोळ्यांतील कौतुकभरल्या चमकेने नि:शब्दपणे साजरा करणारी ती आई! काय नसतं त्या डोळ्यांत? आई झाल्याचा आनंद, बाळाच्या कौतुकाची चमक, बाळाची काळजी आणि अपार प्रेमाची स्निग्धता!

बाळाच्या प्रगतीसाठी धडपडणारी आई, त्यांच्या पालनपोषणासाठी जीवाचे रान करणारी आई, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून तळमळणारी, प्रसंगी मेणाहूनही मऊ ह्र्दयाला वज्रादपि कठोर करणारी आई...

लहानपणी माझा एक फार आवडता सुविचार होता... 'गुलाबाचे काटे तसे आईचे धपाटे'...! अर्थ वगैरे कळण्याचं ते वय नव्हतं, फक्त धपाटे लक्षात राहायचे... पण आता आठवते ते मी रडून झोपल्यावर मारलेल्या वळांवरून अलगद हात फिरवून स्वत:शीच रडणारी आई, मी रागाने जेवली नाही तर स्वत: अन्नाचा कणही पोटात न ढकलणारी आई, माझ्या परीक्षेला आदल्या दिवशीपासून पेपराला जाईपर्यंत ओठ निळेजांभळे होईपर्यंत उत्तरं वाचून दाखवणारी आई....

आई म्हणजे सानेगुरूजींची संस्कारशाळा, आई म्हणजे खंबीर आधारवड, आई म्हणजे कवी माधव ज्युलीयनची वात्सल्यसिंधू आनंदघन कविता - उत्साहाने सळसळणारी... आई म्हणजे चैतन्याची पालवी - सदैव बहरलेली, आई म्हणजे निखळ मैत्री, आई म्हणजे अखंड काळजी...

आई म्हणजे मेणबत्ती...! झगमगणार्‍या दुनियेत अस्तीत्व न जाणवणारी, म्हणून अडगळीत टाकून दिलेली... आणि दिवे गेले, अंधार पडला की शोधाशोध करून मिळवलेली गरजेपुरती वस्तू! तरीही स्वत: आयुष्यभर परिस्थितीची झळ सोसून, जळून झिजून, वेदनांचे कढत अश्रू ढाळून मुलांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रकाश देणारीसंजीवनी म्हणजे आई! आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचा संगम!

अधिक महिन्याचे वाण घ्यायला माहेरी गेलेले...पाटावरून ताटावर आणि ताटावरून अंथरूणावर असं अक्षरश: माहेरपण भरभरून उपभोगलं. तेव्हा अचानक त्या ओळी आठवल्या,"लेकीला माहेर मिळावं म्हणून माय सासरी नांदते"... क्षणभर वाटून गेलं, हे उपकार फेडण्यासाठी तरी, आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावी आई!"

आईचा उत्साह ओसंडून वाहत होता. जेवायला खायला नवनवीन गोडधोड काय करू म्हणून...
खरंच, "आईविना माहेर, पतिविना सासर,
पाखरांविना रान, भासे किती भेसूर..."
आई अचानकच भावूक झाली. रात्रभर जागून लिहीलेली कविता दाखवत होती... म्हणाली,"मी काही तुमच्याइतकी चांगली लेखिका वा कवयित्री नाही. वाटलं ते लिहीलं..."

माझे जीवनगाणे

आयुष्यभर सगळ्यांची मने राखताना माझे गाणेच राहून गेले
आणि मग आलेल्या चिमुकल्यांचे करताना तर माझे गाणेच वाहून गेले
चिमुकल्यांसाठी स्वतःला घरटयातच कोंडून घेतले
त्यानंतर मन भरारी मारणेच विसरून गेले
चिमुकल्यांना मात्र भरारी मारता यायला लागल्यावर
'आपल्या आईला भरारीच मारता येत नाही' म्हणून हसू आले
आणि अशा तर्‍हेने माझ्या आयुष्याचे जीवनगाणेच संपून गेले
--- सौ. सुचित्रा सतिश वडके

'तिची कविता' आपली स्वप्नं आपल्या मुलांसाठी स्वप्नंच ठेउन मुलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडणार्‍या तमाम आईवर्गाची प्रातिनिधीक कविता वाटली मला... वाचता वाचता टचकन डोळ्यांत पाणी आलं.
आपण आईला किती गृहीत धरत जातो नं, विसरूनच जातो, तिचीही काही स्वप्नं असू शकतात, तिचीही काही मतं, आवडीनिवडी असू शकतात...

हळव्या आईचे प्रेमास्वरूप वात्सल्यसिंधू, संवेदनाशील रूप आढळते तसेच खंबीर आधारवडाचे रणरागिणी रूप पण आढळते. आपल्या फुलासारख्या मुलीला सासुरवास होतोय म्हटल्यावर मेणाहूनही मऊ असणारं आईचं ह्रदय वज्रादपि कठोर होतं. एखाद्या खंबीर ढालीसारखं मुलीचं रक्षण करण्यासाठी ती सज्ज होते.

माय म्हणजे काय असते
दुधावरची साय असते
लंगड्याचा पाय असते
एक हक्काचं ठिकाण असते... म्हणूनच कदाचित इंग्रजीतल्या "My"ला 'माय' म्हटलं जात असावं.


मम्मी, ममा, मॉम रूपं पालटली तरी आणि मुलांची माया काळानुरूप, गरजेनुरूप बदलली तरी आईची माया तीच राहते. म्हणून तर म्हणतात ना आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही. म्हणून श्रीकारानंतर शिकणे 'अ आ ई'

विशेष नोंद : आज हा लेख मदर्स डे निमित्त असला तरी मदर्स डे पुरताच मर्यादित नाहीये (म्हणून मुद्दामच मदर्स डे होऊन गेल्यावर देतेय) नाहीतर आज 'विश' करायचं आणि उद्या विषारी बोलायचं त्याला अर्थ नाही. जर आजपर्यंत आईला 'गृहीत' धरलं असेल तर आजपासूनतरी तिचा विचार करा... तुमचा विचार करता करता ती स्वतःचा विचार करणंच विसरून गेली असेल कदाचित....

ललित : पाऊस - आठवणींनी भिजलेला...

मायबोलीवर आणि मराठीमाया.कॉम मासिकामध्ये पूर्वप्रकाशितः मायबोलीबर इथे वाचता येईल.














पहिला पाऊस पहीली आठवण
पहीलं घरटं पहिलं अंगण...



कॉम्प्युटरवर मिलींद इंगळेचं गारवा लावलंय. बाहेर पावसाची रिपरिप ऐकू येतेय. कुंद गारवा अंगावर चिरपरिचित रोमांच उठवून जातोय. तोच तो मातीचा खरपूस सुगंध ह्रदयाच्या कप्प्यातील सुप्त आठवणींना हलवून हलवून जागं करतोय. काही आठवतंय...?


पहीली माती, पहीला गंध
पहिल्या मनात पहीलाच स्पंद...



आभाळाने गर्दगडद करड्या जांभळ्या गरत्या ढगांना प्रेमाने कवटाळलं आहे. खिडकीच्या धुरकटलेल्या तावदानांवरून पावसाचे चुकार थेंब ओघळताहेत. तारांना लोंबकळलेले काही थेंब रोप वे ने गवताच्या पात्यांवर अल्लद लँडींग करताहेत. तृणपात्यांवरून घरंगळत घसरगुंडी खेळताहेत. तर उरलेले काही पानांना क्षणभर बिलगून टपाटपा चिखलात उड्या मारत आहेत. काही आठवतंय...?



पहीलं आभाळ पहीलं रान
पहिल्या झोळीत पहीलंच पान...



दूर पलिकडे, आयांना चुकवून आलेली, अर्ध्या चड्डीवरची उघडी पोरे डबक्यात उड्या मारत आहेत. रस्त्याच्या कडेने तपकिरी ओघळ वाहू लागलेत. दोनचार गोजिरवाणी गोबरी पिल्ले त्या ओहोळात कागदी नावा सोडण्यात तल्लीन झालेत. होडी पुढेपुढेच चाललेय- काट्याकुट्यांतून मार्ग काढत, भोवर्‍यांना, खड्यांना चुकवत, दगडांना ठेचकाळत, पावसाचा मारा झेलत...

पलिकडे एकाच छत्रीत निम्मंशिम्मं भिजणारं एक तरूण जोडपं एकमेकांच्या डोळ्यांमधील आभाळात हरवलंय. मुलगी हळूच नाजूकसा गुलाबी तळवा पुढे करते- पावसाचे काही थेंब झेलण्यासाठी! तरूणाच्या डोळ्यांतून तिच्याविषयीच्या कौतुकाचा पूर ओसंडून वाहतोय. त्यांच्याकडे पाहत तुम्ही स्वतःच्याही नकळत गालातल्या गालात हसता. हळूच खिडकीबाहेर हात सरकवता. भुरभुरणार्‍या पावसाचे काही थेंब अलगद तळहातांवर झेलता. त्या थंडगार स्पर्शाने स्वतःशीच शहारता - काही आठवतंय?



पहीले तळहात, पहीलं प्रेम
पहिल्या सरीचा पहीलाच थेंब



भिजलेल्या स्वरांतील गाणं चालूच आहे. उत्साहाने तुम्ही कागदाच्या भेंडोळ्या उलगडता. पेन सरसावता__

"पाऊस म्हणजे हळव्या आठवणी, पाऊस म्हणजे रोमँटिक गाणी, पाऊस म्हणजे धमाल मस्ती, पाऊस म्हणजे गुलाबी सुस्ती. पाऊस म्हणजे मित्रांबरोबर निसर्गरम्य ठिकाणी ट्रेकिंगला जाणं, पाऊस म्हणजे आनंदतुषार अंगावर झेलत बिनधास्त नाचणं, झिम्माड पाऊसधारांच्या वर्षावात चिंब भिजत खरपूस भाजलेल्या गरमागरम खमंग मक्याच्या कणसाचा आस्वाद घेणं. खिडकीतून बाहेरचा पाऊस बघत वाफाळत्या कडक कॉफीचा घोट तोंडात घोळवणं...

पाऊस म्हणजे एकाच छत्रीत निम्मं निम्मं भिजणं किंवा मग घरातच गप्पांचा फड रंगवून समोरच्या डिशमधलं उरलेलं एकुलतं एक झणझणीत कुरकुरीत भजं सगळ्यांचा डोळा चुकवून हळूच तोंडात टाकणं. पाऊस म्हणजे __

अचानक तुम्ही थबकता - शब्दांचा पाऊस ओसरल्यासारखे! काही आठवतंय का?
काय लिहीणार बरं पावसाबद्दल? एवढे पावसाळे बघूनही पाऊस तुम्हाला कितीसा कळलाय? आणि समजला असेलच तर तो फक्त अनुभवायचा असतो; निशब्दपणे! हे ही समजलं असेलंच एव्हाना.

कागदाची भेंडोळी तुम्ही गुंडाळून ठेवता- काहीसा उमगलेला पाऊस तसाच अर्धवट ठेऊन!
समोरच्या टेबलावरचा वाफाळत्या चहाचा कप अजून तसाच पडून असतो. आल्याच्या घमघमत्या वासाच्या गर्द तपकिरी रंगाच्या चहाची तलफ आता निवून जाते, त्या कपातल्या गारगोट्या, साय पांघरलेल्या चहासारखीच!

तुम्ही सोफ्यावर रेलता- मान मागे टाकून आणि डोळे अलगद मिटून घेता. काही आठवतंय का?




ओझे मनीचे मनाला, आठवून त्या क्षणाला
सांगावे काय माझे मला, उगाच मनात बावरून



तुमच्या मनात विचारांचे काजळी मळभ दाटून येते. कित्येक दिवसांत असं निवांतपण अनुभवलेलं नाही, उपभोगलेलं नाहीय. नोकरीसाठी गावापासून दूर, आईवडीलांपासून - भावंडांपासून दूर, मित्रांपासून दूर आणि _ तिच्यापासूनही!

घड्याळाच्या काट्यांवर बदलणार्‍या ऋतूंची बदलती कूस जाणवलीही नाही. आईच्या हातच्या लसणीच्या झणझणीत फोडणीच्या आमटीची, शेवग्याच्या शेंगा आणि कोकमं टाकून केलेल्या वर साजूक तुपाची धार धरलेल्या गरमागरम पिठलंभाताची चव अजून जीभेवर रेंगाळतेय. बाबांबरोबरच्या, जगभराच्या सर्व विषयांना स्पर्शणार्‍या विविध गप्पा, वादविवाद.. रात्रीच्या जेवणाच्या वेळी सगळ्यांनी एकत्र केलेल्या दिलखुलास गप्पा, ते हास्यविनोद...



मित्रांबरोबरची कट्ट्यावरची धत्तींग, मुद्दाम छत्री विसरून तिच्या छत्रीत हळूच शिरण्यासाठीची धडपड, त्या छत्रीच्याच आडोश्याने मग हळूच चाखलेल्या पहील्या वहील्या चुंबनाची चव, तिच्या घरी हक्कानं सगळ्या कंपूबरोबर केलेली गप्पागोष्टींची धमाल, चहाच्या वाफाळत्या कपांनी केलेले चिअर्स आणि बश्यांमागून बशा रिकाम्या करत कुरकुरीत खमंग भज्यांचा उडवलेला फन्ना-

भुरभुरत्या पावसात बाईकवरून जाताना मागून घट्ट बिलगलेली तिची उबदार मिठी, हातात हात घेऊन तासनतास तिच्याबरोबर शेअर केलेली भविष्याची सप्तरंगी स्वप्ने- पावसाच्याच साक्षीने! इथे येताना तिच्या टपोर्‍या पाणीदार डोळ्यांमध्ये उतरून आलेलं अख्खंच्या अख्खं आभाळ आणि अशाच बेसावध हळव्या क्षणी गदगदून कोसळू लागलेला अश्रूंचा पाऊस- दोघांनाही चिंब भिजवणारा!
रोजच्या रोज फोन करण्याची ती वचने, आणाभाका - पावसाच्याच साक्षीने!

वर्ष सरत आलं..रोजचे संवाद अनियमित होऊ लागले - पावसासारखेच! नकळतपणे शरीराचं अंतर मनांमध्ये कधी उतरलं कळलंच नाही. मिटल्या पापण्यांमधून गालावर एक कोमट थेंब ओघळतो.



पाऊस हा असा झाला वेडा पिसा
पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज खुणा
डोळ्यांत थेंब पुन्हा



मिलींद इंगळेचा आर्त स्वर जुन्या आठवणींनी तुम्हाला पुन्हा भिजवून जातो.
तुम्ही पुन्हा हलकेच खिडकीबाहेर डोकावता. आताशा पावसाची रिपरिप थांबलेली असते; पूर्णपणे. ढगांच्या उबदार दुलईत गुरगुटून झोपलेला सूर्य, पांघरूण अलगद दूर सारून आळोखे पिळोखे देऊ लागलाय. भिजलेल्या उन्हाची पिवळसर कोवळी तिरीप हलकेच रांगत येते. झाडांच्या पानांना बिलगलेल्या थेंबांना, तृणपात्यांना ओठंगून लोंबणार्‍या थेंबांना, तारांवरून ओघळणार्‍या थेंबांच्या रांगांना एक आगळा चंदेरी झळाळीचा साज चढवते.

दूर क्षितीजावर सप्तरंगांची कमान दिमाखात उमटलेली दिसते. तुम्ही अधाशी नजरेनी तो नयनरम्य सोहळा गटागट पिऊन घेता. आकाश स्वच्छ आणि निरभ्र झालेले असते. स्वच्छ उल्हसित हवा तनामनात अनामिक सळसळता उत्साह फुंकते.




तुम्ही बाल्कनीत येऊन उभे राहता. रंगीबेरंगी छत्र्यांची गर्दी हळूहळू ओसरू लागते. रेनकोट सावरणारी गोजिरवाणी बछडी साचलेल्या पाण्यातून उड्या मारत खिदळत घराकडे परतत असतात. कुठेतरी मध्येच कॉलेजकुमारांचा आणि कन्यकांचा रेंगाळणारा थवा एकमेकांची चेष्टा मस्करी करत एकमेकांवर पाणी उडवत उत्फुल्लपणे बागडत चाललेला असतो. एका कॉलेजकन्येच्या डोळ्यांची भिरभिरती चुकार पाखरे तुमच्यावर स्थिर होतात. काहीसे ओशाळून ती नजर जमीनीकडे वळवते. तुम्ही गालातल्या गालात हसता, स्वतःशीच! काही आठवतंय का?




मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून...



आठवणींचा पाऊस बरसून गेलेला असतो. तुमच्या मनातील विचारांचं मळभ दूर झालेलं असतं. मनाचं आभाळ लख्ख झालेलं असतं. एक नवा उत्साह तनामनात भरून राहीलेला असतो. तुम्ही लगबगीने उठता. मघापासून निर्जीवपणे टेबलावर विसावलेल्या सुस्त मोबाईलची काही बटणे भराभर दाबून त्यात तुमच्या चैतन्याचा प्रवाह सोडता. समोरचा ओळखीचा, आधी अचंबीत आणि नंतर काहीसा आनंदीत झालेला कातर हळवा आवाज ऐकता आणि मनाचं आभाळ भरून गहीवरून येतं. प्रोजेक्ट्सच्या आणि कामाच्या अतिवर्षावाने भिजलेले पंख घट्ट मिटून बसलेली बावरलेली संवादांची हळवी पाखरे या निवांतपणाच्या उबदार कोवळ्या उन्हात, भिजलेले पंख झटकत पुन्हा किलबिलू लागतात. खूपशा गोष्टी करायच्या असतात; याच पावसाळ्यात, पावसाच्याच साक्षीने!




पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्र चिंब भिजलेला..
विझवून चांदण्या सार्‍या, विझलेला शांत निजलेला!



सौमित्रच्या गारवाच्या काही निसटत्या ओळी पुन्हा कानात घुमतात. तुम्ही पुन्हा सोफ्यावर लवंडता- आरामात मागे रेलून, मान मागे टाकून स्वप्नांच्या कुप्या पापण्यांच्या झाकणांनी अलगद बंद करून घेता. जाणवेल न जाणवेल असं अस्पष्ट हसू ओठांवर रेंगाळतं...


आता... काही ठरवताय का?

अरे संसार संसार : १. भांडा सौख्यभरे!

नवरा-बायकोचं नातं हे तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना असंच असतं... प्रत्येक नवर्‍याला बायको म्हणजे असून अडचण नसून खोळंबा वाटते. कधी आंबटगोड भांडणे, कधी विरह, कधी लाघववेळा... या नात्याचे असंख्य पदर... काही मला अनुभवायला मिळाले... तुमच्यासोबत शेअर करते *(अर्थात नवर्‍याची संमती घेऊनच )

मी हा लेख सुमारे वर्षभरापूर्वी लिहीला होता. मायबोलीवर पूर्वप्रकाशित, इथे वाचता येईल. लेखमालिका करायचा विचार वगैरे नाही केलाय अजून. पण करावी लागेल असं दिसतंय एकंदरीत... कारण नवरा बायकोचं नातं सात जन्मांचं! एका लेखात संपणारं थोडंच असतं? सध्या भांडणापासून सुरूवात... कारण घरोघरी...

अरे संसार संसार : १. भांडा सौख्यभरे!


"हे असं किती दिवस चालू राहणार आहे?"तो करवादला पण पुन्हा लगेच टप्पोर्‍या काळ्याभोर पाणीदार डोळ्यांमध्ये गाईचे करूण भाव उतरले. "का असं वागतेस राणू? कधीतरी सांग ना गं मनातलं... तुझ्या अशा गप्प बसण्याने मला किती त्रास होतो माहीतेय नं?"

मी क्षणभर अशा व्याकूळ डोळ्यांकडे बघीतलं. त्या आरस्पानी निरागस डोळ्यांतले प्रामाणिक व्याकूळ भाव मलाही अस्वस्थ करतात. क्षणभर वाटलं की त्याला अस्सं कुशीत ओढून घ्यावं आणि केसांतून अलगद हात फिरवत लहान बाळाप्रमाणे थोपटत राहावं_! पण - क्षणभरच! या नाटकीपणाने पुरूष बायकांना हातोहात फसवतात. त्यांना 'बायको' या प्राण्याची कमजोर नस बरोब्बर सापडलेली असते. डोळ्यांत थोड्डसं पाणी आणून नाकाने सुईंग सुईंग आवाज करत चेहर्‍यावर बापुडवाणे भाव पांघरले की बायका कशा लोण्यासारख्या वितळतात.

चेहरा जमेल तितका निर्विकार ठेऊन "मला अज्जिबात वेळ नाही तुझ्याकडे बघायलासुद्धा! असं एक एक शब्द रागामध्ये खमंग घोळून चावत चावत ठणकावून त्याला सांगितलं आणि हातातला चहाचा कप आणि बिस्कीटांची डिश टेबलावर आपटून स्वयंपाकघरात वळले.

नवर्‍याबरोबरच माझ्या हातातली भांडीही निमुटपणे माझा राग सहन करत होती. (मी भांड्यांची आदळआपट करत होते आणि नवरोजी मात्र मी दिलेला कमी साखरेचा चहा चकार शब्द न काढता निमुटपणे ढोसत होते. "यात साखर अंमळ कमीच झालेय" या वाक्याच्या हवनाने आमचा क्रोधहोम कसा धडधडतो याचा पूर्वेतिहास त्यास ज्ञात होताच.)

हल्ली अधूनमधून हे असंच होतं बर्‍याचदा. मी तरी काय करणार बरं? रात्रीचं सगळं आवरून झोपायला नेहमीच साडेअकरा बारा होतात. त्यापुढे मग माझा नवरा लाडात येतो-'केसांतून हातच फिरव गं, पायच दुखतायत गं, डोकंच चेपून दे गं...' थोडे दिवस केलं सगळं कौतुकाने, पण रोजरोजच काय? मीपण दमूनथकून येते. आल्यावर जेवणखावण, स्वयंपाक - घरातील आटपाआटपी (हल्ली बर्‍याचवेळेस आपटाआपटी चालायची ती वेगळी गोष्ट!) करेपर्यंत अंग नुसतं मोडून जायचं.

सक्काळी भल्यापहाटे साडेपाचला (!) मोबाईलचा गजर ठणाणा (हो! ठणाणाच! पाच-साडेपाच तासांच्या एवढ्याशा साखरझोपेतून निर्दयीपणे उठवणारा आवाज कितीही किणकिणणारा नाजूक असला तरी तो ठ्णाणाच वाटतो, विचारा तमाम स्त्रीवर्गाला..) तर हा तो गजर ठणाणा ओरडतो आणि आमचा दिवस सेकंदकाट्यावर पळू लागतो.

सूरी अन भाजीशी झगडत, अधे मधे बोटं कापत, पेंगुळल्या डोळ्यांनी चिरलेली भाजी फोडणीला टाकत मी फ्रीजमधला कणकेचा डबा काढून भराभर चपात्यांसाठीचे गोळे करायला घेते. "तुझ्या चपात्या आईएवढ्या पातळ होत नाहीत.." नवर्‍यानं नाक मुरडत म्हटलेलं वाक्य मनःपटलावर क्षणात चमकून जाते आणि निदान आजतरी मस्तपैकी पातळ लुसलुशीत चपात्या करून दाखवायच्या असा मी चंग बांधते. पण माझ्याकडे चपात्यांचं पातळ आणि लुसलुशीत यांचं कायम व्यस्त प्रमाण का असतं कुणास ठाऊक! असो.

मध्येच चहाचं आधण ठेवणं आणि दूध तापवणं या लहानसहान पण अतिमहत्वाच्या प्रक्रिया आल्याच. माझ्या नवर्‍याला दात घासायच्या आधी चहा लागतो. "कसली मेली घाणेरडी सवय!" असं सवयीने दहावेळा करवादूनही "पेस्टच्या टेस्टमुळे मला चहाची चवच लागत नाही", या युक्तीवादापुढे मी बर्‍याचदा माघार घेतली आहे. आणि मग उतू जाणारं दूध, करपणारी चपाती आणि तळाला लागणारी भाजी अशा त्रिवेणी संगमावरच्या दिव्यांशी झगडताना मी मध्येच घड्याळाचे काटे चाचपडते.

इकडे आमचे नवरोजी मोबाईलचा गजर snoozवर टाकत कुसा बदलत असतात. अस्साSSS राग येतो नं... पण तो त्या भाजीच्या फोडणीत मिसळून जास्त खमंग होतो. राग जास्तच झाला की करपते फोडणी कधी कधी आणि भाजीच्या जळकट वासाने नवरोजींची झोप चाळवते. "अरे आमच्यावरचा राग त्या बिच्यार्‍या भाजीवर का बरे?" नवरोजी खवटपणे विचारतात. (त्यांना भाजीपेक्षा जीभेची अन पोटाची जास्त काळजी असते...)

मी मध्येच धावत जाऊन अंघोळीचे गरम पाणी चालू करते आणि गजराच्या घ्ड्याळाशी स्पर्धा करेल अशा कर्कश्यपणे ओरडते, "उठा आताSSS सव्वासहा वाजून गेले..." नवरा बिचारा दचकून (माझ्या कर्कश्य आवाजाने घाबरून) धडपडत उठतो आणि टॉवेल खांद्यावर टाकून बाथरूममध्ये घुसतो. रात्रीचे नवर्‍याच्या मिठीत विरघळणारे गुलाबी प्रसंग हलकेच माझ्या डोळ्यांपुढून रांगत जातात्.... "दमतेस ना राणी फार! मी ना उद्यापासून लवकर उठत जाईन. बादल्या पाण्याने भरून ठेवेन. भांडी पुसून फळ्यांवर लावेन. जमलंच तर देवाला दिवा बिवा पण लावेन हं ( !) मला जमण्यासारखी छोटी छोटी सगळी कामं मी करेन हा बाबू! (कित्ती गुणाचा बाई माझा नवरा!) गरम पिझ्झ्यावर पडलेल्या चीझसारखी वितळून मी नवर्‍याला आणखीनच प्रेमाने बिलगते. पण सकाळी त्या रात्रीच्या गुलाबी आश्वासनांचा मागमूसही शिल्लक उरलेला नसतो.

सेंटचे फवारे उडवून, केसांना सुगंधी क्रीम चोपडून नवरोजींचं साग्रसंगीत सजून होईपर्यंत मी त्यांच्या दप्तरातला (!) डबा काढून घासून पुसून (डबासाद्धा घासायला देता येत नाही असं सवयीने करवादून) डबा भरून, चहा - पाणी - बिस्कीटे असा सारा सरंजाम जय्यत तयार करून पुढची आवराआवर करण्यासाठी माझ्या कार्यक्षेत्राकडे वळणार एवढ्यात _ "इथे ये ना गं जानूSS" अशा नवर्‍याच्या विरघळणार्‍या लाडीक हाकेने मी पिसासारखी हलकी होते. (आता हे वाक्य वाचून माझा नवरा सातमजली गडगडाट करत खिंकाळेल ती वेगळी गोष्ट! त्याच्या मते 'मी पिसासारखी हलकी' ही अतिशयोक्तीलाही पुरून उरणारी बाब आहे. असो बापडी! पण नवर्‍याच्या मधाळ शब्दांनी रागबिग विसरून पिसासारखं तरंगायला 'बायकोच' व्हावं लागतं!)

चहा पिताना माझ्या नवर्‍याला दोन घटका मी शेजारी बसायला हवी असते. "अहाहा! कित्ती भाग्याची बाई! यात तक्रार करण्यासारखं काय आहे? बाकीच्या पुरूषांना तर पेप्रात डोकं खुपसून बसल्यावर ओ द्यायलाही सवड नसते..." वगैरे वगैरे हेवामिश्रीत बोल गुलालासारखे हवेत उधळले जाणार हे वाटलंच होतं मला. शेजारी बसवून घेण्याचं निमित्त फक्त आणि फक्त प्रेमापोटीच असतं असं नव्हे हं! आपल्या वेंधळ्या बायकोला रोजच्या सगळ्या सूचना पढविण्यासाठी असतं. खोटं वाटतेय? "कपाटाची चावी सोबत घेऊन जा, विसरू नकोस. सगळ्या खिडक्या व्यवस्थित लावून जा. जाताना केराचा डबा न विसरता बाहेर ठेव. गॅस बंद करून जा. गीझर चेक कर बंद केला आहेस का. कुलूप दोनदा ओढून बघ. रात्री भाजी काय करणारेस? घाई करू नकोस. उशीर झाला तरी चालेल पण सगळं व्यवस्थित चेक करून जा. इ. इ." मी यांत्रीकपणे मान डोलावते. (पण अस्मादिकांनी आयत्या वेळी उशीर झाल्यामुळे गोंधळ करून ठेवलेला असतो हे चलाख वाचकांना सांगायलाच नको.) आणि मी मान डोलावली तरी हवा तो गोंधळ घालणारच अशी माझ्या इतर कुठल्याही बाबतीत नाही पण वेंधळेपणाबाबत खात्री असलेला माझा नवरा सारख्या सूचना देण्याचं सासूबाईंचं काम इमानेइतबारे रोज सकाळी मला शेजारी बसवून घेऊन पार पाडतो.

नवरोजी रोज माझ्या आधी घरी परततात आणि "तू घरात नसलीस नं की मला अज्जिबात करमत नाही" असं मधाळ आवाजात माझ्या मोबाईलवर ऐकवून समोर (त्याच्या) मावशीकडे टी. व्ही. बघायला पळतात. 'टी. व्ही. सध्यातरी नको डेड इन्व्हेस्टमेंट आहे आणि टी. व्ही. आणला की माझी कामं होणार नाहीत." या माझ्या दोन मुद्द्यांवर मात्र माझ्या नवर्‍याचं माझ्याशी अगदी एकमत होतं.

विरार लोकलमध्ये आठवड्याच्या भाज्यांच्या बोचक्याबरोबर शरीराचंही बोचकं धडपडत फेकायचं आणि घामाचे उबट कुबट चिकचिकीत ओघळ, धक्के, तारस्वरातील भांडणांचे किचकिच आवाज यांचाच एक भाग बनून, आपल्या इच्छीत स्थळी उतरणार्‍या लोंढ्यासोबत हे बोचकं पुन्हा उतरवून घ्यायचं. धावतपळत घर गाठायचं. हातपात धुवून, चेहर्‍यावर गार पाण्याचे हबके मारून, गाऊनचे चिलखत अंगावर चढवून आधी देवाला दिवाबत्ती करायची आणि रात्रीच्या जेवणाची नव्याने सुरूवात करताना स्वयंपाक घरातील शस्त्रास्त्रं परजायची... यातील तोच तोच रटाळपणा आणि कंटाळवाणी दमछाक, कंपनीच्या गाडीतून फुलासारखा अल्लद प्रवास करणार्‍या नवरेबुवांना कशी बरे कळणार? त्याच्या आरामदायी जीवनाबद्दल हेवा नाही पण बायको दमून येते, तिला आपल्या मदतीची गरज आहे याची जाणीव जरी त्याला झाली तरी खूप रिलॅक्स वाटते. मग कधीतरी त्याच्या गुलाबी मिठीची आणि "दमतेस ना राणू" या आश्वासक मधाळ शब्दांची प्रकर्षाने आठवण होते. आपल्या कष्टाची समोरच्याला कदर आहे यापेक्षा दुसरे मोठे सुख नसावे.

चॅनेल्सवर भराभर सर्फींग करूनही टि. व्ही. वर पाहण्याजोगं काहीच न सापडल्यानं नवरेबुवा कंटाळून घरी परततात. (रिमोट ही गोष्ट एका पुरूषाने अन्य पुरूषांसाठी लावलेला अत्यंत उपयुक्त शोध आहे, अन्यथा समोर डेली सोप्सचा कितीही रटाळखाना चालू असेल तरीही महीलावर्ग भक्तीभावाने त्या पाहत, त्यातील मठ्ठ बायकांचा कैवार घेत हळहळत असतात... आणि माझ्यासारख्या काहीजणी काहीही पाहायचं म्हणून जाहीरातीही तोंड उघडं टाकून पाहत असतात; त्यांना कधी पाहीलेय सर्फींग करताना? मी कधी कधी टि. व्ही पाहायला जाते त्याच्या मावशीकडे आणि त्याच्या अशा सर्फिंगने वैतागते... "नशीब टि.व्ही. ला तरी रिमोट आहे, कंटाळा आला तर चॅनेल बदलू शकतो.." असं काहीसं पुटपुटताना ऐकलेलं नवर्‍याला आणि मी तावातावाने भांडणार तितक्यात मावससासूबाईंचे आगमन झाल्याने एका चिमट्यावर अस्मादिकांना समाधान मानावे लागते.)

"जरा घरी थांबत जा नाSSS रोज रोज काय असतं मावशीकडे? मला नाही का बघावासा वाटत टि. व्ही., पण मी जाते...?" असे घासघासून गुळगुळीत झालेले प्रश्न तोंडातून क्वचित बाहेर निसटतात. त्यावर नवर्‍याची प्रतिक्रिया म्हणजे अस्मादिकांनी ऑफीसातून ओळखीवर आणलेल्या (पण वाचावयास कधीही सवड न मिळणार्‍या) पुस्तकांमध्ये तोंड खुपसण्यापलिकडे आणि क्वचित माझ्या रागावलेल्या चेहर्‍याकडे नजर जाताच केविलवाणे भाव चेहर्‍यावर पांघरून आणि मधाळ प्रेमाने डोळ्यांची बुधली तुडुंब भरून अस्मादिकांना मिठीत ओढण्यापलिकडे नसतात. पण या मधाच्या बुधल्यांमध्ये मनसोक्त डुंबायच्या आधी अस्मादिकांना स्वयंपाकाची लढाई लढवायची असते.

क्वचित केव्हातरी नवरेबुवा स्वयंपाकघरात डोकावतात आणि त्यांच्या आदर्श प्रिय व.पुं.पासून स्फूर्ती घेऊन तत्वज्ञानाचे डोस पाजायचे महान कार्य पार पाडू लागतात. (माझ्या नवर्‍याप्रमाणे व.पूं.चे निस्सीम भक्त असलेल्या सर्व पंख्यांची क्षमा मागते.) मग उकडून काढणार्‍या स्वयंपाकखोलीत घामाच्या चिकचिकीत धारांनी सचैल न्हालेली माझ्यामधली झांशीची राणी कशी बरं मागे हटेल? "मैं मेरी झांशी नहीं दूंगी |"च्या चालीवर मीही लढाईला सरसावते.

"लवकर येऊन साधा देवाचा दिवापण लावता येत नाही. पाणी ढोसायला दहावेळा फ्रीज उघडता येईल पण कुठल्या भाज्या संपल्यात ते जरा बघता येत नाही. सगळीकडे बायकोनेच मेलं पाहीजे. लवकर येऊन तंगड्या पसरून टी.व्ही. बघता येतो. बायको ट्रेनमधून कशी चिरडून येत असेल, एवढ्या गर्दीतून कसं आणत असेल ते काSSही नाही. कधी भाजीची एक जुडी आणायची माहीती नाही..."

तोंडाच्या पट्ट्यासोबत पातेली, झारे, चमचे या शस्त्रास्त्रांचा खणखणाट असतोच. माझ्या शेवटच्या वाक्यावर मात्र नवरा जोरदार प्रतिहल्ला चढवतो. "दादरला भाज्या स्वस्त मिळतात, मीच येताना आणत जाईन; असं तुच तर म्हणालेलीस." "तू भाज्या शिळ्या आणि जून आणतोस, पारखून घेत नाहीस" हा मुद्दा सोयिस्करपणे गाळण्यात आलेला असतो. जबाबदारीतून हात वर कसे करायचे आणि कुठल्या टोल्याला शाब्दिक मार्मिक प्रतिटोला हाणायचा या गोष्टी 'नवरा' या प्राण्याकडून शिकाव्यात.

राग आणि कीव (माझी, नवर्‍याची की आपटल्या गेलेल्या भांड्यांची कुणास ठाऊक!) या संमिश्र भावनेने कांदा-सूरीची मारामारी करायला मी सज्ज होते. ओघळणारे अश्रू हे कांद्यामुळे, अगतिकतेमुळे की माहेरच्या लोभस आठवणींमुळे आहेत हे ना तर मला कळत ना माझ्या बिच्चार्‍या (!) नवर्‍याला!

......................भांडणे सौख्यभरे चालूच राहतात.......................

"सुट्टीच्या दिवशीपण मीच पाणी भरायचं का?" अस्ताव्यस्त लोळणार्‍या नवर्‍याला चापटी मारून उठवण्याचा निष्फळ प्रयत्न होतो. पण कूस बदलत तो दोन्ही कानांवर उशीचे संरक्षक आवरण ओढून घेतो. पुढचा त्रागा करून आता काही फायदाच नसतो. माझ्याच तोंडाची वाफ दवडली जाणार. (बरोबर बोलले ना बाई वाक्प्रचार? "ह्यांच्या" कानावर गेलं - जाणारंच कानांवर! माझ्या चूका अशा एकाच काय पण शंभर उशींची आवरणे भेदून त्याच्या कानात शिरणार. तर ह्याच्या कानावर पडलं तर काम करण्यासाठी नाही पण माझ्या अज्ञानाची कीव करत गडगडाटी खिंकाळण्यासाठी आणि 'मराठी भाषा आणि मराठी माणसाचे मराठी भाषेविषयी अज्ञान आणि अनास्था' यावर लंबचवडं भाषण द्यायला नक्की जाग येईल. मराठी असल्याबद्दलचा त्याचा अभिमान वाखाणण्यासारखा आहे... दिलसे, दिमागसे, मनसे टिप्पीकल मराठी आहे तो! पण म्हणून का गरीब बिच्चार्‍या बायकोला असं सतत हिणवायचं का?)

अगतिकतेने आणि त्राग्याने नवर्‍याला गदागदा हलवून उठवलं आणि 'मला थोडीतरी मदत कर ना रे' असं काकुळतीने विनवलं तर "स्वयंपाकघरामध्ये मला कोणाचीही लुडबूड चालणार नाही, असं मला फार पूर्वीच 'कोणीतरी' ठणकावून सांगितलं आहे.." असं बचावात्मक वाक्य तोंडावर फेकून तो पुन्हा कूस बदलून झोपी जातो आणि आपणच हे वाक्य आवेशामध्ये बोलून गेल्याचं मान्य करण्यापलिकडे आणि स्वतःच्या गाढवपणाबद्दल चरफडण्यापलिकडे मी करू तरी काय शकते?

आणि मग - कधीतरी मात्र माझ्या हाती ब्रह्मास्त्र सापडतं - मौनाचं! कोणीसं म्हटलंय ना-'मौनं सर्वार्थम साधनम|' घरी आलेल्या नवर्‍याचं थंडपणे निर्विकार चेहर्‍याने स्वागत झालं की तो समजून जातो; काहीतरी बिनसलंय राणीसरकारांचं! तेवढा मात्र नवरा हा प्राणी फार चलाख असतो. बायकोचं कधी बिनसलंय आणि बिनसल्यावर काय उपाययोजना कराव्यात हे शिकायला त्याला कुठल्याही कोर्सेसची गरज लागत नाही. पण मुळात बायकोचं कशामुळे बिनसलंय हे काही त्या बापड्याला कधी कळत नाही आणि त्याच्या विनवण्यांकडे साफ दुर्लक्ष करून त्याला भंडावून सोडण्याचा खासा उपाय बायको हा प्राणी कधी चुकवत नाही.

"जानूSSS काय झालंय माझ्या सोनूला? बरं वाटत नाहीये का राणू?" असं नशील्या मधाळ आवाजात विचारून अवतीभवती बागडून हसवण्याचा निष्फळ प्रयत्न होतो. पण मी त्याची सगळी अस्त्रं 'निकामी' करून टाकते आणि मग समजूत काढता काढता कधी अनवधानानं 'अमकी-तमकी'च्या समजूतदारपणाचं उदाहरण या आणीबाणीच्या प्रसंगी काढलंच- तर मग जो क्षोभाचा डोंब उसळतो आणी इतक्या दिवसांचा कोंडलेला ज्वालामुखी उद्रेक होऊन अखंड पाझरू लागतो. (आणि मग नवर्‍याला बिचार्‍याला वाटते, गप्प होती तेच बरं होतं...)

कुठल्याही बाईशी तुलना होणं - त्याहीपेक्षा जास्त म्हणजे दुसर्‍या बाईचं कौतुक नवर्‍याच्या तोंडून ऐकावं लागणं यापेक्षा दुसरं दु:ख नसावं. रागाने अन दु:खाने मी थरथरत असते. जमदग्नीचा क्रोध डोळ्यांत उतरलेला असतो. पण मग अगतिकतेने फुस्सकन तो वितळून क्रोधाच्या ठिणग्यांची अश्रूंची फुले बनून कधी बरसू लागतात आणि नवर्‍याच्या मिठीत त्याला चिंब न्हाऊ कधी घालतात समजतच नाही.


रात्रीची गुलाबी गोंडस स्वप्ने पुन्हा ओल्या पापण्यांआडून रांगत सरकायला लागतात. आपण चिडचिड करत केलेला बेचव स्वयंपाक 'ठीक होता' म्हणत खालच्या मानेनं जेवणारा नवरा आठवतो. आपल्या क्रोधाग्नीने केलेल्या वाग्बाणांनी घायाळ होऊनसुद्धा चकार शब्द न काढणारा नवरा आठवतो. आपण आजारी पडल्यावर आठवणीने आणि जबरदस्तीने औषधं घ्यायला लावणारा नवरा आठवतो. खोकला झालेला असताना, गरमागरम हळद टाकलेलं ग्लासभर दूध हातात देऊन जबरदस्तीने प्यायला लावणारा नवरा आठवतो. 'खूप दमतेस नं राणू?' असं आपल्या कपाळावरचा घाम पुसत लाडीक विचारणा करणारा नवरा आठवतो. मजेमजेचे चेहरे करून अवतीभवती बागडणारा निरागस अल्लड नवरा आठवतो. रूसलेल्या बायकोला मनवण्यासाठी गरम गरम स्वादिष्ट सूपाने भरलेला वाडगा देणारा नवरा आठवतो आणी मी पुन्हा पिझ्झ्यावरच्या चीझसारखी वितळून त्याला घट्ट बिलगते.

'बाबापुता' करून माझी समजूत घालण्यात एकदाचा माझा नवरा यशस्वी होतो आणि खालच्या आवाजात हळूवारपणे हलकेच परवानगी मागतो,"जानू आजपासून ...... matches चालू होताहेत. मी जाऊ बघायला?" त्याच्या मधाळ डोळ्यांच्या बुधल्यांत आणि चेहर्‍यावरच्या निरागस केविलवाण्या भावांमध्ये विरघळून मी त्याला होकार कधी देऊन टाकते आणि हरणाच्या पाडसाच्या अल्लड उत्साहाने दौडत तो कधी गायब होतो समजतही नाही.

लग्नाच्या दिवशी थोरामोठ्यांनी नक्की काय बरं आशीर्वाद दिला होता-'नांदा सौख्यभरे' की 'भांडा सौख्यभरे' या घोळात पडत मी मात्र पुढच्या आवराआवरीला सरसावते.

......................शेवट??? ह्म्म्म न संपणारा!!!.......................

कथा: कोजागिरी


मायबोलीवर पूर्वप्रकाशितः मायबोलीबर इथे वाचता येईल.

खालील कथेतील सर्व पात्रे आणि घटना अंशतः काल्पनिक आहेत तरी ही पात्रे वा घटना आपल्यास आढळल्यास... आश्चर्य कसले? घरोघरी.............!
-----------------------------------------------------------------------------------

"आज आपण कोजागिरी सेलिब्रेट करणार आहोत." हातातल्या पर्सबरोबरच स्वतःला धाडकन सोफ्यावर झोकून देत आल्या आल्या तिने जाहीर केलं. टिव्ही कडे चष्म्याचे दोन आणि स्वतःचे दोन असे चार डोळे लावून बसलेल्या आणि एरवी भुकंप झाला असता तरी सिरीयलवरची नजर जरा इकडे-तिकडे न हलवणार्‍या सासूबाईंनी (चष्म्याचे दोन डोळे टिव्हीवरच रोखून ठेऊन) अलगद स्वतःचे दोन डोळे सुनेच्या सोफ्यावर अस्ताव्यस्त पसरलेल्या अवताराकडे वळवले... "माझीया प्रियालाSS" पार्श्वगायिकेच्या सुरात सूर मिसळून अनुप्रिया गुणगुणू लागली...

पाण्याचा ग्लास हातात घेऊन बाहेर आलेल्या श्रीने हसत हसत विचारले,"काय आज झाशीची राणी विरार मोहीम फत्ते करून आलेली दिसतेय..." टिव्हीवरचे चारही डोळे सिरीयल सोडून दोघांकडे वळले... आधीच अनुप्रियाच्या ऑफीसातून उशीरा येण्याबद्दल कुरकुरणार्‍या सा.बांच्या भव्य कपाळावर आपसूकच आठ्या उमटल्या. 'आता नवर्‍याने हातात पाण्याचा ग्लासही द्यायचा काय राणीसरकारांच्या! आता फक्त जेवण बनवून भरवणं बाकी ठेवलं असेल' असे काहीतरी छद्मी भाव चष्म्याआड उमटले.

"थॅन्क्स." घाईघाईने पाण्याचा मोठ्ठाला घोट घेत अनूची किलबील चालू झाली..."अर्रे काय ती गर्दी! कश्शा चढतात बायका...!!! श्वास घ्यायलापण जागा नसते माहीतेय! त्यातून त्या मिरारोड, दहीसर नी भाईंदरच्या रांगा... बायकांची धक्काबुक्की, कचकच..."
"अगं हो हो, श्वास घे आधी अनू, पाणी पी... कळलं लढाई जिंकून आलाय ते...!" श्रीने तिच्या डोक्यावर हलकेच थोपटत म्हटलं.. नवर्‍याच्या उबदार प्रेमामुळे अनूच्या डोळ्यात डोकावणारी स्निग्ध्तेची चमक समोरच्या चष्म्याआडचं तरतरीत नाक मुरडलं गेलेलं पाहून पटकन ओसरली.

आवंढा गिळत तिने पर्सच्या कप्प्यातून दूध मसाला मिक्स चं पाकीट काढलं. ओसरू जाणारी चमक पुन्हा डोळ्यात डोकवायला लागली.. श्रीपुढे तिने ते पाकीट लहान मुलीच्या उत्साहाने फडकावलं... "हे बघ, मस्त आटीव मसाला दूध करते आज.."

"डाळ करा म्हणावं आधी नीट...!" पलिकडचा पुटपुटता आवाज तिच्या सळसळत्या उत्साहाला बांध घालू पाहत होता. मनात उमटणार्‍या नैराश्याच्या ढगांना तिनं निग्रहानंच बाजूला लोटलं. आजचा दिवस तिला खासम खास बनवायचा होता. रोजचे प्रोजेक्ट्सचे टेन्शन्स, विरार लोकलचा जीवघेणा प्रवास, रोजच होणारा उशीर... ती अगदी त्रासून जायची. भरीला भर म्हणून सा.बां.च्या टोमण्यांचा डोळ्याला पाणी फोडणारा झणझणीत तडका असायचाच. नवरा बिचारा समजूतदार मिळाला होता. दमून आलेल्या बायकोला पाणी देण्यात त्याला अजिबात कमीपणा वाटायचा नाही, उलट आनंदच व्हायचा... एकदाच म्हटलेलं श्रीला अगदी डोळ्यात पाणी आणून, "श्री, ऑफीसात टेन्शन्स असतात रे, पुन्हा गाडीमध्ये मरणाची गर्दी! जीव अगदी मेटाकुटीला येतो.. तू लवकर येतोस, कंपनीच्या गाडीतून येतोस, तुला नाही कळणार रे कित्ती दगदग होते ती! घरी आल्यावर मलापण वाटतं रे अगदी गरमागरम चहाचा कप नको पण निदान पाण्याचा ग्लासतरी मिळावा!" आजतागायत ते बोलणं लक्षात ठेऊन श्री ती आल्या आल्या तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरायचा. त्याच्या काहीच हौशी पुरवता येत नाहीत, सणासुदीला काही चांगलं चुंगलं करून खायला घालता येत नाही (तशी मी काही अन्नपूर्णा नाहीय, पण अगदीच गिळवणार नाही असं बेचव काही बनवत नाही हं!), नाहीतर त्याला खाण्याची कसली आवड आहे! ते काही नाही, आजची कोजागिरी पौर्णिमा स्पेशल झालीच पाहीजे!

ती लगबगीने उठली, चेहर्‍यावर थंड पाण्याचे हबके मारून, हात्-पाय धुवून फ्रेश झाली. एकीकडे डाळ्-भाताचा कुकर चढवून दुसर्‍या गॅसवर दुध आटवत ठेवलं. "आत्ताच करून फ्रीजमध्ये ठेवते रे, मग मस्त थंडगार पिता येईलSS" तिने आतूनच ओरडून सांगितलं. "फ्रीजमध्ये ठेऊन प्यायला ते काय तुमचं कॉकटेल मॉकटेल का काय म्हणतात तस्लं कोल्ड्रिंक आहे??? चंद्राला नैवेद्य दाखवायचा असतो... तो काय दूध कोल्ड्रिंकचा दाखवणार? कोजागिर्‍या साजर्‍या करताहेत!" बाहेरच्या खोलीतून तडतडलेल्या फोडणीचा ठसका चांगलाच बसला. "चारही डोळे टिव्हीला चिकटलेले असले तरी कान मात्र मी काय बोलतेय त्याकडेच लागलेले असतात!" अनू कुरकुरली, पण तेवढ्यापुरतीच. तिला आज कुठल्याही कारणासाठी कोजागिरीच्या ठरवलेल्या प्रोग्रॅमचा आनंद हिरावून द्यायचा नव्हता, अगदी कोणामुळेच नव्हे! आजच तर तिचं ऑफीसमधल्या मैत्रीणींशी डिस्कशन झालेलं, 'असे छोटे छोटे आनंद वसूल करायचे, मग रोजच्या स्पर्धेत धावण्यासाठी बळ मिळतं वगैरे...'

लगबगीने किचनमधलं काम उरकलं... चपाती-भाजी तर सकाळीच केलेली होती डब्यासाठी. तसंपण रात्रीच्या जेवणात तिच्याशिवाय कोणालाच चपात्या लागत नाहीत, त्यामुळे आताचा वेळ तसा मोकळाच होता. ती लगबगीने हॉलमध्ये धावली. टिव्ही वर नवी सिरीयल लागली होती... 'लज्जा, लज्जा, लज्जा... हं गिरीजा ओक, बरी करते अ‍ॅक्टिंग, दिसतेपण फ्रेश. विषयही जरा वेगळा! काय मुर्ख आहे ही बया! सांगत का नाहीये सगळं मनातलं त्या इन्स्पेक्टरला? सगळं काय नेहमी त्यानेच शोधून काढायचं? कित्ती कळकळीने सांगत असतो, मी तुझा मित्र म्हणून करतोय हे सगळं... तिचंही बरोबर आहे म्हणा, एकदा विश्वासघात झाल्यावर दुसर्‍यावर एवढ्या पटकन कसा विश्वास टाकेल बरं!' अनूची मनातल्या मनात पण बडबड चालू होती. टिव्ही सिरीयल्स म्हणजे अगदी तिचा वीक पॉईंट! तसे तिचे बरेचसे वीक पॉईंट्स होते, जे वेळोवेळी सासूबाई वर्मावर बोट ठेऊन दाखवून द्यायची एकही संधी सोडायच्या नाहीत.

तीन शिट्ट्यांनंतर कुकरखालचा गॅस बंद करायला उठली तेव्हा न विसरता आटणार्‍या दुधाकडेही एक नजर टाकली तिने. खबरदारी म्हणून आत लांब दांड्याचा चमचाही टाकला होता तिने दूध ओतून जाऊ नये म्हणून. 'ठीक आहे, दहा मिनिटांनी पुन्हा एक फेरी!' तिने स्वतःलाच बजावत मनाशी म्हटलं

"अर्रे अमरप्रेम!" तिच्या उत्साहाने उतू गेलेल्या स्वरांनी विचलीत होऊन चष्म्याआडचा एक करडा दृष्टिक्षेप तिच्या दिशेने झेपावला, पण अनूच्या डोळ्यांची भिरभिरती पाखरे आता स्क्रीनवरच्या अ‍ॅडवर स्थिरावली होती... 'होSSओ ओ ओ सोन्याहून सोनसळी...' अनू अ‍ॅड आणि सिरियल्स बघण्यात अगदी तल्लीन होऊन गेलेली..

"अगं अनूSS, वास कसला येतोय? भात करपला काय??" श्रीने पुस्तक वाचता वाचता बेडरूम मधूनच ओरडून विचारले. "अगं बाईSS" अनू धडपडत उठली आणि थोडंस धसकूनच किचनकडे धाव घेतली. समोरच्या काळ्याधुस्स पातेल्याच्या बुडाशी सायीचा थर पांघरलेले तांबूस तपकिरी रंगाचे ओंजळभर दूध रटरटत होते. त्या करपलेल्या भांड्याकडे आश्चर्याने मोठ्ठाले डोळे रोखून बघता बघता अनूच्या टपोर्‍या डोळ्यांमध्ये हलके हलके आसवांची गर्दी जमली. सगळा उत्साह त्या करपलेल्या भांड्यात आटून गेला होता. सासूबाई आणि श्री तिच्या मागे येऊन उभे राहीले तरी तिला समजलं नाही. सात्विक संतापाची लाली तिच्या नाकाच्या शेंड्यावर पसरली. तिने एक जळजळीत दृष्टीक्षेप सासूबाईंकडे टाकला. "एरवी फोडणी जरी नेहमीपेक्षा जास्त तडतडली तरी यांच्या धारदार नाकाला लग्गेच झोंबते, मग आजचा करपट वास जाणवला नसेल का? नाही, सुनेच्या उत्साहावर पाणी टाकणं हाच तर आवडता उद्योग आहे ना यांचा. नाहीतरी आधीपासूनच मी यांच्या डोळ्यांत खुपत होती. माझ्या रूबाबदार फॉरेन रिटर्न मुलाला मुलगी कशी अनुरूप मिळाली पाहीजे. अनुरूप नाही मिळाली, फक्त अनू मिळाली! श्रीने माझ्यात काय बघितलंन कोण जाणे! सामान्य घरातली, सामान्य रूपाची जातीबाहेरची मुलगी आणलीन नं त्याने... जाऊ दे! यांच्यावर चिडून काय करू? मीच वेंधळी! आजच्या दिवस ती भिक्कारडी सिरीयल नसती बघितली असती तर काय मी मरणार होते? पण नाही! हे टिव्हीचं भूत बसलंय ना डोक्यावर! भोगा अनूबाई आपल्या कर्माची फळे!..." अनू मनातल्या मनात धुसफुसत होती.

श्रीने काही न बोलता पातेलं उचलून थंड पाण्याखाली धरलं आणि अनूच्या उत्साहाने उतू जाणार्‍या आटीव दूधाची रवानगी सिंकमधल्या खरकट्या भांड्यांच्या गर्दीत झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सासूबाई गप्पपणे टिव्ही रूमकडे वळल्या. "का? आता का? दूधासारखे आटले वाटते यांचे टोमणेपण!" अनू मनातच करवादली. हताशपणे तिने श्रीकडे पाहीले. श्रीने तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेऊन नजरेनेच तिला धीर दिला. आता सिरीयलच्या भानगडीत न पडता तिने निमूटपणे जेवणाची तयारी केली. अनू श्रीच्या ऑफीसातल्या गंमतींवर नेहमीप्रमाणे न खिदळता, एकही शब्द न बोलता, खालच्या मानेने पटापट घास गिळत होती. तिघांची जेवणे आटोपली तशी, अनूने भराभर भांडी आवरून, टेबल, ओटा पुसून गाद्या घातल्या आणि मांडीवर उशी ठेऊन आणि हाताच्या ओंजळीत उदास चेहरा खुपसून विचार करत बसली. सासूबाई बाहेर टिव्ही बघत होत्या. ५ मिनिटांच्या वॉकनंतर श्री परतला तेव्हा अनूच्या नर्व्हस चेहर्‍याकडे बघून समजला की प्रकरण गंभीर आहे आणि करूणरसाचा पूर येणार आहे.

"मी तुला कसलंच सुख नाही देऊ शकले ना रे श्री? कसले सणवार नाहीत, काही गोडधोड खायला करू शकत नाही. म्हणजे मला करायचं असतं रे पण बघ ना मग आजसारखं... तुझ्यासाठी पुरेसा वेळही देऊ शकत नाही. मी कित्ती बावळटासारखी वागते, अजून अल्लडपणा करते. वेंधळ्यासारखी वागते. तुला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं ना रे? तू माझ्याशी लग्न नको करायला हवं हो..." तिचे पुढचे शब्द हुंदक्यात विरून गेले. श्रीने हलकेच तिची हनुवटी वर करत तिच्या अश्रूंनी तुडुंब भरलेल्या डोळ्यांकडे टक लावून पाहीले. एक चुकार अश्रू तिच्या गालांशी सलगी करण्यासाठी लांबसडक पापण्यांशी झगडत होता, पण तिच्या पापण्या तिच्यासारख्याच हट्टी होत्या. मोठ्या निग्रहाने त्या अश्रूला त्यांनी थोपवून धरले होते. "लग्न नको करायला हवं होतं नाही, लग्न करायला नको होतं..." तिने २ मिनिटं त्याच्याकडे रोखून बघितलं आणि तो आपल्या बोलण्यातील व्याकरणाच्या चूका सुधारतोय नेहमीसारखाच हे लक्षात येताच स्वत:च्याही नकळत हायसं वाटून एक निश्वास सोडला. "तू पण ना श्री..." असं रडता रडता हसत पुटपुटून तिने हलकेच त्याच्या दंडावर एक चापटी मारली.

"पण बघ ना रे श्री, कोजागिरी पौर्णिमा तर अशीच गेली रे.. मी कित्ती मस्त रोमँटिक कल्पना सजवल्या होत्या रे. ऑफीसातून घरी येताना सहजच आकाशात लक्ष गेलं तर मस्त केशरी चंद्र! मग वाटलं मसालादूध देऊन चकीत करूया सगळ्यांना. सेलिब्रेशन पण होईल आणि... तर बघ ना कसचं काय! मी खरंच खूप वेंधळी आहे ना रे?"

"चांद मेरा दिल, चांदनी हो तुम... चांद से है दूर चांदनी कहाँ..." श्री ने गाण्यातूनच अनूच्या प्रश्नाला उत्तर दिले. "अरे मला चंद्राचं दर्शन झालं बरं... अशी काय बघतेस? तुझ्या डोळ्यांमध्ये बघ दोन चंद्र दिसताहेत... मी माझं प्रतिबिंब पडलंय ते सांगतोय... मग तुला काय वाटलं? तू??? हा हा..."

"काय रे श्री!" श्रीला पुन्हा एक चापट मिळाली. "हो आहेच मुळी तू माझा चांदोबा!" अनू श्रीला बिलगली. "ए एक गम्मत..!" काहीतरी आठवल्यासारखी धडपडत उठली आणि पर्समध्ये शोधाशोध करू लागली.."ह्म्म हे बघ!" हातातला कागद तिने श्रीपुढे फडकावला.
"काये हे?"
"अरे वाच ना... थांब हं मीच दाखवते वाचून... अरे मायबोलीवर तो सुकि आहे ना... सूर्यकिरण रे! अस्सा काय बघतोस? तो एंगेज्ड आहे आणि त्याला माहीतेय आय अ‍ॅम मॅरीड! लग्गेच रोखून बघायची गरज नाहीये... हा तर ऐक ना.. 'मला तुझा चंद्र व्हावंसं वाटतेय...' अरे कवितेचं नाव आहे, त्याने ना त्याच्या तिच्यासाठी लिहीलेली... कित्ती गोडंय कल्पना ना रे... 'मला तुझा चंद्र व्हावंसं वाटतंय...' व्वा...!!"

"गाण्यांच्या भेंड्या खेळून झाल्या असतील तर ते फ्रीजमध्ये आईसक्रीम करून ठेवलेय. जरा शोकेसमधले काचेचे बाऊल्स नी चमचे धुवून पुसून घ्या आणि त्यात आईस्क्रीम आणा. मला थोडंसंच द्या. घसा खवखवतोय कालपासून..." ओळखीचा आवाज नी स्वर असूनही ही ऑर्डर टिव्ही रूममधून आलेली आहे हे समजून घ्यायला अनूला काही क्षणांचा अवधी लागला. त्या सुखद धक्क्यातून सावरत तिने हळूच श्रीकडे पाहीले. डोळ्यांनीच 'काय मग, रूसवा गेला ना मघाचा? हॅप्पी??' असं विचारणार्‍या श्रीला एका लाजर्‍या हास्यातूनच प्रत्युत्तर मिळाले.

"आलेच" असं आनंदाने ओरडत अनूने फ्रिजरमधला आईसक्रीमचा डबा घाईघाईने काढला आणि "आई पण ना...!" असं म्हणत लगबगीने किचनमध्ये आपला मोर्चा वळवला."आता धडपडू नको हं, हळू.." तिच्या लगबगीकडे बघून सावधानतेचा इशारा द्यायला श्री विसरला नाही.
"चला आजची कोजागिरी स्पेशल होणारेय तर फायनली..." असं पुटपुटत श्री मजेत शीळ घालू लागला.
-----------------------------------------------------------------------------------


त्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात 'आईसक्रीम कसं दाखवणार चंद्राला नैवेद्य म्हणून?' हा प्रश्न अगदीच विसंगत आणि गौण असल्यामुळे उपस्थितच झाला नाही. आणि झालाही असता तरी त्याने उत्साह पुन्हा आटवण्यात रस कोणाला होता? नाहीतरी हे सण वगैरे असतातच कशाला? छोटे छोटे आनंदाचे क्षण साजरे करून या धकाधकीच्या आयुष्यात तात्पुरता विरंगुळा देण्यासाठी नं? आणि अनूच्या आईंना हे वेळेवर जाणवते हे काय थोडे आहे?

तर मग जशी यांची कोजागिरी उत्साहात आणि आनंदात गेली तशी तुम्हा आम्हा सर्वांची जावो.